लोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ

तुम्हाला कसलीही व्हिडिओ क्लिप पाहायची असेल तर तुम्ही काय करता. इंटरनेटवर जाऊन सरळ youtube.com असं टाईप करता. आणि तुम्हाला हवा असलेला व्हिडिओ पाहता. मग त्यामध्ये अख्खा सिनेमा असो की एखादा एमएमएस. किंवा एखाद्या नव्या, येऊ घातलेल्या सिनेमाचं गाणं किंवा प्रोमो पाहायचा असला तर तुमची पहिली पसंती असते यूट्यूब.

 (कृषिवल, मंगळवार 22 मे 2012)

यूट्यूबचा पसारा अफाट आहे. म्हणजे एका मिनिटाला यूट्यूबवर जगभरात 72 तासांचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड होतात. सर्व प्रकारची सचित्र अभिव्यक्ती तुम्हाला व्हिडिओवर पाहायला मिळते. सर्वात महत्वाचं यापैकी एक टक्काही व्हिडिओ यूट्यूबची मालकी असलेल्या गूगल किंवा स्वतः यूट्यूबकडून अपलोड केले जात नाहीत. तर यूट्यूबचे प्रेक्षक, जगभरातले सर्वसामान्य नेटिझन्स सातत्याने व्हिडिओ अपलोड करत असतात, पाहणारे एका क्लिकसरशी पाहत असतात.

 

यू ट्यूब सुद्धा एक सोशल नेटवर्किंगच आहे, जरा वेगळ्या प्रकारचं. इथे तुम्हाला जे काही अभिव्यक्त करायचं आहे, ते तुम्ही थेट व्हिडिओच्या माध्यमातून करता, हा व्हिडिओ कॉन्टेन्ट जगभरातल्या अगणित लोकांबरोबर शेअर करता. मग ते पाहणारे लोक त्यावर आपल्या प्रतिक्रिया देतात. त्यांना तो आवडला आणि इतरांनी पाहावसा वाटला तर शेअर करतात. शेअर करण्यासाठी गूगल प्लस किंवा फेसबुक किंवा ट्वीटर आहेतच आपल्या दिमतीला. सध्याच्या फेसबुक, ट्वीटर किंवा गूगल प्लस यापैकी कशाचाही वापर न करताही तुम्हाला यूट्यूब शेअर करण्याची संधी देतं. कारण आधी सांगितल्याप्रमाणे यूट्यूब हे स्वतः एक सोशल नेटवर्किंग आहे. फरक एवढाच बाकी सर्व नेटवर्किंग साईट्सवर जसं तुम्ही टेक्स्ट, लिंक किंवा फोटो अपलोड करता तसं इथे फक्त व्हिडिओ अपलोड करायचे असतात.

 

सरलेल्या दशकातला म्हणजे 2001 ते 2010 या दहा वर्षातला, सर्वाधिक क्रांतिकारी असं गॅझेट समजल्या गेलेल्या मोबाईल फोनमुळे प्रत्येकाच्या हातात व्हिडिओ कॅमेरा आलेला आहे, आणि इंटरनेट कनेक्शनही. त्यामुळे जवळ जवळ प्रत्येकजण यूट्यूबशी जोडला गेलेला आहे. एकुणातच काय तर यूट्यूब हे आज आपल्याला अजिबातच अपिरचित राहिलेलं नाही.        

 

हे सर्व असं विस्ताराने सांगायचं कारण म्हणजे यू ट्यूबचा काल (सोमवार) वाढदिवस झाला. आजपासून गूगलच्या यूट्यूबने आठव्या वर्षात पदार्पण केलंय. इनमिन फक्त सात वर्षात यूट्यूबने ही थक्क करून टाकणारी झेप घेतलीय. अर्थातच गूगल किंवा यूट्यूबने यामध्ये काहीच केलेलं नाही. जे काही केलेलं आहे ते सर्व तुमच्या माझ्यासारख्या जगभरातल्या शेकडो-लाखो नेटिझन्सनी…  यूट्यूबचं यश थक्क करून टाकणारं आहे, यूट्यूबच्या सात वर्षांच्या वाटचालीवर दृष्टीक्षेप टाकायचा असेल तर  You Tube’s 7Th Birthday हा व्हिडिओ नेटवर नक्की पाहा. या सात वर्षात यूट्यूबने नेमकं काय काय केलंय, याची कल्पना येऊ शकेल. बरं या सात वर्षातल्या वाटचालीचा धावता आढावा घ्यायचा तर काही भला मोठा ग्रंथ किंवा फुलफ्जेज सिनेमा पाहायची गरज नाही तर फक्त तुमच्या आयुष्यातली फक्त सव्वा दोन मिनिटे स्पेअर करा,

 

यूट्यूब डॉट कॉम हे डोमेन नेम रजिस्टर झालं 14 फेब्रुवारी 2005 या दिवशी. हा दिवस आपल्याकडे व्हॅलेन्टाईन म्हणून साजरा होत असल्यामुळे आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. मात्र यूट्यूब सर्वसामान्य नेटिझन्ससाठी खुलं झालं 21 मे 2005 रोजी म्हणजे आजपासून फक्त सात वर्षांपूर्वी. यूट्यूबवर जसे प्रोफेशनल्सचे व्हिडिओ आहेत, तसे तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी अपलोड केलेले अमॅच्युअर म्हणजे हौशी व्हिडिओही ढिगाने आहेत. काहीही दिसलं की काढायचा मोबाईल आणि करायचं शूट, मोबाईलवरून थेट यूट्यूबवर… अभिव्यक्तीचं एक माध्यम आणि व्यासपीठ यूट्यूबने जगभरातल्या सर्व नेटिझन्सना उपलब्ध करून दिलंय. यूट्यूबचा पसारा एवढा अफाट आहे की भारतात दोनवर्षांपूर्वी जेव्हा टीव्ही चॅनल्स आणि आयपीएल यांच्यात प्रक्षेपणावरून वाद निर्माण झाला तेव्हा आयपीएलने सर्व मॅचेस यूट्यूबवरून थेट प्रक्षेपित करायला सुरूवात केली होती. यूट्यूबवरून थेट प्रक्षेपण ही तशी अलीकडची बाब असली आणि तशी खर्चिकही असली तरी अशक्य कोटीतली नक्कीच नाही. आजही कित्येक लोकरूची वार्तापत्रासारखे कार्यक्रम किंवा बातमीपत्र बनविणारे आणि प्रक्षेपित करणाऱ्या टीव्ही चॅनेल्सचा प्रमुख स्त्रोत हा यूट्यूबच असतो. यूट्यूबचा व्हिडिओ क्लिपचा एक अथांग समुद्र आहे, त्यातून एखाद्या चॅनेल्सने कितीही ओंजळी भरून घेतल्या तरी यूट्यूबचा खजिना रिकामा होणार नाही.

 

यूट्यूबची सुरूवात ही अशीच रंजक घटनेतून झालीय. तुम्ही इंटरनेट सॅव्ही असाल तर तुम्हाला हे नक्कीच माहिती असेल. पेपालच्या तीन माजी कर्मचाऱ्यांना यूट्यूबची कल्पना सर्वात आधी सुचली. अतिशय व्यक्तिगत अशा गरजेतून. व्यक्तिगत म्हणजे अभिव्यक्त होण्याची अत्यंत खाजगी गरज, आपल्याला जे माहिती आहे, किंवा आपण जे काही अनुभवलंय ते इतरांना सांगण्याची गरज, इतरांना त्या अनुभवामध्ये सामावून घेण्याची गरज. अभिव्यक्तीच्या गरजेचं मूळही इथेच तर आहे. आपल्याला जे जे ठावे ते ते इतरांना सांगण्याची गरज हीच मानवाची सर्वात आदिम प्रेरणा आहे. त्यामधूनच आपल्याकडे रामायण-महाभारतासारखी महाकाव्ये लिहिली गेली, शतकानुशतकाच्या, पिढानपिढ्यांच्या संक्रमणानंतर मौखिक परंपरेतून आपल्यापर्यंत पोहोचली. प्रत्येक पिढी आपलं ज्ञान पुढच्या पिढीला देत राहिली. त्यामध्ये सातत्याने भर टाकत राहिली. हे मानव जातीचं आदिम तत्वज्ञान आजच्या सोशल नेटवर्किंगच्या यशाच्या मुळाशी आहे.

 

कॅड हर्ले, स्टीव चेन आणि जावेद करीम हे तिघे मित्र यूट्यूबचे जनक. दोन संगणक शास्त्राचे विद्यार्थी तर एक जण रचना शास्त्राचा म्हणजे डिझाईनचा. तिघेही पे पाल या बड्या ऑनलाईन अर्थव्यवहार करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी. या तिघांपैकी दोघांनी मिळून एक पार्टी केली, जावेद म्हणजे त्यांचा तिसरा मित्र त्या पार्टीला उपस्थित राहू शकला नाही. पण पार्टीचं शूट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी झालेला खटाटोप म्हणजे यूट्यूबचा जन्म. ही कहाणी तशी आता मीडियामध्ये चावून चोथा झालेली आहे. पण यूट्यूबरवर सर्वात पहिला अपलोड झालेला व्हिडिओ हा या तीन मित्रांच्या पार्टीचा नव्हता तर यूट्यूबचा सहसंस्थापक असलेल्या जावेद करीमने अपलोड केलेला होता. 23 एप्रिल 2005 मध्ये रात्री आठ वाजून 27 मिनिटांनी मी अड झू यूट्यूबवर अपलोड करण्यात आलं. जावेद या यूजरनेमनं हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला. सॅन दिएगो प्राणिसंग्रहालयातल्या एका हत्तीसमोर स्वतः जावेद करीम उभा असा हा व्हिडिओ होता. आणि हा पहिल्या व्हिडिओची लांबी होती फक्त 19 सेकंद. आजच्या तारखेला अंदाजे 81 लाखांपेक्षाही जास्त लोकांनी व्हिडिओ पाहिलाय.   

 

यूट्यूबने उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आजवर वेगवेगळ्या पद्धतीने झालाय. शेकडो विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी, अनेक मार्केटिंग कंपन्यांना आपल्या जाहिराती टीव्ही व्यक्तिरिक्त हव्या त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा राजकीय पक्षांना आपली भूमिका आपल्या मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी यूट्यूबचा वापर करून घेतलाय आणि अजूनही करत आहेत. यापुढेही अव्याहतपणे करत राहतील. कारण हा लोकांनी लोकांसाठी चालविलेला लोकांचा ज्ञानयज्ञ आहे.   

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: