जेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…

फेसबुकवर टाईमपास करणं तसं आपल्याकडे नवीन नाहीय. फेसबुक आता आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनलंय. कृषिवलच्या मंगळवारसाठीच्या लेखासाठी काही तपशील अभ्यासत असताना एका बातमीने लक्ष वेधून घेतलं, तशी बातमी जुनी आहे, मात्र मला मराठी पेपरात कुठे पाहायला मिळाली नाही. कदाचित तुम्हाला माहिती असेल… पण फेसबुकचे विधायक उपयोग किती लोकविलक्षण असू शकतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं.

{दैनिक कृषिवल (अलिबाग) मंगळवार, दिनांक 20 मार्च 2012}

krushival

मंगळवारसाठीच्या लेखाचा विषय शोधत असताना अचानक फेसबुकच्या भारतातील प्रमुख कीर्तिगा रेड्डी यांच्या बातमीकडे… कीर्तिगा रेड्डी यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये इंटरनेट क्रांती संदर्भातील आपले विचार स्पष्ट केले. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हचं हे अकरावं वर्ष आहे. देशविदेशातले तज्ज्ञ-जाणकार यासाठी भारतात जमतात. आपापल्या विषयावर चर्चासत्रे होतात. तर या कॉन्क्लेव्हमधील माझं  लक्ष वेधून घेणारी बातमी होती, इंटरनेट आणि जीडीपी… म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्नाची… यावर्षी आपला जीडीपी चांगलाच घसरलाय. अनेक अर्थतज्ज्ञांसाठी त्यासाठी काळजी व्यक्त केलीय. एक श्रेष्ठ अर्थतज्ज्ञ असलेल्या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी लवकरच आपला जीडीपी पुन्हा पहिल्या स्थानावर येईल, असा विश्वास व्यक्त केलाय. तर माझ्या नजरेस पडलेल्या बातमीमध्ये असा दावा करण्यात आला होता की, भारताच्या एकूण जीडीपीपैकी 3.2 टक्के हा इंटरनेटमुळे येतो. बातमीतला अंदाज म्हणा की आकडेवारी म्हणा ही गूगलची म्हणजे गूगलच्या भारतातील प्रमुखांनी दिलेली होती. राजन आनंदन हे भारतातील गूगलचे प्रमुख. भारतात गूगलचं कार्यालय प्रामुख्याने त्याचं मार्केटिग सेक्शन सांभाळतं. त्यामुळे भारतातल्या व्यापारविषयक संधीविषयी केलेल्या अभ्यासातूनच ही आकडेवारी आलेली असणार… म्हणून मी उत्सुकतेनं वाचायला घेतली. त्यामध्येच फेसबुकच्या भारतातील प्रमुख कीर्तिगा रेड्डी यांच्याविषयी माहिती मिळाली. कीर्तिगा रेड्डी यांनी इंडिया कॉन्क्लेव्हमधल्या आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच भारतासारख्या देशात फेसबुक काय काय करू शकतो, याचा तपशील देण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून सांगलीच्या शेतकऱ्यांची गोष्ट सांगितली.

तेव्हाच मला माझ्या लेखाचा विषय सापडला. आणि सांगलीच्या हळद उत्पादक शेतकऱ्यांनी फेसबुकच्या माध्यमातून केलेल्या अभिनव आंदोलनाचा शोध घ्यायला सुरूवात केली. सांगलीच्या शेतकऱ्यांनी एवढं सक्षम आंदोलन केलं, मध्यस्थ आणि व्यापाऱ्यांच्या मुजोरीला न जुमानता शेतकऱ्यांचा बहिष्कार यशस्वी करून दाखवला आणि आपल्याला अगदी तासन्तास फेसबुकवर पडीक असूनही कल्पना नाही, याचं वैषम्य वाटलं. जगभरातल्या टेक्नॉलॉजी साईट्सनी ही बातमी पब्लिश केली होती. पण मला मात्र त्याचा गंधही नव्हता.

चला जरा उशीराने का होईना, माहिती तर मिळाली… त्यातच समाधान मानून पुढे अधिक माहिती घ्यायला सुरूवात केली.

फेसबुकच्या भारतातील प्रमुख कीर्तिगा रेड्डी यांनी इंडिया कॉन्क्लेव्हमध्ये दिलेल्या माहितीनुसार भारतात तब्बल फेसबुकचे पाच कोटी यूजर्स आहेत. या पाच कोटींपैकी अनेकजण तुमच्या-माझ्यासारखे तरूण असलो आणि शिक्षणासाठी म्हणा किंवा नोकरीच्या निमित्ताने शहरात राहत असलो तरी निमशहरे आणि ग्रामीण भागातही फेसबुकने केलेली संपर्कक्रांती काही अगदीच दुर्लक्ष करण्याजोगी नक्कीच नाहीय. आज फेसबुक खेडोपाडीही पोहचलं आहे, तसंच सांगलीच्या हळद उत्पादक शेतकऱ्यांपर्यंतही पोहोचलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांच्या हातात असलेल्या मोबाईलमधून ते फेसबुक अक्सेस करतात. सांगलीचा अतुल साळुंखे हा शेतकरीही त्यापैकीच एक.

मी फेसबुकवर सांगलीच्या अतुल सांळुखेचा शोध घेतला तर अतुल साळुंखे या नावाचे बरेचजण सापडले. आपल्याला हवा असलेला कोण तो शोध घेऊनही सापडला नाही. पण यासंदर्भातल्या अनेक बातम्यांमध्ये त्याचा एकच कोट आहे, वय वर्षे फक्त 31 असलेला आपल्या फोनमधून फेसबुक वापरतो. जानेवारी महिन्यात सांगली परिसरात हळदीचं भरघोस उत्पादन आलं. इतकं की आवक जास्त झाल्यामुळे हळदीचे भाव लगेचच जमिनीवर आले. शेतकऱ्यांकडे माल येतो तेव्हा त्याच्या भावांनी जमिनीवर येणं आणि शेतकऱ्यांकडून माल व्यापाऱ्यांकडे आला की पुन्हा भावांनी आकाशात जाऊन बसणं हे तसं काही आपल्याला नवीन नाही. पण शेतकरी यावर मार्ग कसा काढणार. शेतकऱ्यांना शेतात तयार झालेला माल फार दिवस घरात ठेवता येत नाही. या समस्येवर अनेकांनी पीएचड्या मिळवल्या आहेत, पण उपाय मात्र कुणालाही सांगता आलेला नाही. अतुल साळुखे या तरूण शेतकऱ्यांने मग सर्व शेतकऱ्यांना म्हणजे त्याच्या संपर्कात असलेल्या भारतभरातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना फेसबुकच्या माध्यमातून एकत्रित केलं, आणि त्यांना काही दिवसांसाठी हळदीच्या सौद्यांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं. अर्थात हा बहिष्कार फक्त सांगली किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता पूर्ण देशव्यापी असेल, तरच त्याचा काहीतरी परिणाम होईल… असंही त्याने पाहिलं. भारतातील हळद उत्पादक शेतकऱ्याचं फेसबुकवर एक पेजही आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आंध्र आणि तामिळनाडूचे शेतकरी आहेत. ते नियमितपणे हळदीसंदर्भातील माहिती आणि बातम्या अपडेट करतात. त्याचाही वापर अतुलने करून घेतला.

आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मार्केटमधील हळदीच्या सौद्यांवर बहिष्कार टाकायची योजनेच्या तयारीला सुरूवात झाली. भारतभरातल्या आणि सांगली जिल्ह्यातल्या हळद उत्पादक तालुक्यातील शेतकऱ्यांशी फेसबुक, ट्वीटर, मोबाईल फोन यामाध्यमातून संपर्क सुरू झाला. अनेक छोट्या शेतकऱ्यांच्या शंकांना योग्य उत्तरे देण्याचा प्रयत्न झाला. आंदोलन जास्त चिघळलं तर काय करायचं यावरही चर्चा झाली. बाजारातली हळदीची आवक कमी झाली तर आपोआपच भाव वाढतील, असा साधा हिशेब त्यामागे होता, तशी सर्वांनी होकार दिला तरी कितीजण प्रत्यक्षात या आंदोलनात सहभागी होतील, याचा निश्चित आकडा नव्हता कारण फेसबुकमुळे सर्वच व्हर्चुअल. आणि दोन शेतकऱ्यांमध्ये कमीतकमी पाच ते जास्तीत जास्त हजार किलोमीटरपेक्षाही जास्त अंतर… संपर्काचं माध्यम फक्त फेसबुक… तरीही जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे बावीस-तेवीस तारखेच्या आठवड्यात सांगलीच्या हळद बाजारात हळदीचं एकही खांड आलं नाही.

आपल्या अनुभवाबद्धल अतुल साळुंखे सांगतो, बाजारात सातत्याने हळदीचे भाव कोसळत होते, मग काय करायचं, सगळ्यांनाच प्रश्न सतावत होता, पण कोणाकडेच उत्तर नव्हतं. तसं जुन्या शालेय मित्रांचा शोध घेण्यासाठी फेसबुक आलेल्या अतुलने आपल्या माहितीतल्या आंध्रातल्या आणि तामिळनाडूतल्या तसंच फेसबुकवर असलेल्या हळद उत्पादक शेतकऱ्यांशी संपर्क केला. सातत्याने ढासळणारी हळदीची भाववाढ रोखायची कशी यावर अनेकांची मते जाणून घेतली. एक पर्याय पुढे आला. काही दिवस मार्केटमध्ये येणारी हळदीची आवक थांबवायची. पुन्हा हे फक्त सांगली किंवा महाराष्ट्रापुरतं करून भागणार नव्हतं तर तामिळनाडू आणि आंध्रातल्या शेतकऱ्यांनाही त्यामध्ये सहभागी करून घ्यायला पाहिजे. कारण हळदीच्या भावात सुधारणा होण्यासाठी संबंध भारतातून येणारी आवक काही काळासाठी थांबवणं गरजेचं होतं. फेसबुकच्याच माध्यमातून सुरूवात झाल्यावर अतुलने आटपाडीतल्या आपल्या सहकारी शेतकरी मित्रांशी चर्चा केली. सर्वांना कल्पना तर आवडली, पण मार्ग लगेच स्वीकारण्याजोगा नव्हता. कारण हळद मार्केटला नेली नाही तर रोजचा खर्च कसा भागणार… तरीही काही शेतकऱ्यांनी अतुलच्या कल्पनेला संमती दिली. साधारण आठवडाभरात सांगली जिल्ह्यातल्या तब्बल 25 हजार हळद उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश पोहोचवला गेला. त्यासाठीही फेसबुकचाच वापर झाला. फक्त सांगलीच नाही तर दक्षिणेतल्या शेतकऱ्यांनाही सौद्यांवर बहिष्कार घालण्याच्या आंदोलनात सहभागी करून घेतलं. आणि त्यानंतर उजाडलेल्या 22 जानेवारीला सांगलीच्या हळद बाजारातील हळदीचे सौदे ठप्प झाले. फेसबुकवरील संपर्क क्रांतीने हे यशस्वी करून दाखवलं होतं.

आवक वाढली मागणीचं प्रमाण लक्षात न घेता, व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन भाव पाडणं आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी हळद बाजारावर संघटीतपणे सौद्यांवर बहिष्कार टाकणं सांगलीला काही नवीन नाही. व्यापाऱ्यांच्या लबाडीवर यापूर्वीही शेतकऱ्यांनी संघटीतपणे लढा दिला आहे. पण त्यासाठीच्या तयारीला कित्येक महिन्यांचा काळ जावा लागायचा. पण इंटरनेट, फेसबुक, ट्वीटर आणि मोबाईल फोन यासारख्या संपर्कक्रांतीमुळे हे शक्य झालं फक्त दहा दिवसांमध्ये…

त्यानंतर पुन्हा फेसबुकवरच सल्लामसलत करून आणि सर्वांच्या विचार विनिमयाने पुन्हा हळद बाजारात आणली गेली तेव्हा हळदीचा भाव चार रूपये किलोवरून चांगला आठ रूपये किलोपर्यंत पोहोचला. म्हणजे शेतकऱ्यांच्या बहिष्कारामुळे त्यामध्ये दुपटीने वाढ झाली. शेतकऱ्यांच्या बहिष्काराचा हेतू सफलसुफळ झाला होता. याच आंदोलनाचा उल्लेख करून फेसबुकच्या भारतातील प्रमुख कीर्तिगा रेड्डी यांनी फेसबुक शेतकऱ्यांनाही कसं लाभदायक ठरतंय, हे इंडिया कॉन्क्लेव्हसाठी आलेल्या जगभरातल्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. फेसबुकच्या सक्सेस स्टोरी पाहायच्या हजारोंनी सापडतील, पण शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, लढ्यासाठी इतक्या समर्पकपणे त्याचा वापर होणारी उदाहरणे विरळच म्हणावी लागतील.

फेसबुकच्या मदतीने अतुल सांळुखे आणि त्यांच्या सहकारी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाविषयी शेतकरी संघटनेच्या रघुनाथदादा पाटील यांनाही अप्रुप वाटतं. शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अनेक लढे दिलेत. त्यांनाही या आंदोलनातून बरंच काही नवं शिकायला मिळालं.

कोणत्याही यशस्वी आंदोलनाच्या मुळाशी असतो तो संपर्क… माहितीची योग्य पद्धतीने होणारी देवाणघेवाण… आणि त्याचं नियोजन… केवळ माहितीचा अभाव किंवा योग्य निर्णय योग्य वेळेत योग्य ठिकाणी न पोहोचल्यामुळे कितीतरी आंदोलने फसलेली आहेत, नेमकी हीच उणीव इंटरननेटने भरून काढलीय. मग फक्त आंदोलनेच कशाला हवीत, शेतकऱ्यांना हवी असलेली माहिती, हवामानाचे अंदाज, नवनवे प्रयोग यासर्वांच्या बाबतीत सोशल नेटवर्किंग एक प्रभावी भूमिका बजावणार आहे. सांगलीच उदाहरण ही तर त्याचीच नांदी आहे.

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Join the Conversation

2 Comments

  1. अतिशय सुंदर लेख .. दुर्दैवाने म्हणावं लागतं की हा लेख वाचेपर्यंत मलाही या आंदोलनाची कल्पना नव्हती आणि मी फ़ेबुवर पडीक असतो. फ़ालतू बातम्या शेअर होत रोज फ़ेबुच्या भिंतीवर चिकटल्या असतात मात्र या अभिनव आंदोलनाला कोणीच शेअर केलं नाही याचं वाईट वाटतं . जालीय ताकतीची मला पूर्ण कल्पना आहे. अनेक महत्वाच्या विषयांवर आंतरजाल क्रांतीकारी भूमिका वठवू शकते हे पुन्हा या आंदोलनाने अधोरेखित केले. हा लेख मी फ़ेबुवर शेअर करतोय.

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: