कानामागून आला आणि तिखट झाला…

हे मोबाईल युग आहे, असं म्हणायची एक पद्धत आपल्याकडे आहे. म्हणजे प्रत्येक प्रमुख कालखंडाला त्या त्या काळातल्या प्रमुख घटनेनं ओळखण्याची एक पद्धत आपल्याकडे रूढ झालीय. म्हणजे आदीम युग, अश्म युग, लोह युग… असं. हे सर्व आपल्या उत्क्रांतीचे टप्पे… अगदी अर्वाचीन काळापुरतं बोलायचं तर विज्ञान युग, तंत्रज्ञान युग… जाहिरात युग… इंटरनेट युग असं कशालाही तुम्ही युग हा शब्द जोडू शकता. ज्यावेळी जो संदर्भ महत्त्वाचा वाटेल, ते युग तुमच्यासाठी आहे, असं खुशाल समजा… पुन्हा एक सोय अशी की तुम्हाला कोणी असा रेफरन्स दिल्यावर कशावरून हे विज्ञान युग किंवा तंत्रज्ञान युग किंवा जाहिरात युग असं विचारत नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या युगाचं असं नामकरण केल्यानंतर त्याचा प्रतिवाद करण्याच्या फारसं कुणी फंदात पडत नाही.

(कृषिवल, मंगळवार, दि. 5 मार्च 2012)

आपल्याकडे मोबाइल म्हणजे अवघड मराठीमध्ये भ्रमणध्वनी वापरायला सुरूवात झाली, ती १९९७-९८ च्या सुमारास… तशी कागदोपत्री सुरूवात तर १५ ऑगस्ट १९९५ ची आहे. १५ ऑगस्ट १९९५ ला दिल्लीमध्ये बिगर व्यावसायिक तत्त्वावर मोबाईल सेवेची सुरुवात झाली. पण, मोबाईल फोन राजधानीच्या कक्षा ओलांडून मुंबई- पुणे-नाशिकसारख्या ठिकाणी पोहोचायलाही तब्बल पाचेक वर्षे सहजच गेली. ऑगस्ट १९९५ ही सरकारी तारीख असली तरी नव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच मोबाईल युग सुरू झालं असं म्हणावं लागतं. म्हणजे २०००- २००१ पासून… पण तेव्हाही इनकमिंगसाठी कॉल पैसे मोजावे लागत. त्यावेळी अनेक मोठे समजले जाणारे लोकही (म्हणजे फक्त त्यांच्याकडे मोबाईल असायचा म्हणून ते मोठे) इनकमिंग कॉल पाहून मग लँडलाईनवरून रिप्लाय करताना दिसायचे. तसं हे मोबाईल पुराण म्हणजे ‘नमनाला घडाभर तेल’ असलेलं बरंच लांबलंय. ही मोबाइलची चर्चा आज एवढ्यासाठीच की उण्यापुर्‍या फक्त दहा वर्षात कानामागून आलेल्या आणि तिखट झालेल्या मोबाइलने आज बराच मोठा पल्ला गाठलाय. आज ३जीच्या जमान्यात २जी आणि १जी तर अश्मयुगीन वाटावे इतके जुने झालेत. विटकरीसारखे जड असलेले मोबाईल तर आता वस्तू संग्रहालयात ठेवावेत असे दुर्मिळ झालेत. कधीतरी फॉरवर्डस् मेलमधून मोबाइलमध्ये होत असलेल्या स्थित्यंतराचे फोटो पाहायला मिळालं की इतिहासात हरवल्यासारखं वाटतं. तसं पाहिलं तर, मोबाईलचा आपल्याकडचा इतिहास हा फक्त दहा ते बारा वर्षांचा… मोबाईलच्या आतापर्यंतच्या तिन्ही जनरेशन्स या दहा- बारा वर्षातल्याच आहेत.

या तीन जनरेशन्सपलिकडेही एक मोठी अचिव्हमेंट मोबाईल फोननी केलीय, ती म्हणजे सर्व प्रकारच्या संपर्क आणि संज्ञापन माध्यमांच्या एकत्रीकरणाची… मोबाइलवर फक्त एखाद्याशी बोलता यावं, कधीही कुठेही अशीच तुम्ही अपेक्षा बाळगत असाल, तर आताच्या युगात जगण्यासाठी तुम्ही लायकच नाहीत, अशी आजची पिढी नक्कीच म्हणेल. म्हणजे, तुमची इच्छा असो वा नसो, आज मोबाइलमध्ये चांगल्या पिक्सेलचा कॅमेरा, चांगल्या क्वॉलिटीचा व्हिडिओ प्लेअर, म्युझिक प्लेअर, रेडिओ, वेगवेगळ्या थ्रीडी गेम्स आणि इंटरनेट… त्यातही महत्त्वाचं म्हणजे फेसबुक आणि ट्वीटर तर अगदी जीवनावश्यक म्हणता येईल, एवढं महत्त्वाचं… असतंच असतं. अगदी अलिकडे आलेल्या एका सर्वेक्षणानेही यावर शिक्कामोर्तब केलंय. म्हणजे आपल्याकडे भारतात, मोबाईल फोननी टीव्हीसारख्या सशक्त माध्यमांवरही मात केलीय. अगदी आकडेवारीच्या भाषेत सांगायचं तर एकूण मोबाइलधारकांपैकी मोबाइलवर इंटरनेट अक्सेस करणार्‍यांचं प्रमाण मोठं आहे.

इनमोबी या मोबाईल अँड नेटवर्क कंपनीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जेवढा वेळ आपण मोबाइलचा वापर करतो, त्यापैकी ३३ टक्के वेळ हा इंटरनेट अक्सेस करण्यासाठी देतो. या वेळाने टीव्हीवरही मात केलीय. कारण टीव्हीवरचे बहुतेक सर्व कार्यक्रम आता आपल्या हातातल्या मोबाइलवरही उपलब्ध झालेत. मग हवा कशाला लंबाचौडा टीव्ही सेट, त्यासाठी पुन्हा केबल वाल्याची कटकट आणि बरंच काही, या बरंच काहीमध्ये वेळ सर्वाधिक महत्त्वाचा आहे. कारण, तुम्हाला टीव्ही पाहायचा असेल तर तुम्ही घरी किंवा कार्यालयात असणं गरजेचं आहे. त्यासाठी संबंधित कार्यक्रमाच्या वेळेत तुम्ही या दोन्हीपैकी एका ठिकाणी असणं तर अत्यावश्यकच. त्यातही कार्यालयात तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे टीव्ही पाहता येणार नाही, म्हणजे मग घर हा एकच पर्याय उरतो. टीव्हीच्या नेमक्या याच त्रुटीवर मोबाईलने मात केलीय. मोबाईलवर तुम्ही टीव्हीवरील तुमच्या आवडत्या कार्यक्रमाचा आस्वाद कधीही, कुठेही घेऊ शकता. मोबाईल आणि इंटरनेट यांच्या समन्वयामुळेच हे शक्य झालंय. इनमोबी या मोबाईल अँड नेटवर्क कंपनीने तब्बल जगातल्या वेगवेगळ्या देशात केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती संकलीत केलीय. आपल्या भारतातही त्यांनी त्यासाठी सर्वेक्षण केलं. भारतात मोबाइलच्या प्रसाराचे निष्कर्ष पाहून थक्क व्हायला होतं.

भारतातील मोबाइलधारक दिवसभरातले तब्बल ९४ मिनिटे इंटरनेटसाठी वापरतात, यामध्ये मोबाइलवर बोलण्याचा तसंच एसएमएस करण्याचा वेळ समाविष्ट केलेला नाहीय. म्हणजे फक्त इंटरनेटसाठी मोबाइल किंवा मोबाइलवर इंटरनेट अक्सेस करणार्‍यांचीच ही आकडेवारी आहे. फक्त इंटरनेटच नाही, तर करमणुकीसाठीही टीव्हीऐवजी मोबाइलवर विसंबून राहणार्‍यांची संख्या मोठी आहे. पुन्हा आकडेवारीच आपल्या मदतीला येते. करमणुकीसाठी किंवा मनोरंजनासाठी मोबाइल वापरणा-‍यांनी टीव्हीला धोबीपछाड दिलाय. टीव्हीच्या साहाय्याने मनोरंजनाची गरज भागवणारे फक्त २६ टक्के आहेत तर मोबाईलवर मनोरंजनाची आणि करमणुकीची साधने अक्सेस करून आपली गरज भागवणार्‍यांचं प्रमाण टीव्हीपेक्षा कितीतरी जास्त म्हणजे ४१ टक्के आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीसाठी २० टक्के लोक टीव्हीवर विसंबून राहतात तर मोबाइल फोन हाताशी असल्यामुळे त्या माध्यमातून हवी ती माहिती मिळवणारे ५८ टक्के आहेत आणि कम्युनिकेशन म्हणजे खरं तर, त्यासाठीच मोबाइलचा जन्म झालाय. त्यामध्ये अर्थातच मोबाइलने या क्षेत्रातील आपले प्रतिस्पर्धी असलेल्या डेस्कटॉप आणि लॅपटॉपलाही मागे टाकलंय. डेस्कटॉपच्या माध्यमातून इ-मेल किंवा इंटरनेट टेलिफोनीच्या माध्यमातून संपर्क करण्यापेक्षा मोबाइलवरुन डायल करून किंवा एसएमएस करून किंवा अधिक विस्तृत असेल तर थेट इ-मेल करून एकमेकांपर्यंत माहिती पोहोचवणारे आहेत तब्बल ७२ टक्के आणि डेस्कटॉपच्या बाबतीत हा आकडा आहे फक्त १६ टक्के… फार कशाला इंटरनेट शॉपिंग अलिकडे चांगलं वाढलंय, पण मोबाइलने त्यालाही इथे धोबीपछाड दिलाय. डेस्कटॉप, लॅपटॉपच्या साहाय्याने शॉपिंग करणार्‍यांचं प्रमाण आहे १९ टक्के तर मोबाइलवरुन शॉपिंग करणारे आहेत, तब्बल २७ टक्के… कानामागून आला आणि तिखट झाला म्हणजे काय, याचा नेमका अर्थ इथे लागतो. अर्थातच, ही सर्व आकडेवारी व्यावसायिक म्हणजे धंद्याच्या हिशेबाने तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे या माहितीचा व्यावसायिक वापर होणार हे निश्‍चितच आहे, या माहितीवर या क्षेत्रात नव्याने किती गुंतवणूक येणार हे ठरवलं जाईल. म्हणूनच ही आकडेवारी एकाच कंपनीने जागतिक सर्वेक्षणातून तयार केली असली तरी सरसकटपणे दुर्लक्षून चालणार नाही. कारण, गुंतवणूकदार कधी अर्धवट माहितीवर पैसा गुंतवत नाहीत. त्यामुळे या क्षेत्रात व्यवसायाच्या संधी तर असणार हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे. सध्याचं युग हे मोबाइल युग आहे, हे सुरुवातीला सांगितलं आणि सुरुवातीला त्याच्या भारतात रुजू होण्यापासूनचा धांडोळा घेतला तो यासाठी, म्हणजे आता टीव्ही की मोबाइल यामध्ये सरस कोण असं विचाराल तर मोबाइल असंच उत्तर द्यावं लागेल…

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: