फेसबुक : एक यश शेअर आणि कनेक्टचं…

It’s our birthday and we want to thank you for an amazing eight years. You continue to inspire us to provide a service that makes it easy for you to connect with the people and things you care about most.

माझ्या फेसबुक प्रोफाईलवर आलेलं हे फेजबुकचं ताजं स्टेटस… आज म्हणजे शनिवार 4 फेब्रुवारीचं… चार फेब्रुवारी हा फेसबुकचा बर्थ डे… आजचं वय म्हणाल तर फक्त आठ वर्षे… आठवर्षांपूर्वी म्हणजे 2004 मध्ये आजच्याच दिवशी फेसबुकचा जन्म झाला.

(दै. कृषिवल, मंगळवार 07/02/2012)

आपला आठवा वाढदिवस सेलिब्रेट करताना फेसबुकने समस्त फेसबुक यूजर्सचे आभार तर मानलेच आहेत, शिवाय आज फेसबुक जे काही आहे, ते सर्व यश हा यूजर्समुळेच शक्य झाल्याचं विनम्रपणे फेसबुकने आपल्या ऑफिशियल पेजवर स्पष्ट केलंय. आज फेसबुक ही फक्त एक सोशल नेटवर्किंग साईटच राहिलेली नाही. तर इंटरनेटच्या क्षेत्रातली एक बडी कंपनी म्हणूनही उदयाला आलीय. लवकरच त्यांचा आयपीओही बाजारात येतोय. अमेरिकेतल्या गुंतवणूकदारांमध्ये सध्या फेसबुकचा आयपीओ ही एक सर्वात मोठी घटना आहे. हा आयपीओ फेसबुकचं बाजारमूल्य तर वाढवणारच आहे, शिवाय त्याच्या अनेक गुंतवणूकदारांना आणि वेगवेगळ्या लहानमोठ्या भागधारकांनाही भरभरून मोबदला मिळणार आहे.

आपल्याकडे लक्ष्मीला म्हणजे आर्थिक संपत्तीला चंचल म्हटलं गेलंय. आपल्याकडचे कित्येक पुराणग्रंथ याची साक्ष देतील. लक्ष्मी कायम कधी कुणाकडे निवास करत नाही, असं एक तत्वज्ञानही आपल्याकडे जाणीवपूर्वक रूजवलं गेलंय. आजच्या तरूणांच्या भाषेत सांगायचं तर लक्ष्मीला किंवा पैसा-अडका, धन-धान्यादी सुब्बतेला आपल्याकडे व्हर्चुअल असं स्टेटस दिलं गेलंय. पण तिकडे अमेरिकेत या व्हर्चुअल समजल्या जाणाऱ्या फेसबुकच्या उपक्रमाने जगातला सर्वाधिक श्रीमंत स्कूल ड्रॉप आऊट आपल्याला दिलाय. अर्थातच मार्क झुकरबर्गने जेव्हा फेसबुकचं पहिलं व्हर्जन तयार केलं तेव्हा काही तो श्रीमंत नव्हता. पण या व्हर्चुअल सोशल नेटवर्किंगनेच फेसबुक आणि झुकरबर्गच्या संस्थानाला एका जागतिक उद्योगसत्तेचा दर्जा मिळवून दिलाय.

फेसबुक हे लौकिकअर्थाने फक्त एक सोशल नेटवर्किंग असलं तरी आज त्यांची आर्थिक ताकद ही थक्क करायला लावणारी आहे. एरवी पहिल्या दिवसापासून शेअरिंग हा एकच मंत्र देणाऱ्या फेसबुकने आता आर्थिक आघाडीवरही म्हणजे खुल्या बाजारात आयपीओ विक्रीला काढण्याचा निर्णय घेऊन एक शेअरिंगच केलंय. म्हणजेच शेअरिग केल्याने फक्त ज्ञानच नाही तर संपत्तीमध्येही वाढ होते. याचं हे एक चांगलं उदाहरण ठरावं…

अगदी अलीकडे जेव्हा सोपा आणि पिपा या अँटी पायरसी विरोधी कायद्यांची चर्चा अमेरिकेत सुरू झाली तेव्हा फेसबुकच्या ऑफिशियल ब्लॉगवर झुकरबर्गने टाकलेली पोस्ट माहितीय. त्याची सुरूवातच आहे… I founded Facebook on the idea that people want to share and connect with people in their lives.

फेसबुकची सुरूवात आठ वर्षांपूर्वीची म्हणजे चार फेब्रुवारी 2004 ची असली तरी फेसबुक आपल्याकडे माहिती तसं अगदी अलीकडे झालंय. फार तर चारेक वर्षांपूर्वीपासून असेल. आजपासून पाच वर्षांपूर्वीपर्यंत तरी मी ऑर्कूटवर असल्याचं मला चांगलंच आठवतंय. तेव्हा फेसबुक फारसं किमान माझ्या पाहण्यात तरी आलं नव्हतं. फेसबुकने आपला ऑफिशियल ब्लॉग सुरू केला 2006 मध्ये.. फेसबुक ब्लॉगवरील पहिली पोस्ट आहे, 15 ऑगस्ट 2006 ची, आणि या ब्लॉगवरील मार्क झुकरबर्गची पहिली पोस्ट आहे, 30 ऑगस्ट 2006 ची…

आपल्या ऑफिशियल ब्लॉगवरील पहिल्या-वहिल्या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय की, जर तुम्ही वर्षभरापासून फेसबुक यूजर असाल तर तुम्हाला आठवत असेल की तेव्हा फेसबुक हे फक्त फेसबुक नव्हतं तर दी फेसबुक (thefacebook.com) होतं, त्याच्याही थोडं मागे गेलात तर फक्त तुमचा प्रोफाईल फोटो फेसबुकवर लावता येईल, एवढीच सोय होती. त्याच्याही मागे गेलात, तर फेसबुकवर सध्या जगप्रसिद्ध असलेली वॉलही नव्हती, फक्त टेक्स्ट अपलोड करता येईल असा बॉक्स होता.

म्हणजेच मार्क झुकरबर्गने आपल्या पहिल्या ब्लॉगपोस्टमध्ये फेसबुकच्या अगदी सुरवातीच्या म्हणजे पहिल्या दोन वर्षातल्या आठवणींना उजाळा दिला. या आठवणी नंतर कित्येक पटीने वाढलेल्या फेसबुक यूजर्सबरोबर शेअर केल्या. या आठवणींनी त्यांने जगभरातल्या लाखो लोकांना आपल्याशी कनेक्ट करून घेतलं.

पहिल्या दोन वर्षात फेसबुकने बरेच बदल केले, त्यानंतर फेसबुक आपल्यापर्यंत पोहोचलं म्हणजे भारतात रूजलं तेव्हा तर त्यामध्ये अमुलाग्र बदल झाले. आता तर टाईमलाईनच्या माध्यमातून आपलं आयुष्यच सार्वजनिक करणारं जगभरातल्या फेसबुक यूजर्सबरोबर शेअर करणारं अप्लिकेशन सर्वांसाठी उपलब्ध करून दिलंय. आजचं टाईमलाईनने सज्ज असलेलं फेसबुकच्या तुलनेत आठ वर्षांपूर्वी लाँच झालेलं फेसबुक म्हणजे आदिम काळातलंच फेसबुक असं आज आपल्यापैकी अनेकांना वाटेल. तरीही काळासोबत वेगवेगळे बदल फेसबुकने केले, हे बदलच त्यांच्या आजच्या यशाचं म्हणजे एक 100 अब्ज डॉलर्सची महाकाय कंपनी होण्याचं गमक असावं. फेसबुकने बदल अनेक केले तरी त्यांचा महत्वाचा गाभा मात्र शेअर आणि कनेक्ट हाच राहिला. हे तर आजही आपल्याला पटेल.

दोन वर्षांपूर्वी म्हणजे तसं अगदी अलीकडे (तारीखच सांगायची तर पाच फेब्रुवारी 2010) मार्क झुकरबर्गने फेसबुकचा सहावा वाढदिवस साजरा करताना, लिहिलेल्या पोस्टमध्ये फेसबुकचे 400 दशलक्ष यूजर असल्याचा दावा केला होता. त्याच्या वर्षभरापूर्वी म्हणजे 2009 मध्ये हा आकडा जेमतेम निम्म्यांपर्यंत म्हणजे 200 दशलक्ष असावा असंही त्यांने सांगितलंय. आपल्या या ब्लॉग पोस्टमध्येही झुकरबर्गने फेसबुकने जग जास्तीत जास्त ओपन आणि कनेक्टेड झाल्याचा दावा केला. खरं या दाव्यात काहीच अविर्भाव नव्हता. नम्रपणे वस्तुस्थितीची आकडेवारी सांगताना यापेक्षा वेगळ्या पद्धतीने कदाचितच सांगता येईल.

आज म्हणजे 2012 मध्ये फेसबुकचे जगभरात 800 दशलक्षपेक्षाही जास्त यूजर्स आहेत. आपण भारतात असलो म्हणून काय झालं, अमेरिकेखालोखाल फेसबुकचा वापर करणारांमध्ये आपलाच नंबर पहिला आहे. म्हणजे अमेरिकेत फेसबुकचे 152.5 दशलक्ष यूजर्स आहेत. त्यानंतर दुसरा नंबर आपलाच म्हणजे भारतीय फेसबुकर्सचा आहे. हा आकडा तसा अमेरिकी फेसबुकर्सच्या जवळपासही पोहोचणारा नसला तरी जगात दुसऱ्या क्रमांकाचा आहे. हा आकडा आहे, 43.5 दशलक्ष फेसबुकर्सचा. आपल्यानंतर क्रमांक लागतो तो इंडोनेशियाचा म्हणजे 43.1 दशलक्ष यूजर्सचा. त्यानंतरची आकडेवारी अशी : ब्राझील 37.9 आणि मेक्सिको 32 दशलक्ष…

फेसबुक म्हणजे फक्त एक जागतिक संपर्क क्रांती… जगातल्या सर्वांना कनेक्ट करणारी, एकमेकांची सुख-दुःख शेअर करणारी सोशल नेटवर्किंग असं गुडीगुडीच फक्त नाहीय. फक्त फेसबुकचा आयपीओ येत असताना म्हणजे कंपनीचं बाजारमूल्य फक्त एका संकल्पनेपासून ते एका अवाढव्य मल्टीबिलीयन कंपनीमध्ये होत असताना जे महत्वाचं वाटलं ते सर्व मनापासून शेअर करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न… बाकी फेसबुकचे ग्रे एरिया लिहायचे किंवा त्याचा किती जणांनी कशा पद्धतीने आपला अजेंडा राबवण्यासाठी प्रयत्न केलाय, हे एका स्वतंत्र संशोधनाचा विषय होईल. आता इंटरनेट आहे आणि सोशल नेटवर्किंग आहे म्हटल्यावर व्हायरस तर असणारच की…

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: