ट्वीटरची सेन्सॉरशिप!

“The open exchange of information can have a positive global impact … almost every country in the world agrees that freedom of expression is a human right. Many countries also agree that freedom of expression carries with it responsibilities and has limits.”

ही भूमिका आपण आपल्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकात शाळेतच शिकलेलो असतो. म्हणजे भारतात प्रत्येकाला घटनेनं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण आपल्याला अभिव्यक्तीचा अधिकार आहे, याचा अर्थ असा नसतो की आपण दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणावी किंवा आपल्या स्वातंत्र्याने एखाद्याच्या भावना दुखावतील किंवा भडकतील… हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जबाबदारीतच अपेक्षित आहे. हीच भूमिका आपण शाळांमधून शिकलेलो असतो. आता ट्वीटरने पुन्हा एकदा याचीच आठवण करून दिलीय.

(कृषिवल, मंगळवार, दिनांक 31 जानेवारी 2012)

ट्वीटरने आपली ही भूमिका समजून सांगण्यासाठी किंवा कंट्री स्पेसिफिक सेन्सॉरशिपचा निर्णय जाहीर करण्यासाठी लिहिलेल्या ऑफिशियल ब्लॉगचं शीर्षक आहे, Tweets still must flow तसं पाहिलं तर ट्वीटरचा हा ताजा ब्लॉग हा वर्षभरापूर्वीच्या ट्वीटच्या ब्लॉगचा सिक्वेल आहे. बरोबर गेल्यावर्षी ट्वीटरने म्हणजे 28 जानेवारीला ट्वीटरने The Tweets Must Flow हा ब्लॉग लिहिला होता. त्यामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.

पण यावरून सेन्सॉरशिप, निर्बंध, मुस्कटदाबी, प्रतिबंध याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय. ट्वीटरही जागतिक पातळीवर मोठं प्रतिनिधीत्व असलेली सोशल नेटवर्किंग साईट आहे. ट्वीटरने देशनिहाय म्हणजे कंट्री स्पेसिफिक सेन्सॉरशिप लागू करण्याचा निर्णय जाहीर केलाय. म्हणजे एखाद्या भारतीय नेटीझनने आपल्या ट्वीट अकाऊंटमधून एखादा मुद्दा ट्वीट केला आणि तो कपिल सिब्बल किंवा त्यांच्यासारख्या अजून कुणाला आवडला नाही आणि त्यांनी आक्षेप किंवा हरकत नोंदवली तर संबंधित आक्षेपार्ह ट्वीट भारतात कोणालाच दिसणार नाही. भारताबाहेर मात्र सर्वांना ट्वीट उपलब्ध असेल. तसंच पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशाच्या बाबतीत होईल.

 

ट्वीटरच्या अनेक यूजर्सना ट्वीटरने घेतलेला हा निर्णय मान्य नाही. त्यासाठीच त्यांनी एक संबंध ट्वीटर न वापरण्याचा इशारा दिलाय. म्हणजेच ट्वीटरवर एक दिवसासाठी बहिष्कार टाकण्याचा हा निर्णय आहे. एक दिवसाच्या बहिष्काराने काय साध्य होऊ शकतं, हे संबंध जगभराने काही दिवसांपूर्वीच सोपा आणि पिपाच्या बाबतीत पाहिलं आहे. विकीपीडियाने केलेल्या बंदमुळे अमेरिकी काँग्रेसला इंटरनेटवरील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अँटी पायरसी कायद्याच्या गोंडस नावाखाली निर्बंध आणण्याचा विचार त्तात्पुरता का होईना रद्द करावा लागला. आता हीच ताकद ट्वीटरचे यूजर्स ट्वीटरच्या बाबतीत वापरून पाहणार आहेत. पण त्यामध्ये कितपत यश मिळेल याविषयी साशंकता आहे. कारण आपल्याकडेही रिक्षावाल्यांचा संप यशस्वी होतो पण रिक्षावाल्यांच्या मुजोरीविरोधात प्रवाश्यांचा बंद सहसा यशस्वी होत नाही. कारण प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते. इथेही ट्वीटरच्या बाबतीत असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

ट्वीटर सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर असलं तरी त्यांना आपला विस्तार आणखी वाढवायचा आहे. त्यांच्यापुढे चीनसारखं मोठं मार्केट आहे. त्यांना तिथेही आपले हातपाय पसरायचे आहेत. चीनमधील सध्याच्या कम्युनिस्ट व्यवस्थेत गूगल, फेसबुक यांना स्थान नाही. म्हणजे तिथे फेसबुक किंवा गूगल… जगभरात जसं मोकळेपणे वापरता येत,  तसं चीनमध्ये होत नाही. म्हणजे त्यांना जे काही मत मांडायचं आहे, ते त्यांच्या देशाच्या कायदेशीर चौकटीतच मांडावं लागतं, नाही तर तो देशद्रोह ठरतो. शिवाय चीनी जनतेनं इंटरनेटवर व्यक्त केलेलं मत देशाची पोलादी भिंत ओलांडून बाहेर येतच नाही. जागतिक दबाब कितीही असला तरी चीन कुणालाही जुमानत नाही. त्यामुळेच आता अनेक पाश्चिमात्य देशांना चीनची बाजारपेठ हवीय, त्यासाठी ते चीनच्या अटीही मान्य करायला तयार आहेत. मग त्यांनी एकदा का चीनच्या अटी मान्य केल्या तर जगभरातल्या अन्य देशांनाही तोच नियम लागू करायला हवा. याचीच सुरूवात ट्वीट मस्ट फ्लो असं सांगत ट्वीटरने केलीय. आता त्यांचाच कित्ता अन्य सोशल नेटवर्किंग साईट्स करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

ट्वीटरच्या या अचानक बदललेल्या भूमिकेला आणखी एक पैलू आहे, तो म्हणजे गेल्या महिन्यात भारतात तब्बल 21 सोशल नेटवर्किंग साईट्सविरूद्ध सुरू असलेली न्यायालयीन लढाई. त्यापूर्वी केंद्र सरकारने सोशल नेटवर्किंगवाल्यांना आक्षेपार्ह कॉन्टेन्ट हटवण्याची सूचना केली होती. त्याला अर्थातच या कंपन्यांनी जुमानलं नाही. उलट त्याविरूद्ध एक प्रचंड लोकप्रक्षोभ पाहायला मिळाला. मग न्यायालयीन कारवाई सुरू झाली. न्यायालयाने सोशल नेटवर्किंग साईटसना आपल्या साईट्सवर असलेला आक्षेपार्ह आशय हटवण्यासाठी सहा फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिलीय. त्यापूर्वीच ट्वीटरने आपली भूमिका स्पष्ट केलीय. त्यामुळे कदाचित न्यायालयीन लढाईत त्यांची बाजू थोडीशी सशक्त होईलही… पण मूळ मुद्दा पहिल्याप्रमाणेच अनुत्तरीतच राहणार आहे. कारण गूगल सारख्या इंटरनेट कंपन्यांनी तर तेव्हाच आपल्या साईट्सवर असलेला आक्षेपार्ह मजकूर हटवण्यासाठी असमर्थता दर्शवली होती. त्यावेळी ट्वीटरने आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी गूगलच्या दाव्याने संतापलेल्या न्यायाधिशांनी चीनप्रमाणे भारतातही सोशल नेटवर्किंगवर निर्बंध लागू करण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी याची खूप चर्चा झाली. आता ट्वीटरने आपली बदललेली भूमिका जाहीर केली तरी त्यामागील कारणे ही प्रामुख्याने आर्थिक म्हणजे व्यावसायिक वृद्धीसाठीची आहेत. म्हणजेच जिथे व्यवसायवृद्धी हा मुद्दा येतो, किंवा आर्थिक हितसंबंध येतात, तिथे या इंटरनेट कंपन्या आपले हेतू उद्देश किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा उदात्त हेतू सोईस्करपणे गुंडाळून ठेवतात.

जगभरातले ट्वीपल याचाच निषेध करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना किती यश येईल ते माहिती नाही. पण यामुळे कदाचित एक इशारा तर नक्कीच जाईल. कारण ट्वीटर असो की फेसबुक असो, त्यांचं मूळ सूत्र हे यूजर जनरेटेड कॉन्टेन्ट हेच आहे. या साईट्स स्वतः कसल्याच कॉन्टेटची निर्मिती करत नाहीत, तर फक्त यूजर्सनी निर्माण केलेला कॉन्टेन्ट शेअर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतात. अभिव्यक्त होण्यासाठी एक माध्यम उपलब्ध करून देतात. मात्र असं व्यासपीठच जेव्हा एखाद्या महासत्तेपुढे किंवा दबाबापुढे झुकतं किंवा मान तुकवतं, लोकांचा विश्वास तुटू लागतो आणि मग लोकांनाही गळती लागते. ट्वीटरच्या बाबतीतही असंच काहीतरी घडू शकेल का?  काही झालं तरी लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणलेली पचत नाही. म्हणूनच कुणी काही म्हणायच्या आत, सोपा-पिपाने हात पोळलेल्या अमेरिकेनं अटकपूर्व जामीन घेत, ट्वीटरला सेन्सॉरशिपसंदर्भात काहीच डिक्टेट केलेलं नसल्याचा खुलासा केलाय. उलट ट्वीटर आपल्या नव्या धोरणाची अंमलबजावणी कशी करतं आणि त्याला ट्वीपल कसा प्रतिसाद देतात, हेही आपण पाहणार असल्याचं अमेरिकी प्रशासनाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलंय. पण कुणाही देशाने काहीही भूमिका घेतली तरी ट्वीपल्स काय कंट्री स्पेसिफिक सेन्सॉरशिपला कसं रिअक्ट करतात, हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

जाता जाता :

याच आठवड्यात पंतप्रधान कार्यालय ट्वीटरवर आलं, आणि त्यानंतर ट्वीटरने देशनिहाय सेन्सॉरशिप लागू करायचा निर्णय घेतलाय, हा खरं तर एक योगायोग…

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: