एका आवडलेल्या गजलेच्या काही ओळी आहेत… ही गजल गुलाम अली यांनी गायलीय…
बच्चों के छोटे हाथों को चांद-सितारे छूने दो,
चार किताबें पढ कर वो भी हम जैसे बन जाएंगे..।
बहुतेक निदा फाजली यांची ही गजल असावी… अजून शोध घेतलेला नाहीय. मला नेहमीच असं वाटत आलंय की म्हणजे मी या विचारांचा आहे असं म्हणा.. काहीही चालेल… जगात किंवा आपल्या मानवी आयुष्यात सर्वात अनैसर्गिक बाब कोणती तर ती आहे संस्कार… होय, संस्कार, मला सर्वाधिक अनैसर्गिक बाब वाटते.
दिल्ली हायकोर्टाने आजच एक निकाल दिलाय. प्री-स्कूल म्हणजे केजी वगैरेसारख्या नर्सरीमध्ये मुलांना दाखल करण्यासाठी कोणतं वय योग्य यासंदर्भातील हा निर्णय आहे. अर्थात हा निर्णय राजधानी दिल्लीतल्या खाजगी विनाअनुदानित नर्सरीपुरताच मर्यादित आहे. दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयात नवीन असं काहीच नाही, म्हणजे सध्या जो निकष सुरू आहे, तोच पुढे कायम ठेवायचा निर्णय न्यायालयाने घेतलाय. म्हणजे वयाची तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर पालकांना आपल्या पाल्यांना नर्सरीत दाखल करता येणार आहे.
मुळात कोर्टापुढे याचिका होती, ती नर्सरी प्रवेशाचं वय हे तीन ऐवजी चार असं करावं, यासाठी… त्यासाठी अशोक गांगुली समितीच्या अहवालाचा दाखल देण्यात आला होता. त्यांनी नर्सरी प्रवेशासाठी वयाची चार वर्षे पूर्ण केलेली असावीत, अशी शिफारस केली होती. मात्र कोर्टाने या शिफारसीला नामंजूर करतानाच सध्याच्या नियमांनाच पुढे सुरू ठेवण्याचा आदेश दिलाय. यासंदर्भात न्यायालयाने एक महत्वाची टीपणी केलीय. नर्सरी ही शिक्षणाचा अतिपूर्व प्राथमिक टप्पा आहे. म्हणजे प्रत्यक्ष शाळएत जाण्यापूर्वीचा… तिथे औपचारिक शिक्षण अपेक्षितच नाही. म्हणजे शिक्षणाचा फक्त एन्ट्री पॉईन्ट म्हणून नर्सरीकडे पाहावं, असं आवाहनही न्यायालयाने केलंय. तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर नर्सरीमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांना पूर्वप्राथमिक टप्प्यावर प्रवेश घेण्यासाठी पुन्हा नव्याने प्रवेश प्रक्रिया पार पाडावी लागू नये, असंही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलंय. म्हणजेच नर्सरी हे औपचारिक शिक्षण नाहीच असा स्पष्ट निर्वाळा या आदेशाने दिलाय.
पण प्रत्यक्षात या आदेशाचं किती पालन होईल, सांगता येणार नाही. कारण शिक्षण, मग ते अतिपूर्व प्राथमिक असो की उच्च शिक्षण असो, तो आधी सेवा, मग व्यवसाय आणि मग धंदा बनायला वेळ लागत नाही. फक्त घोकंपट्टी, घोकंपट्टी आणि घोकंपट्टी… बाकी काही नाही. मध्ये मध्ये कधी तरी संस्कार नावाच्या भंपक बाबींची फोडणी… शिक्षण अगदी नर्सरीपासून ते थेट विद्यापीठीय स्तरापर्यंत हा एक शुद्ध आर्थिक व्यवहार आहे. मग ते सरकारच्या पातळीवर असो की मंत्रालयातल्या बाबूंच्या पातळीवर असो की संस्थाचालकांच्या किंवा मग पालकांच्या… मुळात नर्सरीला प्रवेश देण्याचं वय तीन वर्षे असावं की चार यामागेही मोठं अर्थकारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण एक वर्ष आधी प्रवेश दिला तर आर्थिक उलाढालीत प्रचंड मोठी वाढ होते. शिक्षणाच्या नावावर हे अर्थकारण करणाऱ्यांना शिक्षण हा मूलभूत मानावाधिकार किंवा मोफत प्राथमिक शिक्षण, असल्या बाबी म्हणजे फक्त सरकारी योजनांमुळे होणारी करमणूक वाटते.
शिक्षण हा सुद्धा संस्काराचा एक भाग असल्यामुळे संस्काराविषयी जे माझं मत आहे, तेच शिक्षणाविषयी आहे… सर्वात अनैसर्गिक प्रकार… कारण शिक्षणाच्या नावावर चाललेल्या दुकानदाऱ्यांमध्ये, मग ती डीएड कॉलेज असो द्या की पूर्व प्राथमिक टप्प्यावरची नर्सऱ्या… फक्त पैसा हे एकमेव सत्य आहे.. कारण राज्यात दरवर्षी हजारोंच्या संख्येनं डीएडची पदविका घेऊन बाहेर पडणाऱ्या भावी शिक्षकांना डीएडला प्रवेश घेण्यापासून नोकरीत कायम होण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अर्थव्यवहाराची माहिती घेऊन पाहा. आज कुठल्याही अनुदानित शाळेत कायम नोकरी पदरात पाडून घ्यायची असेल तर किमान आठ ते अठरा लाखांपर्यंत रूपये मोजावे लागतात. त्यानंतर शिक्षणसेवक, माफ करा परिविक्षाधीन सहाय्यक शिक्षकपदाची तीन वर्षे पूर्ण करावी लागतात. मग तुम्हाला जो काही पूर्ण पगार मिळतो.
खलील जिब्रानची पालक आणि पाल्यांसंबंधीची एक अतिशय सुंदर कविता आहे, त्याचा मराठी अनुवाद खूप वर्षांपूर्वी वाचनात आला होता. नाशिकच्या अभिव्यक्तीच्या एका प्रकाशनात पाहायला मिळाला होता… तो असा आहे… (आता हा अनुवाद मी http://www.misalpav.com/ वरून घेतला आहे )
तुमची लेकरं ही “तुमची” नसतात.
जीवनाच्या अतितीव्र आकांक्षेची मुलं आणि मुली असतात ती
ती तुमच्याद्वारे जन्मतात तुमच्यापासून नाही,
आणि ती तुमच्याजवळ असली तरी तुम्ही मालक नसता त्यांचे.कदाचित तुम्ही त्यांना तुमचं प्रेम देऊ शकाल पण तुमचे विचार नाही देऊ शकत,
कारण त्यांच्याजवळ त्यांचे स्वत:चे विचार आहेत.
त्यांच्या शरीरांना तुम्ही घरकुल देऊही शकाल कदाचित पण त्यांच्या आत्म्यांना कदापी नाही,
कारण त्यांच्या अत्म्यांचा वास उद्याच्या गर्भात आहे.
त्यांच्या “उद्या”ला तुम्ही भेट देऊ शकतच नाही, अगदी स्वप्नातही नाही!
तुम्ही त्यांच्यासारखं व्हायचा प्रयत्न करु शकाल कदाचित
पण त्यांना तुमच्यासारखं बनवण्याचा विचारही करु नका.
आयुष्य कधीही भूतकाळात जात नाही आणि थांबूनही रहात नाही बदलाच्या प्रतीक्षेत.तुम्ही एका धनुष्यासारखे असता ज्यावर स्वार झालेली तुमची मुलं
जणू एखाद्या जिवंत बाणासारखी भविष्याचा वेध घेणार असतात.
“तो” जगन्नियंता धनुर्धारी अनादि अनंत काळाच्या पटावर वेध घेतो एका दूरच्या लक्ष्याचा
आणि सर्वशक्तीने “तो” आकर्ण ताणतो प्रत्यंचा, तुम्ही, त्याचं धनुष्य, वाकेपर्यंत
कारण त्याचे ते बाण अतिजलद गतीने जावेत अतिशय दूरवर म्हणून.
तेव्हा आपलं ते धनुर्धार्याच्या हातातलं वाकणं आनंदाने स्वीकारा,
कारण “त्यालाही” जसे हे दूरवर जाणारे बाण आपलेसे वाटतात,
तशीच प्यारी असतात त्याला स्थिर असलेली धनुष्यही!