संतोष मानेच्या माथेफिरूपणाने उपस्थित केलेले प्रश्न!

 • पुण्यात माथेफिरू एसटी बस ड्रायव्हरचा धुमाकूळ
 • स्वारगेट डेपोतून बस ड्रायव्हरने पळविली बस
 • बस थांबवण्यासाठी पोलिसांकडून 10 राऊंड फायर
 • माथेफिरूच्या हैदोसात 9 मृत्युमुखी, 27 जखमी
 • माथेफिरू बस ड्रायव्हरचं नाव संतोष मारूती माने
 • संतोष मारूती माने, मूळचा उत्तर सोलापूर तालुक्याती, स्वारगेट डेपोत नोकरी
 • संतोष माने मनोरूग्ण – मानेचे कुटूंबीय आणि त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर
 • संतोष माने मनोरूग्ण नाही, तो कालपर्यंत एसटीच्या सेवेत होता
 • माथेफिरू संतोष मानेनं मद्यसेवन केलेलं नाही

अशा अनेक बातम्यांची दिवसभर ब्रेकिंग न्यूज सुरू आहे. सकाळी टीव्ही सुरू केल्यावर एवढंच समजलं की कुणीतरी स्वारगेट डेपोतून एसटी बस पळवली आणि पुण्यातील रस्त्यावर सुसाट पळवत नेली. रस्त्यात जो कुणी येईल, त्याला ठोकरत माथेफिरू बसचालक पुढे गेला. बऱ्याचदा तो नो एन्ट्रीतून जात होता. अनेक रिक्षा, टूव्हीलर, छोट्या-मोठ्या कार याचा त्याने चक्काचूर केला. अनेकांना आपल्या बसखाली चिरडलं.

हा सगळा अवघ्या पाऊण ते तासाभरातला थरार… सगळ्या पुण्याला सुन्न करून टाकणारा… काय होतंय हे कळायच्या आत, सर्व काही होत्याचं नव्हतं झालेलं…

मग एकेक बाबी स्पष्ट होऊ लागल्या. सर्वात आधी बस ड्रायव्हरचं नाव जाहीर झालं. तो रात्रीच गाणगापूरहून बस घेऊन आलेला. रात्रभर त्याने विश्रांती घेतली. आणि सकाळी उठून हा उच्छाद मांडला. माथेफिरूलाही लाजवेल असा प्रकार… डोकं सुन्न करणारा प्रकार

नंतर अजून काही बाबी स्पष्ट होत गेल्या. पोलिसांनी तो दारूच्या अंमलाखाली नसल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर तो मनोरूग्ण असल्याचंही कुणीतरी सांगितलं. तोपर्यंत त्याच्या गावाचा शोध लागला. त्याच्या गावच्या सरपंचांनी तसंच त्याच्या थोरल्या भावांनीही तो मनोरूग्ण असल्याचं सांगितलं. सोलापूरमध्ये त्याच्यावर कधीकाळी उपचार केलेल्या डॉ. दिलीप बरूटेंनीही तो मानसिक रूग्ण असल्याचं सांगितलं. त्याचवेळी एसटीच्या अधिकाऱ्यांनी मात्र संतोष माने मनोरूग्ण असल्याची शक्यता फेटाळून लावली. तो कालपर्यंत व्यवस्थित काम करत असल्याचा त्यांचा दावा होता.

या एका घटनेनं पुण्यात उपमुख्यमंत्र्यांसह मुख्य गृहसचिव आणि एसटीचे व्यवस्थापकीय संचालक यांना मुंबईहून पुण्यात येण्यास भाग पाडलं.

संतोष मानेनं जे काही केलं, त्याचं समर्थन तर कुणीच करायला धजावणार नाही. त्याच्या माथेफिरूपणामुळे नऊ जणांचा जीव गेलाय, कित्येकजण जायबंदी झालेत, तर अनेक जखमी जे काही काळानंतर हॉस्पिटलमधून घरी येतील, त्यांना बसलेला मानसिक धक्काही मोठा असणार आहे. म्हणूनच त्याच्यावर 302 चा म्हणजेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं पुण्याच्या पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी सांगितलंय.

तरीही संतोष मानेनं एका आवेगात किंवा मनोवस्था नीट नसताना हे कृत्य केलं असेल तर ते का केलं, याचाही यथावकाश होणाऱ्या चौकशीत उलगडा होईल कदाचित.

पण या घटनेनं काही मूलभूत प्रश्न उपस्थित केलेत, कदाचित सध्याच्या व्यवस्थेत त्याची उत्तरे कधीच मिळणार नाहीत.

एसटी ही सार्वजनिक सेवा आहे. सरकारने लोकहितासाठी चालवलेला एक व्यावसायिक उपक्रम आहे. या उपक्रमातल्या नोकरभरतीवर तसंच दररोजच्या कार्यपद्धतीवर या घटनेनं अनेक प्रश्न उपस्थित केलेत. नेहमीप्रमाणेच या प्रश्नांच्या मुळाशी न जाता आयत्याच हाती सापडलेल्या आणि भरभक्कम पुरावा असलेल्या संतोष मानेवर कायदेशीर कारवाई होईल. प्रकरण पुन्हा थंड्या बस्त्यात.

यापूर्वीही शासकीय सेवेतल्या अनेक नोकरांनी आत्महत्या किंवा असे माथेफिरी प्रकार केल्याची उदाहरणे आपल्याकडे कमी नाहीत. रजा देत नाही किंवा मानसिक त्रास देतात म्हणून आपल्याच वरीष्ठांवर गोळीबार करणाऱ्या जवानाचं मुंबईतीलच उदाहरण काही वर्षांपूर्वीच असलं तरी जुनं झालेलं नाही. किंवा एसटीच्या गाड्या पळवणं किती सोपं असतं, हेही काही लपून लाहिलेलं नाही.

एसटीच्या वाहक-चालकांसाठी असलेल्या नियमांची किती काटेकोरपणे अंमलबजावणी होते, हे सर्वसामान्य प्रवाश्यांना माहिती नसेल कदाचित. पण सहज म्हणून चालक वाहकांच्या डेपोमधील विश्रामकक्षात डोकावलं तर अंदाज येईल. रात्रीच्या वेळी गाडी उशीरा आल्यावर किंवा शेवटची बस हुकली म्हणून किंवा लॉज परवडत नाही म्हणून कितीतरी प्रवासी बसस्थानकावरच पेपर टाकून झोपतात. मध्यरात्री बारा ते पहाटे साडेचार-पाच पर्यंतच अशा प्रवाश्यांना बसस्थानकांवर झोप घेता येते. त्यापेक्षाही दयनीय अवस्थेत सबंध बसचा डोलारा, त्यातील प्रवाश्यांच्या जीवितासह सांभाळणाऱ्या ड्रायव्हर आणि कंडक्टरला विश्रांती(?) घ्यावी लागते. तुम्ही मुंबई सेंट्रल डेपोला जा की अजून कोणत्याही डेपोत, वाहत-चालकांच्या विश्रामगृहाची अवस्था यापेक्षा वेगळी नसेल.

वाहक-चालकांच्या सेवेच्या तासांबद्धल तर बोलायलाच नको. आरटीओचे काय नियम आहेत, मला आता नेमकेपणाने आठवत नाहीत, मात्र किमान 180 किलोमीटरचं अंतर कापल्यानंतर ड्रायव्हर्सनी विश्रांती घ्यायला हवी, असं कुठेतरी वाचल्याचं आठवतंय. पण रातराणीचे कित्येक ड्रायव्हर्स रात्र-रात्र गाडी ओढतात. त्यानंतर आपल्या मुक्कामाच्या ठिकाणीच त्यांना विश्रांती घेण्याची संधी मिळते. अधिकृत बसस्थानक किंवा काही अनधिकृत बसथांब्यांवर चहापानासाठी थांबणं याला मी तरी विश्रांती म्हणणार नाही.

अनेकदा किरकोळ कारणांवरून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होते. एसटीचं प्रशासन शिस्तीच्या नावाखाली अशा कारवायाचं समर्थनही करतं. पण त्यासाठी त्यांना सोसावा लागणारा मनस्ताप तर अनाकलनीयच. मध्यंतरी एका मुंबई सेंट्रल डेपोमध्ये भूमकडील एका ड्रायव्हरला भेटण्याचा योग आला होता. तो कुबड्यांवर मुंबई सेट्रल डेपो मॅनेजरच्या कार्यालयाच्या चकरा मारायचा. कारण पोलिसांनी त्याच्यावर केलेल्या कारवाईसाठी एसटी मॅनेजरकडून कसलंतरी पत्र हवं होतं.

काही ड्रायवर-कंडक्टरला आपल्या नियमित ड्युट्या लावून घेण्यासाठीही डेपोमध्ये ट्रॅफिकचा चार्ज संभाळणाऱ्या अधिकाऱ्याची सर्व प्रकारची मर्जी सांभाळावी लागते. यामध्ये अनेकदा लाच दिल्याशिवाय हव्या त्या ड्युट्या लागत नसल्याचं अनेक वाहक-चालक सांगतात. एवढंच नाही तर एसटीत नोकरीला लागण्यासाठीही मोठमोठ्या नेत्यांची शिफारसपत्रे आणि अर्थपूर्ण व्यवहार अनिवार्य बाब असते.

असंच एकदा सेंट्रल ऑफिसमध्ये एसटीच्या तत्कालीन कार्मिक महाव्यवस्थापकांकडे बसल्यावर त्यांनी एका विभागीय वाहतूक नियंत्रकाला सुशील कुमार शिंदे यांच्याकडून आलेल्या एका एसएमएसची माहिती दिली होती. हा एसएमएस होता, एका वाहकाची की चालकाची बदली करण्यासंदर्भातला. संबंधित एसटी कर्मचाऱ्याला एकाच जिल्ह्यात एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात बदली करून हवी होती. त्यासाठी त्याला थेट एका केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याला भेटावं लागतं. त्याला आपल्या वरिष्ठांकडे जाण्याऐवजी एकाद्या मंत्र्यांकडे जाणं जास्त योग्य वाटतं. यामध्येच एसटीच्या सध्याच्या कारभाराविषयी सर्वकाही आलं.

मध्यंतरी कुठल्याशा वृत्तपत्रात, बहुतेक सकाळच असावा… ड्रायव्हर कंडक्टरला मिळणाऱ्या आहार आणि निवास भत्त्याविषयीची बातमी वाचल्याचं आठवतंय. सहा सप्टेंबर 2010 ची बातमी, यवतमाळ डेटलाईनची… कदाचित तुम्ही वाचलीही असेल. ड्रायव्हर आणि कंडक्टरला आहार भत्ता मिळतो फक्त पाच रूपये.

 • संबंधित बातमीचा हा काही भाग जसाच्या तसा:

संपूर्ण महाराष्ट्राची आणि त्यामध्ये राहणाऱ्या लोकांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटी बसच्या चालक आणि वाहकांना आजही मुक्कामी असलेल्या गावात एसटी बसच्या टपावर झोपून रात्र काढावी लागते. एवढेच नव्हे तर आजच्या परिस्थितीत जिथे पाच रुपयाला एक कप चहाही मिळत नाही, तिथे त्यांना पाच रुपये एका दिवसाचा मुक्काम खर्च देण्यात येतो. त्यामुळे संपूर्ण राज्यातील 50 हजार चालक, वाहक या भत्त्यामध्ये वाढ होण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत आहेत; परंतु महामंडळ तोट्यात असल्याचे कारण पुढे करीत त्यांच्या मागण्यांना नेहमीच केराची टोपली दाखविण्यात येते.

 • असा मिळतो मुक्कामाचा भत्ता

एसटीची बस म्हटलं की प्रत्येक खेड्यापाड्यातून अगदी पहाटेपासून तिची सेवा उपलब्ध असते. त्यामुळे मोठ-मोठ्या महानगरांपासून ते अगदी अडगळीतील गावापर्यंत सर्वच ठिकाणी एसटीच्या बस मुक्कामाकरिता असतात. मात्र, या बसवर मुक्कामाकरिता जाणाऱ्या चालक, वाहकांना त्याकरिता मिळणाऱ्या भत्त्यात चहा पिणेही मुश्‍किल असते. या तुटपुंज्या पैशात न्याहारी किंवा जेवणाचा विचारच केला जाऊ शकत नाही.

 • मुक्कामासाठी मिळणारा भत्ता

ठिकाण -चालक-वाहक
तालुक्‍याचे ठिकाण-6 रुपये-6 रुपये
जिल्ह्याचे ठिकाण-7 रुपये-7 रुपये
महापालिका-9.50-रुपये 9.50 रुपये

 • अतिरिक्त भत्ता मिळतो पैशामध्ये

याव्यतिरिक्त दिवसभरात केलेल्या प्रवासाच्या बदल्यात किलोमीटरच्या प्रमाणातही काही भत्ता देण्यात येतो. हा भत्ता आजही केवळ अत्यल्प पैशाच्या प्रमाणात देण्यात येतो. एका दिवशी 150 किलोमीटर प्रवास केल्यास चार रुपये, 150 ते 200 किलोमीटरपर्यंत 10 पैसे प्रतिकिलोमीटर, 201 ते 225 किलोमीटरपर्यंत 15 पैसे प्रतिकिलोमीटर आणि 225 किलोमीटरच्या पुढे 20 पैसे प्रतिकिलोमीटर याप्रमाणे वाहक, चालकांना अत्यल्प भत्ता देण्यात येतो.

 • कनिष्ठ वेतनश्रेणीधारकांची अवस्था वाईट

कनिष्ठ वेतनश्रेणी मिळणाऱ्या चालक, वाहकांना अत्यल्प भत्त्यावर समाधानी राहावे लागते.
त्यांना मिळणारा भत्ता पुढीलप्रमाणे.
ठिकाण-चालक-वाहक
तालुक्‍याचे ठिकाण-3 रुपये-3 रुपये
जिल्ह्याचे ठिकाण-3.50 रुपये-3.50 रुपये
महापालिका-5 रुपये-5 रुपये

एसटी महामंडळाच्या संचालक मंडळावर कामगारांचेही प्रतिनिधी आहेत. पण ते कुणाचं प्रतिनिधीत्व करतात, त्यांनाच माहित, कारण आजवर त्यांच्याकडून या अतिशय महत्वाच्या मुद्दयाला वाचा फोडल्याचं अजून तरी ऐकिवात नाही. कारण 2010 मधील अमोल ढोणे यांच्या सकाळमधील बातमीवर काहीच प्रतिक्रिया एसटीच्या पदाधिकाऱ्यांकडून उमटलेली नाही.

प्रश्न अनेक आहेत. परिस्थितीची कितीही कारणे किंवा सबबी सांगितल्या तरी संतोष मानेच्या माथेफिरूपणाचं समर्थन होणार नाही. कुणी करण्यासही धजावणार नाही. तरीही संतोष मानेंच्या संदर्भात उपस्थित झालेल्या काही प्रश्नांची उत्तरे तपास अधिकाऱ्यांना शोधावीच लागतील.

एसटीमध्ये भरती होताना मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्याचं प्रमाणपत्र ही एक अत्यावश्यक बाब असते. सिव्हिल सर्जन हे सर्टिफिकेट कसं देतात, हे कुणालाही नव्याने सांगायची गरज नाही. मग जर संतोष मानेच्या बाबतीत जर असंच सर्टिफिकेट दिलं गेलं तर त्याची जबाबदारी कुणाची. नेमकी हीच जबाबदारी झटकण्यासाठी एसटी प्रशासन आता संतोष माने मनोरूग्ण नसल्याचा दावा करत आहे. मात्र त्याच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ही बाब अधोरेखित केलीय. संतोष मानेच्या थोरल्या भावाने सांगितलं की सतत लांबच्या ड्युट्या करायला तो कंटाळला होता, तसंच राजीनामा देण्याविषयीही त्याने अनेकदा चर्चा केली होती. म्हणजे त्याला एसटीची नोकरी सोडायची त्याची मानसिकता झालेली होती. तरीही त्याला संबंध प्रवाश्यांनी भरलेली बस घेऊन एका गावाहून दुसऱ्या गावाला जावं लागायचं. कारण तो त्याच्या ड्युटीचा एक भाग होता.

एसटीमध्ये आजही अनेक जण सततच्या कामामुळे म्हणा की कामाच्या अतिरिक्त ताणामुळे म्हणा अनेक मनोरूग्ण असण्याची शक्यता आहे. सध्याच्या व्यवस्थेत त्यांना थेट मनोरूग्ण असं म्हणणं योग्य होणार नाही. मात्र आजारी असणं, मानसिकता ठीक नसणं, कामाचा अतिरिक्त ताण असणं, वरिष्ठांची सतत बोलणी खावी लागणं अशाही अनेक समस्या आहेत. एसटीच्या पदाधिकाऱ्यांनाही याची जाणीव असावी, कारण ड्रायव्हर कंडक्टरसाठी अनेकदा योग आणि तणावमुक्तीसाठीची शिबीरेही आयोजित केली जातात. पण अशी शिबीरे आयोजित करण्यापेक्षा त्यांना तणाव जाणवणारच नाही, अशी कृती करणं जास्त योग्य नाही का?

यापुढे तरी किमान संतोष मानेंसारख्या दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी एसटी प्रशासनाला आतापासूनच पावलं उचलावी लागतील… अन्यथा पुन्हा पश्चाताप आणि थातूर-मातूर चौकशीचा फार्स आणि सर्वसामान्य प्रवाशी तसंच रस्त्यावरचे नागरिक यांच्या जिवीताशी खेळण्याच्या घटना नित्याच्या होतील…

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: