सोशल नेटवर्किंगच्या युगात रश्दींना खरोखरच थांबवता येईल?

सलमान रश्दी यांनी जयपूरमधील साहित्य संमेलनात सहभागी होण्याला मुस्लीम मूलतत्ववादी गटांनी विरोध केला. सलमान रश्दी भारतात आले तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे त्यांचा फक्त जयपूरच नाही संपूर्ण भारत दौरा रद्द झाला. पहिल्यांदा त्यांच्या भारतात येण्याला विरोध झाला तेव्हा त्यांनी भारतात येण्यासाठी व्हिसाची गरजच नाही, असंही वक्तव्य केलं होतं. मात्र नंतर त्यांनी आपला दौराच रद्द केला. त्यानंतर आयोजकांनी व्हर्चुअल पद्धतीने म्हणजे प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सलमान रश्दी यांना जयपूर साहित्य संमेलनात सामील करून करून घेण्याचा प्रस्ताव पुढे केला. तर त्यालाही मूलतत्ववाद्यांनी विरोध केला. रश्दींनी भारतात येणं तर दूरच आम्ही स्वतः त्याचं तोंड पाहणार नाही की भारतात कुणाला पाहू देणार नाही, अशी दर्पोक्तीही या आंदोलकांनी केली. आणि आयोजकांनी जर सलमान रश्दी यांचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दाखवलं तर संमेलनातात हिंसाचार घडवून आणण्याची धमकीही दिली. त्यानंतर अगदी नाईलाजाने आयोजकांना रश्दी याचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगही रद्द करावं लागलं. त्यानंतर सलमान रश्दी यांनी ट्वीटरवरून व्यक्त केलेलं मनोगत म्हणजे

@SalmanRushdie #JLF Threat of violence by Muslim groups stifled free speech today. In a true democracy all get to speak, not just the ones making threats
@SalmanRushdie #JLF Videolink cancellation: awful


खरोखरच आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी झाली. आज ट्वीटरवर हाच विषय सर्वाधिक असावा. कारण व्हिडिओ लिंकद्वारे म्हणजे व्हच्युअल पद्धतीने सलमान रश्दी यांना जयपूर साहित्य संमेलनात सहभागी होण्यास विरोध करणं म्हणजे अतिरेकच झाला. त्यावर वरताण म्हणजे पोलिसांनी स्वतःहून हिंसाचाराची भिती व्यक्त करत आयोजकांना रश्दी यांच्या व्हिडिओ लिंकचं प्रसारण रद्द करण्यासाठी दबाब आणणं. एवढंच नाही तर पोलिसांनी आयोजकांऐवजी आधी ज्यांच्या जागेत हे संमेलन सुरू आहे, त्यांच्यावरही दबाब टाकण्याचा प्रयत्न केला. मग शेवटी काय झालं ते सबंध जगाने पाहिलंच आहे.

त्यानंतर कढी केली ती संमेलनाच्या आयोजकांनी… मूलतत्ववाद्यांच्या दबाबाला बळी पडून… साहित्य संमेलनाला जमलेले साहित्य रसिकांच्या सुरक्षिततेसाठी व्हिडिओ लिंक रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
जयपूर साहित्य संमेलनाच्या मंडपात काही मुस्लीम निदर्शकांनी घुसखोरी केली आहे, जर आयोजकांनी सलमान रश्दी यांची व्हिडिओ लिंक दाखवली तर परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर जाईल. मग आयोजकांना पोलिस कोणतीही मदत करू शकणार नाहीत. असं जयपूर संमेलनाच्या आयोजकांपैकी एक असलेल्या संजय रॉय यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. त्यानंतर आयोजकांना नाईलाजास्तव व्हिडिओ लिंक प्रसारित न करण्याचा दुर्दैवी निर्णय घ्यावा लागला.

हिंसाचाराच्या गर्भित धमकीमुळेच आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा अर्ध्यावरच सोडून द्यावा लागला, अशी जोडही संजय रॉय यांनी आपल्या निर्णयाच्या समर्थनार्थ दिली. जयपूर साहित्य संमेलनासाठी आलेल्या साहित्य रसिकांच्या सुरक्षिततेचा तसंच आम्हाला आमच्याही जिवीताची काळजी असल्यामुळे अतिशय नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

जयपूर लिट्रेचर फेस्टिवल किंवा जयपूर साहित्य संमेलन हे आता एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं साहित्य संमेलन झालंय. 2006 पासून हे संमेलन भरवलं जातं. जयपूरमधलं दिग्गी पॅलेस हॉटेल हे संमेलन स्थळ… फक्त भारतामध्येच नाही तर आशिया खंडात या संमेलनाने एक लौकिक मिळवलाय.

ही झाली आजची बातमी.

त्यामध्ये सर्वात वेदनादायी आहे, ते व्हर्च्युअल लिंकद्वारेही सलमान रश्दी यांना संमेलनात सहभागी होऊ न देणं आणि फक्त आंदोलकच नाही तर भारतात कुणीही सलमान रश्दी याचं तोंडही पाहायचं नाही हा हट्ट करणं… कारण आजच म्हणजे मंगळवारी सलमान रश्दी यांची मुलाखत एनडीटीव्हीवर प्रसारित होतेय. स्वतः सलमान रश्दींनीही हे आपल्या ट्वीटमधून जगभरातील त्यांच्या चाहत्यांना, वाचकांना सागितलंय. मग एनडीटीव्हीवरून जगभर प्रसारित होणारा ही मुलाखत कशी थांबवणार. ही मुलाखत एनडीटीव्हीच्या वेबसाईटवरही थेट प्रसारित (लाईव्ह स्ट्रिमिंग) होणार आहे. त्यानंतर काही वेळात यूट्यूबवरही अपलोड होईल. असं असताना सलमान रश्दी यांना कसं थांबवता येईल. कारण आताच्या सोशल नेटवर्किंगने किंवा तंत्रज्ञानाधिष्टीत लोकशाही माध्यमांनी देशांच्या, खंडाच्या आणि धर्माच्या सीमा केव्हाच धुसर करून टाकल्यात. चीनसारखे काही देश सोशल नेटवर्किंगला किंवा इंटरनेटला प्रतिबंध करत असले तरी त्यांनाही ते पूर्णपणे शक्य झालेलं नाही. कारण तंत्रज्ञानाची ताकदच एवढी अफाट आहे.

यूट्यूब किंवा वेबसाईट किंवा टीव्ही चॅनेल्सवर जेव्हा सलमान रश्दी यांची मुलाखत प्रदर्शित होईल, तेव्हा आंदोलक काय करतील. त्यापेक्षा सलमान रश्दी आले असते, त्यांनी त्याचं भाषण केलं असतं तर एख दोन इंग्रजी वृत्तपत्रांनी त्यांच्या बातम्या छापल्या असत्या, किंवा एक दोन चॅनेल्सवर त्याचं लाईव्ह प्रसारण झालं असतं, हा विषय संपलाही असता. पण जयपूर साहित्य संमेलनाच्या बाहेर निदर्शने करणाऱ्या मुस्लीम मुलतत्ववादी गटांना हा विषय फक्त जयपूरपुरताच ठेवून संपवायचा नव्हता. तर त्यांना सलमान रश्दी यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या जागतिक प्रसिद्धीचा एक भाग व्हायचं होतं.

कारण व्हिडिओ लिंकचं प्रदर्शन थांबवून सलमान रश्दींना कसं थांबवता येईल. कारण सलमान रश्दी ट्वीटरवर आहेत. तिथे त्यांना मोठं फॅन फालोईंग आहे. त्याचं कोणतंही भाषण यूट्यूबच्या माध्यमातून फक्त जयपूरच नाही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकतं. फक्त यूट्यूब, फेसबुक किंवा ट्वीटरच नाही तर अजूनही कितीतरी तंत्रज्ञानाधिष्टीत संपर्क माध्यमे आहेत. पण मूलतत्ववाद्यांना समजावणार कोण. कदाचित त्यांना हे सर्व माहिती असेलही पण त्यांना आपला विरोध हा मुस्कटदाबी करूनच व्यक्त करायचा असेल तर…

आणि हे फक्त जयपूरमध्येच घडतं असंही नाही. अभिव्यक्तीचं कोणतंही माध्यम असो, मग ते साहित्यकृती, चित्र, शिल्प, संगीत, सिनेमा, नाटक काहीही चालतं. कारण प्रसिद्धीचा सोसच तेवढा भीषण आहे. सारासार विचार आपल्या गावीही नसतो. आपल्याकडे होणारी साहित्य संमेलने याला अपवाद नाहीत.

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: