माहितीच्या मुक्त प्रवाहासाठी…

आपल्याकडे गेल्या वर्षभरात जशी लोकपाल कायद्याची चर्चा होती, तशीच आता अमेरिकेत सोपा आणि पिपा या दोन कायद्याची आहे. हे दोन्ही कायदे अँटी पायरसी विरोधी आहेत. सोपा म्हणजे SOPA स्टॉप ऑनलाईन पायरसी अॅक्ट… तर पिपा म्हणजे PIPA प्रोटेक्ट आयपी अॅक्ट… पिपाचा प्रस्ताव सिनेटचा आहे. तर सोपाचा प्रस्ताव हाऊसचा म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिवचा आहे. या दोन कायद्यांमुळे इंटरनेटच्या क्षेत्रातली म्हणजेच ऑनलाईन पायरसीला पूर्णपणे आळा बसेल, असं या कायद्याच्या समर्थकांना वाटतं.
http://starmajha.newsbullet.in/technology/technology/11950-2012-01-17-15-30-10
(स्टार माझा डॉट कॉमवर पूर्वप्रकाशित)

थोडक्यात सांगायचं तर हा वाद कॉन्टेन्ट म्हणजेच आशय किंवा मजकूराशी आणि त्याच्या मालकी हक्काशी किंवा स्वामित्व हक्काशी संबंधित आहे. या कायद्याची सुरूवात तशी दोनेक वर्षांपूर्वी मीडिया मुगल रूपर्ट मरडॉक यांनी केली. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा गूगल या सर्च इंजिन जायंटशी उभा दावा घेत गूगल माहितीवर, ज्ञानावर दरोडा टाकत असल्याची टीका जाहीरपणे केली. कारण गूगल फक्त सर्व प्रकारच्या इंटरनेट लिंक म्हणा की वेबसाईटचं फक्त अग्रीकेटिंग करतं. म्हणजे एकाच पानावर तुम्हाला हव्या असलेल्या वेगवेगळ्या माहितीच्या लिंक उपलब्ध करून देतं, कारण इंटरनेट हे अतिशय अवाढव्य असं माहितीचं जाळं आहे. गूगल तुमचं काम सोपं करत. पण मरडॉक यांच्यासारख्या अनेकांचा आरोप असा की गूगल माहिती शोधण्यात तुमची मदत करत असतानाच जाहिरातींच्या माध्यमांतून धंदाही करतं. आणि या जाहिराती गूगलला मिळतात कारण तुमचा आशय म्हणजेच कॉन्टेन्ट… मग तुम्हालाही म्हणजे ज्या कुणाची ती माहिती असेल त्याला त्याचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. कारण गूगल कधीही कॉन्टेन्ट जनरेट करत नाही.

त्यामुळे जे जे कॉन्टेन्ट जनरेट करतात किंवा आशयाची निर्मिती करतात, त्या सर्वांचा अँटी पायरसी विरोधी असलेल्या कायद्यांना पाठिंबा आहे. त्यामध्ये टीव्ही चॅनेल्स, सिनेमा बनवणारे स्टुडिओज किंवा बौद्धिक संपदा निर्माण करणारे विशेषज्ञ यांचा समावेश आहे.

या कायद्याला विरोध करणाऱ्यांमध्ये माहितीचं किंवा आशयाचं, कॉन्टेन्टचं वितरण करणाऱ्या, जगभरात सर्वत्र पोहोचवणाऱ्या किंवा त्याचं अग्रीकेटिंग करणाऱ्या इंटरनेट कंपन्या आहेत. त्यामध्ये सर्वात अग्रभागी आहे गूगल, फेसबुक, विकीपीडिया…

जगभरात वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर सध्या सोपा आणि पिपाची चर्चा सुरू आहे. जगात विशेष दबदबा असलेल्या वृत्तपत्रांमध्येही या दोन कायद्यांचीच चर्चा आहे.

गेल्या दोन दिवसात विशेषतः सोमवारी या कायद्याची चर्चा आपल्याकडेही जरा जास्तच झाली कारण विकीपीडियाने घेतलेला निर्णय. विकीपीडियाचं नियंत्रण आणि संचालन करणाऱ्या विकीमीडिया फाऊंडेशनने प्रस्तावित अँटी पायरसी कायद्याच्या निषेधार्थ एक दिवसांचा बंद पाळण्याचा निर्णय घेतला. आपल्या ब्लॉगवर तसंच विकीपीडियाच्या ओपनिंग पेजवर त्यांनी संदर्भातली भूमिका स्पष्ट केली.

आपल्याकडेही बंद, निदर्शने आणि हरताळ होतात. पण इंटरनेटच्या जगातील हा एक आगळा वेगळा बंद. कदाचित अशा प्रकारचा हा पहिलाच बंद असावा. आपल्याकडेही उद्या म्हणजे भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी साडेदहा वाजल्यापासून विकीपीडिया बंद होईल. विकीपीडियाच्या या अभिनव ब्लॅकआऊटमध्ये तुम्ही विकीपीडियावर गेलात तर तुम्हाला एक संदेश दिसेल, अर्थातच हा संदेश विकीपीडियाची अँटी पायरसी कायद्याविरोधातली भूमिका स्पष्ट करणारी असेल. त्यापलिकडे तुम्हाला विकीपीडियावर काहीच शोधता येणार नाही. कारण विकीपीडिया बंद असेल. पूर्ण चोवीस तासांसाठी. गुरूवारी सकाळी साडेदहा वाजता पुन्हा तुम्हाला पहिल्याप्रमाणे विकीपीडियावर हवी ती माहिती उपलब्ध होऊ शकेल.

विकीपीडियाने सोपा आणि पिपाला विरोध करताना आधीच स्पष्ट केलंय, ते या दोन कायद्यांना विरोध करत आहेत याचा अर्थ त्यांचा ऑनलाईन पायरसीला पाठिंबा आहे, असा मुळीच होत नाही. त्यांचाही ऑनलाईन पायरसीला विरोध आहे. पण त्यासाठी अमेरिकी काँग्रेसने प्रस्तावित केलेले दोन्ही कायदे म्हणजे भिक नको पण कुत्रं आवर असा प्रकार असल्याचं त्यांना वाटतं. कारण या कायद्यामध्ये अमेरिकी प्रशासनाला अनिर्बंध अधिकार देण्यात आलेत. पायरसी कशाला म्हणायचं याचा निर्णयही या कायद्याने निश्चित होईल. या कायद्याने फक्त व्यक्तिगत आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्यावरच घाला येणार नाही तर सर्वत्र एक वेगळ्या प्रकारची सेन्सॉरशिपचं राज्य उदयाला येईल. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करून माहितीची साधने काही मूठभरांपुरती मर्यादित करण्याला विकीपीडियासह अनेक इंटरनेट कंपन्यांचा विरोध आहे. कारण अनेक इंटरनेट कंपन्यांना आपला व्यवसायच करता येणार नाही.

विकीपीडिया एका पूर्ण दिवसासाठी बंद करण्याच्या निर्णयावर अमेरिकेतल्या वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी विशेष भाष्य केलंय. याचाच एक भाग म्हणून जेव्हा ट्वीटर या मायक्रो ब्लॉगिंग साईटच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबतची प्रतिक्रिया विचारण्यात आली, तेव्हा त्यांनी एक दिवसाचा निषेध बंद म्हणजे शुद्ध खुळचटपणा असल्याचं मत ट्वीटरवरूनच व्यक्त केलं. त्याचीही मग बातमी झाली, खरं तर या प्रस्तावित कायद्याला ट्वीटरचाही विरोध आहे, मात्र त्यांनी फक्त त्याचा निषेध जागतिक पातळीवर पोहोचलेला व्यवसाय पूर्ण एक दिवसासाठी बंद करण्याला विरोध दर्शवलाय एवढंच. पण त्याच्याही अनेक बातम्या तातडीने वेबवर प्रकाशित झाल्या.

त्यानंतर रूपर्ट मरडॉक यांनीही या कायद्याच्या समर्थनार्थ चालविलेल्या मोहीमेचीही चर्चा अमेरिकेतल्या वेब आणि प्रिंटमधून होतेय. गूगल हा जगभरातल्या पायरसीचा लीडर असल्याचा आरोप मरडॉक यांनी अलीकडेच ट्वीटरवर केला होता. गूगलने त्याला प्रत्युत्तर दिलं तर लगेच त्यांनी गूगल ही एक चांगली कंपनी असल्याचं सर्टिफिकेट देत पायरसीचे आरोप मात्र मागे घ्यायला स्पष्ट नकार दिला. एवढंच नाही तर जेव्हा व्हाईट हाऊसने या प्रस्तावित कायद्यांच्या विरोधात भूमिका घेतली आणि काही राजकीय विश्लेषकांनी अध्यक्ष बराक ओबामा त्यांना असलेला नकाराधिकार वापरून हा कायदा फेटाळू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली, तेव्हा मरडॉक यांनी बराक यांच्यावरही टीका केली. इंटरनेट कंपन्यांचे दलाल बराक ओबामा यांना पैसे पुरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ओबामांनी सिलीकॉन व्हॅलीतल्या धनाढ्यांपुढे मान तुकवल्याची टीकाही मरडॉक यांनी आपल्या ट्वीटमधून केली.

दुसऱ्या बाजूला ज्या कायद्यांमुळे व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात येणार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा येतील, अशा कायद्याला आपण कधीही पाठिंबा देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका व्हाईट हाऊननेही घेतलीय. ही भूमिका शनिवारीच स्पष्ट झाली असली तरी अजूनही हा कायदा प्रत्यक्षात येईल अशी भिती असल्यानेच इंटरनेट कंपन्यांनी आपल्या विरोधाची धार वाढवलीय. फक्त निषेधाचे मार्ग वेगवेगळे आहेत. त्यात सर्वात आधी बंदचा निर्णय घेऊन बाजी मारलीय विकीपीडियाने…

कारण विकीपीडियाच्या या निर्णयाचा फटका जगभरातल्या जवळपास 100 मिलीयन म्हणजे दहा कोटी इंग्रजी भाषा समजणाऱ्यांना बसणार आहे. कारण त्यांना उद्याचा पूर्ण दिवस विकीपीडियावर कसलीच माहिती मिळणार नाही. माहितीचा प्रवाह मुक्त आणि कसल्याही नियंत्रणाशिवाय तसंच व्यापारी शक्तींच्या नियंत्रणापलिकडे असावा, अशी माफक अपेक्षा विकीपीडियासारख्या संस्थांची आहे.

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: