चित्रांवर लिहिणं खूप अवघड असलं पाहिजे, किंवा मला ते जमत नसावं, गेले दोन दिवस चित्रांवर लिहिण्याचा प्रयत्न करतोय, पण जमत नाही. अगदी खरं सांगायचं तर मला चित्रातलं फार काही कळत नाही.
तशी चित्रे फक्त आवडतात, बघायला… त्यातलं शास्त्र कळत नाही म्हणजे माध्यम, कागद किंवा कॅनव्हास यातलं काहीच कळत नाही. म्हणजे तुमचं ते मॉडर्न आर्ट वगैरे… किंवा अॅबस्ट्रॅक्ट अशी बरीच काही नावे असतात, जाणकार त्याचं कौतुकही करतात. त्यातून वेगवेगळे अर्थ शोधतात.
फक्त एवढं मात्र नक्की मला माहिती आहे, की चित्र हे सुद्धा एक अभिव्यक्तीचं माध्यम आहे. कविता, कथा, कांदबऱ्या, गेला बाजार फेसबुकवरील स्टेट्स किंवा ट्वीटरवरचे अपडेट्स याप्रमाणे शिल्पकृती किंवा चित्रकृती हेही एक अभिव्यक्तीचं माध्यम… तशी नाटक आणि चित्रपटही किंवा फोटोग्राफी सुद्धा… म्हणजेच कलाकृती कोणतीही असो, ज्याची त्याची अभिव्यक्तीच… एवढं मात्र समजतं. मला वाटतं, तेवढं जरी समजलं तरी पुरेसं आहे, एवढं कळत असूनही पण चित्रावर लिहायला पुरेशी सामुग्री जमत नाहीय.
मला सर्वात पहिलं चित्र आवडलं ते जॉन फर्नांडीस याचं. त्यांची पहिली ओळख झाली, म्हणजे त्यांच्या चित्रांची.. ती साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकावर जॉन फर्नांडीस यांची चित्र यायचं. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी सलग तीन वर्षे हा प्रयोग केला होता. साल आता आठवत नाही, पण दहापेक्षा जास्त वर्षे तर नक्कीच होऊन गेली असावीत. साप्ताहिक सकाळचा दिवाळी अंक मी फक्त जॉन फर्नांडीसांच्या चित्रासाठी विकत घेतलाय.
त्यानंतर हैदराबादला चित्रांचा जाणकार असलेल्या कमलेश देवरूखकरची भेट झाली. तो ईटीव्हीत नुकताच जॉईन झालेला. त्याच्याकडे फक्त जॉन फर्नांडीसच नाही तर बऱ्याच मोठमोठ्या चित्रकारांची खूप माहिती होती. त्यांच्याबरोबर चित्राविषयी अनेकदा चर्चा व्हायची. कमलेश मुंबईत रजेवर आल्यावर त्याने माझ्यासाठी जॉन फर्नांडीसांच्या पेन्टिंगचे दोन कॅटलॉगही आणले. तोपर्यंत मी फक्त जॉन फर्नांडीस यांची फक्त तीन-चार चित्रे पाहिली होती. प्रदर्शनात तर एकही नाही. सगळी कुठे ना कुठे छापून आलेली. आता त्यांच्या कॅटलॉगचा खजानाच मला मिळाला होता.
पुढे कमलेश आणि मी दोघेही मुंबईत आल्यानंतर त्याने आवर्जून मला चिन्हचा अंक दिला. तो चिन्हच्या संपादकीय टीममध्ये होता.
त्यानंतर आता थेट शशिकांत धोत्रे… शशिकांत धोत्रेची भेट तशी अपघातानेच झालेली. पहिला चित्रकार मी याची देही याची डोळा पाहिलेला…
शनिवारी माझा एक पत्रकार मित्र मिलिंद अवताडे भेटला. नेरूळ स्टेशनवरच. त्याने शशिकांत धोत्रेविषयी मला सांगितलं होतं. मी म्हटलं शनिवारी जाऊ आपण बघायला, त्याचं प्रदर्शन… मला फारशी उत्सुकता तशी नव्हती. कारण ऑफिसला पोहोचायला उशीर झालेला आधीच. नेरूळ स्टेशनवर मिलिंदला सांगितलं, तुम्ही पुढे व्हा… मी ऑफिसला डोकावून येतो… त्यावर मिलिंदने होकार दिला. मग ट्रेन आल्यावर आम्ही ट्रेनमध्ये बसलो. त्याने शशिकांतचाच विषय काढला. शशिकांतविषयी त्याला असलेली सर्व माहिती दिली.
शशिकांत धोत्रे… मुक्काम पोस्ट : शिरापूर, तालुका : मोहोळ, (ईटीव्हीतला माझा सहकारी धनंजय कोष्टी – ज्याला आम्ही प्रेमाने काका म्हणतो, हाही शिरापूरचाच… त्यामुळे शिरापूर हे काही अगदीच अनोळखी गाव नाही माझ्यासाठी) चित्रकलेचं कसलंही औपचारिक शिक्षण नाही. शाळेत कधीतरी असताना चित्रकलेचा नाद लागला. मग जिथे कुठे वेळ मिळेल किंवा सोय असले तिथे याची चित्रं रंगू लागली… चित्रे काढायचं माध्यम फक्त पेन्सिल… शाळेत असतानाचं अगदी सुरवातीचं माध्यम काय असेल, माहिती नाही. आई वडिलांना चित्रातलं फारसं काही कळत नाही. त्यांना फक्त दगड फोडायचे माहिती. तो त्यांचा पिढीजात धंदा.. म्हणजे वडार समाजाचा. आजही वडार समाज आणि दगड याचं नातं आहे. हा शशिकांत वडार समाजातून पुढे आलेला. छिन्नी हातोड्यापासून ते आजच्या प्रसिद्ध चित्रकारापर्यंतचा हा प्रवास खरोखरच चित्रबद्ध करण्यासारखा आहे. शशिकांत मुबंईत आला तेव्हा मिलिंदची आणि त्याची ओळख झाली. त्यावेळी सकाळच्या साममध्ये असलेल्या मिलिंदने त्यांना शक्य तिथे प्रसिद्धी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मिलिंद अवताडे आता सरकारी सेवेत असला तरी शशिकांतच्या प्रदर्शनाविषयी जमेल तेवढे लिहितो. खरं तर आता शशिकांतला नियोजित प्रसिद्धीची अजिबात गरज नाहीय. कारण त्याची चित्रेच आता त्याच्याविषयी सगळं काही सांगून जातात.
मिंलिंद मला शशिकांतविषयी झपाटल्यासारखं सांगत होता. त्यादरम्यान मला उतरायचं असलेलं परळ स्टेशन कधी गेलं तेही समजलं नाही. मग थेट सीएसटी आल्यावरच समजलं की आपण सीएसटीला आलो आहोत. मग म्हटलं आता आलोच आहोत, इथपर्यंत तर पाहून घेऊयात प्रदर्शन…
मग टॅक्सीने जहांगीर आर्ट गॅलरी…
मुंबईत येऊन पाच वर्षे पूर्ण होत आली तरी अजून एकदाही या परिसरात आलेलो नाही. आज पहिल्यांदाच जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रवेश करत होतो. तिथे वेगवेगळ्या कलाकारांची प्रदर्शने भरली होती. जहांगीरमध्ये प्रदर्शन लावायचं तर कितीतरी वर्षांची वेटिंग लिस्ट असते, एवढंच मी ऐकून होतो. त्यापलिकडे जहांगीरविषयी काहीच माहिती नव्हती.
मग एका दालनात शशिकांत धोत्रेची ओळख झाली. मिलिंदला त्याने ओळखलं, मग मिलिंदने माझी ओळख करून दिली. त्यांच्या चित्रांनी भुरळ पाडली, ती अजूनही कायम आहे. त्याची चित्रे ही चित्रे आहेत की फोटो हा फरकच मला करता आल नाही. जाणत्यांना कदाचित त्यातला फरक कळेल… मला अजून त्यातलं तेवढं नॉलेज नाही. हे आधीच सांगितलंय की…
त्याची चित्रे पाहताना मला पुन्हा एकदा जॉन फर्नांडीस यांचीच आठवण झाली. मला चित्रातलं फारसं काही कळत नसल्यामुळे मी त्याला जॉन फर्नांडीसचा वारसदारही ठरवून टाकलं. त्याची इतर चित्रे पाहताना मात्र माझ्या चित्रविषयक ज्ञानाची मलाच कीव आली. कारण शशिकांतची चित्रे शशिकांतला राजा रविवर्म्याच्या रांगेत नेऊन बसवतात. कारण राजा रविवर्मा याचं लेडी विथ लॅम्प मी मैसूरला एका संग्रहालयात पाहिलं होतं. तिथेही त्याची रिप्लिका आहे म्हणतात. पण राजा रविवर्मा यांचं लेडी विथ लॅम्प हे चित्र ऑईल पेन्टमधील आहे. लेडी विथ लॅम्प हे राजा रविवर्मा याचं मास्टरपीस समजलं जातं. राजा रविवर्मा याचं शकुंतला हेही एक जगप्रसिद्ध चित्र आहे, असं ऐकलंय…
शशिकांतची चित्रे पाहिल्यावर आणि त्यांच्या पार्श्वभूमी पाहिल्यावर त्याच्याविषयीचा आदर पहिल्यापेक्षा कितीतरी जास्त वाढला. ऑफिसला जाण्याऐवजी आपण शशिकांत धोत्रेची भेट घ्यायला आलो, यात काहीच वावगं वाटलं नाही. ऑफिसला तर रोजच जातो, शशिकांत कुठे आपल्याला दररोज भेटणार आहे, ऑफिसला आधीच उशीर झाला होता, त्यात पुऩ्हा थोडासा झाला तर त्यात काय एवढं असंही वाटून गेलं.
शशिकांत त्याची चित्रेही स्वतः समजावून सांगतो. खिडकीतून नवऱ्याची वाट पाहणारी पत्नी, भाजी निवडणारी गृहिणी किंवा जात्यावर ओव्या गात दळण दळणारी माऊली… किंवा हातात सोन्याच्या बांगड्या घालणारी स्त्री हे त्याच्या या प्रदर्शनातील चित्रांचे विषय. प्रदर्शन आजच म्हणजे रविवारी 15 जानेवारी ला संपणार आहे. त्यानंतर त्याला लंडनमध्ये आपलं प्रदर्शन भरवायचं आहे. तो ज्या कंपनीच्या कलर पेन्सिल आणि काळा कागद वापरतो, त्यांनी त्याला लंडनमध्ये चित्रांचं प्रदर्शन भरवण्यासाठी आमंत्रित केलंय.
शशिकांत भरभरून बोलतो. सर्वात मुख्य म्हणजे कायम जमिनीवर असतो. हे त्याच्याशी बोलल्यावर लगेचच जाणवतं. मला त्याच्या या प्रदर्शनात सर्वाधिक आवडलेल्या चित्रांपैकी काही म्हणजे स्मरणाचे चांदणे,
आंतरीचा जोगिया,
चंद्रमाधवी आणि शाल्मली… तो प्रत्येक चित्रांचे तपशील अगदी व्यवस्थित सांगतो. चित्रांमधले तपशील तर थक्क करायला लावतात.
मी त्याला सहजच विचारलं मुंबईला येण्यापूर्वी कधी छिन्नी-हातोडा हाताळलाय का? तर त्याचं उत्तर लगेगच.. तग मग, मी छिन्नी हातोड्याशिवाय वडराच्या पोराला जगता तरी येईल का, त्यान फक्त छिन्नी हातोड्याने दगडच फोडलेले नाहीत तर गंवड्यांच्या हाताखाली बिगारी म्हणून काम केलंय, वाळूच्या ट्रकवर मजुरी केलीय. मुंबईला येण्यापूर्वी… मुंबईत आल्यानंतरही जिथे कुठे मिळेल तिथे पेटिंगची लहानमोठी कामे केलीत. म्हणजे साईनबोर्ड रंगवण्यापासून…
शशिकांतने या प्रदर्शनात मांडलेली सर्व चित्रे चांगल्या किंमतीला विकली गेलीत. त्याला आता वेध लागलेत, त्याच्या पुढच्या प्रदर्शनाचे, म्हणजेच लंडनचे… त्यापूर्वी मला त्याच्या आतापर्यंतच्या वाटचालीवर एक स्टोरीही करायचीय… टीव्हीची स्टोरी… कारण मुंबईला येण्यापूर्वी त्याने गावात अनेकांना पोट्रेट काढून दिलीत, अगदी पन्नास-शंभर रूपयांमध्ये… शिरापूरमध्ये आता कुणाकडे ती चित्रे आहेत की नाहीत, माहिती नाही… पण शोध घेतला तर खूप चांगली स्टोरी डिझाईन होऊ शकेल…
shashikant dhotre sahebancha mumbai madhe punhaa pradarshan asel tar mala mazaya email id var tapshil kalva Email ID: nitinsb2011@gmail.com
kevaa ekda bhetato tya kshanachi vaat pahato….. rasik bhakta . nitin
शशिकांत धोत्रेचं चित्रप्रदर्शन तुझ्या ब्लॉगवर पाहिलं..मलाही चित्रातलं काहीच कळत नाही..पण माझ्या गावचा एक मुलगा एवढा मोठा चित्रकार झाला हे मला तुझ्यामुळे कळलं..त्याला आजच फोन करतो.. अजून माझ्याकडे फोन नंबर नाही पण मिळवेन मी..तुझ्याकडे असेल तर एसएमएस कर..आणि लवकरच त्यालाही भेटेन..शशिकांतच्या चित्रामुळे माझ्या गावचं नावही मोठं झालं यातच मलाही आनंद आहे. .ब्लॉग आणि फोनवरुन त्याची माहिती दिली त्याबदद्ल धन्यवाद..अन्यथा मला या चित्रकाराची ओळख कदाचित झाली नसती…
धना, शशिकांत फेसबुकवर आहे… https://www.facebook.com/profile.php?id=100001830506429
सरजी…. मला आपले ब्लाग खूप आवडले…. मला त्यांना भेटायचयं प्लीज माहीती द्या….. माझा मेल.. vinayakkundaram@gmail.com Cell No. 9004176056 asap… 🙂
विनायक, शशिकांत, शिरापूरमध्येच असतात… ते फेसबुकवर आहेत… त्यांच्याशीही थेट संपर्क करता येईल.. मुंबईत येतात, बऱ्याचदा. पण मला मुंबईतील पत्ता माहिती नाही
I am die heart fan of him And I am trying to reach up-to him. Can you please help me with it??