2011 या संबंध वर्षावर अण्णा हजारे यांचा प्रभाव पडलेला दिसतो. पहिल्यांदा एप्रिलमध्ये जंतर मंतरवर पाच दिवसांचं उपोषण त्यानंतर ऑगस्टमध्ये रामलीला मैदानावर बारा दिवसांचं उपोषण आणि मग वर्ष संपताना मुंबईत एमएमआरडीए मैदानावर दोन दिवसांचं उपोषण…
या तीन उपोषणांपैकी पहिल्या दोन उपोषणाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, मात्र अण्णांना आपल्या आंदोलनाला असलेला लोकसमर्थनाचा प्रतिसाद तिसऱ्या वेळी म्हणजे मुंबईत कायम ठेवता आला नाही. त्याच पार्श्वभूमीवर स्टार माझा आणि नेल्सनने संयुक्त रित्या देशभरात एक सर्वेक्षण करून अण्णा इफेक्टचा आढावा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला. अर्थातच हे सर्वेक्षण प्रातिनिधिक आहे. देशातल्या फक्त 28 शहरांचा त्यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्रातली म्हणाल तर फक्त पाचच शहरे आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूर… अण्णांच्या तीनही आंदोलनानंतर आम्ही देशभरात अशा प्रकारचे सर्वेक्षण केलं होतं. त्या टप्प्यातला हे तिसरं सर्वेक्षण… परवाच ज्येष्ठ राजकीय आणि निवडणूक विश्लेषक योगेन्द्र यादव यांनी एका कार्यक्रमात बोलताना असं स्पष्ट केलं होतं की अण्णा अजूनही या देशातली एक चुकलेला बाण नाही. भलेही त्याचं मुंबईतलं आंदोलन फ्लॉप गेलं असलं तरी अजून त्यांच्यावर देशवासियांचा विश्वास आहे. टीम अण्णांने राजकीय प्रक्रियेला, राजकीय विचारांना सरसकट विरोध न करता भ्रष्ट राजकारणाला विरोध केला पाहिजे… अर्थातच हा विरोध लोकशाही मार्गानेच शक्य होणार आहे, आणि अण्णांना आणि त्यांच्या माध्यमातून या देशातल्या जनतेला अपेक्षित असलेले बदल लोकशाही प्रक्रियेतूनच शक्य होणार आहे. कारण अण्णांमध्ये अजूनही लोकांचा विश्वास आहे… तोवर त्यांच्यावर आर्थिक अनियमिततेचे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांवर कितीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले तरी लोक त्यांच्यासोबतच राहणार आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचं कधीही समर्थन करता येणार नाही. तरीही त्यांनी चालविलेल्या मोहिमेला आपापल्या परीने पाठिंबा तर नक्कीच देता येईल.
टीम अण्णामध्ये अनेक अंतर्विरोधही आहेत. प्रत्येकाचे इंटरेस्ट वेगवेगळे आहेत. पण प्रत्येकाचं ध्येय तर एकच आहे, किमानपक्षी सध्यातरी सर्वांनी एकच सार्वजनिक ध्येय एकच ठेवलं आहे. अर्थातच या आंदोलनाच्या माध्यमातून पुढे मागे काही त्यांनी राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला तर देश त्यांना कधीच माफ करणार नाही. त्यांनाही त्यांची जागा आज त्यांच्यामागे असलेली जनताच दाखवून देईल. याच पार्श्वभूमीवर स्टार माझाने देशभरात सर्वेक्षण करून अण्णांचा करीश्मा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा गोषवारा… अण्णा इफेक्टच्या सर्वेक्षणाचा तपशील असलेली बातमी http://www.starmajha.com या लिंकवरही उपलब्धही आहे.
स्टार माझावर जेव्हा दहे सर्वेक्षण प्रसारित झालं तेव्हा त्यावर जाणकारांची एक चर्चाही आयोजित करण्यात आली होती. त्याच्या व्हिडिओची लिंकही इथे देत आहे…
मुंबईत अण्णांच्या लोकपाल आंदोलनाचा फ्लॉप शो झाला. त्यानंतर अण्णा चळवळ थंड्या वस्त्यात असे अग्रलेखही आले, अनेकांनी अण्णांना आपापल्या परीने सल्ले द्यायला सुरूवात केली. अण्णा आता तरी सुधारा नाही तर काही खरं नाही. पण प्रत्यक्षात खरीच स्थिती आहे का? आम्ही घरोघर जाऊन लोकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर काय आलं हातात…
http://starmajha.newsbullet.in/india/34-more/11605-2012-01-06-15-33-22
अण्णांचा मुंबईतील शो कथित अर्थाने जरी फ्लॉप झाला असला तरी, प्रत्यक्षात अण्णांना असलेला लोकांचा पाठिंबा तसूभरही कमी झालेला नाही. अजूनही अण्णा आणि त्याचं आंदोलनच आपल्याला प्रभावी सशक्त आणि लोकपाल मिळवून देऊ शकतील तसंच त्यांच्यामुळेच देशातला भ्रष्टाचार निपटून काढण्यास मदत होईल… असाही निष्कर्ष स्टार माझा – नेल्सन सर्वेक्षणातून उघड झाला.
अण्णाचं मुंबईतील आंदोलन संपल्यानंतर आम्ही हे सर्वेक्षण केलं. भारतातील तब्बल 28 शहरांमध्ये झालेल्या या सर्वेक्षणात अण्णा अजूनही देशवासियांचे खरे हिरो असल्याचंच आम्हाला दिसून आलं. म्हणजे अगदी उद्याच निवडणुका झाल्या तर देशाच्या राजकीय पटलावर काय चित्र असेल, असंही आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला. आमच्या गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या वेगवेगळ्या जनमत चाचण्यांच्या मालिकेतला आज जाहीर झालेलं सर्वेक्षण हे तिसरं सर्वेक्षण… वेगवेगळ्या टप्प्यावर आणि वेगवेगळ्या काळात आम्ही काही ठराविक प्रश्न घेऊन लोकांमध्ये गेलो, आणि त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी मे 2011 आणि ऑगस्ट 2011 मध्ये याच प्रकारचे सर्वेक्षण आम्ही केलं होतं. आता आज आलेला या मालिकेतला हा तिसरं सर्वेक्षण आहे. अर्थातच हे तिसरं सर्वेक्षण मुंबईतला अण्णांचा शो फ्लॉप झाल्यानंतर तसंच लोकपाल विधेयक संसदेत संमत झाल्यावर आणि राज्यसभेत त्यावर मतदान न होता गुंडाळलं गेल्यानंतर घेण्यात आलंय.
आम्ही जेव्हा मतदारांना थेट विचारलं की तुमचा अजूनही अण्णांचा पाठिंबा आहे का, कारण गेल्या काही आठवड्यांपासून त्यांची लोकप्रियता घटतेय, तर आम्हाला मिळालेल्या प्रतिसादानंतर तब्बल 52 टक्के लोकांनी अजूनही अण्णांना आपला पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं. फक्त 42 टक्के लोकांना अण्णांची लोकप्रियता घटल्याचं वाटतं. तर अण्णांच्या मुंबईतील उपोषणाबद्धल 92 टक्के लोकांना माहिती असल्याचं या सर्वेक्षणातून पुढे आलं.
एवढंच नाही तर राज्यसभेत लोकपाल विधेयकावर मतदान न होता गुंडाळलं गेल्याला राजकारणीच जबाबदार असल्याचं 43 टक्के लोकांना वाटतं. तर 30 टक्के लोकांना राज्यसभेतल्या नामुष्कीसाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचं वाटतं. हेच तीस टक्के लोक विधेयक संमत होऊ शकलं नाही यासाठी काँग्रेसला जबाबदार धरतात.
आम्ही या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांना विचारलं की टीम अण्णा ही खरोखरच हटवादी आणि हेकट आहे का? अण्णा हजारेंनी जरा नमतं घेत आपला हेतू साध्य करून घेतला पाहिजे का. तर तब्बल 59 टक्के लोकांना टीम अण्णा ही हेकट वाटत नाही. उलट त्यांनी अतिशय रिजीड पद्धतीने आपल्या मागण्या सरकारकडून मान्य करून घेतल्या पाहिजेत असंही त्यांना वाटतं. कारण सरकार त्याशिवाय त्यांना जुमानणार नाही. अशीही या 59 टक्के लोकांची भूमिका आहे, तर फक्त 36 टक्के लोकांना अण्णांनी थोडा नमतेपणा दाखवत सरकारबरोबर सातत्याने चर्चा करून सामोपचाराने मार्ग काढायला हवा असं वाटतं.
अण्णांच्या आमरण उपोषणाविषयी आम्ही जेव्हा लोकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा असं आढळून आलं की तब्बल 71 टक्के लोकांना अण्णांनी लोकपाल विधेयक संमत होत तोवर आमरण उपोषण करावं असं वाटतं. या लोकांनी सरकारी लोकपालाच्या तुलनेत अण्णाचं लोकपाल अधिक संक्षम असल्याचंही मत व्यक्त केलं. तर आम्ही प्रश्न विचारलेल्या अनेकांनी सरकारी लोकपाल विधेयकही चांगलं असल्याचं मत व्यक्त करून सरकारी विधेयकाला पाठिंबा दर्शवला. 61 टक्के लोक सरकारी लोकपाल विधेयकाविषयी आशावादी असल्याचं सर्वेक्षणात उघड झालं.
लोकपाल विधेयकाला संसदेत संमत होण्यासाठी राजकारणी कितपत पाठिंबा देतील, असं विचारल्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिसून आली, 48 टक्के लोकांनी सांगितलं राजकारणी लोकपाल विधेयक संमत होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतील तर 43 टक्के लोकांनी नेमकं यापेक्षा वेगळं मत व्यक्त केलं.
एकूणच जेव्हा भ्रष्टाचाराचा विषय निघतो, तेव्हा राजकारणी नेते आणि त्यांच्या पक्षाचे यांच्यावर त्यांचा स्वाभाविक रोष निघतो. या देशात भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजण्यासाठी हे सर्वपक्षीय राजकारणीच जबाबदार असल्याचं तब्बल 67 टक्के लोकांना वाटतं. टीम अण्णा जरी प्रमुख सत्ताधारी पक्ष म्हणून फक्त काँग्रेसलाच भ्रष्टाचारासाठी जबाबदार धरत असली तरी फक्त 28 टक्के लोकांना देशातल्या भ्रष्टाचारासाठी काँग्रेस जबाबदार असल्याचं वाटतं.
राहुल गांधी हे अलीकडच्या काळात एक लोकप्रिय युवा नेते म्हणून उदयाला आले आहेत. पण बहुसंख्य लोकांना अजूनही राहुल गांधी यांनी पंतप्रधान होण्याची वेळ आलेली नसल्याचं वाटतं. टक्केवारीच्या भाषेत सांगायचं तर 58 टक्के लोकांना अजूनही राहुल गांधी पंतप्रधान म्हणून देशाची धुरा सांभाळण्यासाठी सक्षम आहेत, असं वाटत नाही.
आम्ही ऑगस्ट महिन्यात जेव्हा अशाच प्रकारचं सर्वेक्षण केलं होतं. त्यावेळी राहुल गांधी पंतप्रधान होण्यासाठी सक्षम असल्याचं मत 39 टक्के लोकांनी व्यक्त केलं होतं. आता मात्र त्या प्रमाणात बरीच घट झालीय. यावेळी फक्त 35 टक्के लोकांनी राहुल गांधीच्या पंतप्रधान होण्याला संमती दर्शवलीय. म्हणजेच राहुल गांधीच्या लोकप्रियतेत तब्बल चार टक्क्यांची घट झालीय.
बहुसंख्य म्हणजे 56 टक्के लोकांना असं वाटतं की सत्ताधारी काँग्रेसला अण्णा हजारेचं आंदोलन योग्य पद्धतीने हाताळता आलं नाही. अण्णाचं आंदोलन हाताळण्यात सरकारला आलेलं अपयश नेमकं कोणामुळे असं विचारल्यावर मात्र 57 टक्के लोक पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना क्लीन चीट देतात, त्यासाठी काँग्रेसच्या मंत्रिमंडळातले सहकारी जबाबदार असल्याचं वाटतं.
तसंच अगदी उद्याच निवडणुका झाल्या तर कुणाला मतदान कराल किंवा कोणत्या पक्षाकडे सत्तेची सूत्रे सोपवायला हवीत, असं विचारल्यावर मात्र भाजपला पसंती देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तब्बल 31 टक्के म्हणजे सर्वाधिक लोकांनी भाजपला पसंती दिलीय, तर काँग्रेसच्या बाजूने उभे राहणाऱ्यांची टक्केवारी फक्त 21 टक्के आहे.
स्टार माझा – नेल्सन यांनी हे सर्वेक्षण देशातल्या 28 शहरामध्ये केलं. त्यामध्ये महाराष्ट्राल्या मुंबईसह पाच प्रमुख शहरांचा समावेश होता. त्यामध्ये पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद अशी इतर शहरे आहेत. देशभरात या सर्वेक्षणात 8902 लोकांनी भाग घेतला. तर हे सर्वेक्षण 30 डिसेंबर 2011 ते एक जानेवारी 2012 या तीन दिवसात पार पडलं.
http://www.starmajha.com
anna ke vichar khatm karna congress ke bas ki bat nahi ! aanna abhi jinda hai !