वाढत्या लोकांक्षाचं वर्ष 2011

सरलेल्या म्हणजे 2011 या वर्षाच्या गप्पा अजून किती दिवस मारायच्या… आताशा अनेक वृत्तपत्रांनी, टीव्ही चॅनेलांनी 2011 चा आढावा घेतला असेल, काही अजूनही घेत असतील…
थोडक्यात काय तर …

तुम चले जाओगे तो सोचेंगे…
हम नें क्या खोया, क्या पाया….

(कृषिवल मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2012)

हे तसं अजून काही दिवस सुरू राहिल अजून… अजून नव्या वर्षाचा पहिला आठवडा संपायचाय. आज इन मिन तिसरा दिवस… त्यामुळे सरलेल्या वर्षांच्या आठवणींमधून बाहेर पडायला तसे काही दिवस लागणं साहजिकच आहे…हळू हळू मग हा महिना संपेल, फेब्रुवारी तर तसा छोटाच… मग अर्थसंकल्पात आपल्याला काय मिळालं काय नाही याची चर्चा करत आणि एक एप्रिलपासून नवं आर्थिक वर्ष सुरू होईल तेव्हा आपणच आश्चर्यचकित होऊन म्हणू की नव्या वर्षाचे तीन महिने संपले सुद्धा… असं करत करत आपण पुन्हा 31 डिसेंबर साजरा करायची वेळ येईल.. पण ते वर्ष 2012 असेल आणि आपण 2013 चं स्वागत करायला सज्ज झालेलो असू… पुन्हा त्याच ओळी

तुम चले जाओगे तो सोचेंगे…
हम नें क्या खोया, क्या पाया….

पण मला अजूनही 2011 च्या एका वैशिष्ट्याचा आढावा घेण्याचा मोह आवरत नाही. तसंही नवं वर्ष सुरू होऊन फक्त तीनच दिवस झालेत नाही, हातांनाही अजून 2012 चं वळण बसलेलं नाही. बऱ्याचदा बँकेत वगैरे तारखा लिहिताना 2011 करून कित्येकदा लिहिलेल्या स्लीप फाडून टाकाव्या लागल्यात.

नवं वर्ष उजाडण्यापूर्वी आपल्या माननीय पंतप्रधानांनी सबंध देशासाठी एक संदेश जारी केला. टीव्हीवर त्यांचा संदेश आला की नाही ते आठवत नाही. पण त्याच्या बातम्या मात्र अनेत ठिकाणी आल्या. माझ्याकडे अर्थातच या माध्यम विश्वाचा मी एक भाग असल्यामुळे त्याच्या भाषणाची कॉपी आली. चांगलं साताठ पानाचं लांबलचक भाषण आहे, पंतप्रधानांचं… त्यामध्ये त्यांनी सरत्या वर्षाचा आढावा घेतानाच नव्या वर्षातल्या आव्हानांचीही चर्चा केलीय. त्यात त्यांनी एक अतिशय महत्वाची बाब नमूद केलीय. म्हणजे मला तरी किमान ते सर्वात महत्वाचं वाटतं. पंतप्रधानांनी 2011 या सरलेल्या वर्षाला लोक आंदोलनाचं वर्ष असं म्हटलंय. भारतातही सरलेल्या वर्षात अण्णा हजारेचं नेत्तृत्व नव्याने उभं राहिलं. म्हणजे महाराष्ट्रात रचनात्मक कार्यक्रमामुळे त्याचं नाव तसं अपरिचित नव्हतंच, पण एप्रिल 2011 पासून त्यांच्या नावाला एक देशव्यापी आयाम मिळाला. नेमकी हीच बाब पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी अतिशय नेमक्या शब्दात पकडलीय, आपल्या संदेशात….

A ‘revolution of rising expectations’, fostered by the extraordinary reach of the electronic media and the connectivity provided by new social networking platforms, has kept Governments around the world on their toes.

लोकांच्या, सर्वासामान्य जनतेच्या वाढत्या आशा-आकांक्षांच्या क्रांतीचं हे वर्ष, ज्याला साथ मिळाली गल्ली ते दिल्ली अशी पोहोच असलेली टीव्ही चॅनेल्स आणि सोशल नेटवर्किंगने उपलब्ध करून दिलेली संपर्काची संधी यामुळे सतत वाढणाऱ्या लोकांक्षांपुढे जगभरातल्या सरकारांनाही गुडघे टेकायला भाग पाडलं… असं पंतप्रधानानी आपल्या भाषणात म्हटलंय. त्याच्या या वक्तव्यात टीव्ही आणि सोशल नेटवर्किंग या दोन्ही संपर्क माध्यमांच्या ताकदीचा योग्य आढावा घेत सर्वाधित महत्व त्यांनी लोकांच्या सतत वाढणाऱ्या अपेक्षांना दिलंय. या म्हणजे सरलेल्या वर्षाचं जर काही फलित असेल तर हेच की या वर्षाने लोकांना जागं केलं. अगदीच अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टीही जनआंदोलनांचा रेटा असेल तर प्रत्यक्षात येऊ शकतात, हे सुद्धा याच वर्षाने दाखवून दिलं.

भारतात अण्णा हजारेचं आंदोलन मुंबईतल्या फ्लॉप शोनंतर जरा विरल्यासारखं वाटतं असलं तरी त्यानंतर लगेचच संसदेत मध्यरात्रीपर्यंत जो काही तमाशा चालला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला जबाबदार कोण हे सांगण्यासाठी जशी पत्रकार परिषदांची मॅरेथॉन चालली होती,. ते पाहून अण्णांचा आणखी एक संधी तर द्यायलाच हवी, असं अण्णांच्या आंदोलनाला अनुपस्थित राहून त्यांच्यावर रोष व्यक्त करणाऱ्या मुंबईकरांना तर नक्कीच वाटलं असणार, त्याची प्रतिक्रिया फेसबुकवर फारशी उमटली नाही कारण तोपर्यंत सुट्याचा मोसम सुरू झालेला… काय करणार अजून तरी आपल्याकडे इंटरनेट अजूनही आवाक्यात नाही. कारण मोबाईलमुळे प्रत्येकाच्या हातात इंटरनेट आला तरी अजून स्पीड वगैरे मुद्दे 3G च्या जमान्यातही आहेतच की…

हे झालं भारताच्या बाबतीत, देशाबाहेर पाहायचं तर आणखीणच आशादायक चित्र आहे. अरब देशात क्रांती झाली ती तरूणांच्या आणि त्यांच्या हातात असलेल्या सोशल नेटवर्किंगसारख्या हत्याराने… सोशल नेटवर्किंग हेही एक बेजोड असं हत्यार होऊ शकतं, त्यामुळे भल्या मोठ्या हुकूमशहांच्या सत्ता उलथवून टाकता येतात, याची जाणीव जगाला झाली. फार जुनं नाही पण या सोशल नेटवर्किगनेच अमेरिकेला पहिला कृष्णवर्णीय अध्यक्ष दिला होता. आता पुन्हा अध्यक्षांची निवडणूक हे नवं वर्ष घेऊऩ आलंय. आधीच्या निवडणुकीत सोशल नेटवर्किंगने केलेला चमत्कार पाहून आणि सरलेल्या वर्षात वेगवेगळ्या जुलमी राजवटींचा अंत पाहून रिपब्लिकांनीही सोशल नेटवर्किंगचे धडे आतापासूनच गिरवायला सुरूवात केलीय.

एकुणातच सोशल नेटवर्किंग हे बदलाचं अर्थवाही माध्यम बनलं, ही 2011 या सरलेल्या वर्षाची सर्वात मोठी उपलब्धी आहे. मग ते थेट अगदी जेमतेम दीड महिन्याचं आयुष्य असलेल्या कोलावरीचं उदाहरण घ्या किंवा 25 जानेवारी 2011 ला पहिल्यांदा इजिप्तच्या होस्नी मुबारक यांच्या राजवटीविरूद्ध निघालेला पहिला हुंकार असू द्या… सर्वत्र होत असलेल्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक बदलाला सबंध जगभर पोहोचवण्याचं आणि त्याचा स्थानिक लोकशाही चळवळींवर लोकांच्या व्यापक सहभागावर, त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर प्रभाव टाकण्याचं काम याच वर्षात झालं.

जगभर दिसत असलेल्या बदलांचा धसका आपल्या भारतातल्या सरकारनेही घेतला, त्यातूनच मग कपिल सिब्बल यांनीही सोशल नेटवर्किंगवर निर्बंध घालता येतील का याची चाचपणी केली. हा प्रकार त्यांच्या अंगलट आला, आणि त्यांना सपशेल माघार घ्यावी लागली, ती ही याच वर्षात….

थोडक्यात काय तर माहिती प्रसारणाची साधने ही कुणा मूठभरांच्या हातात राहिलेली नाहीत तर ती थेट लोकांच्या हातात आली आहेत. त्याचं नियंत्रणही लोकांच्या हातात आलंय. ही एका नव्या तंत्रज्ञानाधिष्टीत लोकशाहीची नांदी आहे.

आणि

जाता जाता…

2012 विषयी… तर तीनच दिवसांपूर्वी सुरू झालेलं हे वर्ष अगणित संधी घेऊन आलेलं आहे… अर्थात फक्त सोशल नेटवर्किंगचाच विचार केला तरी अफाट असं जग तुमच्या पुढ्यात उभं ठाकलेलं आहे… या संधी व्यावसायिक आहेत, माहिती-ज्ञान-मनोरंजनाच्या आहेत, तंत्रज्ञानाच्या आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उज्जव भवितव्याच्या आहेत.

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: