सोशल नेटवर्किंगवर निर्बंध घालण्यापूर्वी….

इन बंद कमरों में मेरी सॉंस घुटी जाती है
खिडकियॉं खोलता हूँ तो जहरीली हवा आती है

प्रसिद्ध हिंदी लेखक कमलेश्वर यांनी आपल्या ‘कितनें पाकिस्तान’ या कादंबरीची सुरुवात या ओळींनी केलीय. या ओळी कुणाच्या याचा उल्लेख त्यांनी त्यामध्ये केलेला नाही. नंतरही माझ्या वाचनात त्या ओळी आलेल्या नाही. आता इथे त्याचा संदर्भ देण्याचा हेतू एवढाच की, सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या संदर्भात आता सुरु असलेल्या काही घडामोडी. यामुळे मला या ओळींचा पुन्हा एकदा शोध घ्यायला भाग पाडलं. मला फेसबुकच्या बाबतीत किंवा त्यासंदर्भात ज्या काही उलट सुलट बातम्या सध्या येत आहेत, त्यावर जे भाष्य करायचंय, ते नेमकं अशा द्विधावस्थेतलं आहे.
(कृषिवल, मंगळवार दिनांक 29 डिसेंबर 2011)

फेसबुक काय किंवा एकूणच इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंगने आपल्यासमोर अख्खं विश्व आणून उभं केलंय. फेसबुक नसेल किंवा इंटरनेट नसेल, तर आपली दारेखिडक्या पूर्णपणे बंदच की कुणाचाच कुणाशी संपर्क नाही, दळणवळण नाही, संवाद नाही, विसंवाद तर त्याहून नाही. म्हणजे किती एकलकोंड्यासारखी अवस्था होईल.

गेल्याच आठवड्यात आलेली ही बातमी. दिल्लीतल्या एका कोर्टाने फेसबुक, याहू, गुगलसह वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साईट्सना नोटीस इश्यू केल्या. कोर्टाने त्यांच्याकडे दाखल झालेल्या एका याचिकेसंदर्भात ही नोटीस होती. त्यामध्ये असं स्पष्ट करण्यात आलं होतं की, या सोशल साईट्सनी त्यावर असलेला आक्षेपार्ह मजकूर तातडीने हटवावा. त्यावर झालेल्या सुनावणीसाठी फक्त दोनच सोशल नेटवर्किंगचे प्रतिनिधी उपस्थित राहिले, कारण इतरांना या नोटीसा मिळाल्या नाहीत. जे हजर राहिले त्यांच्या प्रतिनिधींनी कोर्टाने बजावलं की सहा फेब्रुवारीपर्यंत आक्षेपार्ह मजकूर हटवा.

त्यानंतर आजच माझ्या फेसबुक वॉलवर कुणाचं तरी स्टेटस आलं, की म्हणे दिल्लीतल्या एका कोर्टाने फेसबुक आणि त्यांच्या वापरकर्त्याला नोटीस जारी केलीय, एका वकिलाच्या याचिकेवरून. या वापरकर्त्याने म्हणे भगवद् गीतेवर बंदी घालण्यासंदर्भातील आवाहन केलं होतं. माझ्या वॉलवर आलेल्या या स्टेटसमध्ये असा प्रश्न विचारण्यात आला होता की, यामध्ये फेसबुकचा काही दोष आहे की नाही. त्यावर वेगवेगळ्या कॉमेन्ट आल्यात. पण, बहुतांश फेसबुकर्सना असंच वाटतं की, संबंधित स्टेटस कुणीही काहीही टाकतं, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, फक्त फेसबुक हे व्यासपीठ आहे, त्यामध्ये त्या व्यासपीठाचा काय दोष?

फक्त कपिल सिब्बलच नाही तर मध्यंतरी शिवसेनेच्या युवा नेत्यांनीही अशीच मागणी केली होती. म्हणजे फेसबुकवर आक्षेपार्ह कॉमेन्ट नसल्या पाहिजेत. अशा कॉमेन्ट फेसबुकवर येत असतील तर त्यावर निर्बंध असायला हवेत. या बातमीकडे कुणी फारसं लक्ष दिलं नाही, हा भाग वेगळा.

म्हणजे फेसबुक सर्वांनाच हवं आहे, मात्र त्यावरील आक्षेपार्ह कॉमेन्ट मात्र नकोत. फक्त काही लोकांना आवडणार्या, सुखावणार्या किंवा स्कापॉलिसी करणार्याच कॉमेन्ट आपल्या वॉलवर किंवा पेजवर आल्या पाहिजेत, असं म्हणणं कितपत संयुक्तिक आहे?

मला स्वतःला माझं व्यक्तिगत मत म्हणून जे काही वाटतं ते सर्व मी या लेखाच्या सुरुवातीलाच देण्याचा प्रयत्न केला आहे, ते म्हणजे इन बंद कमरों में मेरी सॉंस घुटी जाती है, खिडकियॉं खोलता हूँ तो जहरीली हवा आती है, करायचं तरी काय… पण म्हणून काही खिडक्या बंद करून चालेल काय. बाहेरून आतमध्ये विषारी हवा येऊ नये, यासाठी काहीतरी प्रयत्न करूयात की… त्यासाठी निर्बंध किंवा सरसकट बंदी अशी आचरट मागणी करून कसं चालेल.

सामाजिक माध्यमांवर निर्बंधांची मागणी ही अशीच शुद्ध गैरलागू आहे. सोशल नेटवर्किंग हे माध्यमच परस्परसंबंधांचं आहे. मग त्यावर तिसर्या कुणाचे तरी निर्बंध कसे काय येऊ शकतील. याच स्तंभात मी यापूर्वीही एकदा फेसबुकवर आपल्याला न आवडणार्या किंवा न रूचणार्या कॉमेन्टला प्रतिबंध करण्यासाठी स्वतः फेसबुकने कितीतरी प्रकारच्या उपाययोजना केल्या असल्याची माहिती दिली होती. म्हणजेच जे काही करायचंय ते तिसर्या कुणीतरी नाही तर आपलं आपणच करायचं आहे. इतकं हे माध्यम आणि व्यासपीठ लोकशाहीधिष्ठीत आहे, सर्व नियंत्रणच लोकांच्या, वापरणार्यांच्या हाती आहे, तरीही काहीही विचार न करता आपल्याकडे निर्बंधाच्या मागण्या सरसकट होतात, म्हणजेच हे आपल्या नाकर्तेपणाचंच लक्षण म्हणता येईल.

फेसबुकवर कॉमेन्ट टाकणारे, किंवा स्टेटस अपडेट करणारेही आपणच असतो की… किंवा मग आपल्यासारखेच… मग फेसबुकवर निर्बंध घालायचे तर ते प्रत्येकाने स्वतःवरच घालून घेतले पाहिजेत. ही सेन्सॉरशिप त्रयस्थ दमनकारी संस्थेकडून अर्थातच नसली पाहिजे, कारण त्यामुळे संबंध अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध येतील. तर ही सेन्सॉरशिप आपणच आपल्या भल्यासाठी स्वयंप्रेरणेनं घालून घेतलेली असायला हवी…

म्हणजे उद्या बंद घरात घुसमट होत असेल, आणि दरवाजे, खिडक्या उघडल्या तर विषारी हवा घरात येत असेल तर दोष त्या दरवाजे आणि खिडक्यांचा नक्कीच नसेल तर तो दूषित हवेचा असेल, त्यासाठी आपण आपल्या चेहर्यावर मास्क लावूयात, दूषित हवा, विषारी हवा, आपल्या जीवावर बेतणार नाही यासाठी प्रयत्न करूयात… सरसकट दरवाजे-खिडक्या बंद करणं किंवा आसमंतातल्या हवेवरच, कारण ती विषारी वायूचं वहन करते म्हणून बंदी घालणं कसं संयुक्तिक ठरेल?

फेसबुक हे फक्त एक माध्यम आहे. आज फेसबुकची चलती आहे, त्यापूर्वी ऑर्कुटची चलती होती, उद्या कदाचित फेसबुकची जागा गूगल प्लस किंवा अजून कोणतंही माध्यम घेईल… किंवा त्यापेक्षा आणखी वेगळं काही तरी इंटरनेटवर अवतरेल. हा प्रवाह चालतच राहणार आहे. आपल्या बदललेल्या आणि सतत बदलत राहणार्या अभिव्यक्ती होण्याच्या गरजांप्रमाणे किंवा अभिव्यक्तीच्या वेगवेगळ्या फॉर्मप्रमाणे… तेव्हा बदल हे आपल्यातच घडवले पाहिजेत.

सोशल नेटवर्किंगचं माध्यम उपलब्ध करून देणार्या संस्था किंवा कंपन्या यांचा हिशोब फक्त हिट्स आणि पेजव्यूजवर चालतो. त्यांना त्यांच्या साईट्सचा जास्तीत जास्त वापर झालेला हवा आहे. त्यांनी फक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. त्याचा वापर आपण आपल्या हितासाठी करायची जबाबदारी तर आपलीच असेल ना! आपल्या घरात येत असलेल्या खिडक्यांतून शुद्ध हवा आणि प्रकाश आतमध्ये येऊ द्यायचा की विषारी हवा, निर्णय आपलाच असणार आहे. खिडकी बंद करणं हे कधीच उत्तर असत नाही. याच फेसबुक किंवा सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आपल्याला अण्णा हजारेंच्या आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त करता आला, आता जेव्हा कधी कधी त्यांच्या उपोषणास्त्रांचा अतिरेक होतोय, असं लक्षात येतं तेव्हा त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया किंवा कॉमेन्ट व्यक्त करायलाही फेसबुक हेच माध्यम आहे. वापर आपण दोन्ही बाजूंनी आपणच करायचा आहे. एकूणच जर बदलत्या अर्थकारणाचा, वैश्विक घडामोडींचा विचार केला तर सहजच लक्षात येईल की, सोशल नेटवर्किंग ही बंद होणारी बाब नक्कीच नाही, किंवा निर्बंध घालणंही शक्य नाही, आपल्याला फार फार तर आपल्या अभिव्यक्त होण्याचे फॉर्म बदलावे लागतील. आपल्या बदलत्या गरजांप्रमाणे… एकूणच काय तर जरा जास्त डोळस होण्याची आवश्यकता आहे. सरतं वर्ष या ना त्या कारणाने चर्चेत राहिलं ते सोशल नेटवर्किंगमुळे. त्याच्या वेगवेगळ्या फॉर्ममुळे आणि त्यांच्या कंपन्यांनी साध्य केलेल्या आर्थिक उद्दीष्टांमुळे… म्हणजे यावर्षी अमेरिकेनं पाकिस्तानात जाऊन ओसामा बिन लादेनला यमसदनी धाडलं तरी त्या कारवाईचा सर्वात पहिला वृत्तांत जगभरात पोहोचला तो एका संगणक अभियंत्याच्या ट्वीटमुळे आणि त्यानंतर अमेरिकी कारवाईचे अधिकृत फोटो रीलिज झाले तेव्हाही अध्यक्ष ओबामा यांच्या वॉररूमचा फोटो हा याहूच्या फ्लिकरवर जगात सर्वाधिक पाहिला गेलेला फोटो झाला. म्हणजे ओसामाला ठार करणं ही मोठी गोष्ट असली तरी त्याची चर्चा वेगवेगळ्या पद्धतीने होत राहिली ती सोशल नेटवर्किंगमधूनच… मग आता आपल्याला चर्चा करायचीय, विचारांचं आदानप्रदान करायचंय की फक्त द्वेष आणि विषारी वायू जगभरात पसरवायचे आहेत, याचाही निर्णय या नव्या वर्षात जाताना करायचा आहे. नव्या वर्षाचं स्वागत करायचं ते निर्बंधांनी किंवा जखडलेपणातून कसं करता येईल…

मोकळं तर व्हायलाच हवं…

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Join the Conversation

3 Comments

 1. हा विषय अत्यंत गहन आहे . योग्य विचार केल्यावर असे दिसते कि काहीतरी बंधने असलीच पाहिजेत. परंतु दुसरा एक नवीन प्रश्न उभा राहतो तो म्हणजे बंधनावर कोणाचे बंधन.जगातल्या अनेक देशात ज्यांना बंधने आणण्याचा अधिकार आहे त्यांनी त्याचा दुरुपयोग केलेला आहे हे उघड आहे. याला उपाय म्हणून अशी बंधने अगदी ठराविक वेळे साठी आणि कोणी आणली या बद्दल अत्त्यंत उघड पणा पाहिजे. सरकारची तीन अंगे असतात . हि बंधने आणण्या साठी त्यातल्या कमीतकमी दोन अंगांची परवानगी पाहिजे.प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात तसे तोटे सुद्धा असतात आपण स्वतःला कुठे थांबवायचे ते आपण ठरवायचे असते

 2. खरंय, पूजा तुमचं… फक्त बंधने असलीच पाहिजेत मात्र ती कुणाही त्रयस्थ दमनकारी संस्थेमार्फत नसावीत तर आपली आपणच स्वतःवर घालून घेतलेली असली पाहिजेत…

 3. नु कतीच फेसबुकवर एका मित्राची पोस्ट पाहिली. त्याने त्याच्या रूममध्ये
  “वाय-फाय’ सुरू केलं होतं आणि तो आणि त्याचे रूम पार्टनर एकाच खोलीत बसून
  तासभर चॅट करत होते… एकमेकांशीच ! पण या प्रसंगाने मी नक्कीच माझ्या
  “सोशल नेटवर्किंग’ वापरावर विचार करायला लागलो. “सोशल नेटवर्किंगचे
  फायदे-तोटे’ अशा स्वरूपाचा विचार करण्याऐवजी आणि चूक की बरोबर, अशी लेबल न
  लावता आत्मपरीक्षण करायचा हा प्रयत्न आहे. का दिवसातून दहादा तरी फेसबुक
  चेक करावंसं वाटतं? मित्रांशी फोनवर, प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा चॅटिंग का
  बरं वाटतं? आपण शेअर केलेल्या व्हिडिओ, फोटोवर खूप कॉमेंट याव्याशा का
  वाटतात? हे आणि असे अनेक प्रश्‍न पडू लागले. पण उत्तरं नव्हती; कारण आधी
  कधी हे प्रश्‍न स्वतःला विचारावेसे वाटलेच नाहीत. नुसतंच आवडतं म्हणून
  करतो, याच्याशिवाय दुसरं कारण नव्हतं. त्यातून मला जी उत्तरं मिळाली ती देत
  आहे. सगळ्यांची हीच उत्तरं असतील असं नव्हे, आणि माझी उत्तरं परिपूर्ण
  असतील असं तर अजिबात नव्हे. फेसबुक, लिंक्‍डइन, अशा साइट्‌सवर माझी
  प्रोफाइल, हे माझं जग आहे. इंटरनेटवर माझी “स्वतःची’ जागा आहे. त्याला कसा
  आकार द्यायचा, हे सगळं मी ठरवतो. प्रत्येकाच्या मनात सुप्त इच्छा असतेच
  सत्ता गाजवायची… कुणावर किंवा कशावर तरी… माझी ही इच्छा लहान प्रमाणात
  का होईना, इथे पूर्ण होते. यातूनच नकळत एक स्पर्धा सुरू झाली… आपलं जग
  दुसऱ्यापेक्षा चांगलं करण्याची. म्हणूनच एखाद्या मित्राच्या फोटोवर
  इतरांच्या कॉमेंट पाहिल्या, की आपल्याही फोटोबाबत असं व्हावं, असं वाटतं.
  मित्रांनी माझी दखल घेतल्याची पावती म्हणजे या कॉमेंट्‌स. म्हणून जास्ती
  पोस्ट, जास्ती फोटो, स्वतःच्या आवडीनावडी, अनुभव मत.. असं शेअरिंग वाढतच
  गेलं. जेव्हा नीट विचार करून ही नकळत चाललेली स्पर्धा थांबवली. तेव्हा
  आपोआप फेसबुकवरचा वेळही कमी झाला.

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: