लोकपाल आता दृष्टीक्षेपात आलंय, पण प्रत्यक्षात यायला अजून बराच अवकाश आहे. प्रत्यक्षात येईल की नाही हे अजूनही कुणी ठामपणे सांगत नाही. सरकारने सोमवारी लोकपालवर चर्चा केली. कदाचित आज किंवा उद्या ते संसदेत मांडलंही जाईल. संसद अधिवेशनाचा कालावधी वाढला जाण्याचीही शक्यता आहे. सरकारने फक्त लोकपाल विधेयक संसदेत मांडण्यापुरतीच आपली जबाबदारी सीमित असल्याचाही दावा केलाय. म्हणजे लोकपाल विधेयक मांडायचं, त्याचं पुढे काय होईल, ते होईल… तंस गेल्या 40-45 वर्षांपासून ते प्रलंबित आहेच, फक्त महिला आरक्षण विधेयकाएवढी त्याची परवड झालेली नाही, हेच त्यातल्या त्यात एक समाधान…
(कृषिवल, मंगळवार, दिनांक 20 डिसेंबर 2011)
लोकपाल संसदेच्या पायरीपर्यंत नेण्यात सर्वात मोठा वाटा, आतापर्यंतचा तरी अण्णांचा आहे, अगदी निर्विवादपणे, त्यांच्याशी कितीही मतभेद असले तरी हे मान्य करावं लागत. तसंच अण्णांना सपोर्ट देणाऱ्या त्यांच्या प्रत्यक्ष सोबत न जाता, आपापल्या घरातून, ऑफिसमधून… त्यांना सपोर्ट करणाऱ्या नेटीझन्सचाही मोठा वाटा आहे, हे ही कधीच नाकारता येणार नाही.
अगदी सुरवातीचं अण्णाचं आंदोलन आठवा, म्हणजे एप्रिल महिन्यात अण्णांनी जंतर मंतरवर पाच दिवसाचं उपोषण केलं. त्यावेळी त्यांना मिळालेला अभूतपूर्व नेटिझन्सचा पाठिंबा. त्याच काळात कित्येक नेटीझन्सनी आपल्या फेसबुक पेजवर अण्णाचं जनलोकपाल आणि सरकारी लोकपाल या दोन्ही विधेयकांमधील फरक सर्वदूर पोहोचवण्याचा प्रयत्न केला. सोशल नेटवर्किंग मीडियातून अण्णा आणि त्यांच्या आंदोलनाला मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहूनच मग टीव्ही चॅनेलवाल्याचं तिकडे लक्ष गेलं, त्यातलं पोटेंशिअल लक्षात आलं. मग त्यानंतर झालेलं रामदेव बाबाचं आंदोलन असो की पुन्हा रामलीला मैदानावर झालेलंच अण्णाचं राजधानीतलं दुसरं उपोषण असो, त्यालाही नेटिझन्सही पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. त्यामध्ये काही जण अण्णांचा विरोध करण्यासाठीही आले होते. फेसबुकवर सर्वजण अण्णांना सपोर्ट करतात, म्हणून आपणही करा, असं काही नव्हतं… फेसबुकवर अण्णा आणि त्यांच्या आंदोलनाला सपोर्ट देणारा प्रत्येक नेटीझन काहीतरी विचार करतच असेल की… म्हणून त्याने दिलेली प्रत्येक कॉमेन्ट किंवा लाईक, तसं अगदीच वाया जाणारं नक्कीच नाही. याचीच दखल यावेळच्या म्हणजे सरत्या वर्षाच्या फेसबुकच्या मेमोलॉजीनेही घेतली आहे.
फेसबुक मेमॉलॉजीमध्ये यामुळेच की काय 2011 या संपूर्ण वर्षभरात सर्वाधिक चाललेला ट्रेंड हा अण्णा हजारे आणि जनलोकपाल बिल हा असल्याचं फेसबुकने निर्विवादपणे मान्य केलंय. कारण सरत्या वर्षातले एप्रिल, ऑगस्ट आणि त्यानंतर पुढे सबंध वर्षावर अण्णांचीच छाप राहिलीय. मग अशावेळी युवकांच्या अभिव्यक्तीचं प्रमुख माध्यम असलेलं फेसबुक मागे कसं राहिल?
बरं सर्वात महत्वाचं म्हणजे अण्णांना काही फेसबुक कॉर्पोरेशनने पाठिंबा दिलेलाच नाही. तर त्यांना मिळालेला पाठिंबा हा पूर्णपणे फेसबुकयूजर्सचा आहे. त्यावरील वेगवेगळ्या गटांचा आहे. म्हणजे अगदी सगळी आव्हाने समोर असतानाही हा पाठिंबा मिळालेला आहे. आजपावेतो अण्णांना मिळालेल्या या पाठिंब्याचं वेगवेगळ्या पातळीवर विश्लेषणही झालेलं आहेच. अण्णांना मिळालेला हा पाठिंबा किती तकलादू होता, किंवा त्याचं राज्यातल्या नगरपालिका निवडणुकीत मतांमध्ये कसं परिवर्तन झालं नाही. असेही मुद्दे चर्चेला आले, पण त्यामुळे काहीच साध्य होत नाही. कारण नेटीझन्सची गरज आणि त्याचं मानसशास्त्र हे पूर्णपणे वेगळंच आहे. त्या त्या क्षणी त्याला असलेलं तात्कालीक मूल्य कधीच नाकारता येणार नाही.
याहू या जगप्रसिद्ध सर्चइंजिनच्या इंडिया डोमेननेही 2011 या सरत्या वर्षाचा आढावा घेताना, अण्णांना मिळालेल्या अबूतपूर्व पाठिब्यांचा गौरवपूर्वक उल्लेख केलाय. याहूच्या टॉप सर्च म्हणजे पर्सन ऑफ द इयर ठरले आहेत, अण्णा हजारे… त्यानंतरचा क्रमांक विक्रमादित्य सचिन, त्यानंतर कॅरिना कैफ आणि पुन्हा वर्ड ऑफ द इयर म्हणून पुन्हा लोकपाल हा शब्द आहे… याहूच्याच न्यूज मेकर ऑफ द इयर या आणखी एका कॅटेगरीमध्ये अण्णांनी पुन्हा पहिला नंबर मिळवलाय. या यादीमध्ये सातव्या स्थानावर टीम अण्णा सदस्य किरण बेदी यांनीही स्थान मिळवलंय. पण त्या जरी टीम अण्णांच्या सक्रीय सद्य असल्या तरी त्यांचा उल्लेख यामध्ये कदाचित त्यांच्या ट्रॅवल बिल्स घोटाळ्यामुळे आला असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे नेटीझन्सनी टीम अण्णा किंवा भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला पाठिंबा देताना अगदीच डोळे झाकून दिलेला नाही, की माझ्या काही मित्रांनी लाईक केलंय, म्हणून मी ही करतो, इतकं निर्बुद्ध व्हायरल असही हा पाठिंबा नाही.
याहूचं इअरएन्ड रिव्ह्यू काय, किंवा गूगलच्या जेडगार्स्ट आणि फेसबुकची मेमॉलॉजी हे स्वतंत्रपणे लिहिण्याचे विषय आहे. इंटरनेट जगताचे हे सर्व आढावे खरं तर एक दस्तावेज आहेत. पण आता आपल्याला फक्त त्यातल्या एकाच मुद्द्याचं, घटकाचा प्रसार आणि भारतीयांनी त्याला दिलेला प्रतिसाद पाहायचा होता.
आता यामध्ये एक महत्वाची बाब आहे, तुम्हाला अण्णांना शिव्या द्यायच्या असतील किंवा अण्णांच्या आंदोलनाविषयी नापसंती व्यक्त करायची असेल किंवा अण्णा जे काही करत आहेत, ते सर्वच साफ चुकीचं आहे, भ्रष्टाचार या देशातून कधी संपलाच नाही पाहिजे, इतर स्रव उत्पादक बाबींप्रमाणेच भ्रष्टाचार हा एक उत्पादक आणि म्हणून समाजोपयी घटक आहे, अशी तुमचं प्रामाणिक मत आहे, म्हणून तुम्ही अण्णांना विरोध करणार असाल तरी तुम्ही अण्णा असं कोणत्याही भाषेत टाईप केलं किंवा नेटवर सर्च केलं तरी तुमचा सर्च नोंदला जाणार आहे.. म्हणजे वेगवेगळ्या सर्च इंजिन आणि सोशल नेटवर्किंगमधून अण्णा आणि त्यांच्या आंदोलनाला पहिल्या क्रमाकाचं स्थान दिलेलं असलं तरी लोकांना त्याविषयी उत्सुकता आहे, नेटिझन्सना त्याविषयी अधिकाधिक माहिती जाणून घ्यायची आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे… बाकी त्या माहितीचं काय करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न…