माहितीला कुलूप, कल्पनांचा तुरूंगवास

सोशल नेटवर्किंगवरील प्रस्तावित सेन्सॉरशिप सध्या चर्चेचा विषय बनलीय. गेले तब्बल आठवडाभर या विषयावर चर्चितचर्वण सुरू आहे. आतापावेतो वेगवेगळ्या लोकांनी यावर वेगवेगळी मते आणि प्रतिक्रिया व्यक्त झाल्यात. केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांच्या डोक्यात ही सुपीक आयडिया पहिल्यांदा आली आणि आपल्या पक्षनिष्ठेचा पुरावा म्हणून त्यांनी लागलीच ही आयडिया जाहीरही केली. अपेक्षेप्रमाणेच सिब्बल यांच्या या प्रस्तावाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटली. अजूनही उमटत आहेत. यावरून सरकारला एवढं तरी नक्कीच उमजलं असेल की सोशल नेटवर्किंगवर सेन्सॉरशिप लादणं हे काही तितकंसं सोपं नाही. त्यामुळे एका खूप मोठ्या लोकक्षोभाला तोंड द्यावं लागणार आहे.
(कृषिवल दिनांक 13 डिसेंबर 2011)

सोशल नेटवर्किंग ही कॉन्सेप्टच मुळात पूर्णपणे लोकाशाहीधिष्टित आहे. त्यामुळे त्यावर सेन्सॉरशिप कधी प्रत्यक्षात येऊच शकत नाही, पण चीन आणि काही हुकूमशाही देशांचं उदाहरण हाताशी असल्यामुळे कदाचित कपिल सिब्बल यांनी सेन्सॉरशिपचा प्रस्ताव पुढे केला असावा. पण सोशल नेटवर्किंग आणि सेन्सॉरशिप या पूर्णपणे परस्परविरोधी संकल्पना आहेत. या दोन्ही कॉन्सेप्ट कधी एकमेकांसोबत असूच शकत नाहीत. त्यामुळेच मोठा आऊटक्राय झाल्यानंतर कपिल सिब्बल यांनी सेन्सॉरशिपच्या प्रस्तावावरून घुमजाव करत फक्त आक्षेपार्ह अशा कॉमेन्ट्सवर निर्बंध आणण्याचा प्रस्ताव असल्याचं सांगत सारवासारव केली.

खरं तर मुळातच कपिल सिब्बल यांना अपेक्षित असलेली सेन्सॉरशिप ही काही कुणी त्रयस्थ संस्थेनं किंवा सरकारने करण्याची मुळी गरजच नाही. तुम्ही जर सोशल नेटवर्किंगच्या कोणत्याही साईटवर म्हणजे फेसबुक वगैरेवर असाल तर तुम्हाला हे माहितीच असेल की तुमच्या फेसबुक वॉलवर तुम्हाला न आवडलेला किंवा सरकारच्या भाषेत अश्लील किंवा आक्षेपार्ह असलेला मजकूर हटवायचा असेल तर तो हटवणं हे अत्यंत सोपं आहे. त्यासाठीची सोय फेसबुकच्या निर्माणकर्त्यांनीच प्रत्येक नेटीझन असो की फेसुबकर सर्वांनाच उपलब्ध करून दिलीय. मग कशाला हवीय, सेन्सॉरशिप किंवा सिब्बल यांच्या सुधारित सारवासारवीप्रमाणे आक्षेपार्ह कॉमेन्ट किंवा कॉन्टेन्टवर सरकारी नियंत्रण…

फक्त आपल्या वॉलवरून किंवा प्रोफाईलवरून संबंधित पोस्ट आपल्याला हटवून आपलं समाधान होणार नसेल आणि आपल्या वॉलवर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या आपल्या नेटफ्रेंडला आपल्याला धडा शिकवायचा पर्यायही फेसबुकनेच उपलब्ध करून दिलाय. म्हणजे तुम्ही थेट ब्लॉक करू शकता त्याला फ्लॅग रिपोर्ट करू शकता. यामध्ये तुम्हाला संबंधित कॉमेन्ट नेमक्या कोणत्या कारणासाठी आक्षेपार्ह वाटते त्याचेही पर्याय फेसबुकनेच उपलब्ध करून दिलेत, मग कशाला हवं सरकारी सेन्सॉरशिप… त्यासर्वांच्या पलिकडे आपले सायबर कायदे आहेत, ते काय फक्त देशभरातल्या वकिलांच्या मागे असलेल्या कपाटातल्या शोभेच्या वस्तू बनवून ठेवायचे का? सध्याच्या सायबर कायद्यांनी सोशल नेटवर्किंगवरील काही टवाळखोर आणि समाजकंटक प्रवृत्तींचा निषेध करणं खरोखरच खूप सोपं करून ठेवलंय. खासदार राजीव चंद्रशेखर यांनी या सेन्सॉरशिप प्रस्तावाचा मुद्दा चर्चेत असताना केलेला ट्वीट मुळातूनच वाचण्यासारखा आहे, त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की सिब्बल आणि कंपनीला जर खरोखरच सोशल नेटवर्किंगमुळे होणाऱ्या बदनामीपासून आपल्या नेत्याचं रक्षण करायचं असेल तर ते सध्या आस्तित्वात असलेले आयटी कायद्यांचा अभ्यास करत नाहीत. आयटी कायद्यात ही सर्व तरतूद आधीच करून ठेवण्यात आलीय. आणि एक ज्षेष्ठ वकील असलेले आणि सरकारमधीलही एक ज्येष्ठ आणि जबाबदार मंत्री असलेले सिब्बल आपल्याच सरकारने केलेले कायदेही नजरेखालून घालण्याचं धाडस करत नाहीत काय?

मला सर्वात महत्वाचं वाटतं ते म्हणजे कपिल सिब्बल यांनी साधलेली वेळ. अण्णा हजारे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. यापूर्वीही त्यांना सोशल नेटवर्किंमधूनच सर्वाधिक पाठिंबा मिळाला होता. अण्णा हजारेंना मिळालेला हा पाठिंबाच सरकारसाठी डोकेदुखी बनलाय. आता अण्णांचं समर्थन करताना काही जण पंतप्रधान मनमोहन सिंह किंवा काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी किंवा अजून कुणी काँग्रेस नेता असला त्यांची यथेच्छ टिंगळ टवाळी करतात. कारण लोकांना अभिव्यक्त होण्याचं हे एक माध्यम आहे, ते आपापल्या परीने अभिव्यक्त होतात. त्यांचा राग त्यांनी सोशल नेटवर्किंगशिवाय अन्य कोणत्याही मार्गाने अभिव्यक्त करायचा ठरवलं तर देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा किती भीषण प्रश्न निर्माण होईल, याची कल्पनाच न केलेली बरी.. फक्त सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहनसिंहच कशाला परवा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांना थप्पड मारण्याचा प्रयत्न झाला तेव्हा देशभरात जी प्रतिक्रिया उमटली ती कशाचं निदर्शक होती. म्हणजे कपिल सिब्बल यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्याला आणि निष्णात वकिलाला तर हे कळायलाच हवं होतं की सोशल नेटवर्किंगवरील तरूण पिढी ही काही फक्त काँग्रेस नेत्यांच्या खासकरून सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह यांच्या विरोधात नाही तर एकूणच सर्वच राजकारण्यांच्या विरोधात आहे. आता राजकारणी त्यासाठी सोशल नेटवर्किंग किंवा प्रसारमाध्यमांना दोष देऊ लागली आणि त्याचं काही चुकतच नाही किंवा ते जे काही करतात ते बरोबरच असतं अशा अविर्भावात राहिली तर परिस्थिती आणखीणच बिकट होणार आहे.

त्यामुळे कपिल सिब्बल आणि मंडळींनी कसलाही गृहपाठ न करता सेन्सॉरशिपचा प्रस्ताव मांडला आणि तीव्र प्रतिक्रिया उमटल्यावर त्यानंतर सारवासारवही केली.

शनिवारीच संयुक्त राष्ट्रे म्हणजेच युनायटेड नेशन्सनेही सरकारच्या प्रस्तावित सेन्सॉरशिप विरोधात आपलं मत नोंदवलं आहे, संयुक्त राष्टांचे सरचिटणीस बान की मून यांनी अतिशय समर्पक शब्दात सोशल नेटवर्किंगवर निर्बंध घालणाऱ्या सरकारांचा निषेध केलाय. अर्थातच त्यांनी यामध्ये कुठेही भारत किंवा अन्य कोणत्याही देशाचा उल्लेख करण्याचं मुत्सद्दीपणे टाळलं आहे. बान की मून यांच्यामते अनेक देशांना सोशल नेटवर्किंगला मर्यादित करायचं आहे, कारण त्यामुळे लोकांचा हुंकार व्यक्त होतो, आणि हा हुंकार फक्त देशांच्या सीमांमध्येच बंदिस्त न राहता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतो. पण सरकारांनी सोशल मीडियावर असे निर्बंध घालण्याचे दिवस आता नाहीत, तो काळ तर केव्हाच गेला. माहितीच्या वेगाला आता कुणालाही वेसण घालता येणार नाही. असंही त्यांनी बजावलंय. केवळ टीका होते किंवा लोक साधक-बाधक चर्चा करतात हे इंटरनेटवर निर्बंध घालण्याचं समर्पक कारण कधीच होऊ शकत नसल्याचंही सिब्बल किंवा भारत सरकार याचं नाव घेता बान की मून म्हणाले. त्यापूर्वीच दोन दिवस अगोदर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिन्टन यांनीही कोणत्याही देशाचं नाव न घेता इंटरनेटवर निर्बंध घालणाऱ्या देशांना खडसावलं होतं. त्यांनी आतिशय चांगल्या, सूचक आणि नेमक्या शब्दात इंटरनेट ब्ल़क केल्यामुळे किती भीषण हानी होईल, हे सांगितलं. हिलरी क्लिंटन काय म्हणाल्या, याचं मराठीमध्ये भांषांतर करण्याच्या फंदात न पडता मी त्यांनी आपलं मत जसं मांडलं तसंच सांगणं मला जास्त महत्वाचं वाटतं.

“When ideas are blocked, information deleted, conversations stifled and people constrained in their choices , the internet is diminished for all of us.”

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: