लोकलमध्ये भेटलेले प्रा. संदीप देसाई

मला रोज घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर असा प्रवास करताना मुंबईच्या तिन्ही लोकल ट्रेनचा वापर करावा लागतो. म्हणजे नेरूळ ते कुर्ला हार्बर, त्यानंतर कुर्ला ते परळ सेंट्रल मेन आणि त्यानंतर एलफिन्स्टन रोड ते महालक्ष्मी असा वेस्टर्न लाईनचा प्रवास…

महालक्ष्मी ते एलफिन्स्टन या प्रवासात ट्रेनमध्ये जागा असली तरी कधी बसण्याचा योग सहसा येत नाही. कारण लोअर परळ हे एक स्टेशन पास झालं की लगेच उतरण्याचे वेध लागतात. कधी कधी जागा असेल तर किंवा मोठ्या मुश्कीलीने मिळाली तर परळ ते कुर्ला दरम्यानच्या प्रवासात कधीतरी बसायला मिळतं. कुर्ला ते नेरूळपर्यंत नेहमीच जागा किंमान उभे राहण्यापुरती तरी मिळावी असं नेहमीच वाटतं पण मिळतेच असं नाही.

हा आता रोजचाच प्रवास आहे. पण कालचा म्हणजे शुक्रवारचा प्रवास तसा वेगळा होता. परळला कुर्ल्याकडे जाणारी गाडी मिळाली, बसण्यासाठी पुरेशी जागा असूनही बसायचं टाळलं. गाडी परळ सोडत नाही तोवरच एक मोठाली आरोळी ऐकू आली, मुंबईतल्या ट्रेनमध्ये भीक मागण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. पण कालचा प्रकार वेगळा होता. विद्या दान एक श्रेष्ठ दान या सुभाषिताने भीक मागण्याची सुरूवात झाली. सुरवातीला दुर्लक्ष केलं. तसाच धीरगंभीर आवाज आता भाषा बदलली होती. म्हणजे दान मागणाऱ्यांनी आता अस्खलीत इंग्रजीमध्ये आपलं मनोगत मांडायला सुरूवात केली… प्रोफेसर संदीप देसाई…

प्रा. संदीप देसाई
प्रा. संदीप देसाई

त्यांच्या हातात वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी म्हणजे मुंबईतल्या इंग्रजी, मराठी, हिंदी आणि गुजराती पेपरांनी त्यांच्यावर लिहिलेल्या वेगवेगळ्या वृत्तपत्रांची लॅमिनेट केलेल्या प्रती असतात. त्यांना गुजराती, मराठी, इंग्रजी आणि गुजराती या भाषा अस्खलीत येतात. अगदी मातृभाषा असल्यासारख्या… त्यांच्या दुसऱ्या हातात असते दानपेटी… अक्रीलिकची… पारदर्शक. त्यामध्ये मुंबईतल्या लोकल प्रवाश्यांनी संदीप देसायांना दिलेली मदत. आपापल्या मगदुराप्रमाणे… कुणी दहा देतं,कुणी वीस तर कुणी अगदी शंभरही…

लोकलमधल्या प्रवाश्यांकडून शाळेसाठी निधी जमवताना त्यांनी सीएनएन आयबीएनचा रिअल हिरो आणि झी मराठीचा अनन्य गौरव पुरस्कार मिळाल्याचीही माहिती दिली.


अगदी खरं सांगायचं तर मी त्यांना काल काहीच पैसे दिले नाहीत. फक्त ते काय करत आहेत, त्याचं काम आहे, त्यांना मुंबईकर प्रवाश्यांचा कसा प्रतिसाद मिळतो हेच मी पाहत होतो. लोकलमधले सर्व प्रवासी सढळहस्ते मदत करत असताना असं बघ्याची भूमिका घेणं कधीच समर्थनीय नसतं तरीही…

ज्या ज्या प्रवाश्यांनी ट्रेनमध्ये पैसे दिले त्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करीत, त्यांनी आपला दानयज्ञ थांबवला. मग थेट मलाच विचारलं सायन गेलं का, त्यावर मी सांगितलं नाही आताच मांटुगा गेलंय, आता सायन येईल. मग तेवढ्या वेळात त्यांच्याशी जमेल तेवढ्या गप्पा मारल्या. गप्पा मारतानाच खिशातला मोबाईल काढून त्यांचा फोटो घेतला, त्यांच्या ते लक्षात आलं, लगेगच त्यांनी फोटोसाठी योग्य पोजही दिली. एका हातात लॅमिनेट केलेले त्यांचे लेख आणि दुसऱ्या हातात दानपेटी. फोटो काढून झाल्यावर त्यांनीच सुचवलं की फेसबुकवर शेअर करा हा माझा फोटो.. मग त्यांना विचारलं की तुम्ही दिवसभराचा किती वेळ असं लोकलमध्ये लोकांकडून पैसे जमवता. त्यांवर ते म्हणाले, जमेल तसं करतो, सायंकाळी अकरा वाजेपर्यंत… आधी आम्ही वेस्टर्न लाईनला करायचो, आता सेट्रल लाईनलाही सुरूवात केलीय. जेमतेम आठवडा झाला असेल. मग त्यांनी त्यांच्या श्लोक फौंडेशनमार्फत चालवल्या जाणाऱ्या गरीब आणि झोपडपट्टीतल्या मुलांच्या शाळेविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितलं की सध्या एक शाळा गोरेगावला आहे, मुंबईत आणि दोन कोकणात आहेत. एक राजापूरला आणि एक कणकवलीमध्ये… लवकरच रत्नागिरीच्या शाळेला सुरूवात होणाराय. त्याचं बांधकाम सुरू असल्याचंही ते म्हणाले. त्यांना सायनला उतरायचं होतं, पण तरीही विचारलं की तुम्ही ज्या शिक्षकांची नियुक्ती केलीय, त्यांना पगार देता की तेही विद्यादान निशुल्क करतात, त्यावर त्यांनी शिक्षकांना पगार देत असल्याची माहिती दिली. म्हणाले शिक्षकांना पगार नाही दिला तर ते व्यवस्थित शिकवणार नाहीत. मला खरं त्यांची शाळा बघण्याची खूप उत्सुकता आहे. मग ते सायनला उतरले. जाताना पुन्हा एकदा सगळ्या दात्यांचे त्यांनी आभार मानले,

दुसऱ्या दिवशी म्हणजे आज ऑफिसला पोहोचल्या पोहोचल्या आधी गूगलवर संदीप देसाईंतचा शोध घेतला. त्यांचा काल फोनमध्ये घेतलेला फोटो कॉम्प्युटरवर कॉपी केला. फेसबुकवरही शेअर केला.

गूगलवर शोध घेताना अनेक इंग्रजी पेपरांच्या लिंक मिळाल्या, त्यातूनच समजलं की त्यांच्या लोकल ट्रेनमध्ये शाळांसाठी मदत मागण्याने प्रभावित होऊन सुपरस्टार सलमान खाननेही आपल्या चाहत्यांना संदीप देसाई यांना मदत करण्याचं आवाहन ट्विटरवरून केलं होतं.

सलमान खानचा ट्वीट होता, “Prof sandeep desai ka jawab nahi .kamaal karte ho yaar prof saheb” एवढंच नाही तर सलमान खानने संदीप देसाई यांच्याकडून त्यांचा बँक अकांऊट नंबर घेऊन आपल्या सर्व चाहत्यांना मदत करण्याचं आवाहन केलं, अर्थातच त्यांने स्वतःही मदत केली. संदीप देसाई मुंबईतील लोकल प्रवाश्यांकडून पन्नास पैश्यांपासून एक हजार रूपयांपर्यंत कितीही मदत स्वीकारतात. त्यांच्या http://shlokamissionaries.org या वेबसाईटवर त्यांच्या कामाविषयीचा सर्व तपशील आहे, त्यांचा फोन नंबरही सर्वांसाठी खुला आहे. 93222757030. ज्यांना त्यांच्या बँक खात्यावर आपली मदत पोहोचवायची आहे, त्यांच्या साठी त्यांचा बचत खाते क्रमांक आहे, 002210100040149 Bank of India Goregaon (East) हे सर्व त्यांच्या वेबसाईट प्रमाणेच त्यांना वेळोवेळी मदत करणाऱ्या किंवा माझ्यासारख्या फक्त ब्लॉग लिहिणाऱ्यांनीही ही माहिती शेअर केलीय.

मला एक वेळ वाटून गेलं, आपल्याकडे गुप्त दान म्हणून किंवा पुण्य लागतं म्हणून कोटीच्या कोटी रूपये शिर्डीच्या साईबाबाला देणाऱ्यांची काही कमी नाही. किंवा खाजगी विना अनुदानित शिक्षण संस्थांच्या नावाखाली डोनेशन आणि कॅपिटेशन फी उकळून शिक्षणाची दुकाने चालविणाऱ्यांचीही कमी नाही. यातली बहुतांश शिक्षणाची दुकाने ही राजकारण्यांची किंवा त्यांच्या बगलबच्च्यांची आहेत. वोगस विद्यार्थी संख्या दाखवून या शिक्षण संस्था वेगवेगळ्या पद्धतीने सरकारी खजिन्याची लूट तर करतातच, पुन्हा डोनेशन घेऊन ढेकरही देत नाहीत, एवढंच नाही तर जेव्हा शिक्षक भरती करायची असते, तेव्हा किमान सतरा ते जास्तीत जास्त कितीही लाख रूपये लाच घेऊन शिक्षक भरती करतात. शिक्षण संस्था म्हणजे कधीही न आटणारा पैश्यांचा झराच म्हणावा अशी स्थिती आहे. मग या सर्व दुकानदारीत लोकल मधल्या प्रवाश्यांच्या जीवावर त्यांनी केलेल्या तुटपुंज्या मदतीवर चाललेली गोरेगावची शाळा मला खूप दिलासा देऊन जाते.

पुढच्या वेळी कधी लोकलमध्ये संदीप देसाई भेटले तर मी त्यांना एवढंच विचारीन की शिक्षण संस्था रजिस्टर करताना किंवा कायम विनाअनुदानीत तत्वावर का असेना, शाळेला मान्यता मिळवण्यासाठी त्यांना मंत्रालयात किती पैसे चारावे लागले. की त्यांच्या या प्रकल्पावर खूप होऊन मंत्रालयातल्या बाबूंनी त्यांना कसलीही चिरीमिरी न घेता परवानगी देऊन टाकली.

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Join the Conversation

1 Comment

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: