अण्णांच्या कालच्या उतावळेपणाचे पडसाद आजही उमटत आहेत. आज राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी राळेगणसिद्धीमध्ये ठाण मांडलंय. त्यांना म्हणे अण्णांच्या वक्तव्याचा निषेध करायचा आहे. मात्र त्यांना आपलं निषेध आणि आत्मक्लेष आंदोलन करू देण्यासाठी अण्णांचे कार्यकर्ते राजी नाहीत. आणि यामुळेच की काय आज राळेगणसिद्धीमध्ये तणाव आहे.
शरद पवारांना काल दिल्लीमध्ये थप्पड मारण्यात आल्यानंतर अण्णांना राळेगणमध्ये जमलेल्या पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली. त्यापूर्वी अण्णांना हा प्रकार माहिती नव्हता. वयोमानाप्रमाणे अण्णांना ऐकायलाही कमी येत असावं कदाचित. त्यामुळे कालचा व्हिडिओ पाहिला तर सर्व काही लक्षात येईल. त्यातील संभाषण असं आहे…
पत्रकार : दिल्ली में शरद पवार को थप्पड मारा गया हैं…
अण्णा : थप्पड मारा? एक ही मारा ?
पार्श्वभूमीवर हशा… अण्णा शांत… हळू हळू उठतात, पत्रकार परिषद संपते….
अण्णांनी आपल्या या प्रतिक्रियेनंतर बरीच सारवा सारव केली. पण ही सर्व सारवासारव राजकीय स्वरूपाचीच होती, म्हणजे अगदी राजकारणी करतात, तसंच मी असं म्हणालोच नव्हतो… मला असं बोलायचं नव्हतं…. मी माहिती घेत होतो… किंवा माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय. माझं ते अधिकृत वक्तव्य नव्हतं… असं बरंच काही… त्यामध्ये कसलंही राजकीय शहाणपण नव्हतं की मुत्सद्देगिरी…
अण्णांनी आधी दिलेल्या प्रतिक्रियेचा आणि त्यानंतरच्या सारवासारवीवरही प्रसारमाध्यमांमधून बरीच टीका झाली. त्यानंतर अण्णांनी शरद पवारांना थप्पड मारणं हे लोकशाही विरोधी असल्याचं, हिंसात्मक असल्याचंही वारंवार सांगून पाहिलं, पण त्यांच्या पूर्वीच्याच प्रतिक्रियेवर सर्वजण अडून राहिले..
आज राष्ट्रवादीने नेमका त्याचा समाचार घ्यायला सुरूवात केली. खरी सुरूवात तर कालच झालेली, म्हणजे त्यांच्याच जिल्ह्यात म्हणजे अहमदनगरमध्ये अण्णांचा पुतळा जाळण्यात आला. त्याचं कवित्व आजही सुरू राहिलं, मात्र काल आपल्या सुधारित प्रतिक्रियेत शरद पवारांवरील हल्ल्याच्या निषेध करणाऱ्या अण्णांनी आपला पवित्रा पुन्हा एकदा बदलला.
शदर पवारांना एक थप्पड मारली तर एवढा संताप, मग शेतकऱ्यांवर गोळीबार झाला, हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तेव्हा का नाही झाला संताप… अशी आगीत तेल ओतणारी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यामुळे त्यांनी काल अनाहूतपणे दिलेली पहिली प्रतिक्रिया हीच अण्णांची खरी प्रतिक्रिया होती असं मानायला आजच्या घटनांमुळे बळच मिळालं.
अण्णा हजारे आणि शरद पवार यांच्यातला बेबनाव तसा काही लपून राहिलेला नाही. अण्णा हजारेंच्या पहिल्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे 7 एप्रिल रोजी शरद पवारांनी भ्रष्टाचारविरोधी मंत्रिगटाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी टीम अण्णांच्या आंदोलनाला आलेलं हे पहिलं यश मानलं गेलं. शरद पवार राज्यात मुख्यमंत्री असतानाच अण्णांनी त्यांना मिळालेला पद्मश्री खिताब परत केला होता.
मधल्या काळात अण्णाचं रामलीला मैदानावर बारा दिवसाचं उपोषण झालं. त्यामुळे देशभरात भ्रष्टाचार निर्मूलन चळवळीचे मसीहा अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. अण्णा अनेकांचे आयकॉन झाले. राळेगण सिद्धीला तीर्थक्षेत्राचं स्वरूप आलं. हा सर्व आता इतिहास आहे. राळेगण आजही पवित्र असलं तरी राळेगण सिद्धीमध्ये आता तणाव आहे, खरं तर तिथे तणाव असणं किंवा अण्णांच्या बंदोबस्तासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करावी लागणं, यामध्येच अण्णांच्या तत्वाचा पराभव आहे. अण्णांनी वारंवार सांगितलेली तत्वे ही खरे तर गांधीजीची आहेत. मधल्या काळात त्यांना दुसरा गांधी म्हणूनही नामाभिधान मिळालं. पण आता तो गौरव गळून पडायला लागला आहे,
शरद पवारांना काल थप्पड मारण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा सोशल नेटवर्किंगवर अक्षरशः जल्लोष व्यक्त झाला होता. खरे तर ही लोकांची भावना होती, एखाद्याला मारहाण झाल्यानंतरचा असूरी आनंद म्हटलं तरी त्याला पूर्णपणे अव्हेरता येणार नाही, नेमकी हीच भावना अण्णांच्या पहिल्या प्रतिक्रियेतून व्यक्त झाली होती, तरीही अण्णांचं समर्थन करता येत नाही… कारण अण्णांना एक भूमिका आहे, अण्णा या देशातल्या लाखो-कोट्यवधी लोकांसाठी आशेचा किरण आहे, अण्णांच्या बारा दिवसांच्या उपोषणाने देशाला भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याची एक नवी उमेद दिली. अण्णाचं उपोषण सुरू असताना त्यांना विरोध करणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. तरीही अण्णांना मिळणारा पाठिंबा कमी झाला नाही…. त्यामुळेच लोकनेतृत्वाची, मार्गदर्शकाची भूमिका बजावणाऱ्या अण्णांकडे काहीतरी राजकीय जाण आणि शहाणपण असणं अपेक्षितच आहे. त्यासाठी राजकारणी असावं लागत नाही की प्रत्यक्ष कुणाही राजकीय पक्षाचा सभासद असण्याची आवश्यकता असत नाही. कदाचित सराईत राजकारण्याकडे अशी राजकीय जाण किंवा शहाणपण नसेलही… पण अण्णाकडे मात्र हे भान असलंच पाहिजे.
आज राळेगण सिद्धी मध्ये नेमकं उलट घडतंय. अण्णांचे कार्यकर्ते, त्यांचे स्वीय सहायक किंवा सहकारी अण्णांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राळेगणमध्ये थांबू द्यायलाच तयार नाहीत. म्हणजे आंदोलन करण्याचा मक्ता फक्त राळेगणवासियांचाच आहे का? पुन्हा सुरेश पाठारे म्हणतात, तसं एनसीपी कार्यकर्त्यांचं हे आदोलन फक्त निवडणुकीची तिकीटे मिळवण्यापुरतंच आहे, हीच लोक काल अण्णांचे पुतळे जाळतात, आणि नंतर आज शांततामय मार्गाने आत्मक्लेष करण्याची नौटंकी करतात, ही नौटकी म्हणजे राष्ट्रवादीचा दुतोंडीपणा असल्याचं अण्णांचे स्वीय सहायक असलेल्या पाठारेंना वाटतं.
राळेगणमध्ये जाऊन उपोषण करणं किंवा आत्मक्लेष करण्याचं आंदोलन करणं ही असेलही राष्ट्रवादीची नौटंकी कदाचित, पण त्याला अण्णांच्या कार्यकर्त्यांनी नौटंकी दर्जा कसा काय देऊन टाकावा. पाठारेंनी टीव्ही कॅमेऱ्यासमोर जे सांगितलं, त्याप्रमाणे जर एनसीपीला राळेगणमध्ये येऊन उपोषण करण्याचा अधिकार नाही तर अण्णांना तर इतरत्र जाऊन आंदोलन करण्याचा अधिकार कसा काय पोहोचेल.
आज राळेगणमध्ये अण्णांच्या सहकाऱ्यांनी कसलाही विरोध न करता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उपोषण किंवा त्यांना अजून जे काही आत्मक्लेष करायचा तो करू दिला असता तर आजचा तणाव निर्माणच झाला नसता. पण हे कळणं म्हणजेच राजकीय शहाणपण किंवा राजकीय जाण असण्याचं लक्षण आहे.
अण्णांनी कालच्या पहिल्या प्रतिक्रियेत जसं पवारांना फक्त एकच थप्पड मारली, असा सवाल केला, खरं तर हीच सर्वसामान्य जनभावना आहे, पण ती अण्णांच्या तोंडून थेट व्यक्त व्हायला नको, की राळेगणमधल्या त्यांच्या सहकाऱ्यांकडूनही व्हायला नको… त्यामुळे तोटा अण्णांचा किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचा नाही तर संबंध देशाचा होणार आहे. नुकतंच बाळसं धरू लागलेल्या भ्रष्टाचार निर्मूलन चळवळीचा होणार आहे….
कारण या देशाला अजूनही मूर्ती किंवा व्यक्तिशिवाय उद्दीष्टांची आणि ध्येयाची पूजाच करता येत नाही.
agadi perfect 🙂 end para rocks ..
महाराष्ट्राचे एक जबाबदार नेते आणि भारताचे कृषिमंत्री (जे फक्त एक सुरक्षारक्षक घेऊन फिरतात!) यांच्यावर झालेला हल्ला लोकशाहीच्या दृष्टीने निषेधार्हच आहे. आणि तो कुणावरही झाला तरी त्याचे समर्थन करता येणार नाही.
पण सर्वांनी खुश होण्याआधी थोडा तटस्थ विचार करावा, कारण नॉन इशू ला इशू करण्यात भारतीय मीडियाचा हात कुणीच धरणार नाही. हा हल्ला आताच का झाला? शरद पवारांवरच का झाला? याचा विचार होणे आवश्यक.
सध्या महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुका आहेत आणि सत्ताधारी सगळे भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले आहेत, अश्यावेळी राष्ट्रवादीला मिळालेली शक्ती दाखवण्याची हि संधी आहे असे माझे मत आहे. आणि त्यांनी ते दाखवूनही दिले आहे.
मुळात ह्या हरविंदर सिंगने दोन-तीन दिवसापूर्वीच एका काँग्रेसी मंत्र्यावर हल्ला केला होता मग त्याला पोलिसांनी सोडले कसे? आणि तो प्रधानमंत्री मनमोहन सिंगाच्या ऐवजी पवारांकडे का आला?
आणि ह्या हल्ल्यानंतर शरद पवारांना देशभरात प्रचंड सहानुभूती मिळाली आहे, आणि ह्याचा थेट फायदा त्यांना निवडणुकीत होणार आहे.