फेसबुक पुन्हा एकदा चर्चेत आलंय. तसं ते नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतंच. फेसबुक म्हणजे सोशल नेटवर्किंग हे तर आता सगळ्या भारत वर्षाला ठाऊक आहे. जगभरात 80 कोटीपेक्षाही जास्त जण फेसबुकवर आहेत. दररोज त्यांची संख्या वाढतेच आहे. लवकरच म्हणा किंवा येत्या काही वर्षात भारताच्या लोकसंख्येएवढी फेसबुक प्रोफाईल्सची संख्या असेल.
(कृषिवल, मंगळवार, दिनांक 22/12/2011)
आता जम्मू-काश्मीरमध्ये फेसबुकवर बंदी घालण्याची मागमी करण्यात येतेय. तिथे फेसबुक अशांततेचं एक कारण ठरलंय. कारण तसं फार नवीन नाही. कोणत्यातरी फेसबुक पेजवर अवमानास्पद अशी काहीतरी पोस्ट कुणीतरी टाकल्याचं निमित्त आहे. आपल्याकडे भावना काय कशानेही भडकतात. तसंच हे एक निमित्त आहे. त्यामध्ये फेसबुकचा काहीच दोष नाही. तर तो वापर करणारांचा प्रॉब्लेम आहे. कुणी कशासाठी फेसबुकचा वापर करावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न. पुन्हा त्यात मेख अशी की ज्याचा त्याचा प्रश्न म्हणजे कुणीही काहीही करावं असा नक्कीच होत नाही. तर जबाबदारीचं भान प्रत्येकालाच हवं. आपल्या एखाद्या पोस्टने एखाद्यांच्या भावनांवर काय परिणाम होतोय, याचं तर भान असायलाच हवं. आता यातली दुसरी बाजू अशी की भावना भकडतील, उद्दीपीत होतील, एवढंही एखाद्याने निर्बुद्ध का असावं. म्हणजे कुणीतरी काही तरी पोस्ट सोशल नेटवर्किंगवर टाकलीय म्हणून लगेच आपल्या डोक्यावरचं, मनावरचं नियंत्रण इतक्या सहजपणे सुटू द्यायचं. तेही आजच्या मोकळ्या ढाकळ्या असलेल्या सोशल नेटवर्किंगच्या किंवा इंटरनेट 3G च्या युगातही अक्कल इतक्या सहजपणे गहाण टाकायची.
फेसबुक आणखी एका कारणामुळे चर्चेत आलंय, हे दुसरं कारण आहे, फेसबुक प्रोफाईल हॅक होण्याचं… म्हणजे कुणीतरी एखादी लिंक शेअर करतं, त्यावर क्लिक केलं की, तुमचं अकाऊंट हॅक होतं, तुमच्या नावाने अश्लील चित्रांच्या पोस्ट तुमच्या मित्रांबरोबर शेअर होतात. तुमचा मित्र साहजिकच विचार करेल, की याला झालंय काय, हा अशी चित्रे का शेअर करायला लागलाय. तुम्ही मग त्याला स्पॅम मार्क करता किंवा त्याला अनफ्रेंड करता. तशी सगळ्यांची सोय फेसबुकने करून दिलीय. बंगळूरातल्या हजारो फेसबुकवाल्यांची अशी प्रोफाईल्स हॅक झाल्यावर हा मुद्दा चर्चेत आला. तशी जगभरातही अनेक उदाहरणे पुढे आली. फेसबुकने प्रत्येक दोन माणसांच्यातील अंतर पूर्णपणे मिटवून टाकल्यामुळे व्हायरसमुळे जगभर माजवलेला हाहाकार लागलीच फेसबुकच्याही लक्षात आला, त्यावर उपाययोजनाही करण्यात आल्याचं जाहीर झालं. फेसबुकने अधिकृतपणे जाहीर केलं की काही हॅकर्सनी फेसबुकला लक्ष्य केलं होतं, मात्र त्यावर नियंत्रण मिळवण्यात आलं असून, भविष्यात आता असा हल्ला होणार पुन्हा याची काळजी घेण्यात येईल. कितीही केलं तरी फेसबुकचे तंत्रज्ञ याची गॅरन्टी देऊच शकणार नाहीत की पुन्हा असा हल्ला होणार नाही, कारण हॅकर्सना चॅलेंज हवंच असतं, अशी तात्पुरती उपाययोजना केल्यामुळे ते स्वस्थ थोडेच बसणार आहेत.
या दोन्ही वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत. काश्मीरमध्ये जे काही होतंय, ते कोणाच्या तरी खोडीचा, आगळीकीचा परिणाम आहे, अशा वेळी माथी भडकावून देऊन भागणार नाही. व्हायरस हा कितीही केला तरी त्यावर अँटी व्हायरस प्रोग्रामने नियंत्रण मिळवता येईल. पण काश्मीरमध्ये जे काही घडलंय, त्यावरचा अँटी व्हायरस कसा शोधणार हा महत्वाचा प्रश्न आहे.
आता काश्मीरमध्ये जे काही घडतंय, त्यामध्ये फुटीरतावादाविषयी काहीच नाही. काहीतरी धार्मिक आहे, भावना भडकावण्यासाठी आपल्याकडे काहीही पुरतं, त्यामध्ये धर्माचाही समावेश आहे. आपल्याकडे सर्वात जास्त हिंसा ही धर्मामुळेच झालीय. अर्थात त्याला धर्मयुद्ध असं गोंडस नाव देऊन त्याचं समर्थन होतं, हा भाग वेगळा. पण हा मुद्दाच आता चर्चेचा नाही, तर चर्चा करायची आहे, ती फेसबुकच्या कोणत्यातरी पेजवर जी काही पोस्ट कुणी टाकलीय, त्याचा आयपी अॅड्रेस शोधणं, कुणी टाकलीय, त्याच्यापर्यंत पोहोचणं… किंवा अगदीच गेला बाजार सर्वांनी मिळून संबंधित पोस्टला स्पॅम रिपोर्ट करणं हा तसा अतिशय सोपा सनदशीर उपाय आहे. अशाने संबंधित पोस्ट ब्लॉक होऊ शकते. फ्लॅग रिपोर्ट करता येईल. त्याचा प्रतिबंध करण्याचे प्रयत्न अनेक आहेत. पण त्यापैकी कुणालाही त्याचा वापर करायचा नाही. कारण उद्देश हा नाहीच, म्हणजे फेसबुकवर असं भावना भडकवणारं काहीतरी आल्याशिवाय आपले राजकीय हितसंबंध कसे जपता येतील.
अगदी परवाचीच घटना आहे, पेपरामधून तुम्ही वाचली असेलच. विकीपीडिया या इंटरनेटवरील मुक्तकोशाचे संस्थापक भारतात, मुंबईत आले होते,. त्याचं नाव जिम्मी वेल्स.. निमित्त होतं, भारतातल्या पहिल्या वहिल्या विकीकॉन्फरन्सचं… भारतात विकीपिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. हजारो जण त्याचा नियमित वापर करत असतात. अनेकांना त्यातून चांगली आणि उपयुक्त माहिती मिळते. तर मुंबई विद्यापीठात भरलेल्या या विकीकॉन्फरन्सला सुरूवात होत असतानाच तिथे काही तरूण जमले आणि विकीपीडियाचा निषेध करायला सुरूवात केली. निमित्त होतं, भारताचे अपूर्ण असलेले नकाशे विकिपिडियावर टाकले जातात, अपलोड केले जातात. त्यामुळे त्यांच्या भावना दुखावतात. आणि भावना दुखावल्यामुळे ते आपला निषेध व्यक्त करण्यासाठी पहिल्या वहिल्या विकीकॉन्फरन्सचं निमित्त त्यांना पुरलं.
खरं तर विकीपीडिया काय आहे, या निदर्शने करणाऱ्या किती तरूणांना माहिती आहे, मला खरंच माहिती नाही. विकीपीडिया हा लोकांसाठी लोकांनी बनवलेला विश्वकोश… सगळ्याच नोंदी ऑथेंटिंक असतील, याची खात्री कुणी देऊ शकत नाही, पुन्हा त्याची पडताळणीही लोकांनीच करायची आहे, म्हणजे जगातल्या वेगवेगळ्या लोकांनी आपल्याकडील माहिती जगभरातल्या लोकांपर्यंत पोहोचवायची. वाटल्याने ज्ञान वाढतं असं म्हणतात, ते काही उगीच नाही. आपण काही नोंदी टाकल्या तर त्यांच्या सत्यता प्रमाणासाठी तसे तपशील आणि संदर्भांची माहितीही पुरवायची. जर एखाद्या गोष्टीला काही संदर्भ नसेल, तर विकीपीडिया तुम्हाला तशी स्पष्ट सूचनाही देतो की, संबंधित माहितीलेखातील माहिती पडताळली गेलेली नाही., त्यासाठी आम्हाला मदत करा… अशावेळी वापर करणाऱाची ही जबाबदारी असते, की संबंधित माहितीतील त्रुटी शोधून त्या दुरूस्त कराव्यात आणि त्याचे रेफर्नस द्यावेत… वेगवेगळ्या लोकांनी आपलं ज्ञान शेअर केल्याने ते अधिकाधिक निर्भेळ आणि सकस होत जातं, ही साधी सोपी आयडिया विकीपीडियाच्या आस्तित्वामागे आहे. विकीपीडिया हा इंटरनेटवरील माहिती-ज्ञानाचा अविरत सुरू असलेला एक महायज्ञ आहे. सर्वांनी आपापल्या परीने त्यामध्ये समीधा टाकायच्या. त्यांचा फायदा स्वर्गात नुसतेच बसलेल्या देवाला जरी नाही झाला तरी याच मर्त्य पृथ्वीतलावरच्या सर्वसामान्य लोकांना तर नक्कीच होणार आहे. कुणाला कुणाला तर त्याचा नक्कीच फायदा होईल… आज इंटरनेटवर असलेल्या कुणाही पामराला विकीपीडिया माहिती नाही, असं उदाहरण अपवाद म्हणूनच सापडेल.
सर्वानी सर्वांसाठी मिळून सुरू केलेल्या विकीपीडियाच्या माहिती ज्ञानयज्ञात आपला यथार्थ वाटा उचलायचा सोडून मुंबईतल्या विकीपिडीयाच्या कार्यक्रमात काही तरूणांना थेट विकीपिडीयाचा निषेध करावा वाटला… कारण काय होतं तर विकीपीडियावर भारताचे काही नकाशे चुकीच्या पद्धतीने टाकले. जम्मू काश्मीरमध्ये जे काही होतंय त्यापेक्षा लौकिकअर्थाने अजिबात वेगळं नाही. कारण तिथे काहीतरी धार्मिक कारण झालंकी भावना दुखावतात, इकडे नकाशे चुकीचे टाकले की भावना दुखावतात. मग निमित्त आयतंच मिळतं निदर्शने करण्यासाठी.. पुन्हा विकीपीडियाच्या विदेशी पाहुण्यांसमोर निदर्शने केली की प्रसिद्धी आयतीच मिळते, आणि देशप्रेम सिद्ध होतं, एकही देशभक्तीपर ठळक असं, विधायक असं किंवा खरोखऱच देशाच्या विकासात भर न घालता… निदर्शनामागचं तत्वज्ञान हे असं इतकं सोपं आहे… अर्थकारण म्हणाल तर खूप मोठं आहे, पण तो आपल्या या लेखाचा विषय नाही.
विकीपीडियाच्या संस्थापकांपुढे निदर्शने करून तात्पुरती प्रसिद्धी मिळवणाऱ्यांनी कधीच हा विचार केलेला नाही की, विकिपीडियावर चुकीचे नकाशे टाकलेले असतीलही, पण ते दुरूस्त करण्याची सोय आहेच की आपल्याला, किंवा इंटरनेटवर सर्वांना समजेल अशा भाषेत संबंधित नकाशे चुकीचे आहेत, त्यामध्ये सुधारणा करावी, अशी विनंतीही करता येऊ शकते… पण सनदशीर मार्ग हवेत कुणाला… त्यामुले थोडीच प्रसिद्धी मिळमार आहे की आपलं खरं देशप्रेम सिद्ध होणार आहे.
विकीपीडियावर असलेली चुकीची माहिती किंवा चित्रे दुरूस्त करण्याची जबाबदारी विकीपीडियाचा वापर करणाऱ्या प्रत्येकाची आहे, स्वतः विकीपिडीयाने ही माहिती टाकलेली नाहीच… तुम्ही आम्ही कुणीतरी ही माहिती टाकलेली असते, माहितीची शहानिशा न करता… त्यामुळे तशी आक्षेपार्ह माहिती दुरूस्त करण्याची जबाबदारीही आपलीच की… विकीपिडिया तर फक्त एक व्यासपीठ आहे, ज्ञानाचा यज्ञ आहे… त्याचा होता होईल तेवढा वापर करून घ्यावा आपल्याकडे काही सांगण्यासारखं असेल तर त्यामध्ये भर टाकावी, काहीच शक्य नसेल तर फक्त माहिती आत्मसात करावी… पण जबाबदारीचं हवंय कुणाला…
जबाबदारीचं भान नको असल्यामुळेच आपल्याकडे फेसबुक असो विकिपीडिया असो त्याविरोधात नुसतीच आंदोलने होत राहतात, निदर्शने होत राहतात… अंबाजोगाईसारखी फेसबुकचा विधायक वापर करून घेण्याची उदाहरणे तशी विरळच… नाहीतर आपली नुसतीच बोंबाबोब…. भावना दुखावल्या म्हणून….