अंबेजोगाईच्या नेटीझन्सचे विधायक पाऊल

अंबेजोगाईची एक बातमी आहे, तुम्ही जर फेसबुकवर असाल तर तुम्हाला माहितीच असेल, कदाचित. एव्हाना काही वृत्तपत्रांमध्येही येऊन गेली असेल. बातमी तशी साधीच आहे, तसं पाहिलं तर काही वेगळं नाही. फक्त फेसबुकचा वापर किती चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो, याचाच एक नमुना म्हणजे ही बातमी आहे.
(कृषिवल, दिनांक 15/11/2011)

अंबेजोगाई हा मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातला एक तालुका, तसा फार विकसित म्हणता येणार नाही, पण काही साखर कारखाने आणि सर्वात मोठं ग्रामीण रूग्णालय यामुळे अलीकडच्या काळात अंबेजोगाईगाचं झपाट्याने शहरीकरण झालंय. कोकणातल्या लोकांचं कुलदैवत असलेली योगेश्वरी याच अंबेजोगाईची… आशियातला सर्वात मोठं ग्रामीण रूग्णालय म्हणजेच स्वामी रामानंद तीर्थ सर्वोपचार रूग्णालय इथेच. तसा या गावाला शैक्षणिक पार्श्वभूमीही मोठी आहे. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजनही याच गावात लहानाचे मोठे झाले.
आता मला अंबेजोगाईची महती किंवा त्याचं ऐतिहासिक महत्व सांगायचं नाहीच आहे. कारण त्यासाठीचा हा लेख नाही.

तर मी वाचलेली बातमी अशी आहे :

सध्या सोशल नेटवर्किंग साईटचा वापर दिवसेंदिवस झपाट्याने वाढतोय. मात्र याचा वापर केवळ टाईमपाससाठी न करता विकास कामांवर चर्चा करण्यासाठीही केली जातोय. फक्त शहरी नाही तर ग्रामीण भागात हे शक्य झालंय. अंबाजोगाईच्या तरूणांनी फेसबुकच्या माध्यमातून शहरातील समस्या मांडायला सुरुवात केली आहे आणि समस्या सोडवूनही घेतल्या आहेत.

भारतात ही फेसबुकचा वापर अगदी गावागावात पोहचलाय. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईत तरूणामध्येही ही क्रेझ आलीय. पण या तरुणांनी या फेसबुकचा वापर विधायक कामांसाठी करायला सुरुवात केलीय.

नगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली असतांना या तरुणांनी अंबाजोगाई नगरपालिका निवडणूक २०११ हा ग्रुप सुरु केलाय. अवघ्या एका महिन्यात या ग्रुपसोबत तेराशे मेंबर जोडले गेलेत. यात शहरातील सगळ्या नगरसेवकांपासून डॉक्टर, वकील आणि महाविद्यालयीन तरुणांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे हे सगळे लोक मोबाईल फोनवरच नेट वापरतात. अंबाजोगाईतील अभिजित जगताप या तरुणाने हा ग्रुप सुरु केलाय, आता मात्र ही चळवळ बनलीय.

नगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा ग्रुप तयार करण्यात आल्याने शहरातील सगळ्या नगरसेवकांना आप आपली विकासकामे यात मांडण्यासबंधी आवाहन करण्यात आलं. सुरुवातीला याला फारसा रीस्पॉन्स मिळला नाहीं मात्र, शहरातील समस्या मांडून त्यावर चर्चा होऊ लागल्याने या ग्रुपवर माहिती टाकण्यासाठी लोक प्रतिनिधी पुढे सरसावले. आता तर लोकात जावून निवडणुका लढवायच्या असल्याने सकाळी हातात पेपर येण्याअगोदर आता राजकारणी फेसबुक चेक करतात.
*************
बातमीत आणखी बरेच तपशील आहेत. मी सहजच संबंधित फेसबुक ग्रुपला जॉईन होण्याची रिक्वेस्ट टाकली. आता माझं गाव काही अंबेजोगाई नाही. पण तिथल्या मुलांनी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा जो उपक्रम फेसबुकच्या माध्यमातून सुरू केलाय, त्यामध्ये मला इंटरेस्ट आहे. तसं पाहिलं तर आता निवडणुका होऊ घातलेल्या राज्यातल्या 196 नगरपालिकापैंकी ही एक अंबेजोगाईची नगरपालिका. त्यामुळे त्यात तसं वेगळ काहीच नाही. पण यावेळी फेसबुकच्या सार्वत्रिक वापरानंतर अंबेजोगाईसाठी ही निवडणूक जरा वेगळी ठरलीय.

अभिजीत जगताप या तरूणाच्या डोक्यात ही कल्पना उपजली. आणि फार विचार न करता त्याने ती प्रत्यक्षातही आणली. खरं तर फेसबुकवर प्रत्येकाने असायलाच पाहिजे असा काही नियम नाही, पण अभिव्यक्त होणं आणि संपर्कात राहणं ही प्रत्येकाची मूलभूत गरज असल्याने अंबेजोगाईत ही आयडिया क्लिक झाली. आणि अवघ्या महिन्याभरात दीडेक हजार सभासद या अंबेजोगाई नगरपालिका निवडणूक ग्रुपमध्ये सहभागी झाले. आता या ग्रुपमध्ये सहभागी झालेले सर्वचजण काही अंबेजोगाईचे स्थानिक रहिवासी नसतीलही, पण त्यामुळे काय फरक पडतो. चांगल्या उपक्रमांची चर्चा, शहरातल्या समस्यांची उकल म्हणा किंवा नगरपालिका प्रशासनाला किंवा नगरसेवक वगैरे गल्लीतल्या राजकारण्यांना याची दखल तर घ्यावीशी वाटतेय, हे काय कमी आहे. एवढंच नाही तर लोकांच्या या ग्रुपमधल्या उत्स्फूर्त सहभागाने, त्यामधील चर्चेने राजकारण्यांना एक वेगळं माध्यम उपलब्ध करून दिलंय. हे साधन अर्थातच तंत्रज्ञानाधिष्टीत आणि लोकशाहीभिमुख आहे, सर्वाधिक पारदर्शक आणि म्हणून गोपनियतेला थारा नसलेलं आहे. जे काही आहे ते थेट चव्हाट्यावर आहे.

अंबेजोगाई निवडणूक 2011 हा ग्रुप फेसबुकवर बनवणारा तरूण अभिजीत जगताप हा स्वतः एका पत्रकाराचा मुलगा. स्वतःही पत्रकारितेतली पदव्युत्तर पदवी घेतलेली. तरूण असल्यामुळेच टेकसॅव्ही आणि फेसबुकवर असलेला. तसं फेसबुकवर अंबेजोगाईच्याच काही एनआर म्हणजे नॉन रेसिडेन्ट तरूणांनी एक ग्रुप बनवला होता. त्याचं नाव अंबेजोगाई प्राईड. नॉन रेसिडेन्ट अशा अर्थाने की मूळची अंबेजोगाईची असलेल्या काही तरूणांनी पुढे शिक्षणासाठी किंवा कामा-धंद्याच्या निमित्ताने पुण्या-मुंबईत गेल्यावर आपल्या जुन्या मित्रांना एकत्र भेटण्यासाठी, जमण्यासाठी, वेगवेगळे अनुभव शेअर करण्यासाठीचा एक कट्टा म्हणजे अंबेजोगाई प्राईड. पण त्यात विधायक असं काही नव्हतं. नेमकी हीच त्रुटी अभिजीतने अंबेजोगाई इलेक्शनच्या माध्यमातून भरून काढली.

या ग्रुपमध्ये जसे वेगवेगळे अंबेजोगाईकर तरूण आहेत, तसे नगरसेवक वगैरे राजकारणी आहेत. म्हणजे फक्त अंबेजोगाईपुरतं बोलायचं तर अक्षय मुंदडा, पापा मोदी यांच्यासह अनेक नगरसेवकही आहेत. नगरपालिका प्रशासनात असलेले काही अधिकारीही आहेत.

आता फक्त फेसबुक ग्रुप बनवलाय, आणि काही तरूण त्यांच्या अपेक्षा किंवा शहरातल्या प्रस्तावित विकासकामांची चर्चा करतात, एवढंच या ग्रुपवर झालं नाही तर ज्याला तुम्ही आम्ही सक्सेस स्टोरी म्हणतो, म्हणजे लौकिकअर्थाने ज्या सक्सेसस्टोरी असतात, तशाही या ग्रुपच्या माध्यमातून झाल्यात. शहरातलेच काही सराईत राजकारणी मोक्याच्या ठिकाणी अतिक्रमणाच्या तयारीत असताना, या ग्रुपवरती मुद्दा उपस्थित झाला आणि त्यावर चर्चा झाली, शेवटी अतिक्रमण झालं नाही. तसंच रेस्ट हाऊससमोर गेले कित्येक दिवस खराब असलेला रस्त्याचे फोटो या फेसबुक ग्रुपवर पब्लिश झाले आणि आणि नगरपालिकेच्या संबंधित इंजिनीयरने त्याची तातडीने दखल घेतली. आणि सर्वसामान्य नागारिकांनी कित्येक दिवस पत्रव्यवहार, विनंत्या करून जे साध्य झालं नाही, ते एकट्या फेसबुकवरील पोस्टने केलं. अभिजीत जगतापचा हा ग्रुप फक्त फेसबुकवर शहरातल्या समस्याच शेअर करत नाही तर त्याचं निवारण झालं की नंतरचे फोटोही तातडीने अपलोड होतात. म्हणजेच, स्टेटस अपडेट झाल्यावर शहरात काहीतरी सुधारणा झालीय, हे ही लागलीच कळतं.

अंबेजोगाईचे एक नगरसेवक डॉ. सचिन काळे यांनीही आपला अनुभव सांगितला. ते काही कामासाठी मुंबईला आले होते. सध्या फेसबुक मोबाईलवरही उपलब्ध असल्यामुळे तुम्हाला प्रत्येकवेळी इंटरनेट कॅफेमध्येच जाऊन बसावं लागतंच असं नाही. तर या डॉ. सचिन काळेंनी म्हणजेच मेंबर काळेंनी मुंबईत सहजच फेसबुकवर लॉगइन केलं त्यांच्या लक्षात आलं की अंबेजोगाईत कुठेतरी एक पाईपलाईन फुटलीय. मोठ्या प्रमाणावर पाणी लिकेज होतंय, दुसऱ्यादिवशी शहरातल्या लोकांना पाणीपुरवठा पुरेसा होणार नाही. कारण अभिजीतने त्याचे फोटो आणि काय प्रकार झालाय, त्याचा तपशील फेसबुकवर टाकला होता. मग डॉ. सचिन काळेंनी तातडीने फोनाफोनी केली आणि नगरपालिका प्रशासनाने फुटलेली पाईपलाईन दुरूस्त केली. शहरातल्या लोकांची दुसऱ्या दिवशीच्या पाणीटंचाईतून सुटका झाली, यापेक्षा मोठी सक्सेस स्टोरी कोणती असावी, फेसबुकची… किंवा फेसबुकवरील एखाद्या ग्रुपची…

तसं पाहिलं तर फेसबुकवर कॉमेन्ट टाकणं किंवा नुसतंच लाईक करणं खूप सोपं असतं. त्यात तुम्हाला फारसे बौद्धिक कष्ट करावे लागत नाहीत. कसलाच सहभाग प्रत्यक्षात द्यावा लागत नाही. यामुळेच की काय अण्णांच्या आंदोलनाला फेसबुकवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसाच प्रतिसाद कालच्या राजू शेट्टी यांच्या ऊसदरवाढ आंदोलनालही मिळाला. फेसबुकवर शेट्टींच्या आंदोलनाला सपोर्ट करणारे काही सर्वचज ऊसउत्पादक शेतकरी नव्हते. म्हणजे अण्णा काय किंवा राजू शेट्टी काय, त्यांच्या आंदोलनाला सोशल नेटवर्किंगमध्ये मिळालेला प्रतिसाद काही कमी दर्जाचा नव्हता. पण अंबेजोगाईच्या ग्रुपने निवडणूक आणि शहरांच्या विकासकामांमध्ये ज्या पद्धतीने आपला ठसा उमटवलाय, तो प्रयत्न निश्चितच वाखाणण्याजोगा आहे.

हे फक्त फेसबुकचं यश नाही तर संपूर्ण सोशल नेटवर्किंग आणि इंटरनेट कम्युनिकेशनचं यश आहे, यामुळेच जगात काही ठिकाणी क्रांतीचं लोण पसरलं तर अमेरिकेसारख्या ठिकाणी निवडणुकीच्या काही काळ अगोदर संपूर्णपणे अपरिचित असलेले बराक ओबामा संपूर्ण अमेरिकेला माहिती झाले.

दिवाळीपूर्वी आपल्याकडे युवक काँग्रेसच्या निवडणुका झाल्या. काँग्रेसमध्ये पक्षातर्गंत लोकशाही आहे, दे दाखविण्यासाठीच हा निवडणुकांचा घाट घालण्यात आला होता, हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे. पक्षाचे सरचिटणीस आणि होऊ घातलेले पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या आग्रहावरून या पक्षातर्गंत निवडणुका झाल्या होत्या. निवडणुकीसाठी कोण कोण उभं राहिलं, आणि महत्वाच्या पदांवर कोणाची वर्णी लागली, या सर्व शिळ्या झालेल्या बातम्या आहेत. पण या निवडणुकीत माहिती-तंत्रज्ञानाची माध्यमे वापरण्याचा एक प्रयत्न जाणीव पूर्वक करण्यात आला. हा पक्षाचा आदेश होता की या निवडणुकीला उभ्या राहिलेल्या युवा नेत्यांनी स्वतःहूनच हा निर्णय घेतला होता, हे कळायला मार्ग नाही. त्याच्या तपशीलात जाण्याचंही कारण नाही. कारण बहुतेक उमेदवारांची निवडणुकीला उभे राहण्याची भूमिकेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते यूट्यूबवर अपलोड करण्यात आलं होतं. त्याचीच लिंक पुढे युवक काँग्रेसच्या मुख्य साईटलाही देण्यात आली होती. अर्थातच वेगवेगळ्या उमेदवारांच्या या राजकीय भूमिकेला मतदारांनी काही फारसा प्रतिसाद दिला नाह, कारण प्रत्येकाचे व्ह्यूज पाहिले तर कळतं की कुणाचीही भूमिका दोनेकशेपेक्षा जास्त मतदारांनी किंवा निव्वळ नेटीझन्सनी पाहिलेली नाही. म्हणजे प्रयत्न करूनही युवक काँग्रेसची निवडणूक हव्या त्या पद्धतीने लोकभिमुख झाली नाही.

मात्र नगरपालिका निवडणुका मात्र याला अपवाद ठरत आहेत. एकट्या अंबेजोगाईने तर हा पायंडा रूळवलाय. बाकी नगरपालिका किंवा निमशहरांनी अंबेजोगाईचा आदर्श घ्यायला काहीच हरकत नाही.

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Join the Conversation

1 Comment

  1. धन्यवाद मेघराज सर. .!!! आपण या लेखामधून आमच्या ग्रुप चे जे कौतुक केले आहे त्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. ग्रुप सुरु करताना आमच्या अंबाजोगाई बाहेरील व्यक्तींना सुद्धा या ग्रुपचे आकर्षण वाटेल याची यत्किंचितही जाणीव मला नव्हती. हा ग्रुप मोठा करण्यामागे ग्रुपमधील प्रत्येक सभासदाचे महत्वपूर्ण योगदान आहे. आपल्या ब्लॉगमुळे आणि दै. कृषीवल मधील लेखामुळे आम्हा सर्वांच्या उमेदीला अधिक बळ मिळाले आहे. ग्रुपच्या सभासदांच्या वतीने आपले आभार ..!!!

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: