नवमाध्यमांच्या जमान्यातलं राजकारण

आज आपल्याकडे ट्वीटरवर असलेले राजकारणी कोण कोणते, तर सर्वात पहिलं नाव येतं, शशी तरूर याचं. पण शशी तरूर हे राजकारणात येण्याआधीपासानूच ट्वीटरवर सक्रीय आहेत, एवढंच नाही तर सध्या त्यांची फॉलोअर्सची संख्या देशात सर्वाधिक आहे. सत्तेच्या राजकारणातून म्हणजे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्रीपदावरून पायउचार झाल्यानंतरही ते ट्वीटरवर तेवढेच सक्रीय आहेत, जेवढे पूर्वी होते. त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही सातत्याने वाढतेच आहे. त्यांनी आपल्या ट्वीटने अनेकदा राष्ट्रीय पातळीवर होडलाईन होतील, अशा बातम्याही दिल्यात. त्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदी, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, भाजपच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज अशी काही मोजकी नावे ट्वीटरवर सक्रीय असलेल्यांची म्हणून घेता येतील. उमर अब्दुल्ला यांनी आपल्या ट्वीटमधून हेडलाईन्सच्या अनेक बातम्या दिल्या.
(कृषिवल:दिनांक 08/11/2011)

सध्यातरी या लोकाचं ट्वीटर फॉलोइंग ही एका मर्यादित लोकसंख्येपुरतीच आहे. म्हणजे यांच्या ट्वीटवरून प्रस्थापित प्रसारमाध्यमांनी म्हणजे टीव्ही चॅनेल्स किंवा मोठ्या वृत्तपत्रांनी बातम्या केल्याशिवाय इतर जगाला त्याविषयी माहितीच होत नाही. याउलट अमेरिकेत अध्यक्ष बराक ओबामा याना तुम्ही ट्वीटरवर फॉलो करत असाल तर लक्षात येईल की त्यांनी आपल्या ट्वीटमधून तिथल्या रोजगार हमी कायद्याचा विषय लावून धरलाय. जॉब गॅरन्टी कायदा प्रत्यक्षात येणासाठी आपापल्या खासदारांना ट्वीट करा, मेल करा किंवा त्यांच्या फेसबुकवर जाऊन त्यांना आवाहन करा, असं आवाहन सर्व फॉलोअर्सना करत आहेत. त्या सर्व ट्वीटची बातमी होत नाही. पण संबंधितांना काय आवाहन केलंय, ते मात्र कळतं.

ऑनलाईन माध्यमांच्या उदयानंतर किंवा त्यांचा भारतात प्रसार होऊ लागल्यानंतर त्याचा राजकारणावर म्हणावा असा प्रभाव उमटण्यासाठी आपल्याकडे काही अडचणी आहेत. खरं तर ज्या वेगाने तंत्रज्ञान सध्या विकसित होतंय. त्या वेगाने या अडचणी सुटायला फार वेळ लागणारच नाही, फक्त तयारी हवीय, आपण नव्या तंत्रज्ञानाला सरावण्याची. सध्या भारतासारख्या खंडप्राय आणि शेकडो भाषा आणि बोली असलेल्या देशात मोबाईल सहजगत्या पोचला असला तरी अजून त्यांचा पुरेसा वापर होतच नाही कारण प्रमुख अडसर भाषेचाच. फक्त बोलण्यापुरच मर्यादित असेल तर भाषेचा फारसा अडसर जाणवण्याचं काही कारण नाही मात्र, मराठी टाईप करायला येणं… वेगाने टाईप करायला येणं.. यापातळीवर बऱ्याच अडचणी आहेत.

ऑनलाईन मीडियाच्याच अंगाने बोलायचं तर आपल्या सर्वच संगणकात हल्ली मराठी टाईप करण्याची सोय आहे. ही सोय उपलब्ध होऊनही तब्बल दहा वर्षे उलटून गेलीत. तरीही कित्येकांना मराठी आपल्या संगणकात बाय डिफॉल्ट असतं हे टाऊकच नसतं. एवढंच नाही तर युनिकोडमध्येच मराठी टाईप करण्यासाठी किमान डझनभर तरी साईट्स उपलब्ध आहेत. या सर्वांवर सोपं मराठी लिहिण्याचा पर्याय अगदी फुकट उपलब्ध आहे, शिवाय अमुक एक कीबोर्डच आला पाहिजे असाही आग्रह नाही. कारण इंग्रजीतून टाईप केलं तरी युनिकोड मराठी अक्षरे उमटवण्याची ऑनलाईन सोय उपलब्ध आहे. तरीही आपल्याकडे फेसबुक किंवा ट्वीटरवर कॉमेन्ट करायची वेळ आली की रोमनमधून मराठी लिहिली जाते. काही मोबाईल हँडसेटमध्ये अजून मराठीची सुविधा नाहीय, हे मान्य केलं तरीही मराठीतून काँमेन्टची संख्या मर्यादितच आहे. भारतातल्या भाषिक विविधतेच्या पार्श्वभूमीवर ट्वीटरनेच अगदी अलीकडे हिंदी म्हणजेच देवनागरीतून ट्वीट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलीय. त्यामुळे थोडासा फरक पडायला हरकत नसावी, त्यामुळे काही मराठी नेते ट्वीटरवर आले तरी बरंच काही साध्य होईल.

ट्वीटरवरील भारतीय राजकारणी

सर्वाधिक लोकप्रिय म्हणजे फॉलोईंग असलेले क्रमांक एकचे राजकारणी आहेत, शशी तरूर, त्यांचे ट्वीटरवर फॉलोअर्स आहेत तब्वल अकरा लाखांपेक्षाही जास्त… त्यानंतरचा नंबर लागतो गुजरातचे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदी यांचा, त्यांना साडेतीन लाखांपेक्षा फॉलोअर्स आहेत, तर त्याखालोखाल सुषमा स्वराज यांना दीड पावणेदोन लाखांच्या जवळ फॉलोअर्स आहेत. त्यानंतरचा नंबर आहे खासदार राजीव चंद्रशेखर यांचा, त्यांचे फॉलोअर्स पन्नास हजाराच्या घरात. त्याशिवायही अनेक राजकारणी फॉलोअर्स आहेत, पण ते दक्षिणेकडचे… आपल्या सर्वाधिक परिचयाचं नाव म्हणजे पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी, पण ते ट्वीटर फार सक्रीय नाहीत,

ब्लॉगवरील राजकारणी
आपल्याकडे सर्वात आधी ब्लॉग चर्चेत आला तो, ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांचा… त्यानंतर अगदी अलीकडे म्हणजे आपल्या आर आर आबांचा… आबांनी तर आपल्या ब्लॉगमधील पहिलीच पोस्ट अंगाशी आल्यानंतर सोशल नेटवर्किंगच्या नादी लागायचं सोडून दिलं. पहिल्याच पोस्टनंतर त्यांनी ब्लॉगिंगशी डिव्होर्स घेतला तो कायमचाच. नाही म्हणायला आपल्या परिचयाचे असलेले बिहारचे नितीश कुमार नितीश कुमार नियमितपणे ब्लॉग लिहित असतात. त्यांनीही मधल्या काळात तब्बल वर्षभर ब्लॉगिंगपासून फारकत घेतली होती. कर्नाटकातील बरेच नेते ब्लॉगिंग करतात, त्यामध्ये व्हीएस आचार्य, एस सुरेशकुमार, रघुपती भट त्याशिवाय तामिळनाडूत व्ही एस स्टॅलिन सक्रीय आहेत.

आपल्याकडे कित्येक आमदार-खासदारांच्या स्वतःच्या वेबसाईट्स आहेत, पण त्यावर त्यांच्या फोटो शिवाय आणि विधीमंडळातील भाषणांच्या पीडीएफ फाईल्सशिवाय अन्य काही अभावानेच पहायला मिळेल. कित्येक वेबसाईट्स तर वर्षानुवर्षे अपडेट न केलेल्याच आहेत.

राहुल गांधी हे काँग्रेसचे युवराज. त्यांची वेबसाईट आहे. ते कधीतरी ट्वीटरवर आल्याची चर्चा होती, त्यानंतर त्याचं अकाऊंट फेक असल्याचंही जाहीर झालं, एरवी भारतभर फिरणाऱ्या आणि टेक्नोसॅव्ही म्हणून ओळख असलेल्या राहुल गांधीचंही ट्वीटरवर अकाऊंट नाहीय की ते ब्लॉगही लिहित नाही. आपल्याकडे गांधी घराण्यातील लोकांकडे वारसा हक्काने देशाचं नेतृत्व जातं असं म्हणतात. राहुल गांधी हे पंतप्रधान होणार हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट असलं तरी त्यांनी अजून लोकापर्यंत पोहोचण्यासाठी सोशल किंवा ऑनलाईन माध्यमांचा अजून वापर केलेला नाहीय. त्यांच्या हट्टाने म्हणा की आग्रहाने युवक काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुका झाल्या, त्यासाठी सर्व उमेदवारांना आपापली भूमिका रेकॉर्ड करून यूट्यूबवर टाकण्याचा आदेशच होता, त्यानुसार अनेकांच्या व्हिडिओ क्लिप यूट्यूबवर आणि त्याच्या लिंक युवक काँग्रेसच्या वेबसाईटवर झळकल्या पण त्यातल्या कित्येकांच्या व्ह्युअरशिपने शंभराचा आकडाही ओलांडला नाही. पक्षाने सांगितलं नसतं तर कुणीच स्वतःहून हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा खटाटोप केला नसता. त्याउलट त्यांना टीव्ही किंवा वृत्तपत्रात नाहीतर आपापल्या गावात होर्डिग (अनधिकृतच) उभारायला सांगितलं असतं तर मोजता येणार नाहीत, एवढी होर्डिंग आणि कित्येक सेकंदाच्या जाहीराती लगेचच झळकल्या असत्या. सहज फुकट उपलब्ध असलेलं सोशल नेटवर्किंग तर आपल्या गावीही नसतं. त्यामुळे चक्क एका महासत्तेच्या अध्यक्षांची संबंध देशवासियांना पहिली ओळख झाली, किंवा दोन देशांमध्ये शांततेच्या मार्गाने क्रांती झाली, सत्तापरिवर्तन झालं, स्बंध जगाला त्याची दखल घ्यावी लागली, हे आपल्या गावीही नसतं.

राहुल गांधींची टीम तरूण तुर्क आहे. त्यांची तरूणांमधली लोकप्रियता आणि फॅन फालोईंगची अफाट आहे, तरीही त्यांनी अजून ऑनलाईन मीडियामध्ये म्हणावा रूची घेतलेली दिसतच नाही. राहुल ब्रिगेडमध्ये अनेकजण इंजिनीयर्स आहेत. उच्च शिक्षित म्हणा किंवा परदेशात शिकून आलेले आहेत. त्यांना तर भाषिक अडचण येण्याची काहीच हरकत नाही. तरीही त्यांनी अमेरिकेचं अनुकरण करणं तर दूरच साधा प्रयत्नही केलेला दिसत नाही. नाही म्हणायला त्यांचे तसे, फेसबुक बुकवर पेज आणि कम्युनिटी आहेत, पण त्याचे मॅनेजर्स किंवा अॅडमिनिस्ट्रेटर्स चमचेगिरीशिवाय दुसरं काहीच करत नाहीत. महाराष्ट्रातली अजित पवार, आर आर पाटील, शरद पवार यांचे फेसबुक पेज आहेत. तसंच अनेक तरूण आमदार फेसबुकवर प्रोफाईल आणि पेजच्या माध्यमातून ऑनलाईन असतात. त्याचं फॅनफालोईंगही लक्षणीय आहे. फक्त त्याला अजून दिशा नाहीय.

आपल्याकडे सोशल नेटवर्किंगची निवडणुकीच्या काळातली कामगिरी अजून टेस्ट व्हायचीय. 2009 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोशल नेटवर्किंग नुकतंच आपल्याकडे बाळसं धरू लागलं होतं. आगामी लोकसभा निवडणुकीत मात्र सोशल नेटवर्किंग एक तगडी भूमिका अदा करेल, असं भाकित वर्तवायला काहीच हरकत नसावी. सोशल नेटवर्किंगवरील तरूणाई काय करू शकते, याची चुणूक आपल्याला अण्णा हजारेंच्या दोन्ही उपोषणाच्या वेळी दिसलीच आहे. त्यातून राजकारणी मंडळी नक्कीच काही ना काही बोध घेतीलच. आता स्वतः अण्णा हजारेही अधिकृतपणे सोशल नेटवर्किंगच्या सर्वच व्यासपीठावर अधिकृतपणे उपलब्ध आहेत. वर्डप्रेस, ब्लॉगस्पॉट, ट्वीटर, फेसबुक, यूट्यूब अशा सर्व व्यासपीठांवर अधिकृत अण्णा आलेले आहेत. खुद्द अण्णाचं उपोषण सुरू असताना त्याच्या टीम मेंबर किरण बेदी यांनी ट्वीटर किंवा यूट्यूब व्हिडिओमधून तिहारमधील अण्णा समस्त भारतीयांपर्यंत पोहोचवले होते, एवढंच नाही तर अण्णांनी केलेल्या तीन मागण्यांवर संसदेत जी चर्चा सुरू होती, त्याचं प्रसारणही बेदींच्याच आयपॅडवरून अण्णांनी पाहिल्याच्या बातम्या आल्या होत्या. अण्णांच्या आंदोलनाला सोशल नेटीझन्सचा मिळालेला प्रतिसाद पाहूनच की काय दिग्विजय सिंहही तातडीने ट्वीटरवर दाखल झाले होते. याच काळात स्वाभाविकच किरण बेदीच्या ट्वीटर फॉलोअर्सची संख्या सर्वाधिक वाढलेली दिसली.

आता लोकसभेच्याही अगोदर आपल्याकडे महापालिकांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारीत पालिकेच्या निवडणुका पार पडतील. त्यामध्ये सोशल नेटवर्किंग एक प्रभावी नक्कीच पार पाडेल. नाही म्हणायला या आधीच्या म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीची सोशल नेटवर्किंगवर चांगलीच चर्चा झाली होती. त्यामुळे आता मुंबईच्या पालिका निवडणुकीत काहीतरी सकारात्मक बदल तर नक्कीच होईल.

फेसबुकवर सहज सर्च केलं तर त्यावर आर.आर.पाटलांपासून, भाई जगताप, बाळा नांदगावकर, जितेंद्र आव्हाड, प्रणिती शिंदे, पंकजा पालवे-मुंडे, देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे अशा वेगवेगळ्या पक्षाच्या आमदारांचे प्रोफाईल बघायला मिळतात. ही यादी खरंतर बरीच मोठी आहे. प्रत्येकाची फेसबुक वापरण्याची तऱ्हा वेगवेगळी असली तरी पक्ष कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी फेसबुकचा वापर वाढतोय. फेसबुकमुळं लोकप्रतिनिधींची मतदारांशी संवाद साधण्याची पद्धतीही आमूलाग्र बदललीय. फेसबुकसारखं इंटरअॅक्टिव्ह माध्यम असल्यानं राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना (आणि टीकाकारांनासुद्धा) एकमेकांशी संवाद साधणं अगदी सोपं झालंय. पूर्वी राजकीय नेत्यांपुढं एखादी समस्या मांडायची झाल्यास प्रत्यक्ष भेटीशिवाय पर्याय नव्हता. आता काही प्रमाणात का होईना याची जागा फेसबुकनं घेतलीय. शिवाय फेसबुकमुळं वेळ आणि पैशांत खूप बचत होते.

हे एकूणच टेलिकम्युनिकेशन क्रांतीचं फलित आहे. राजकीय नेत्यांच्या फेसबुक अकाउंटचा उपयोग पत्रकारांनाही होतोय. मीडिया सॅव्ही असलेल्या राजकारण्यांची फ्रेंड लिस्ट बघितली तर त्यामध्ये जास्तीत जास्त पत्रकार बघायला मिळतील. प्रसिद्धी मिळवण्यासाठी फेसबुकवरच्या फोटो गॅलरीचा चांगला उपयोग होताना दिसतोय. राजकीय नेत्यांनाही फेसबुकवरुन आपले विचार स्पष्टपणे मांडता येतात. यावरुन एखादा राजकारणी एखाद्या विषयाकडं कसं बघतो याचा अंदाज येतो.

परदेशात काही कंपन्यांमध्ये काम मिळवण्यासाठी गेलेल्या उमेदवाराचं सोशल नेटवर्किंग कसं आहे ते तपासलं जातं. यावरुन ती व्यक्ती कंपनीला किती फायद्याची ठरु शकते याचा ठोकताळा बांधला जातो. अजून आपल्याकडे असा विचार होत नसला तरी, जेव्हा कधी तो होईल, तेव्हा कदाचित विविध पक्षांचे हायकमांड एखाद्या नेत्याविषयी असा विचार करतीलही!

नेत्यांसाठी सोशल नेटवर्किंगचे क्लासही आगामी निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्लास म्हणण्यापेक्षा एक स्वतंत्र बिझीनेस म्हणजे वेगवेगळ्या नेत्याचे फेसबुक पेज डिझाईन करून देणं, त्यांना जास्तीत फॉलोअर्स मिळतील, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्याच्या पेजची चर्चा होईल, त्यांना सोशल नेटवर्किंगमधून जास्तीत जास्त प्रमोट केलं जाण्याच्या एका नव्या प्रोफेशनचा आगामी निवडणुकीत जन्म व्हायला हरकत नाही.

कॉमेन्टचं स्वरूप भावनिक उद्रेकाचं किंवा भावनोद्दीपनाचं…

फक्त धोका एकच आहे, ते म्हणजे या यूजर जनरेटेड कॉन्टेटच्या सार्वकालिक नसल्याचा. थोडक्यात काय तर कॉमेन्ट फक्त टॉपिक रिलेटेड आणि तात्पुरत्या स्वरूपाच्या असं आपल्याकडचं चित्र आहे. बऱ्याच अर्थाने या कॉमेन्ट म्हणजे एक भावनोद्रेकाचं आहे. म्हणजे कुण्या एखाद्या नेत्याने काहीतरी वक्तव्य केलं तर किंवा त्या संदर्भातल्या बातमीची लिंक कुणी शेअर केली तर प्रतिक्रियांचा अक्षरशः खच पडतो, पण त्यातल्या विचारप्रवण किंवा खरोखरच प्रतिक्रिया म्हणता येतील अशा किती तर फारसं काही हाताला लागत नाही. अर्थाने सोशल नेटवर्किंगची आपल्याकडे आज असलेली अवस्था ही खूपच प्रयोगात्म आणि बालिश अवस्थेतली आहे, म्हणूनच अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीत जसा करीष्मा बराक ओबामांना करून दाखवता आला, तसं लगेचच आपल्याकडे होईलच असंही नाही. कारण आपल्याला प्रगल्भ होण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे, आता हाताशी असलेल्या माध्यमांच्या सहाय्याने… म्हणून आताच्या फेसबुक किंवा ट्वीटरवर असलेल्या प्रछन्न किंवा वरवरच्या कॉमेन्ट ज्यामुळे तात्पुरत्या प्रतिक्रेयांचा पाऊस पडतो, हे खरं तर एका अर्थाने चांगलंच लक्षण मानायला पाहिजे, कारण त्याने एक सुरूवात तर करून दिलीय. सुरवातीच्या दिवसातला हा खळखळाट तसा स्वाभाविकच म्हणायला पाहिजे. कारण त्याचा सराव झाला तर पुढे काही सीरियस पावले उचलली जातील. त्यासाठी तेवढा वेळ तर द्यायलाच पाहिजे.

अमेरिकेत टीव्ही डीबेटची एक मोठी परंपरा आहे, त्यामध्ये प्रेक्षकांचा सहभागही तेवढाच महत्वाचा… टीव्ही डिबेट अजून तरी आपल्याकडे तथाकथित एक्स्पर्टचीच मक्तेदारी आहे. सामान्य प्रेक्षकाला त्यामध्ये फारसा वावच नाही. प्रेक्षक म्हणून कार्यक्रमात फक्त तो बघण्यापलीकडे सहभागी होण्याची आपली कुवतच अजून तयार झालेली नाही. म्हणजेच सोशल नेटवर्किंगमुळे उपलब्ध झालेलं टू वे कम्युनिकेशचं साधन रूळलं तर पाहिजेच पाहिजे…

त्यातूनच उद्याची राजकीय प्रक्रिया घडणार आहे…
(पूर्ण)

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: