नवमाध्यमांच्या जमान्यातलं राजकारण

Change will not come if we wait for some other person or some other time. We are the ones we’ve been waiting for. We are the change that we seek. – बराक ओबामा

सोशल नेटवर्किंगने अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची आजपर्यंतची सर्व परिमाणेच बदलून टाकली. काही मोजक्या लोकांच्या पलिकडे अमेरिकेच्या संबंध जनतेला बराक ओबामा आणि त्याचं जगप्रसिद्ध वाक्य, ज्याला नंतर आपल्याकडे सुभाषिताचा दर्जा मिळाला, Yes We Can! ते फक्त अमेरिकेत नाही तर जगभरात पोहोचलं ते फक्त सोशल नेटवर्किंगमुळेच.
(कृषिवल 1/11/2011)

आपल्याकडे प्रत्येक जमान्याला एकेक विशेषण लावायची सवय असते. म्हणजे कुणाला वाटतं हे यंत्र युग आहे, कुणाला वाटतं हे जाहिरात युग आहे, कुणाला वाटतं हे माध्यम युग आहे, तर कुणाला हे संगणक युग वाटेल. जास्तच स्पेसिफिक सांगायचं तर सध्याचं युग हे सोशल नेटवर्किंगचं आहे, असंही कुणी म्हटलं तर त्याचा कुणी विनाकारण प्रतिवाद करीत बसणार नाही.

तुम्ही तरुण आहात, कॉलेजमध्ये जाता किंवा जॉब करता, तरीही तुम्ही फेसबुक किंवा ट्विटरवर नाहीत, असं सांगितलं तर तुमच्या तरुण असण्यावर शंका घेता यावी, इतपत हे सोशल नेटवर्किंग आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग झालंय. सध्या हे फक्त शहरापुरतंच मर्यादित आहे, असंही म्हणायची सोय नाही. कारण मोबाईलमुळे प्रत्येकाच्या हातात एक कॉम्प्युटर आलाय, इंटरनेट जोडणीसह.

प्रत्येकाच्या हातात सोशल नेटवर्किंगचं साधन असताना त्यामुळे आपल्याकडचं राजकारण किती आणि कसं प्रभावित झालंय किंवा किती प्रभावित होण्याची शक्यता आहे. तर भारताच्या बाबतीत बोलायचं तर म्हणावं लागतं की, आपल्याला बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. कारण भारतीय राजकारण्यांना अभिव्यक्त तर व्हायचं असतं, पण त्याचे अभिव्यक्त होण्याचे मार्ग सोशल नेटवर्किंगइतके पारदर्शी नाहीत.

अभिव्यक्त होणं ही एकूण मानव प्राण्याची एक मूलभूत गरज आहे. राजकारणी त्याला कधीच अपवाद असू शकत नाहीत. कारण त्याचं सगळं आस्तित्वच या अभिव्यक्त होण्यावर अवलंबून असतं. मात्र आपल्याकडे सामाजिक अर्थाने अभिव्यक्त व्हायचं तर भारतीय राजकारण्यांना सहारा घ्यावा लागतो, स्थानिक तरुण मंडळांचा, गणेशोत्सवाचा, नवरात्रीच्या काळात दांडियाचा किंवा नवरात्र मंडळांचा, दहीहंडी उत्सवाचा, जिथे लोक जमतात, स्वाभाविकपणे काहीही कष्ट न करता तिथे हे राजकारणी आपलं सामाजिक नेटवर्किंग साधण्यासाठी लगेच एकवटतात. त्यासाठी जत्रा, यात्रा, उरुस, मेळावे, वाढदिवस, परीक्षा असं काहीही चालतं. पण या सर्व वेगवेगळ्या घडामोडी नसतात तेव्हाही तरुण पिढी कायम एका व्हर्च्युअल अड्ड्यावर सापडते, ते ठिकाण म्हणजे सोशल नेटवर्किंगचे संगणकीय अड्डे. त्याला तुम्ही फेसबुक म्हणा की ट्विटर म्हणा की यूटूब किंवा अजून काही…. हजारो साईट्स आहेत… तिथे भारतीय राजकारणी मात्र अभावानेच दिसतात.

तसं पाहिलं तर अलीकडे हे चित्र पालटू लागलंय. अनेक राजकारणी फेसबुकवर आलेत; पण त्याचा वापर करण्याचं तंत्र त्यांना अवगत झालेलं नाही. कारण त्यांच्या वतीने कुणीतरी तिसराच तिथे बसलेला असतो. सोशल नेटवर्किंगमध्ये जिथे पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा अतिशय अनिवार्य असतो, बहुतेक त्या वाटेला भारतीय राजकारणी जाणारच नाहीत.

फेसबुक किंवा अन्य नेटवर्किंगचा अतिशय चांगल्या वापराची उदाहरणे पाहायची तर तुम्हाला अमेरिकेतच जावं लागतं. पुन्हा अमेरिकेत जाणं म्हणजे फिजीकली नाहीच तर पुन्हा इंटरनेट इथेही तुमचा वाटाड्या असतोच.

अमेरिकेच्या २००८ च्या अध्यक्षीय निवडणुकीत बराक ओबामा यांनी सर्वात चांगल्या पद्धतीने सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर करुन घेतला. जेव्हा बराक ओबामा कोण आहेत, हे उभ्या अमेरिकेला माहिती नव्हतं, त्यावेळी आपल्या जाहीर भाषणातून ते सांगायचे की, तुम्हाला बराक ओबामा कोण आहे, ते माहिती करुन घ्यायचंय तर माझ्या फेसबुक पेजवर जा… अमेरिकेत आता पुढची अध्यक्षीय निवडणूक आहे, सहा नोव्हेंबर २०१२ ला. त्याला अजून तब्बल एक वर्ष आहे. पण सोशल नेटवर्किंग साईट गेल्या वर्षभरापासूनच कामाला लागल्यात. यू ट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि मायस्पेस सर्वचजण निवडणुकीच्या तयारीला लागलेत. आपल्याकडेही इलेक्शन हा एक मोठा इव्हेंट असतो, प्रसारमाध्यमांसाठी. या काळात प्रसारमाध्यमे विशेषतः टेलिव्हिजन चॅनेल्सची प्रेक्षक संख्या मोठ्या प्रमाणात वाढते, असा आजवरचा अनुभव आहे. फक्त टीव्हीच नाही तर वृतपत्रांचा खपही या काळात वाढलेला असतो. म्हणजेच लोकांना माहिती हवी असते.

त्यांना आपापल्या उमेदवारांविषयी जास्तीची माहिती हवी असते. तुम्ही आम्ही पांढरपेशांनी कितीही म्हटलं की, पोलिटीक्स हा डर्टी गेम असतो, तरीही त्याविषयीही उत्सुकता मात्र अजिबात कमी होत नाही. म्हणजे, आम्ही एकवेळ मतदान करणार नाही, मतदानाच्या दिवशी पिकनिक प्लॅन करू… पण राजकारणाच्या बातम्या आणि निवडणुकीची अपडेट्स मात्र कधी चुकवणार नाही. निकाल हाती यायला लागले की, आम्ही एसएमएसच्या माध्यमातून किंवा फेसबुक अड्ड्यावर कोण जिकलं आणि कोण हरलं किंवा सरकार कुणाचं बनतंय, यावरच्या चर्चा रंगवू… त्यावेळी आपण मतदानच केलेलं नाही, हे पूर्णपणे विसरून जाऊ. फेसबुकवरच्या चर्चेत कुणी विचारलंच की, कुणाला मत टाकलं तर आपलं उत्तरही तयारच असेल की कुणीच लायक नाहीय, माझं मत मिळवण्यासाठी म्हणून बायकॉट केलं मतदान…

ऑनलाईन मीडियाच्या किंवा नवमाध्यमांच्या जमान्यात राजकारण कसं बदलतंय, असा शोध घ्यायचा तर अमेरिका हेच एकमेव चांगलं उदाहरण डोळ्यासमोर येतं. तसं अलीकडच्या काळात ट्यूनिशिया, इजिप्त वगैरेमध्ेय जो लोकांचा उठाव झाला, लोकशाही आंदोलने झाली, त्यामध्येही सोशल नेटवर्किंगच ड्रायव्हिंग फोर्स असल्याचं प्रकर्षाने पुढे आलं. कारण या माध्यमांमध्ये असलेली अभिव्यक्त होण्याची अतिशय पारदर्शी आणि सोपी अशी परिभाषा.

या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या भारतात काय चित्र आहे.तर हल्ली बहुतेक सर्व पहिल्या, दुसर्या फळीतले नेते तुम्हाला सोशल नेटवर्किंगवर दिसतील; पण त्यांच्या वतीने कुणीतरी त्याचं प्रोफाईल किंवा पेज ऍडमिन करत असलेलं पाहायला मिळतं. म्हणजे एक चांगलं साधन हाताशी असूनही त्याचा फारशा गांभीर्याने वापर होत नाही. किंवा त्याची गरज वाटत नाही.

फार पूर्वी जेव्हा टीव्ही वाहिन्या भारतात रूळल्या नव्हत्या, तेव्हा जेव्हा एखादा नेता त्याने सर्वांसमोर केलेल्या वक्तव्याचं बूमरँग होई तेव्हा, लगेगच आपलं मत डिसओन करायचा किंवा आपण असं काही बोललोच नाही म्हणायचा किंवा आपल्या तोंडी पत्रकारांनी काहीबाही घातलंय. आपल्याला असं म्हणायचं नव्हतं, असे खुलासे द्यायचा. त्यानंतर टीव्ही आल्यानंतर नेत्यांच्या खुलासे देण्यात प्रमुख बदल झाला. कारण टीव्हीमध्ये एखादा नेता काही बोलला तर डिसओन करायची सोयच नसते. कारण टीव्हीच्या कॅमेर्यात त्याचं जे काही म्हणणं असतं, ते साक्षात रेकॉर्ड झालेलं असतं. हा तसा पाहिला तर तंत्रज्ञान क्रांतीचा महिमा. काही नेत्यांनी त्यावरही मार्ग शोधून काढला. मी जे काही बोललो, ते चुकीच्या पद्धतीने दाखवलं जात आहे, आपल्याला असा प्रश्नच विचारण्यात आला नव्हतं, आपण जे उत्तर दिलंय, ते विचारलेल्या प्रश्नाचं नव्हतंच किंवा आपलं मत एडिट करुन ते तोडमोड करुन वापरण्यात आलंय.

त्यानंतरचा जमाना आला वेबचा. म्हणजे यूजर जनरेटेड कॉन्टेन्टचा. वेब किंवा त्यातल्या त्यात सोशल नेटवर्किंगमध्ये सर्व कॉन्टेन्ट हा लोकांनी लोकांसाठी तयार केलेला. त्यामध्येही अनेक नेतेमंडळीही असतात. ते काही वेळेला ट्विट टाकतात, किंवा ब्लॉग लिहितात. त्यातल्या एखाद्या महत्त्वाच्या आशयाची बातमी होते, अशावेळी जेव्हा एखाद्या बातमीचं बूमरँग होतं, त्यावेळी संबंधित नेता सारवासारव करण्यासाठी जी वक्तव्य वापरतो, त्यामध्येही अलीकडच्या काळात बदल झालेला आहे. तो लागलीच सुरू करतो, आपल्या ट्विटचा अर्थच लोकांना कळलेला नाही, आपल्याला असं म्हणायचं नव्हतं. किंवा आपल्या ब्लॉगमधील माहितीचा चुकीचा अर्थ काढलाय. तुम्हीही काहीही केलंत तरी त्याला डीसओन करणं किंवा आपण त्यातले नाहीतच किंवा आपल्याला असं म्हणायचंच नव्हतं, असं म्हणायला राजकारणी मोकळे असतात. पण एक गोष्ट मात्र माध्यमे बदलत गेली तशी ठळकपणे लक्षात येते की, भूमिका बदलणं किंवा सोयीची भूमिका घेणं अलीकडच्या काळात बरंच अवघड झालंय. हा सर्व तंत्रज्ञानाचा प्रभाव. कदाचित या तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे सोईस्कर भूमिका घेण्यात येणारे अडथळे पाहून आपल्याकडचे राजकारणी या फंदात पडत नसावेत.

यामुळेच की काय शरद पवार, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह किंवा आपले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अजूनही ट्विटरवर आलेले नाहीत. त्यासाठी ते सोईस्कर उत्तर देऊ शकतील की त्यांना वेळच मिळत नाही; पण अमेरिकेच्या अध्यक्षांना ट्विट करायला वेळ असतो, तर आपल्याकडे का वेळ मिळू नये. आवडीच्या कामासाठी कसाही वेळ काढता येतो. अशा अर्थाचं एक सुभाषित याच नेत्यांच्या आवडीचं असतं. अनेकदा शाळांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून गेल्यावर लहान विद्यार्थ्यांपुढे फेकायला हे सुभाषित अनेकदा वापरलं जातं. पण मुळातच या नेत्यांना त्याची गरज वाटत नाही.

(पूर्वार्ध)

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: