रूपयाचा नवीन आलेलं नाणं पाहिलंत? स्टीलचं अतिशय लहान… आता पन्नास पैसे किंवा पाच रूपयाचं नाणं असू द्यात, आकारात कसलाच फरक नाही, तेव्हाच पहिल्यांदा पटलं की खरंच रूपया बारीक झालाय…
म्हणजे अगोदर अर्थशास्त्रज्ञ किंवा त्यासंदर्भातले जाणकार कितीही सांगत असले की रूपयाचं मूल्य कमी होतंय, त्यावर सहजासहजी विश्वास बसायचा नाही, पण आताचा रूपया पाहिला की रूपयाचं मूल्य कमी झाल्याची खात्री पटते.
रूपयाच्या नव्या नाण्यात आपण अलीकडेच स्वीकारलेलं रूपयाचं नवं चिन्ह मुद्राकिंत केलेलं आहे, आकाराला अतिशय छोटासा असा हा रूपया..
रूपयाच्या या नव्या नाण्याने सहज विचाराला चालना दिली, आपल्या हातात आलेलं हे रूपयाचं कितवं नाणं… सगळ्यात आधी म्हणजे अगदी लहानपणी हाताळलेला बंदा रूपया… चांगलाच दणकट होता.. खरोखर रूपया हा रूपया वाटायचा. सर्व नाण्यांमध्ये सर्वात मोठा असलेला… त्यामुळेच कदाचित त्यावेळी सबसे बडा रूपय्या अशी म्हण प्रचलित झाली असावी कदाचित.
आम्ही लहान मुले तेव्हा कुणीतरी मोठ्या माणसाने विचारलं की तुला चाराणे हवेत की दहा पैसे असं विचारलं तर सांगायचो की दहा पैसे कारण दहा पैश्याचं जर्मनचं नाणं हे निकेलच्या चाराण्यापेक्षा आकाराने मोठं होतं. त्यामुळे दहा पैसेच हवेहवेसे वाटायचे… त्याहीपेक्षा तेव्हा मोठा होता तो बंदा रूपया… म्हणजे सर्वात मोठा दणकट रूपया… अगदी वजनदार असं ते नाणं हळूहळू चलनातून कमी झालं.. कारण तोपर्यंत दोन रूपयाचं नाणं चलनात आलं होतं. आणि रूपयाचा आकार थोडासा लहान झाला होता. नंतर आलेला रूपया हा थोडा पातळ होता, तरीही एक रूपया म्हणून त्याचा धाक होताच..
आई नेहमी सांगायची की रूपया म्हणजे सोळा आणे… खरं तर आपण स्वतंत्र झाल्यानंतर ही पैवारी बंद केली होती, पण त्याला प्रत्यक्ष व्यवहारातून हद्दपार व्हायला बराच वेळ लागला. एखादी गोष्ट खूप खरी आहे, शंभर टक्के अस्सल आहे, हे सांगायचं आईचं एक परिमाण होतं, सोळा आणे अस्सल… म्हणजे बंद्या रूपयाइतकं… असा त्याचा अर्थ असायचा. अजूनही जुन्या लोकांना हा सोळा आण्यांचाच हिशेब लवकर कळतो. पटकन समजतो. त्यांना आपली पैश्याची गणिते फारशी सरावाची नसतात, अगदी देशाच्या स्वातंत्र्याच्या साठोत्तरीतही…
सहा पैश्यांचा एक आणा, या हिशेबाने 24 पैश्याचे चार आणे, नंतर आठ आणे म्हणजे 48 पैसे तर पुढे सोळा आणे म्हणजे बंदा रूपया.. हिशेबच लावायचा तर 96 पैसे… पण कळायला लागल्यापासून चार आणे म्हणजे 25 पैसे होते, आठ आणे म्हणजे 50 पैसे, बारा आणे म्हणजे 75 पैसे आणि सोळा आणे हा शब्द आस्तित्वात नसला तरी दोन आठाणे किंवा चार चाराणे म्हणजे एक बंदा रूपया असंच गणित होतं.
चलनात अगदी परवापर्यंत म्हणजे रिझर्व बँकेने चार आणे रद्द करेपर्यंत चार आणे आणि आठ आणे हा शब्द प्रचलित होता, आठ आणे हा शब्द तर अजूनही कायम आहे. माझ्या लहानपणीही होता, आपण स्वातंत्र्यानंतर दहा वर्षांनी दशमान पद्धत स्वीकारली आणि अंमलात आणली असली तरी द्रव पदार्थांच्या बाबतीतला गावठी हिशेब अजूनही कायम आहे, म्हणजे चार चाराण्यांचा एक रूपया किंवा दोन आठ आण्यांचा एक रूपया हे गणित सर्वमान्य असलं तरी पावशेर दूध म्हणजे प्रत्यक्षात 200 मिली दूध असतं, पाच पावशेर दूध म्हणजे एक लीटर दूध होतं, तर चार पावकिलोचा एक किलो होतो. शेर आणि किलो किंवा लीटर यांची सांगड घातली तरी प्रत्यक्ष व्यवहारात हा मेळ लोकांनी आपापल्या सोईंनी घातलाय. त्यामुळे अर्थातच कुठे हिशेब चुकत वगैरे नाहीत.
लहानपणीच्या या मोजमापांचा हा धांडोळा सुरू झाला रूपयाचा अत्यंत लहान असा कॉईन हातात पडल्यानंतर…
स्वाभाविकत, त्याअनुषंगाने रिझर्व बँकेच्या वेबसाईटवर आपल्या नाण्यांचा जरा मागोवा घेतला.. त्यावरची माहिती ही खूपच इंटरेस्टिंग आहे, अगदी सचित्र… यामुळे अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
1947 ला भारत स्वतंत्र झाला, तेव्हा आपल्याकडे ब्रिटीश काळातली चलने वापरात आणि व्यवहारात होती, पुढेही आपण तीच व्यवस्था कायम ठेवली. म्हणजे मधल्या संक्रमण काळापर्यंत, सत्ता हस्तांतरीत होऊन स्वतंत्र भारताचं प्रजासत्ताक भारतात रूपांतर होईस्तोवर… स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे साधारणपणे वर्षभरात पाकिस्तानने, 1948 मध्ये नाणे आणि 1949 मध्ये नोटांची स्वतंत्र छपाई सुरू केली. तर भारताने आपल्या स्वतंत्र नोटांची छपाई 1950 मध्ये सुरू केली, म्हणजे आपलं प्रजासत्ताक आस्तित्वात आल्यानंतर… भारताने 15 ऑगस्ट 1950 पासून नाणे आणि नोटा छपाईला सुरूवात केल्याचं आरबीआयच्या साईटवर नमूद करण्यात आलंय.
तेव्हाच आपण दशमान पद्धतीचा स्वीकार केला.
त्यापूर्वी म्हणजे 1947 ते 1950 या काळात आपल्याकडे जुनी मोजणी पद्धत आस्तित्वात होती, त्यानुसार
1 Rupee = 16 Annas सोळा आणे म्हणजे एक रूपया
1 Anna = 4 Pice एक आणा म्हणजे चार पैस
1 Pice = 3 Pies तीन पै म्हणजे एक पैस
या हिशेबाने एका बंद्या रूपयामध्ये 192 पै असंत…
त्यानंतर आणा पद्धत आपल्याकडे अधिकृतपणे रूजू झाली, ती म्हणजे 15 ऑगस्ट 1950 पासून…
त्यानुसार
एक पैसा,
अर्धा आणा,
एक आणा,
दोन आणे,
चार आणे,
अर्धा रूपया आणि
एक रूपया अशी नाणी प्रचलीत झाली. एक पैश्याचं नाणं ब्राँझचं तर अर्ध्यापासून दोन आण्यापर्यंतची नाणी ही कॉपर निकेल अशी मिश्र धातूची होती. तर चार आण्यापासून पुढची म्हणजे चार आणे किंवा पाव रूपया, अर्धा रूपया आणि एक रूपया ही नाणी निकेलची होती. त्यावरचा मजकूरही एक रूपया, अर्धा रूपया आणि चार आणे असाच होता. या नाणेवारीनुसार रूपया झाला सोळा आण्यांचा…
ही नाणेवारी सात वर्षे म्हणजे 1957 पर्यंत कायम होती…
त्यानंतर 1957 मध्ये आपण दशमान पद्धत स्वीकारली, या दशमान मालिकेला नया पैसा मालिका असंही म्हणतात. ही पैसेवारी आपल्याकडे 1957 ते 1964 पर्यंत होती, हा टप्पा नया पैश्याचा, त्यापूर्वीचा आण्यांचा…
सप्टेंबर 1955 मध्ये आपण भारतीय नाणे कायद्यात दुरूस्ती केली, आणि नाण्यांची पैसेवारी किंवा दशमान पद्धत आपण स्वीकारली. हा कायदा आस्तित्वात आला एक एप्रिल 1957 पासून… त्यामध्ये एक रूपयाचं नाव आणि मूल्य आधीच्या एवढंच कायम ठेवण्यात आलं. फक्त त्याची विभागणी आधीच्या सोळा आण्यांऐवजी 100 पैसे अशी अतिशय सुटसुटीत करण्यात आली, म्हणजे आधी 16 आण्यांचा म्हणजेच 96 पैश्यांचा असलेला रूपया आता 100 पैश्यांचा झाला. 1957 साली आस्तित्वात आलेल्या या पैसेवारीत एकूण सात नाण्यांचा समावेश होता.
त्यामध्ये सर्वात लहान नाणं होतं, एक पैश्याचं, तांबड्या रंगाचं…एक नया पैसा किंवा रूपयाचा शंभरावा भाग असा मजकूर उमटवलेलं हे नाणं ब्राँझ धातूचं होतं.
त्यापेक्षा मोठं कॉपर निकेल असं मिश्र धातूचं, दोन पैश्याचं म्हणजेच रूपयाचा पन्नासावा भाग…
त्यापेक्षा मोठं पाच नव्या पैश्याचं.. नाणं होतं, चौकोनी… कॉपर निकेलच्या मिश्रणातून बनवलेलं…रूपयाचा विसावा भाग असं त्यावर मुद्रीत केलेलं असायचं…
त्यापेक्षा मोठे दहा पैसे, आकार दोन पैशांसारखा, गोलाकार पण नागमोडी किनार असलेल्या कॉपर निकेलच्या मिश्रणातून बनवलेल्या दहा पैश्यांच्या नाण्यावर रूपयाचा दहावा हिस्सा असं मुद्रीत केलेलं असायचं…
त्यापेक्षा मोठं नाणं होतं, चाराण्याचं, म्हणजे आकाराने लहान पण मूल्य मात्र जास्तच… ते नाणं 25 पैसे किंमतीचं, त्यावर रूपयाचा चौथा हिस्सा असं मुद्रीत केलेलं असायचं… हे नाणं निकेलपासून घडवलेलं होतं. (वजन अडीच ग्रॅम आणि व्यास 19 मिमी)
त्यानंतरचं नाणं पन्नास पैश्याचं म्हणजेच रूपयाचा अर्धा हिस्सा. निकेल धातू पासून बनवलेल्या या नाण्यावर 50 पैसे आणि रूपयाचा अर्धा हिस्सा असा मजकूर मुद्राकिंत असायचा. (वजन पाच ग्रॅम आणि व्यास 24 मिमी)
मग येई रूपया.. आपला बंदा रूपया… जाडजूड.. असं हे नाणं निकेलपासून बनवलेलं असायचं. दहा ग्रॅम वजनाच्या या नाण्याचा व्यास 28 मिमी होता.
आधुनिक नाणेपद्धतीचा म्हणजेच दशमान पद्धतीच कायम ठेऊन नाण्यांची एक नवी मालिका आपल्याकडे सुरू करण्यात आली. ही मालिका होती, अॅल्युमिनिअमची होती. यामध्ये कोणत्याही नाण्याचं मूल्य कमी किंवा जास्त करण्यात आलं नव्हतं. म्हणजे मोजणी किंवा परिमाण कायम राहिलं तरी नाण्याचा धातू फक्त बदलून तो अॅल्युमिनीअम म्हणजेच आपल्या गावाकडच्या भाषेत जर्मन करण्यात आला.
फक्त दोनच नवीन नाणे, या जर्मन मालिकेत सुरू करण्यात आलं ते म्हणजे तीन पैश्याचं… आणि वीस पैश्याचं…
साठोत्तरी काळात निकेल, कॉपर यांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने चलनातली नाणी अॅल्युमिनिअमची करण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण या धातूंच्या वाढलेल्या भावांच्या किंमतीचा फायदा घेऊन अनेक ठिकाणी नाणे वितळवून त्यापासून धातू मिळवण्याचे गैरप्रकार व्हायचे, त्यासाठी ही नाणीच हळू हळू बंद करण्यात आली.
1964 साली आलेल्या या मालिकेत एकूण सहा नाणी होती. ती अशी वीस पैसे, दहा पैसे, पाच पैसे, तीन पैसे, दोन पैसे, एक पैसा
वीस पैसे… हे नव्याने सुरू झालेलं नाणं होतं, तसंच या नव्या मालिकेतील सर्वात जास्त मूल्याचं नाणं होतं. त्याचं वजन भरायचं 2.2 ग्रॅम आणि आकार होता षटकोनी…
दहा पैसे… या नाण्याचं वजन होतं, 203 ग्रॅम… म्हणजेच वीस पैश्यांपेक्षा दहा पैश्यांसाठी जास्त धातू वापरला गेला होता. त्याचा आकार आधीच्या मालिकेतल्या सारखाच नागमोडी गोलाकार होता.
पाच पैसे… पाच पैश्याचं नाणं चौकोनी होतं, जर्मनचं… त्याचा आकारही आधीच्या मालिकेतल्या चौकोनी पाच पैश्यांएवढाच होता. वजन दीड ग्रॅम…
या मालिकेत वीस पैश्यांप्रमाणेच नव्यानेच सुरू करण्यात आलेलं नाणं होतं तीन पैश्याचं… या नाण्याचा आकारही वीस पैश्यांप्रमाणेच षटकोनी होता, आणि वजन सव्वा ग्रॅम…
नंतर दोन पैसा आणि एक पैसा अशी अॅल्युमिनिअमची नाणीही या मालिकेत जारी करण्यात आली. दोन पैश्याचं वजन होतं एक ग्रॅम तर एक पैश्याचं वजन होतं पाऊण ग्रॅम… दोन पैसेही दहा पैश्यासारखे नागमोडी गोल आणि एक पैसा पाच पैश्यांसारखा चौकोनी होता.
मग सुरू होतो, सर्वात अलीकडचा टप्पा, म्हणजे तुमच्या आमच्या हातात आलेल्या स्टेनलेस स्टीलच्या नाण्यांचा टप्पा… खरं तर त्यापूर्वी अॅल्युमिनिअम मालिकेत 1968 साली चार आण्याचं म्हणजेच पंचवीस पैश्याचंही एक नाणं सुरू करण्यात आलं होतं, पण लोकांनी त्याला फारसं स्वीकारलं नाही, त्याचा वापर हळू हळू कमी करण्यात आला.
सत्तरच्या दशकातच वाढता उत्पादन खर्च आणि व्यवहार यांचा मेळ घालून काही नाणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एक पैसा, दोन पैसा आणि तीन पैसा ही नाणी बंद झाली. म्हणजे त्यावेळी चलनातलं सर्वात कमी मूल्याचं नाणं होतं, पाच पैश्याचं..
1988 मध्ये आपल्याकडे 10, 25 आणि 50 पैश्यांची स्टेनलेस स्टीलची नाणी सुरू झाली.
स्टेनलेस स्टीलचं एक रूपयाचं नाणं 1992 मध्ये चलनात आलं. याच काळात एक दोन आणि पाच रूपयांच्या नोटांची छपाई कमी करण्यात आली आणि त्याऐवजी नाण्यांचा वापर वाढविण्यात आला. चलनात दोन रूपये आणि पाच रूपयांच्या निकेल-कॉपर मिश्र धातूंच्या नाण्याचं प्रमाण लक्षणीय रित्या वाढलं आणि नोटाचं प्रमाण हळू हळू कमी झालं.
या काळात आलेल्या चार आण्यांवर(25 पैसे) गेंडा मुद्रीत केलेला असायचा तर आठ आण्यांवर (50 पैसे) संसद असायची… अगदी सुरवातीला या नाण्यांची खूप क्रेझ होती. एकदा कुणाकडे हे नाणं आलं की ते चलनात जायचंच नाही…
आता दहा रूपयांच्या नाण्यांच्या बाबतीत होतं तसं…
आता ब्राँझ, निकेल आणि कॉपर मिश्र धातूंच्या नाण्याचं प्रणाम जवळ जवळ कमी झालंय. काही ठिकाणी एक रूपया पातळ असलेले, तसंच दोन रूपये आणि पाच रूपये हीच नाणी शिल्लक आहेत. ती ही होतील हद्दपार हळूहळू… त्यांची जागा पाच रूपये, दोन रूपये आणि एक रूपयांच्या नव्या स्टीलच्या नाण्यांनी केव्हाच घेतलीय. या मालिकेत सर्वात नवीन स्टीलच्या नाण्यांमध्ये एक रूपयासाठी अंगठा, दोन रूपयांवर दोन बोटे अशा खुणाही मुद्रीत केल्या होत्या.
त्यानंतर सर्वात शेवटचं… म्हणजे अगदी अलीकडे जारी झालेलं रूपयाचं नाणं आहे, या मालिकेत जारी झालेल्या नाण्यां पैकी एक, दोन आणि पाच रूपयांची नाणी माझ्याकडे आलीत. त्या सर्वांचा आकार सारखाच आहे, काही मिमीचा फरक असला तरी साध्या डोळ्यांना न कळणारा असा हा फरक आहे, फक्त त्यावर आपण अलीकडे स्वीकारलेलं रूपयाचं नवीन चिन्ह ठळकपणे कोरलेलं आहे…