iSteve: the Book of Jobs च्या निमित्ताने….

स्टीव जॉब्जचं निधन झालं, त्याला आता पंधरवडा उलटून गेलाय. स्टीव जॉब्जच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी त्याच्या अनेक चाहत्यांनी मधल्या काळात मोठ्या प्रमाणात अॅपल्सच्या प्रॉडक्टची खरेदी केली. आता पुन्हा एकदा स्टीव जॉब्ज चर्चेत आलाय, यावेळी कारण आहे ते त्याच्या चरित्राचं… त्याच्यावरील पुस्तकाचं.
(कृषिवलसाठी लिहिलेला लेख)

वॉल्टर आयझॅकसन हे स्टीव जॉब्जचे अधिकृत चरित्रकार, आपल्या हयातीतच स्टीवने त्यांची चरित्रकार म्हणून नेमणूक केलेली. स्टीव जॉब्जचं चरित्र रविवारीच प्रकाशित झालं. म्हणजे फक्त औपचारिक प्रकाशन. त्यापूर्वीच त्या पुस्तकात काय काय असेल, याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. पुस्तकाची तडाखेबंद विक्री होणार यामध्ये शंकाच नाही.

अमेझॉन डॉट कॉमवर स्टीव जॉब्जच्या चरित्राची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू झाल्यापासूनच ते एक जागतिक वेस्टसेलर बनलं होतं. एखाद दिवस नाही तर तब्बल नऊ महिन्यांपासून… तसं आपल्या चरित्राचं प्रकाशन आपल्या हयातीतच व्हावं, अशी त्याची इच्छा असावी, पण त्याच्या निधनामुळे वॉल्टर यांनी साहजिकच प्रकाशन थोडं लांबवलं.

24 ऑक्टोबर म्हणजे रविवारी या पुस्तकाचं प्रकाशन झालं. पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वीच सोनीने या पुस्तकाचे सिनेमा हक्क विकत घेतले होते. अॅपलच्या प्रॉडक्टने अमेरिकी लोकांची सिनेमा पाहणं आणि संगीत ऐकण्याची परिमाणेच बदलून टाकली. त्यामुळेच सोनीला स्टीवच्या आयुष्यावरील सिनेमा खूप बिझिनेस करेल, असा विश्वास आहे. त्याशिवाय सिनेमा आणि अॅनिमेशन उद्योगाशी संबंधित असलेल्या पिक्सार स्टुडिओचाही तो निर्माता होता. अॅपलमधून हकालपट्टी झाल्यानंतर स्टीवने पिक्सार स्टुडिओची स्थापना केलेली, पिक्सारच्या माध्यमातून त्याने अॅनिमेशन उद्योगाला एक नवी दिशा दिली होती. त्यानंतर 2006 मध्ये स्टीवने डिस्नेला पिक्सार स्टुडिओ विकला तरी पिक्सारचा सर्वात मोठा भागधारक आणि संचालक मंडळावरही तो कायम होता.

स्टीवचं चरित्र अजून भारतात यायला बराच अवकाश आहे. प्रकाशन रविवारी झालं असलं तरी प्रत्यक्ष विक्री सुरू होण्यासाठी अजून किमान महिनाभर तरी वाट पाहावी लागणार आहे. 21 नोव्हेंबरच्या आसपास प्रत्यक्ष विक्री सुरू होईल. “iSteve: the Book of Jobs” असं या पुस्तकाचं नाव. आपल्या चरित्राचं नावही अॅपलच्या प्रॉडक्टसारखं आयने सुरूवात होणारं असावं, ही सुद्धा कदाचित स्टीवचीच कल्पना असेल. काय सांगावं अॅपलच्या प्रॉडक्टची प्रत्यक्ष विक्री सुरू होताना, जशी कित्येक तास त्याचे चाहते जशी दुकानाबाहेर वाट पाहात बसायचे, तशीच त्याच्या चरित्रासाठीही भलीमोठी रांग लावून कित्येक तासांची प्रतिक्षा करतील. दिवस-रात्रीची पर्वा न करता.

गेल्या काही दिवसांपासून या पुस्तकात काय काय तपशील असतील. याच्या वेगवेगळ्या स्टोरीज वेगवेगळ्या ठिकाणी झळकत आहेत. त्यामध्ये काही प्रमुख आहेत त्या वॉल्टर आयझॅकसन यांच्याविषयीच्या तर काही या पुस्तकातल्या तपशीलाविषयीच्या, अर्थातच वॉल्टर यांनीच सांगितलेल्या माहितीवर आधारित… वॉल्टर आयझॅकसन हे एक पुलित्झर विजेते लेखक आहेत, अमेरिकेतील नामांकित पत्रकार आहेत. ते सीएनएनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच अध्यक्षही होते. टाईम या जगप्रसिद्ध साप्ताहिकाचेही ते व्यवस्थापकीय संचालक होते. सध्या ते व्हाईस ऑफ अमेरिकाचं काम पाहतात. अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांची ब्रॉडकास्टिंग बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती केलीय. या बोर्डामार्फतच व्हाईस ऑफ अमेरिका, रेडिओ फ्री युरोप आणि अमेरिका प्रशासनाची इतर आंतरराष्ट्रीय प्रसारण सेवा चालवल्या जातात. वॉल्टर आयझॅकसन यांनी अल्बर्ट आईनस्टाईन, बेंजामिन फ्रँकलीन आणि हेन्री किसींजर यांचीही चरित्रे यापूर्वी शब्दबद्ध केली आहेत.

जॉब्जच्या “iSteve: the Book of Jobs” चं औपचारिक प्रकाशन झालं असलं आणि भारतात किंवा जगभरात प्रत्यक्ष विक्रीसाठी उपलब्ध होण्यास अजून वेळ असल्यामुळे या पुस्तकातल्या तपशीलाच्या चर्चेनं अनेकांची झोप उडवलीय. वेगवेगळ्या वाहिन्या असो की इंटरनेट साईट्स की यूट्यूब व्हिडीओ किंवा अन्य ऑनलाईन कम्युनिटी सर्वांना एकच खाद्य आहे, ते म्हणजे या चरित्रातल्या मसाल्याचं…

स्टीव जॉब्ज आणि गूगल यांच्यातलं, युद्ध अँड्रॉईडच्या लाँचिंगनंतर किती भीषण झालं होतं, याचे तपशील अनेक साईट्सच्या मुख्य बातमीचा विषय झाल्या आहेत. स्टीवने आपल्या चरित्रकाराला म्हणजेच वॉल्टर आयझॅकसन यांना दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं, की “मी गूगलच्या अँड्राईडला उध्वस्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, कारण ते एक चोरीचं प्रॉडक्ट आहे. त्यामुळे एक चोरीचं प्रॉडक्ट नष्ट करण्यासाठी मी अणुयुद्धही लढण्यासाठी तयार आहे.” आयझॅकसन यांनी आपल्या पुस्तकात पुढे स्टीवने असंही सांगितल्याचा दावा केलाय की, “माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी गूगलविरूद्ध लढा देणार आहे. गूगलची ही चूक दुरूस्त करण्यासाठी मी अॅपलच्या बँक खात्यात असलेल्या सर्व म्हणजे सर्व 40 अब्ज डॉलर्स खर्च करण्यासाठी तयार आहे.” (चाळीस अब्ज डॉलर्स म्हणजे रूपयांच्या भाषेत गुणिले पन्नास करा…) स्टीव जॉब्जच्या मते गूगलची अँड्राईड आणि iOS मध्ये खूप साम्य आहे. खरं तर अँड्राईड हा एक मोठा बौद्धिक दरोडा आहे. अॅपलने स्टीव जॉब्ज जिवंत असतानाच अनेक मोबाईल कंपन्या ज्यामध्ये गूगलची अँड्राईडही ऑपरेटिंग सिस्टीम वापरलेली आहे, त्यांना न्यायालयात खेचलं होतं.

खरं तर गूगलने अँड्राईड लाँच करण्यापूर्वी अॅपल आणि गूगल यांच्यातले संबंध तसे खूप सलोख्याचे होते. अँडार्ईड बाजारपेठेत येण्यापूर्वी गूगलचे सर्च आणि मॅप्स हे अॅप्लिकेशन आयफोनमध्ये हमखास असायचे. तेव्हा गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आता चेअरमन असलेले एरिक श्मीट अॅपलच्या संचालक मंडळावर होते. पण नोव्हेंबर 2007 मध्ये गूगलने अँड्राईड बाजारपेठेत लाँच केलं, आणि या दोन कंपन्यामध्ये असलेल्या मधुर संबंधात मिठाचा खडा पडला. त्याच्या तब्बल दहा महिने आधी लोकांनी रांगा लावून पहिला आयफोन खरेदी केला होता. पण गूगलची स्वतःची मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टीम लाँच झाल्यानंतर अॅपलने तातडीने आय स्टोअरमधून गूगलची अॅप्लिकेशन कमी करायला सुरूवात केली. त्याचा परिणाम अॅपलच्या व्यवसायावरही झाला. गूगलचं अँड्राईड प्रचंड वेगाने लोकप्रिय झालं, जगभरात गूगलच्या ऑपरेटिंग सिस्टीमचा मार्केट शेअर हा 48 टक्क्यांपर्यंत वाढला तर अॅपलचा 19 टक्क्यांपर्यंत घसरला. सर्वात आधी गूगलची अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टीम मोटारोलाने वापरली असली तरी धडाकेबाज मार्केटिंग करून वेगवेगळी प्रॉडक्ट मार्केटमध्ये उतरणाऱ्या सॅमसंगला अॅपलने न्यायालयात खेचलं, त्यामुळे सॅमसंगच्या उत्पादनांच्या अनेक देशांमधल्या विक्रीवर निर्बंध आले. मधल्या काळात सॅमसंगनेही अॅपलवर अनेक खटले दाखल केलेत. आता स्टीव जॉब्जच्या चरित्राच्या प्रकाशनानंतर कायदेशीर लढाईमध्ये काही फरक पडणार नसला तरी कोर्टाबाहेरच्या म्हणजे मार्केटिंग फ्रंटवर अनेक घडामोडी होतील.

हा झाला, स्टीव जॉब्जच्या अॅपलच्या कामगिरीचा, त्याच्या पेटंट आणि स्वामित्व हक्कासाठी झगडण्याच्या प्रवृत्तीचा भाग. स्टे हंग्री, स्टे फूलिश हा त्याचा संदेशच होता, जगभरातल्या त्याच्या चाहत्यांना.. पण स्टीव जॉब्जच्या पुस्तकात याशिवायही अजून बरंच काही असेल… म्हणजे तो आपल्या खऱ्या वडिलांनाही कसा भेटला होता.. किंवा त्याची आणि न्यूज कॉर्पोरेशनचे प्रमुख मीडिया मुगल रूपर्ट मरडॉक यांची भेट… किंवा मायक्रोसॉफ्टचा सर्वेसर्वा बिल गेट्स विषयी त्याचं मत असा बराच मसाला “iSteve: the Book of Jobs” मध्ये असावा, अश्या शक्यतेच्या बातम्यांनी अनेक साईट्सची भरपूर स्पेस व्यापून टाकलीय. तसंच अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पहिल्या टर्मतील कार्यपद्धतीमुळे ते फक्त एका टर्मपुरतेच या पदावर राहतील, आणि 2012 च्या निवडणुकीत त्यांची फेरनिवड होणार नाही, हे स्टीव जॉब्जचं भाकित, यावरही अनेक मोठ्या मोठ्या चर्चा आतापासूनच रंगल्या आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे जगातील सर्वात सत्ताधीशाला स्टीव जॉब्जने हा सल्ला खुल्या पत्राने किंवा कुठल्याही जाहीर सभेत दिला नव्हता तर प्रत्यक्ष भेटीत दिल्याचं वॉल्टर यांच्या हवाल्याने सांगितलं जातंय.

याच पुस्तकात आपल्याला जॉब्जची शिक्षणविषयक मतेही पाहायला मिळतील, असंही अनेक ठिकाणी लीक झाल्याचं सांगितलं जातंय. स्टीव जॉब्जची शिक्षण पद्धतीविषयीची मते खूप टोकाची होती. कारण तो स्वतः एक कॉलेज ड्रॉप आऊट होता. जोपर्यंत शिक्षकांच्या संघटना मोडीत निघत नाहीत, तोपर्यंत शिक्षणाच्या क्षेत्रात सुधारणा होणं अशक्य असल्याचं त्याचं मत होतं. शिक्षक संघटनांनी अमेरिकी शिक्षण पद्धतीची मुस्कटदाबी केल्याचा त्याचा आरोप होता.

आपल्याकडेही फार वेगळं चित्र नाहीय, फक्त हे सांगायला आपल्याकडे स्टीव जॉब्ज नाही, एवढंच… मग ते देशाचे प्रमुख म्हणून पंतप्रधानांची टर्म असो की शिक्षण पद्धतीला राजकारणी आणि त्यांच्या संस्थाचालकांनी तसंच त्यांच्याच संस्थामधून शिकून पुढे शिक्षक झालेले आणि त्यांच्या संघटना बांधलेले असोत की अजून कुणी…

(हा लेख स्टीव जॉब्जच्या चरित्राचं प्रकाशन होण्यापूर्वीच लिहिलेला आहे…)

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: