अण्णा हजारे यांनी आज पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमधून आपली भूमिका स्पष्ट केलीय. आज त्यांनी ब्लॉगमधून राजकीय कट कारस्थान्यांबाबतीतली भूमिका स्पष्ट केलीय. आपल्या आंदोलनाबाबत राजकीय क्षेत्रामध्ये उलट सुलट चर्चा नेहमीच होत असतात, मी त्याकडे विशेष लक्ष देत नाही, असं सांगूनच अण्णांनी आपल्या ब्लॉगची सुरूवात केलीय.
स्टार माझा मध्ये प्रकाशित
काल राजधानी दिल्लीसह देशभरातल्या सर्व प्रमुख प्रसारमाध्यमांमध्ये अण्णांचाच विषय चर्चेला होता. अण्णांनी सध्या राळेगणमध्ये प्रकृती स्वास्थ्यासाठी मौन धारण केलं असलं तरी कालही त्यांनी एक ब्लॉग लिहून आपली काश्मीरविषयीची भूमिका स्पष्ट केली होती. खरं तर मौन व्रताला सुरूवात करण्यापूर्वीच अण्णांनी आपली काश्मीरविषयक भूमिका राळेगणमध्ये जमलेल्या पत्रकारांजवळ स्पष्ट केली होती. तेव्हाही त्याला देशभर प्रसिद्धी मिळाली होती. तरीही त्यांनी ब्लॉग लिहून अतिशय नेमकेपणाने आपली भूमिका स्पष्ट केली.
काल म्हणजे मंगळवारीच अण्णांचे टीममधील अतिशय महत्वाचे सहकारी अरविंद केजरीवाल यांच्यावर चप्पलफेक करण्यात आली. लखनौमध्ये एका माजी काँग्रेस कार्यकर्त्याने केलेल्या या प्रकाराबद्धल अण्णांनी तातडीने निवेदन जारी करून हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचं सांगितलं. देशहितासाठी आपण आणि आपले सहकारी बंदुकीच्या गोळ्या झेलण्यासाठीही तयार आहोत, चप्पल हल्ल्यांसारख्या भ्याड प्रकाराने आपण विचलीत होणार नसल्याचं निवेदन त्यांनी जारी केलं.
मंगळवार हा पूर्ण दिवस अण्णांचाच होता. ते जरी राळेगणमध्ये मौन व्रती असले तरी राजधानीत त्यांच्या मौनाशिवाय त्यांचे ब्लॉग आणि त्यांचे सहकारी आणि गावकरी यांचीच चर्चा होती. काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांना भेटण्यासाठी गेलेल्या राळेगण सिद्धीच्या सरपंचांना भेट नाकारण्यात आली. काँग्रेसने नंतर काहीतरी गफलत झाल्याचं निवेदन जारी केलं, पण राहुलची भेट काही झालीच नाही. यामुळे प्रचंड अपमानीत झाल्याची भावना राळेगणचे सरपंच जयसिंग मापारी यांनी व्यक्त केली. ते आल्या पावली परत फिरले. काँग्रेस खासदार थॉमस यांनी माफी मागितली आणि मिसकम्युनिकेशन झाल्याचं मान्य केलं तरी राहुल गांधींच्या भेटीबाबत ते काहीच बोलले नाहीत. किंवा राहुल गांधी यांनीही काही स्टेटमेंट दिलं नाही.
त्यानंतर सायंकाळी टीम अण्णांमधून त्यांचे दोन सहकारी राजेंद्र सिंह आणि राजगोपाल यांनी फारकत घेतली. दोघेही टीम अण्णांच्या कोअर गटाचे सदस्य होते. त्यांनी उर्वरित टीमचा कारभार पारदर्शी नसल्याचा आरोप केलाय. अण्णांचं तर मौन असल्यामुळे ते काहीच बोलले नाहीत, की त्यांनी या प्रकारावर निवेदन जारी केलेलं नाही. त्यानंतर सायंकाळी अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला झाला.
सर्वोच्च न्यायालयानेही अण्णांच्या ट्रस्टच्या हिशेबात काहीतरी अनियमितता असल्याचा आरोप करणारी याचिका दाखल करून घेतली. खरं तर महाराष्ट्राला हा प्रकार नवा नाही. सुरेश जैन जिकडे संधी मिळेल, तिथे यासंबंधी बोलत असतात. न्यायमूर्ती पीबी सावंत आयोगाने अण्णांना क्लीनचीट देऊनही त्यांच्याबद्धलचे आरोप थांबलेले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने आता फक्त याचिका दाखल करून घेतलीय, त्यावर सुनावणी करायची की नाही, यावर यथावकाश निर्णय होईल. हा भाग वेगळा, तरीही अण्णांनी अजून कसलंही निवेदन केलेलं नाही.
या पार्श्वभूमीवर आज जारी करण्यात आलेल्या अण्णांच्या ब्लॉगमधून कार्यकर्त्यांना अपमान पचवण्याचं आवाहन अण्णांनी केलंय. अण्णा सांगतात, “अपमान पचवण्याची शक्ती असल्याशिवाय कार्यकर्त्याला समाज आणि देशासाठी भरीव कार्य करता येत नाही हा इतिहास आहे. कारण ज्या झाडांना फळे लागतात त्याच झाडांना लोक दगड मारत असतात. ज्या झाडांना फळेच नाही अशा झाडाला दगड मारायचा प्रश्नच येत नाही.”
“अपमान पचवण्याची शक्ती असल्याशिवाय कार्यकर्त्याला समाज आणि देशासाठी भरीव कार्य करता येत नाही हा इतिहास आहे. कारण ज्या झाडांना फळे लागतात त्याच झाडांना लोक दगड मारत असतात. ज्या झाडांना फळेच नाही अशा झाडाला दगड मारायचा प्रश्नच येत नाही.”
आता अरविंद केजरीवाल यांनी चप्पलफेकीमुळे झालेला अपमान पचवायचा की राहुल गांधींनी राळेगण सिद्धीच्या सरपंचाची भेट नाकारल्याने झालेला अपमान पचवायचा, हे त्या दोघांनीच ठरवावं… असंही अण्णांना सुचवायचं असेल, पण या ब्लॉगमध्ये राळेगणचे सरपंच तसंच आपले सहकारी अरविंद केजरीवाल यांपैकी कोणाचाही नामोल्लेख त्यांनी केलेला नाही. एवढंच नाही तर काल पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत टीमपासून फारकत घेणाऱ्या राजेद्रसिंह आणि राजगोपालन यांच्याविषयीही त्यांनी काही भाष्य केलेलं तसलं तरी…
“मी माझ्या मनाला साक्ष ठेवून वाटचाल करीत असतो, कोण काय म्हणतो इकडे पाहत नाही.”
हा आजच्या ब्लॉगमधील तपशील पाहिला की हे स्पष्टीकरण राजेन्द्र सिंह आणि राजगोपालन यांच्यासाठीच असावं असं वाटतं.
म्हणूनच…
“फक्त सत्याच्या मार्गाने चालत रहावं कारण सत्य हे नेहमी सत्य असते. सत्याला कोणी ही खोटे करू शकलेले नाही.
सत्याच्या मार्गावर अडचणी खुप येतात, त्रासही खूप होतो, मात्र सत्य कधी पराजित झालेलं नाही, हा इतिहास आहे.”
“फक्त सत्याच्या मार्गाने चालत रहावं कारण सत्य हे नेहमी सत्य असते. सत्याला कोणी ही खोटे करू शकलेले नाही.
सत्याच्या मार्गावर अडचणी खुप येतात, त्रासही खूप होतो, मात्र सत्य कधी पराजित झालेलं नाही, हा इतिहास आहे.”
असं अण्णांनी आपल्या ब्लॉगमधून स्पष्ट केलंय.
“मी गेले तीस वर्षे राजकीय हेवे-दाव्यांसंबंधी उलट-सुलट चर्चा ऐकतो आहे.
मात्र मनाला कधी थकवा आलेला नाही.” असंही अण्णांनी आपल्या ब्लॉगच्या शेवटी म्हटलंय. म्हणजे वेगवेगळ्या सहकाऱ्यांनी आपल्या सोबत येणं, किंवा साथ सोडून जाणं, जाताना वेगवेगळे आरोप करणं याची आपल्या सवयच असल्याचंही अण्णांनी स्पष्ट केलंय.