आपल्याकडे सोशल नेटवर्किंग हा परवलीचा शब्द झाला, तो ऑर्कूटपासून… एक जमाना होता ऑर्कूटचा. ऑर्कूटवरचे स्क्रॅप हा एकेकाळी आपल्या दररोजच्या जगण्याचा एक भाग होता, फार जुनी गोष्ट नाही ही, झाली असतील फार फार तर पाचेक वर्षे… पण झुकरबर्गच्या फेसबुकने गूगलच्या ऑर्कूटला ओव्हरटेक केलं. फेसबुकच्या वाढत्या प्रभावाला तोंड देण्यासाठी ऑर्कूटने अनेक बदल केले; पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
(कृषिवल, मंगळवार, दिनांक 18 ऑक्टोबर 2011)
ऑर्कूटची लोकप्रियता एकेकाळी एवढी अफाट होती, की त्याच्या व्यसनामुळे अनेक कॉलेजांमध्ये तसंच ऑफिसमध्ये ऑर्कूट ब्लॉक करण्यात आलं होतं, त्यामुळेही थोडासा ऑर्कूटच्या लोकप्रियतेवर परिणाम झाला असावा.
ऑर्कूट अनेक ऑफिसांत ब्लॉक करण्यात आलं तसंच फेसबुकच्या वाढत्या प्रसाराने फेसबुकवरही अनेक ठिकाणी हीच पाळी आलीय; पण त्याचा फारसा परिणाम झालेला नाहीय. कारण तोपर्यंत 3G चं युग अवतरलं आणि सर्वांच्या हातात असलेल्या स्मार्टफोनमुळे फेसबुक ऑफिसात बंद झालं तरी त्याचा फारसा परिणाम झाला नाही, म्हणजे जरा लवकर लॉंच होण्यामुळे ऑर्कूटचा तोटाच झाला…
फेसबुकच्या पावलावर पाऊल टाकत आणि फेसबुक-ट्विटरचा एकत्रित परिणाम साधणारं नवं सोशल नेटवर्किंग गूगलने लॉंच केलं, गूगल बझ या नावाने. गूगल बझ कधी आलं आणि कधी अडगळीला गेलं, ते लवकर समजलंही नाही. कारण फेसबुक तोपर्यंत आपल्या जगण्याचा एक भाग झालं होतं.
तसं पाहिलं तर सोशल नेटवर्किंगची सुरूवात खूप जुनी आहे. आपल्याकडे त्याचा प्रसार खूपच उशिरा झाला असली तरी… मायस्पेस तसं आपल्याकडे फार रूळलंच नाही. त्यामुळेच आपल्याकडे सोशल नेटवर्किंगची सुरूवात ही तशी ऑर्कूट फेसबुकपासूनच होते. आता हे सर्व सांगायचं कारण गूगलने गूगल बझ बंद करण्याची घोषणा केलीय. गूगल बझ आपल्याकडेच काय जगातही कुठे फारसं रूळलं नाही. कारण काय ते माहिती नाही. कदाचित, त्यामध्ये आजच्या तरुणांना आकर्षित करण्यासारखं काही नसावं बहुतेक. पण आता हा सर्व इतिहास झालाय. कारण गूगल बझच्या शेवटाची घोषणा झालीय. तसं त्याचा पूर्णपणे अंत होण्यासाठी अजून थोडा अवधी आहे. गूगलच्या अधिकृत ब्लॉगनुसार, १५ जानेवारी २०१२ हा गूगल बझचा शेवटचा दिवस असेल.
गूगलने बझ बंद करण्याचा निर्णय जाहीर करताना म्हटलंय, नेहमीच लोकोपयोगी प्रॉडक्ट लॉंच करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. या प्रॉडक्टमुळे लोकांच्या जगण्यात, जीवन पद्धतीत बदल व्हावा, त्यामध्ये सुधारणा व्हावी, असाही त्यांचा प्रयत्न असतो, मात्र अनेकदा तसं होत नाही. आपण लॉंच केलेली प्रॉडक्ट लोकांनी किमान दोन-तीनदा तरी वापरावीत, असा त्यामागचा उद्देश असतो. तरचं ते यशस्वी झालं, असं मानलं जातं. पण प्रत्येकवेळीच असं यश मिळतंच असं नाही. कोणतंही प्रॉडक्ट यशस्वी होण्यासाठी त्यामागे एक दणकट विचार त्याला साजेसा दृष्टीकोन आवश्यक असतो. प्रत्येक प्रॉडक्ट याच निकषावर खरं उतरावं यासाठी प्रयत्न केले जातात; पण कुठेतरी काहीतरी कमी पडतं. यामुळेच काही प्रॉडक्ट बंद करावी लागतात. तरीही त्यातल्या काही चांगल्या बाबी इतर नव्या प्रॉडक्टमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न असतोच, असं स्पष्टीकरण देत गूगलने बझच्या शेवटाची घोषणा केलीय. त्यासाठीची तारीखही नक्की केलीय. तोपर्यंत म्हणजे, १५ जानेवारी २०१२ पर्यंत कुणालाही गूगल बझवर नवीन अकांऊट उघडता येणार नाही. शिवाय आधी ज्यांनी गूगल बझवर कॉन्टेन्ट अपलोड केला असेल त्यांना आपल्या गूगल अकाऊंटमधून तो डाऊनलोड करून संग्रही ठेवता येईल. गूगल अकाऊंटमध्ये असलेला हा कॉन्टेन्ट गूगल टेकआऊटच्या माध्यमातूनही डाऊनलोड करता येईल.
गूगल भविष्यात सोशल नेटवर्किंगपुरताच विचार करायचा झाला तर गूगल+वरच लक्ष केंद्रित करणार आहे. फक्त गूगल बझच नाही तर गूगल कोड सर्च, आय गूगल सोशल फीचर्स आणि जैकू या गूगल प्रॉडक्टचा अंत १५ जानेवारी २०१२ रोजी होणार आहे.
कोणत्याही सोशल नेटवर्किंगचा शेवट हा तसा क्लेशदायकच… म्हणजे कुणालाही आणि कसलाही शेवट हा त्रास देणारा आणि रूखरूख जावणारा असतोच की… अनेकांनी अनेक गोष्टी त्यामध्ये शेअर केलेल्या असतात. त्याचाही त्याबरोबरच शेवट होतो; पण पुन्हा आपल्याला नवं काहीतरी मिळतं. नव्याच्या उदयात आपण जुन्याचं दुःख विसरतो, असं म्हणतात. म्हणूनच आपल्याकडे पूर्वजांची नावे आपल्या पोरांबाळांना किंवा वंशजांना ठेवण्याची परंपरा रूढ असावी. त्यामुळेच ऑर्कूट सध्या फारसं वापरात नसलं तरी किंवा गूगल बझ बंद होणार असलं तरी त्याची फारशी चर्चा आपल्याकडे होणार नाही. कारण आपल्याकडेही गूगल बझला तसा प्रतिसादच मिळाला नव्हता.
संदेशाचं दळणवळण किंवा संदेशवहन तसं आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. त्यामधून आजच्या प्रगत ऑनलाईन सोशल नेटवर्किंगचा जन्म झालाय. फार पूर्वी कधी तरी कबुतरांच्यामार्फत किंवा प्रत्यक्ष दूत पाठवून संदेश पोहोचवले जायचे. तेव्हा जगही आजच्या एवढं वेगवान नव्हतंच, त्यामुळे प्रत्यक्ष दूत पोहोचल्यावरच जेव्हा संदेश मिळायचा, तेव्हाच तो अंमलात यायचा. मधल्या काळात इंग्रजांनी तार आणि टपालसेवा सुरू केली, त्याचा आपल्याकडे चांगाल जम बसला. पोस्टमन हा आपल्या दररोजच्या जगण्याचा एक भाग झाला. त्यानंतर आलेल्या तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे हा पोस्टमन कधी सेल्समन झाला ते आपल्याला कळलंच नाही. सहज तुम्हीच आठवून पाहा की शेवटंच पत्र तुम्ही कधी लिहिलंय. आता पोस्ट कार्डाची किंमत किती हा एमपीएससी किंवा यूपीएससीच्या परीक्षेत विचाराला जावा, एवढा अवघड प्रश्न झालाय. कधी काळी पंधरा पैसे ही पोस्ट कार्डाची किंमत म्हणजे, पोस्टाच्या चिकट डिंकासारखी त्याला चिकटलेली होती. महागाई निर्देशांक कितीही वाढला तरी कित्येक वर्षे ही किंमत बदललेलीच नव्हती. पोस्ट कार्डाची किंमत पंधरा पैशांवरून पन्नास पैसे कधी झाली तेही आपल्यापैकी कित्येकांना माहितीच नसेल. इतक्या झपाट्याने त्याचा वापर कमी झालाय. कारण मधल्या तंत्रज्ञान आणि दळणवळण क्रांतीने घरोघरी फोन आला, त्यामुळे ख्याली खुशाली कळण्यासाठी पत्रावर अवलंबून राहण्याची वेळच गेली. शिवाय पुन्हा पत्र लिहिण्या-वाचण्यासाठी साक्षर असणं किंवा किमान अक्षर ओळख असणं ही एक अफाट पूर्वअट असायची. ज्यांना लिहिता-वाचता येत नाही, त्यांच्यासाठी पत्र वाचन म्हणजे वेदपठणाहून भयंकर… असं काहीतरी….
मधल्या काळात लँडलाईन फोन आणि आता मोबाईल फोन… जगण्याची सर्व परिमाणेच या शोधांनी आमुलाग्र बदलून टाकली. हे सर्व आपल्याकडे रूळत असतानाच कॉम्प्युटरमार्फत होणारं दळणवळण आपल्या परिचयाचं झालं. म्हणजे ईमेल वगैरे… मोबाईलमध्येच इंटरनेट आल्यापासून तर सर्व जगच आपल्या हातात आल्यासारखं झालं. मग कशाला पत्राची पेटी किंवा अजून काही…
ऑनलाईन सोशल नेटवर्किंग सेवेचा जन्म हा अशाच संवादाच्या गरजेतूनच झालाय. कारण जग आपल्या हातात असलं तरी संभाषण हवंच ना… मग ते कधी वाचिक तर कधी फक्त शाब्दिक.. हा प्रवाह चालतच राहणार आहे, सतत वाहता राहणारा आहे. कालच्या जगात वीटेएवढे भल्या मोठ्या आकाराचे फर्स्ट जनरेशन मोबाईल फोन असायचे. आता तसा मोबाईल चित्रात जरी बघायला मिळाला तरी तुम्हाला कसं पुरानकालीन काही तरी बघतो आहोत, असं वाटेल. कदाचित, फार जुना काही अगदी काही वर्षांपूर्वीचा काळा होता. हे मोबाईल फक्त एकाच रंगाचा स्क्रीन असलेले, फक्त बोलणं ऐकू येणारे किंवा समोरच्यापर्यंत आपला आवाज पोहोचवणारे होते. त्यातून एसएमएसही जायचे; पण फक्त सिंगल लाईन मेसेज… म्हणजे कॅरेक्टर लिमिट फक्त १४०. नंतर स्क्रीनचा रंग बदलत गेला. त्यामध्ये कॅमेरा आला. मग त्यात ऍनिमेटेड ग्राफिक्स आलं, आधी पॉलिट्यून आणि नंतर mp3 रिंगटोन आल्या… स्क्रीन मोठा झाला. इंटरनेट आला, 3G चा वेगवान इंटरनेटही आला, मग क्वेर्टी कीपॅड आला. कॅमेर्यांची क्षमता वाढत वाढत गेलीय, अजूनही त्याला कसलीच मर्यादा नाही. प्रत्येक लॉंच होणार्या नव्या मॉडेलमध्ये अद्ययावत कॅमेरा आणि त्याला साजेशे फीचर्स असतात.
आपल्याला आपला जुना झालेला मोबाईल, फार वेळ वापरू वाटत नाही. कारण त्याची एकतर गरज संपलेली असते किंवा आपल्या वाढलेल्या गरजांना आपल्याजवळ असलेला मोबाईल न्याय देऊ शकत नाही. किंवा आपल्या मित्रांकडे नवा आणि चांगल्या फीचर्सचा मोबाईल आलेला असतो, कारणं काहीही असू द्यात, आपण मोबाईल बदलतो. मोबाईलसोबत आपली जीवनशैलीही बदलते. मग पुन्हा आपण बदलतो. हे सगळं असं एकमेकात गुंतलेलं आहे, इंटरकनेक्टेड आहे, संपर्कातलं आहे. म्हणूनच सतत बदलतं आणि प्रवाही आहे,
एक गूगल बझ बंद झालं म्हणून काय फरक पडतो. काही आठवणी असतील, त्याही मागे पडली, त्यावर नव्या आठवणी जमा होतील. हळूहळू जुनं ते विस्मृतीत जाईल. पुन्हा एक नवा साज धारण करून आपल्या भेटीला येईल. हा प्रवाह चालतच राहणार आहे. म्हणूनच तो चिरकाल सजीव चिरंतन राहणार आहे…
गुगल प्लस पेक्षा बझ जास्त बरं वाटायचं.. पण आता प्लस सुरु करावे लागणार..