स्टीव्ह जॉब्स गेल्यानंतर…

स्टीव्ह जॉब्स बुधवारी गेला. आपल्याकडे बातमी समजली तेव्हा गुरुवार उजाडला होता. पेपरवाल्यांना त्याच्या निधनाची बातमी शुक्रवारच्या अंकात घ्यावी लागली. स्टीव्ह जॉब्स गेल्यापासून ते थेट आजपर्यंत आपापल्या मगदुराप्रमाणे त्याच्या क्षेत्रातल्या जाणकारांनी लिहिण्याचा प्रयत्न केलाय. जॉब्सच्या द्रष्टेपणाचं सगळ्याच लहानथोरांना कौतुक… सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं कॉलेज ड्रॉपआऊट असूनही जगज्जेता असणं, जगभरातल्या लोकांना सर्वाधिक भावलं असावं.
(कृषिवल दिनांक 11 ऑक्टोबर 2011)

माझ्यासारख्या वेब आणि टीव्ही पत्रकाराला स्टीव्ह जॉब्समध्ये काय भावण्यासारखं, बातमी आली की प्रसारीत करायची. तो किती मोठा त्याचा अंदाज आलेलाच असतो. तशी त्याच्या ऍपल किंवा मॅकबुकविषयी माहिती असल्यामुळे किंवा आयपॉड, आयफोन किंवा आयपॅडचं जसं जगभरात स्वागत झालं, याच्याही बातम्या पाच-सहा वर्षांपासून कानांना सवयीच्या होत्या. एवढंच नाही तर त्याचं स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतलं भाषण यूट्यूब आणि फेसबुकमधून माझ्याहीपर्यंत पोहोचलेलंच होतं. त्यामुळे स्टीव्ह जॉब्स कोण हे नव्याने सांगावं लागण्याची आवश्यकता नव्हतीच. तरीही स्टीव्हचं जाणं चटका लावून जाणारं ठरलं. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तो गेल्यानंतर जगभरातले नेटीझन्स किंवा लाखो-करोडो वेबसाईट्स, त्यांचे प्रेक्षक वाचक, स्टीव्हचे चाहते, वेगवेगळी वृत्तपत्रे, त्यांचे अग्रलेख, विशेष संपादकीय, खास बातम्या, आपल्याकडच्या उद्योगपती आणि सीईओंच्या सद्भावना, त्याचे आयटीच्या क्षेत्रातले प्रतिस्पर्धी या सर्वांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि त्याची मांडणी, गुगलने आपल्या दोन प्रॉडक्टचं लॉंचिंग पुढे ढकलणं… स्टीव्हचं वेगळेपण ठसवून सांगणारे भलेमोठे म्हणा किंवा ग्राफिकल मांडणी केलेले छोटे वृत्तांत, टीव्हीवाल्यांच्या स्पेशल स्टोरीज, अर्काईव्ह फुटेज, काही महत्त्वाचे साऊंडबाईट, त्याचे खास म्हणून गणले गेलेले कोट्स, त्याचं ग्राफिक्स, किंवा आयपॉड, आयट्यून, आयफोन, आयपॅड असं सर्वकाही ‘आय’च्या बाराखडीतल्या शब्दांची मांडणी यामुळे स्टीव्हच्या जाण्याचा एक दणकट असा ईव्हेंट झाला.

मला सर्वाधिक भावलं ते अशा एखाद्याचं जाण्याचं एव्हेंट होणं… फार कमी जणांच्या बाबतीत अशी वेळ येते. तसं आपल्याकडे कुणी गेल्यानंतर अगदी थेट शब्दात म्हणजे मेल्यानंतर (माणूस मेल्यानंतर तो मेला असं का म्हणू नये… मला खरंच माहिती नाही, तर तो गेला असं म्हणतात म्हणे, का असं विचाराल तर तेही खरं खरं ठाऊक नाही, असतील काही तरी कारणं… किंवा जाताना म्हणजे घरातून बाहेर पडताना येतो असं म्हणावं, म्हणतात, म्हणजे सरळं आणि खरं कधी बोलायचंच नसतं की काय…) कित्येक दिवस शोक पाळण्याची परंपरा आहे. वेगवेगळ्या जातीधर्माप्रमाणे कुणाच्यात तीन दिवस तर कुणाच्यात दहा अकरा बारा पंधरा दिवस सूतकाचे असतात. राजशिष्टाचार किंवा राजसन्मान म्हणून सरकार जाणार्यांच्या किंवा मरणार्यांच्या औकातीप्रमाणे एक ते आठ दिवसांपर्यंतचा दुखवटा जाहीर करतं. दुखवटा पाळणं तसं आपल्याला नवीन नाही. आपल्या भारतीय स्वभाव वैशिष्ट्याचा तो एक अविभाज्य भाग आहे. पण, कोणत्याही देशाने स्टीव्हच्या जाण्याबद्दल असा दुखवटा जाहीर केला नाही. प्रसारमाध्यमांना कुणाही सरकारने किंवा त्यांच्या मालकाने किंवा प्रेक्षकांनीही दुखवटा पाळण्याची सूचना केली नव्हती. तरीही चॅनेलवाल्यांना कितीतरी वेळ म्हणजे स्टीव्ह गेल्यानंतरचा, पेपरवाल्यांना कितीतरी रकाने, वेबसाईट्ना कितीतरी बाईट्स तपशील स्टीव्हसाठी द्यावा वाटला, हे आपणहून काहीतरी द्यावं वाटणं, मला एखाद्या उत्सवासारखं, थोडं विदेशी भाषेत म्हणाल तर ईव्हेंट वाटतं. ऍपलची स्थापना करण्यापूर्वी स्टीव्ह जॉब्स भारतात येऊन गेलेला, तेव्हा त्याचं वय असावं विशीच्या आसपास… आपल्याकडे नुकतीच ओठांवर मिसरूड फुटू लागण्याचं वय, तेव्हा तो आत्मज्ञानाच्या म्हणा किंवा आत्मिक शांततेच्या शोधात भारतात येऊन गेलेला. आता आमच्यापैकी अनेकजण म्हणायला मोकळे होतील की, तो भारतात येऊन गेला म्हणूनच त्याला ऍपलच्या स्थापनेची प्रेरणा मिळाली. खरंच अशा बातम्या आल्या किंवा कुणा महाभागाला वाटलं तर आपल्यासारखे करंटे आपणच असू… कारण अजूनही आपल्याला खुमखुमी उठतच असते की, विमानाचा शोध जरी राईट बंधूंनी लावला असला, तरी आपल्या वेदांमध्ये विमान बनवण्याचा सगळा तपशील आधीपासूनच होता. कधी कधी वाटतं की, पाश्चिमात्य देशात एखादा मोठा शोध लागल्यानंतरच आपल्याला त्याविषयीचं दिव्यज्ञान प्राप्त होत असावं की अरे हे तर आपल्याकडे आधीपासूनच आहे किंवा होतं….

ऍपलचा संस्थापक आणि जगज्जेता असलेल्या स्टीव्ह जॉब्सचं महानपण किंवा त्याचं द्रष्टेपण तर निर्विवादच आहे. त्याविषयी लिहिणं हा माझा अधिकारच नाही. तर फक्त त्याच्या मरणाचा संबंध जगभराने, म्हणजे त्यातल्या प्रसारमाध्यमांनी, लक्षावधी वेबसाईट्सनी किंवा पेपर आणि प्रिंटवाल्यांनी कसलाही मार्केट फोर्स नसतानाही कसा ईव्हेंट केला… याचंच मला सर्वात जास्त अप्रूप आहे. जगभरातल्या एकाही पेपरवाल्याला किंवा वेबसाईट्ला ऍपल कंपनीने स्टीव्हच्या मरणाचा ईव्हेंट करण्याची सूचना केलेली नव्हती किंवा आपल्याकडे एखादा बडा उद्योगपती मेला किंवा गेला तर दुसर्या-तिसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये पूर्ण पानभर जाहिरात असते, नैनं छिदंती शस्त्रांनी… पुढं बरंच काही… संस्कृतमध्ये असतं… मी ते सर्व कधीच वाचत नाही आणि खाली सर्व शोकाकूल कामगार, आणि कुटुंबीय आणि मित्रमंडळी वगैरे… स्टीव्हच्याबाबतीत ऍपलने असं काहीच केलेलं नसलं तरीही सर्वांना मिळून या जगज्जेत्याचा मृत्यू हा शोकमग्न म्हणून नाही तर या युगांचा शेवट म्हणून सेलिब्रेट करावासा वाटला. यातच आपलं सर्वांचं मोठेपण आहे… कारण आपण म्हणजे सर्वसामान्य तरुण, किंवा अखिल मानव जात… तसं सर्वाचं मोठेपण किंवा द्रष्टेपण स्वतःहून सहजपणे मान्य तर करतच नाहीत ना…

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: