इंटरनेट: विकासाची मूलभूत गरज

If you are willing to sacrifice economic modernity and growth, then turn off the Internet, But if you want to be part of a vibrant, global marketplace and build a knowledge-based economy, you have to have an open Internet. … -Alec Ross, senior adviser for innovation to U.S. Secretary of State Hillary Clinton

‘इंटरनेट’ म्हणजे समृद्धी हे आता सगळ्यांनाच पटायला लागलंय. अलेक रॉस हे आता अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयात काम करतात. त्यांची अमेरिकी प्रशासनासोबत काम करण्याची सुरुवात मात्र त्याही अगोदर म्हणजे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रचार मोहिमेच्या काळात झालीय. बराक ओबामा यांनी ज्या पद्धतीने सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून प्रचार मोहिमेत आघाडी घेतली… हा आता सर्वांच्या अभ्यासाचा विषय आहे. त्या प्रचार मोहिमेत सोशल नेटवर्किंगचा वापर कसा कसा करायचा, त्यामागचं डोकं हे या अलेक रॉस यांचं होतं. म्हणूनच आता जेव्हा ते इंटरनेट हे फक्त माहितीचं नाही तर समृद्धीचंही वाहक आहे, असं जेव्हा सांगतात, तेव्हा आपल्याला त्यांचं बोलणं काळजीपूर्वक ऐकावं लागतं.
(कृषिवल, दि. 4 ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेला लेख)

भारत असो की नैरोबी… भारत त्यातल्या त्यात तसा श्रीमंत… पण, विकसनशील देश हा आपल्या देशावर बसलेला ठप्पा आपण शाळेत जातोय, तेव्हापासून शिकावा लागलेला. किंबहुना आपले वडीलही शाळेत असतील तेव्हाही, त्यांनाही भारत विकसनशील असल्याचंच शिकवलं गेलं असेल. आपलं हे स्टेट्स काही केल्या विकसित होत नाही. आपली अर्थव्यवस्था कितीही सुधारली तरी… जाऊ द्या हा वेगळा विषय आहे…

परवा, नैरोबीमध्ये एक इंटरनेटविषयक कॉन्फरन्स झाली. त्यामध्ये प्रामुख्याने ऑनलाईनमुळे निर्माण झालेल्या आणि होत असलेल्या व्यवसाय संधींवर चर्चा झाली.

माहिती तंत्रज्ञानामुळे दृष्टीक्षेपात आलेले हे उद्योग आर्थिक विकासाला मोठी चालना देतात, यावर परिषदेत सहभागी झालेल्या सर्वच देशांच्या प्रतिनिधीचं एकमत झालं. म्हणून त्यांनी असा ठराव पास केला की, सर्व गरीब देशांनी आपापल्या देशात इंटरनेटसाठी व्यापक पायाभूत सुविधा उभारल्या पाहिजेत. तरच सगळ्यांचं जीवनमान सुधारेल, असंही मत या परिषदेत व्यक्त झालं. विकसित देशामध्ये इंटरनेट वापरणार्या लोकसंख्येचं प्रमाण ६९ टक्के तर विकसनशील देशामध्ये हेच प्रमाण फक्त २१ टक्के आहे. म्हणजेच, या दोन्ही जगामध्ये असलेली दरी किती मोठी आहे, याचा अंदाज येईल. जगातली एक मोठी कन्सल्टन्सी फर्म असलेल्या मॅक्सन्सीने जारी केलेल्या अभ्यासानुसार विकसित देशामध्ये इंटरनेटवर आधारीत व्यवसायामुळे आर्थिक वृद्धीला तब्बल २१ टक्क्यांचा हातभार लागला. म्हणजेच विकसित देशांच्या आर्थिक विकासात इंटरनेटचा वाटा २१ टक्क्यांचा… आणि डॉलर्समध्ये हा व्यवसाय मोजायचा तर मॅक्सन्सीच्या अंदाजानुसार हा भरतो आठ ट्रिलियन डॉलर्सएवढा…

म्हणजेच जगाच्या आर्थिक वृद्धीचं इंजिनच सध्या इंटरनेटकडे आहे. इंटरनेटमुळे फक्त ऑनलाईन उद्योगांचं नाही तर ऑफलाईन उद्योगांनाही चालना मिळते, म्हणून विकसनशील देशांना आता आपल्याकडे साधनसुविधा नाहीत, असं म्हणून मागं बसता येणार नाही, असंही मत या परिषदेत व्यक्त करण्यात आलं.

याच परिषदेतून एक सर्वात महत्त्वाची मागणी पुढे आली ती म्हणजे इंटरनेटचा मानवाधिकाराचा किंवा मूलभूत मानवी गरजेचा दर्जा देण्याची. आपल्याकडे अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत मानवी गरजा मानल्या गेल्या आहेत. त्यामध्ये सुधारणा होऊन नंतर शिक्षण आणि आरोग्य यांचा समावेश झाला. आता ही यादी आणखी विस्तारण्याची गरज आहे. म्हणजेच या यादीमध्ये इंटरनेटचा लवकरच समावेश करावा लागणार आहे.

आफ्रिकेतल्या देशांना याची गरज पटायला लागलीय. कारण त्यामध्ये बहुतांश देश हे गरीब आणि विकसनशील दर्जाचे आहेत. इंटरनेट हा विकासाचा महामार्ग असल्याचं त्यांना पटायला लागलंय. आपल्याकडे सोशल नेटवर्किंग काय किंवा एकूणच इंटरनेट काय, अजून फॅड या स्वरूपात आहे. त्यातली मूलभूतता खूप कमी जणांना ओळखता आलीय. इन्फोसिसच्या नारायणमूर्तीसारखे मोजके अपवाद आपल्याकडेही आहेत. येणार्या काळात त्यांची संख्या आणखी वाढेल. वाढायला हवी.

इंटरनेटमुळे येणारी समृद्धी आपल्याकडेही दृष्टिक्षेपात आलीय. नाही असं नाही. त्यामुळेच तर ३ जी या लिलावांना थक्क करून सोडणारा प्रतिसाद आपल्याकडे मिळाला. तसंच २ जीचे लिलाव न केल्यामुळे देशाचं जे काही आर्थिक नुकसान झालं, त्यासंदर्भातला घोटाळा हाही अलिकडच्या काळातला सर्वात मोठा घोटाळा म्हणून ओळखला जाण्याची शक्यता आहे. टू जी काय किंवा थ्री जी काय किंवा एकूणच मोबाईल इंडस्ट्री ही सर्व कम्युनिकेशन या एकाच मानवी गरजेभोवतीच उभा राहिलेली आहे. एकवेळ आपण इंटरनेट नाही तरी कम्युनिकेशनला तर नक्कीच मूलभूत मानवी गरज स्वीकारायला हवं.

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: