या आठवड्यात बार्शीतला मुक्काम एक दिवसाने वाढला. सोमवारी रात्रीच निघायच्या ऐवजी मंगळवारी निघालो. अमावस्या होती. दुसऱ्या दिवशी घटस्थापना. आश्विन शुद्ध प्रतिपदा. माझी नेहमीची ट्रॅवल्स बस पकडण्यासाठी बार्शीमध्ये पोस्टाजवळच्या चौकात थांबलो. रिक्षावाल्याने मला त्या ठिकाणी सोडलं तरी मला रस्ता ओलांडून पलिकडच्या बाजूला पोहोचता येईना. कारण काय तर प्रचंड ट्रॅफिक. वेळ रात्री साडे अकरा-बारा वाजताची. यावेळीही बार्शीत ट्रॅफिक जाम असतं. हा एक नवा धडा मिळाला.
तसा हा रस्ता म्हणजे कुर्डूवाडी-बार्शी-लातूर रस्ता कायमच रहदारीचा असतो. बार्शीमधून जाणारा हाच एक प्रमुख रस्ता. याच चौकातून एक रस्ता सोलापूरच्या दिशेनं जात असल्यामुळे रहदारी पुन्हा वाढते.
नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातल्या कसल्यातरी वादामुळे या रस्त्याची वाताहत झालीय, पण रहदारी काही काही कमी व्हायचं नाव घेत नाही. कारण सध्यातरी दुसरा पर्याय नाही. लातूरकडे जाण्यासाठी बायपास असला तरी त्याचा तितकासा वापर होत नाही. शिवाय, सोलापूर, तुळजापूरकडे जायचं तर बायपासचा उपयोग नाही.
घटस्थापनेच्या आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारच्या रात्री रस्ता जाम होईपर्यंत ट्रॅफिक असण्याचं महत्वाचं कारण तुळजापूर येथून येणाऱ्या आणि तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या गाड्या. गाडीला गाडी चिटकून असावी, एवढी प्रचंड वाहतूक. शिवाय टू व्हीलर्स, कार, जीप प्रकारातल्या वढापच्या गाड्या म्हणजे सुमो, ट्रॅक्स, बोलेरो, स्कॉर्पिओ, इनोव्हा यांची गणतीच नाही. उलट दिशेनेनही अशीच गाड्याची वाहतूक.
तुळजापूरहून ज्योत घेऊन येण्याची प्रथा नक्की कधी सुरू झालीय, काही माहिती नाही. या प्रथेबाबत लहानपणापासून काही ऐकल्याचं तर आठवत नाही. तुळजापूरच्या एवढं जवळ असूनही नाही. ज्योत घेऊन येणारा अनवाणी पायाने धावत असतो. बॅटन रिले स्पर्धेसारखा प्रकार. हा प्रकार तसा खूप लहाणपणी टीव्हीवर “मिले सूर मेरा तुम्हाला” लागायचं तेव्हा त्यामध्ये पाहिला होता. एकाने काही ठराविक अंतर धावत जायचं, पुढे थांबलेल्या जवळ मशाल द्यायची. असा तो प्रकार होता. त्यानंतर आता पहिल्यांदाच हा प्रकार पाहिला. ज्योत घेऊन जाणारा कुणीतरी एक किंवा त्यांची टीम… मात्र इथे तर गाड्यांचा ताफाच होता. एखाद्या गावात पंतप्रधानांचा दौरा अचानक जाहीर झाल्यावर जशा गाड्यांचा ताफा धुराळा उडवीत येतो, त्याचीच आठवण व्हावी.
बराच वेळाने म्हणजे रात्री साडेबारा पाऊणच्या सुमारास माझी नेहमीची मुंबईला जाणारी ट्रॅवल्स बस आली. त्या गाडीच्या ड्रायव्हरनेही आज गाडी चालवणं किती अवघड आहे, त्याची कल्पना दिली. मध्यरात्र असूनही वाहत्या असलेल्या रस्त्याबद्धल त्याला सांगायचं होतं. पुन्हा कुणाला ओव्हरटेक करायची सोय नाही. कारण हे देवाचं काम. त्याला ओलांडून कसं जाणार पुढे.
माझी बस येईपर्यंत किमान तीनेकशे तरी टूव्हीलर्स आणि इतर गाड्या तुळजापूरकडे रवाना झाल्या असतील. त्या प्रत्येकाला फक्त ज्योत घेऊन यायची होती. बाकीचे सर्व अनवाणी पायाने ज्योत घेऊन येणाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी. हा पाठिंबा पुन्हा कर्णकर्कश हॉर्न वाजवत आणि असह्य आरडाओरडा करतच असतो. त्यानेच काही अंतर मशाल घेऊन धावणाऱ्याला कसं काय प्रोत्साहन मिळतं कुणास ठाऊक.
मला सहजच अनेक प्रश्न पडले,
या सर्व गाड्यांना डिझेल-पेट्रोल लागत नसेल का? त्यासाठीचे पैसे कुणी ना कुणी देतच असणार, पेट्रोलपंप चालक काही देवीची ज्योत आणण्याचं काम म्हणून पेट्रोल फुकट नक्कीच देणार नाही.
हा सर्व गाड्यांचा ताफा कुढून येत होता, हे माहिती नव्हतं. काही गाड्यांवर बॅनर्स होते, त्यावर नावगावाचा पत्ता होता. म्हणजे अमुक तमुक नवरात्रौत्सव सोहळा… मुक्काम… प्रत्येकाकडे पुन्हा नवे टीशर्ट… ते शर्ट स्पॉन्सर करणाऱ्या नेत्याचं नाव आणि त्याचा फोटोही ठळक दिसेल असा. फक्त अंधारात त्याचा काही उपयोग नव्हता. म्हणजे पैसे कुणाकडून येतायत, कशासाठी येताहेत. याचं उत्तर तर मिळालं. पण फक्त काहीजणांच्या उत्साहासाठी देशाच्या संपत्तीची लूट का करायची, या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालंच नाही.
म्हणजे अधिक विस्ताराने मला पडलेला प्रश्न असा, या सर्व गाड्यांना इंधन लागतं, ते कर भरणाऱ्यांच्या खिशातून सरकारकडे जमा झालेल्या निधीतून सबसिडी घेऊनच मिळतं ना, मग जिथे दोन गाड्यांनी काम भागलं असतं तिथे पाच पन्नास गाड्यांचा ताफा कशासाठी.
आता यातून एक पळवाट अशी असेल की, तुम्हाला राजकीय नेत्यांच्या रॅली दिसत नाहीत का, देवाचच कसं दिसतं. तर राजकारणी नेते रॅली काढतात, त्यामध्ये असा वाहनांचा होणारा अनिर्बंध वापर चुकीचाच आहे, त्याचं कुणालाही समर्थन करता येणार नाही. करूच नये. कारण पेट्रोल डिझेल आपल्याला आयात करावं लागतं. आपण आज पैसे आहेत म्हणून करूही ते, पण त्याचाही साठा मर्यादितच आहे, कधी ना कधी तो संपेलच की… त्यावर सध्यातरी उत्तर नाही.
पुन्हा या सर्वांमध्ये श्रद्धा वगैरे, सामान्य माणसाचे भावडे प्रश्न नसतातच मुळी. तर फक्त आणि फक्त शक्तीप्रदर्शन… ते एकवेळ राजकारणाच्या आखाड्यात केलं तर माफ करता येईल, तिथे गरजच असते, शक्तीप्रदर्शनाची पण देवाच्या आखाड्यातही शक्तीप्रदर्शनाला काही पर्याय नाही का?
पाटील साहेब,
मूर्ख नि न लायक लोकांच्या हातात सत्ता दिल्यावर काय काय होते हे आपण फार पूर्वी पासूनच पाहतोय पण बिनडोक लोकांच्या हातात पैसा आल्यावर,दिल्यावर आपण अजून वेगळी, ती, काय अपेक्षा करायची ?त्यातून धर्म नि श्रद्धा ह्या अफू सारख्या आहेत.जितकी चढवाल तितकी चढतच जाणार.दहा दिवसाच्या उत्सवातल्या गणपतीला नंतर मांडी घालून रस्त्याच्या कडेलाच मंदीर रुपी पिंजऱ्यात जेव्हा कोंडले जाते तेव्हा काय किंवा शुक्रवारच्या नमाजा साठी जेव्हा भर वाहतुकीचे रस्ते बंद केले जातात तेव्हा काय,किंवा अगदी ६ डिसेंबरला चैत्य भूमीवर मेणबत्ती प्रज्वलित करतांना काय, इथून तेथून माणसं एकच, त्या मुळे मानसिकता एकच असते.त्या त्या ठिकाणी ती ती माणसे एकजुटीने असतात,आणि जेथे एकजूट तेथे प्रदर्शन हे आलेच त्या मुळे बिचाऱ्या जनतेची “मुकी x x x,हाक ना बोंब ” अशीच अवस्था नाही झाली तरच नवल. त्या मुळे “तुका म्हणे उगी राहावे जे जे होईल ते ते पाहत राहावे”.हेरम्बाने ह्या मानसिकतेवर पूर्वी http://www.harkatnay.com/2010/10/blog-post_21.html हे खूप छान पोस्ट टाकले होते.
शक्तीप्रदर्शनाची कोणतीच संधी ते सोडत नाहीत … ह्या आणि असल्याच तत्सम गोष्टींवर विनाकारण पैसा उधळण्यापेक्षा तोच डायरेक्ट जनतेच्या सेवेसाठी योग्य मार्गांनी वापरला तरी जनता त्यांच्या बाजूने उभी राहील हे समजत नाही का त्यांना …