‘फेसबुक’ ही तर संधी!

फेसबुक आता कात टाकतंय. गुगल प्लसच्या आगमनानंतर निर्माण होणार्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी फेसबुकने हे बदल सुरू केल्याची चर्चा इंटरनेट विश्वात आहे. गुगल प्लस फेसबुकच्या तुलनेत कुठेच नसलं तरी सर्च इंजिन म्हणून गुगलचं असलेलं स्थान फेसबुकला काळजी करायला लावणारं आहे. त्यामुळेच भविष्यातली स्पर्धा ओळखून फेसबुकने बदल सुरू केलेत. या बदलांनी आधीच्या फेसबुकला सरावलेले अनेक फेसबुकर बुचकाळ्यात पडलेत. त्यांना दररोज नवनवे बदल आपल्या प्रोफाईल पेजवर झालेले दिसतायत. काहीजण त्याची तुलना गुगल प्लसबरोबरही करत आहेत. काहींना या बदलाविषयी नाराजी आहे, तर काहींनी स्वागत केलंय. त्यामुळेच फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गने फेसबुकच्या फक्त आताच्या बाह्यांगावरून त्याला जज करू नका, असं आवाहन सर्व फेसबुकरांना केलंय. त्याच्यामते, आगामी काळात येऊ घातलेले बदल हे युजर फ्रेंडली आणि त्यांच्या अनेक गरजा ध्यानात ठेऊनच करण्यात येत आहेत.
(“कृषिवल”मध्ये मंगळवार {27/09/2011} प्रकाशित झालेला लेख)


तुम्ही गेल्या आठवड्यातली एक बातमी वाचलीच असेल. वॉल स्ट्रीट जर्नल हा रूपर्ट मरडॉक यांच्या साम्राज्यात अलीकडेच समाविष्ट झालेलं एक मोठा पेपर. या पेपरचा तिकडे मोठा दरारा आहे. त्यांनी अलीकडेच खास फेसबुक एडिशन सुरू केली. त्यांच्या तंत्रज्ञांनी फेसबुकच्या सहकार्याने एक खास ऍप्लिकेशन डेव्हलप केलंय. या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही फेसबुकच्या फॉर्मेटमध्येच वॉल स्ट्रीट जर्नल वाचू शकता. त्यातल्या बतम्यांवर कॉमेन्ट करू शकता. त्यातल्या बातम्या मित्रांबरोबर शेअर करू शकता. खरं तर आता फेसबुकवर एक मार्केट स्ट्रॅटेजी म्हणून आपलं फॅनपेज सुरू करणारी आपल्याकडची अनेक वृत्तपत्रे यापेक्षा वेगळं काही करत नाहीत. पण, वॉल स्ट्रीट जर्नलच्या फेसबुक एडिशनमध्ये एका सामान्य फेसबुकपेजमध्ये फरक एवढाच की, तुम्ही फेसबुक पेजवरून संबंधित चॅनेलच्या किंवा वृत्तपत्राच्या वेबसाईटवर रिडायरेक्ट होत नाही. म्हणजे तुम्ही फेसबुकवरच असता आणि संबंधित वृत्तपत्राच्या बातम्यांचा आनंद घेऊ शकता. यासाठीच रूपर्ट मरडॉक यांनी या प्रयोगाला वॉल स्ट्रीट जर्नलची खास फेसबुक एडिशन असं नाव दिलंय. याच मरडॉक महाशयांनी काही महिन्यांपूर्वी खास आयपॅडधारकांसाठी एक वृत्तपत्र सुरू केलं होतं. सुरुवातीपासूनच हे वृत्तपत्र विकत देण्याचं धाडसही त्यांनी केलं होतं. हा प्रयोग अजूनही सुरू आहे.

आपल्याकडेही वृत्तपत्रांच्या वेगवेगळ्या आवृत्त्या सुरू होतात; पण आपल्या आवृत्त्या वेगवेगळ्या गावांना किंवा शहरांना, जिल्ह्यांना टार्गेट करणार्या असतात. आपल्याकडे आताशा अनेक वृत्तपत्रांच्या वेबसाईटही नेटीझनच्या अंगवळणी पडल्यात. पण, त्याही जे काही पेपरमध्ये छापून आलंय, त्याचं सॉफ्ट वर्जन यापलीकडे या वेबसाईट्सचं स्वरूप नाही. म्हणजे नेटीझनच्या नवनवीन गरजा, त्याला त्याच्या पद्धतीने अभिव्यक्त होण्यासाठी त्यांचा स्वतःचा असा एक स्पेस, याची गरज आपल्या गावीही नसते. जे पेपरमध्ये सकाळी छापून आलंय, तेच पुन्हा वेबसाईटवर… आपला बचाव एवढाच की, ज्यांच्यापर्यंत पेपर पोहोचू शकत नाही, त्या देशविदेशातल्या लोकांपर्यंत-वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेबसाईट हा एक खटाटोप.

फेसबुकवर किंवा एकूणच सोशल नेटवर्किंगसाईट्सवर देशविदेशात वेगवेगळे प्रयोग होत आहेत. फेसबुक ही संधी मानून त्याचा आपापल्या परीने वापर करून घेण्याचे प्रयत्न तर लक्षावधी आहेत. त्यातला सर्वात ठळक म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचा. त्यांनी चार वर्षांपूर्वी त्यांच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात करताना जाहीरपणे संगितलं होतं की, बराक ओबामा कोण आहे, हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझ्या फेसबुक पेजवर जा… यापेक्षा सशक्त वापर कदाचितच कुठे कधी झाला असेल.

नाही म्हणायला, इंडिया अगेन्स्ट करप्शन या स्वयंसेवी संस्थेनं अण्णा हजारेंच्या आंदोलनाला तरुणांचा पाठिंबा मिळविण्यासाठी दोन्ही वेळा फेसबुकचा योग्य वापर करून घेतला. हे खरं तर आयएसीच्या व्यवस्थापकीय कौशल्याचा भाग म्हणायला हवं. पण, आपल्याकडे अशी उदाहरणं किती. अण्णांचं आंदोलन ही तशी एक मोठी प्रक्रिया होती. समाजातल्या वेगवेगळ्या थरापर्यंत भ्रष्टाचाराचे चटके बसलेले अनेक जण असल्याने मिळालेला पाठिंबा हा तसा उत्स्फूर्त असाच होता. त्यापेक्षाही अलीकडचं आणि विधायक तसंच पूर्णपणे व्यक्तिगत असं उदाहरण द्यायचं श्रद्धा शर्मा या देहराडूनच्या मुलीचं देता येईल.

श्रद्धा शर्मा ही तशी सामान्य मध्यमवर्गीय मुलगी. पण, आता भारतीय नेटीझन्समध्ये तिची एक जबरदस्त क्रेझ आहे. वय वर्षे फक्त पंधरा… तिने गायलेलं तिचं पहिलं गाण यूट्यूबवर अपलोड केलं, ३० एप्रिल २०११ ला. त्यानंतर तिने गायलेल्या आणखी सहा गाण्यांचे व्हिडीओही अपलोड करण्यात आलेत. तिच्या यूट्यूब चॅनेलचं नाव आहे, श्रद्धा रॉकईन. तिच्या व्हिडीओजना आतापर्यंत मिळालेले व्ह्यूज आहेत तब्बल वीस लाख… म्हणजे किमान वीस लाख वेळा तिचे व्हिडिओज पाहिले गेलेत. श्रद्धा शर्मा ही भारताची जस्टीन बेबर आहे का असा प्रश्न करणार्या चर्चा नेटीझन्समध्ये रंगत आहेत. श्रद्धा फेसबुकवरही आहे. तिच्या फॅनपेजवर तिला लाईक करणार्यांची संख्या आहे, पासष्ट हजार… ती ट्विटरवरही आहे, तिथे तिचे फॉलोअर्स आहेत तीनेक हजारांच्या जवळ. तिच्या श्रद्धारॉकइन या यूट्यूब चॅनेलचे सबस्क्राईबर्सही आहेत. भारतात सर्वाधिक म्हणजे अठरा हजार सहाशे…

श्रद्धा स्वतःविषयी सांगते, ती एक सामान्य मुलगी आहे, देहराडूनला राहणारी… तिला संगीताची ओळख झाली तिच्या आईमुळे. आईच आपली पहिली गुरू असल्याचं ती आवर्जून सांगते. फक्त गुरूच नाही तर पहिली श्रोता आणि प्रेरणाही. सध्या ती शिकतेय, अकरावीमध्ये. तिच्या घरात भारतीय संगीत असलं तरी तिला रॉकस्टार व्हायचंय. त्या दिशेनं तिची वाटचाल सुरू आहे, इंटरनेटवरील आपल्या असंख्य चाहत्यांच्या मदतीने…

एका बाजूला श्रद्धा शर्मा आहे, तर दुसऱ्या बाजूला, मालिनी मुरमू… गेल्याच आठवड्यात ती चांगलीच चर्चेत होती. कारण काय, तर फेसबुकवर तिच्या बॉयफ्रेंडने अपडेट केलेलं स्टेट्स वाचल्यावर तिने आत्महत्या केली. ही तशी फेसबुकची एक काळी बाजू आहे. फेसबुकसारखी सोशल नेटवर्किंग माध्यमे तुमच्या अभिव्यक्तीला एक व्यासपीठ उपलब्ध करून देतात, तशीच ती तुमच्या जगण्या-मरण्यावरही परिणाम करतात. हे आपल्याकडेच आहे, असं नाही तर ग्रेट ब्रिटनमध्ये फेसबुक संबंधित गुन्ह्यांमध्ये गेल्या पाच वर्षात ५४.० टक्क्यांनी वाढ झालीय. अनुकरणाच्या प्रवृत्तीने म्हणा किंवा फारशी तयारी नसताना फेसबुकसारख्या साईट्समुळे पहिल्यांदाच एवढा ओपननेस आपल्याकडे आल्यामुळे म्हणा आपल्याकडेही फेसबुक संबंधित गुन्हेगारी वाढतेय. फेसबुक हे एक व्यासपीठ आहे, माध्यम आहे, अभिव्यक्त होण्याचं. त्याचा वापर कसा करायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न. एका बाजूला श्रद्धा शर्मा आहे तर दुसर्या बाजूला फसवले गेलेले अनेक तरुण-तरुणी.. किंवा त्यापेक्षाही ठळक उदाहरण द्यायचं तर अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांचं. त्यांना अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत फेसबुकने मोलाची मदत केली. आता तुम्हीच सांगा, तुम्ही कोणाच्या मार्गाने जाल…

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Join the Conversation

1 Comment

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: