अण्णांना ऑनलाईन माध्यमातून मोठा सपोर्ट

अण्णांच्या आंदोलनाने काय साध्य होईल, भारताला एक सशक्त लोकपाल मिळेल का नाही, की निरंकुश सत्तेला आणि अधिकाराला चटावलेले सत्ताधारी पुन्हा काहीतरी बहाणेबाजी करत पुढच्या निवडणुकीची वाट पाहतील. आता काहीच सांगता येणार नाही. पण अण्णांच्या आधीच्या म्हणजे, पाच महिन्यांपूर्वीच्या आणि आताच्या आंदोलनाने एका बाबीवर मात्र शिक्कामोर्तब केलं, ती म्हणजे अण्णांसाठी सक्रिय झालेले डिजीटल नेटिव्ह किंवा नेटिझन्स.. आणि त्यानी अण्णांना दिलेला ऑनलाईन सपोर्ट…

एकट्या स्टार माझाच्या बाबतीत सांगायचं तर अण्णांच्या समर्थनामध्ये तब्बल पन्नास हजार एसएमएस आले. एकूण देशाची किंवा राज्याची लोकसंख्या पाहता हा आकडा तसा अतिशय कमी, पण प्रत्येकाला आपण एका एसएमएसच्या माध्यमातून का होईना सपोर्ट द्यावा वाटणं, भलेही हा एक फॅशन ट्रेंड असेल; पण स्वतःहून एक एसएमएस पाठवावासा वाटणं, हेच जास्त महत्त्वाचं आहे. फक्त मोबाईल हे काही डिजीटल एजचं प्रमुख साधन नाही, फेसबुक, ट्विटर यारख्या कितीतरी सोशल नेटवर्किंग साईट्स तर अण्णांच्या पाठिंब्याने ओसंडून वाहात होत्या. फेसबुकच्या स्टार माझा पेजला लाईक करणार्यांची संख्या अण्णांच्या आंदोलनाच्या काळात झपाट्याने वाढली. ३५ हजारांपासून त्याने ४१ हजारांपर्यंतचा टप्पा कधी पार केला, तेही लवकर लक्षात आलं नाही. हे फक्त स्टार माझाच्या बाबतीत होत होतं, असंही नाही. सर्व प्रसारमाध्यमे, त्यांचे फेसबुक फॅनपेज, ट्विटर अकाऊंट यांना भरभरून प्रतिसाद मिळत होता. या आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणेच एप्रिल महिन्यातल्या उपोषणाला मिळालेला ऑनलाईन प्रतिसाद पाहून यावेळी इंडिया अगेन्स्ट करप्शन आणि त्यांच्या इतर समर्थक, समविचारी संस्थांनी बर्यापैकी डिजीटल तयारी केली. त्याचाच परिणाम हा अण्णांना सर्वात मोठा ऑनलाईन पाठिंबा मिळण्यात झाला.

यूट्यूब, ट्विटर किंवा फेसबुकवर फक्त लाईक करुन किंवा कॉमेन्ट करुन अण्णांना सपोर्ट करणं म्हणजे, अतिशय सहज आणि सोपं असलं तरी किमान अण्णांना सपोर्ट द्यावा वाटणंच हे माझ्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचं आहे. अण्णांना वेगवेगळ्या पद्धतीने ऑनलाईन माध्यमाने देणार्यांची संख्या केव्हाच कोट्यवधीपर्यंत पोहोचली.

अण्णांना ऑनलाईन माध्यमातून मोठा सपोर्ट मिळतोय आणि त्यातून प्रामुख्याने १८ ते २४ या वयोगटातील तरुणाई अण्णांच्या सोबत येतेय, हे पाहिल्यावर काही अण्णा विरोधकांनी बुद्धिभेद करण्यासाठी वेगवेगळ्या कम्युनिटी आणि व्हिडिओंच्या माध्यमातून मोर्चेबांधणी केली. अण्णांच्या आंदोलनाबाबत बुद्धिभेद करणारा एक व्हिडिओही या मंडळींनी यूट्यूबवर अपलोड केला. त्यामध्ये अण्णा हजारे कसे हेकेखोर आहेत, आणि त्यांनी आजवरच्या आपल्या सहकार्यांना कसा धोका दिलाय, याची माहिती होती. पण या व्हिडिओला लाईक करणार्यांपेक्षा डिसलाईक म्हणजेच, नामंजूर करणार्यांचीच संख्या मोठी होती, हेही इथे आवर्जून नोंदवलं पाहिजे. तसंच काही वेबसाईट आणि फेसबुक पेजेस अण्णांच्या विरोधात सक्रिय झाल्या होत्या. अण्णांचं उपोषण किंवा आंदोलन आहे, म्हणजेच त्याला सर्वांनी पाठिंबाच दिला पाहिजे, असंही बंधनकारक नाही… इंटरनेट हे खर्या अर्थाने लोकशाहीधिष्ठित माध्यम असल्यामुळे सर्वांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. मग अण्णांना सपोर्ट करण्याचा जसा अधिकार आहे, तसाच अण्णांना विरोध करणार्यांचाही आहे.

अण्णांच्या आंदोलनाने एक बाब मात्र स्पष्ट केली, की तरुणाईला काय किंवा या देशातल्या जनतेला फार वेळ वेडं बनवता येत नाही. सध्याच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या डिजीटल युगात तर ही बाब अशक्यप्रायच समजायला हवी.

माझ्या पिढीला जयप्रकाश नारायण यांचं नवनिर्माणाचं आंदोलन माहिती नाही. फक्त या आंदोलनाची परिणीती आणीबाणीमध्ये झाली, एवढंच काय ते इतिहासात वाचलंय. किंवा आधीच्या पिढीकडून माझ्यापर्यंत पोहोचलंय. आताच्या संसदेत विरोधी पक्षात तसंच सत्ताधारी गटात असलेले अनेक खासदार हे जेपींच्या आंदोलनाची उत्पत्ती आहेत; पण आजही त्यांचा या नव्या आंदोलनाला विरोध आहे. आजचे लालू प्रसाद वगैरे मंडळी त्यावेळी जेपींच्या आंदोलनातले युवा नेते. आज त्यांचाच अण्णांच्या आंदोलनाला विरोध आहे. पण त्यावेळी माहितीचा प्रसार आजच्याएवढ्या झपाट्याने होत नव्हता. आज सर्व जग एका क्लिकने क्षणार्धात जोडलं जातं. तरीही तेव्हा जेपींनी भारत हालवून सोडला, आणि सरकारला आणीबाणी लादावी लागली. आता काहीही झालं तरी सरकार पुन्हा आणीबाणी लादण्याची चूक करणार नाही. कारण त्याचे परिणाम काय होतील, याची सरकारला कल्पना असावी. कारण तेव्हा माहितीचं आदान-प्रदान थांबवण्यासाठी सरकारला प्रसारमाध्यमांवर निर्बंध लादावे लागले, आता कोणत्याही प्रकाराने असे निर्बंध लादणं शक्य होणार नाही. कारण आता प्रत्येकाच्या हातात, एक कॉम्प्युटर आहे.

आज अण्णांना विरोध करणारी संसद पाहिली म्हणजे खरं तर दर वीस किंवा तीस वर्षांनी अशी लोकव्यापी आंदोलनं व्हायला हवीत. ७५ च्या सुमारास जेपींचं नवनिर्माण आणि अण्णांचं लोकपालासाठीचं देशव्यापी आंदोलन. दोघांची तुलना होऊ शकत नसली तरी… दोन्ही आंदोलनांना देशव्यापी पाठिंबा आणि प्रत्यक्ष सहभाग आहे, हे मात्र नाकारता येत नाही. एखाद्या मोठ्या राजकीय नेत्यांच्या भाषणासाठी गर्दी जमवावी, तशी ही गर्दी पैसे देऊन जमा केलेली तर नक्कीच नाही. भ्रष्टाचाराने नागवला गेलेला, कधीतरी आपापल्या आयुष्यात एकदा तरी ठेचकाळलेला प्रत्येकजण आज मनाने का होईना, अगदीच आपल्या कुवतीप्रमाणे-म्हणजे फेसबुक-ट्विटरवरून का होईना, अण्णांच्या सोबत आहे.

(कृषिवल : 23/08/2011)

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Join the Conversation

4 Comments

  1. I suppport Anna hajare to remove corruption in different government and semi government organisation

  2. भाऊगर्दी करून भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई जिंकता येईल असे मला वाटत नाही

  3. खरं आहे, तुमचं म्हणणं… मनोहरजी… भाऊगर्दी करून भ्रष्टाचाराविरूद्धची लढाई जिंकता येणार नाही. या भाऊ गर्दीनेच त्यांच्या त्यांच्या पातळीवरचा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी पुढाकार घेतला तर तो अण्णांना खरा पाठिंबा असेल. म्हणजे रेशन कार्डासाठी पैसे न देणं, ड्रायव्हिंग लायसेन्ससाठी पैसे न देणं… किंवा मुलाच्या शाळा प्रवेशासाठी डोनेशन न देणं… उपाय छोटे छोटे आहेत, फक्त पुढाकार घेण्याची गरज आहे, त्यासाठी कुठल्याही मैदानावर जाण्याची आवश्यकता नाही. फक्त आपापल्या पुरतं पाहिलं तरी ठिक. अशा गावोगावच्या छोट्या छोट्या प्रयत्नांचाच मिळून एक महासागर होईल. बघा, एक वेळ अशी येईल, की लायसेन्ससाठी जर कुणी पैसे नाही दिले तर आरटीओ आणि एजंटला माश्या मारत बसावं लागेल. विनापरवाना गाडी चालवली तर दंड भरावा लागेल, भरूयात, त्यासाठी पैसे नसतील तर कारवाई होईल, होऊद्या… न्यायालयात उभं केलं जाईल, तेव्हा तिथं आपला आवाज ऐकला जाईलच की… वेळ लागेल, पण भ्रष्टाचार निपटून काढायचा ठरवलं तर अगदीच अशक्य नक्कीच नाही.

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: