माझा प्रत्येक सोमवार हा बार्शीसाठी राखीव असतो. अण्णाचं आंदोलन अतिशय महत्वाच्या टप्प्यावर असतानाही मला कोर्टाच्या तारखेसाठी दर सोमवारप्रमाणेच कालही बार्शीला जावं लागलं. मी प्रत्येक रविवारी रात्री मुंबईतून बसतो आणि सोमवारी रात्री बार्शीतून निघून मंगळवारी सकाळी मुंबईत, पुन्हा कामाला हजर…
काल बार्शीत असताना मी सहज चौकशी केली, बार्शीत अण्णांच्या आंदोलनाचा काही परिणाम दिसतोय की नाही. गेल्या आठवड्यात म्हणजे अण्णाचं उपोषण सुरू झालं आणि त्यांना अटक करण्यात आली त्या मंगळवारीही मी बार्शीतच होतो. अण्णा हजारेंना पाठिंबा देण्यासाठी बार्शीतील काही उत्साही मित्रांनी एक मोटार सायकल रॅली काढली होती. त्यानंतर मंगळवारी जेलभरो केल्याची बातमीही कानावर आली होती.
तेव्हाच फेसबुकवरून काही तरूणांनी अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी गांधीपुतळ्यासमोर एक कार्यक्रम केल्याचं समजलं. तो ग्रुप कोणता, त्यांची विचारधारा काय, हेही मी फेसबुकवरूनच समजून घेण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतरचा आठवडा हा पूर्णपणे अण्णामय होता. अण्णांना अटक करून तिहारमध्ये टाकण्यात आलं. तिथे ते तीन दिवस होते. हे तीन दिवस अण्णा समोर नसतानाही लोकांचा उत्साह कमी झाला नाही. या तीन दिवसात बार्शीत काय होत होतं, याची माहिती मिळाली नाही. माझी अशी एक भाबडी आशा होती की याकाळात वेगवेगळ्या सरकारी कार्यालयातले दिवाण घेवाणीचे प्रकार थांबले असतील. किमान अण्णाचं उपोषण सुरू आहे, त्या काळात तरी… पण असं काहीही होत नव्हतं, बार्शीचा एक अतिशय आवडता शब्द आहे, निवांत… जगभरात काहीही सुरू असलं तरी बार्शी निवांत असते. जसं काही बार्शी ही मंगळासारख्या कोणत्यातरी अज्ञात ग्रहावर वसलेली असावी…
शुक्रवार हा बार्शीत आरटीओ येण्याचा दिवस, म्हणून मी फेसबुकवर बार्शी फ्रेंड या ग्रुपमध्ये एक पोस्ट टाकली. आज शुक्रवार. बार्शीत आरटीओ येण्याचा दिवस. अण्णांना खऱ्या अर्थाने पाठिंबा द्यायचाय, तर त्यासाठी रॅली काढायची किंवा डिजीटल लावायची अजिबात आवश्यकता नाही. फक्त एवढंच करायचं, ड्रायव्हिंग लायसेन्स वगैरे काढण्यासाठी आरटीओबाहेर जमलेल्या एजंटची मदत घ्यायची नाही. काय होईल… तर कुणालाही लायसेन्स मिळणार नाही. कारण लायसेन्स काढण्यासाठीचे फॉर्म्स एजंटशिवाय कुणाकडे मिळतच नाहीत. ही वस्तुस्थिती मला माहिती होती. पण आपण अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून एक आठवडा एजंटशिवाय लायसेन्स काढायचं किंवा किमानपक्षी तसा प्रयत्न करायचा ठरवला तर काय होईल. कुणालाही लायसेन्स मिळणार नाही, यापलिकडे काहीच होणार नाही. आरटीओ पुन्हा पुढच्या शुक्रवारीयेणारच आहे ना… बार्शीत… तेव्हा तरी लायसेन्स देईल की नाही… आपल्यापैकी कुणीही एजंटाच्या मदतीशिवाय लायसेन्स काढण्याचा प्रयत्न केला तर आरटीओ कुणालाही लायसेन्स न देता हात हलवत परत जाईल… असं एकवेळ गृहित धरलं तरी, त्याला या आठवड्याच्या बार्शी भेटीत कसलीच वरकमाई होणार नाही, हेही खरं असेल ना, मग हा अण्णांना पाठिंबा का नाही होऊ शकणार… नाही तरी आपण कितीतरी दिवस विना लायसेन्सची गाडी चालवतोच ना, त्यात एखादा महिना वाढ होईल… मधल्या काळात समजा ट्रॅफिक पोलिसांने लायसेन्स नाही म्हणून पकडलं तर काय होईल. त्याला आवश्यक तो दंड भरायचा, आणि आरटीओ मध्ये एजंटशिवाय लायसेन्स मिळत नाही, म्हणून अजून लायसेन्स काढलं नाही, असं सांगायचं… आणि विनालायसेन्स गाडी चालवल्याबद्धल भराव्या लागणाऱ्या दंडाची पावती घ्यायची. म्हणजे पोलिसांनाही लाच देणं नको, शिवाय पावती घेतल्यामुळे हा पैसा काळा नाही तर व्हाईट असेल. आणि पोलिसांनाही त्यामध्ये वरकमाई करता येणार नाही. पोलीस किती दिवस दंड करतील, गाडी जप्त करतील किंवा आपल्याला कोर्टासमोर उभे करतील, यापलिकडे काय होईल. फेसबुक मित्रांमध्ये कुणी यासंदर्भातले तज्ज्ञ असतील तर त्यांनी अवश्य माहिती शेअर करावी.
आरटीओसंदर्भात मी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टला दुर्दैवाने फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तशी अपेक्षाही नव्हती. हा अनुभव जाता होताच, म्हणून काल बार्शीत असताना एका मित्रांना विचारलं, आरटीओची प्रत्येक शुक्रवारची बार्शीतली कमाई किती असेल अंदाजे… तर त्याने माहिती पुरवली की किमान एक लाख तरी नक्कीच, त्यापेक्षा कमी नक्कीच नाही.. आता या माहितीला काहीच आधार नाही, कसलाही पुरावा नाही. कारण आरटीओ एजंट तसलाही पुरावा तुम्हाला देत नसतात.
त्यानंतर तहसील परिसरातल्याच एका मित्रांला मी विचारलं की अण्णाचं उपोषण सुरू असताना तहसील कार्यालयात, रजिस्ट्रार कार्यालयात, रेशन कार्ड बनवण्यासाठीच्या कार्यालयात सध्या कसं वातावरण आहे, तर त्याने माहिती पुरवली की काहीच फऱक पडलेला नाही, सर्व काही सुखेनैव सुरू आहे. कोणतंच काम पैसे दिल्याशिवाय होतच नाही. रेशन कार्ड काढायला पैसे द्यावेच लागतात, रॉकेलसाठी ऑनमनी द्यावाच लागतो. कोणतंही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही, इतकंच नाही तर न्यायालयात प्रतिज्ञापत्र साक्षांकित करून घेण्यासाठीही दहा रूपये समोर ठेवून देवाशपथ खरं सांगेन, किंवा खरं सांगितलं , लिहिलं आहे, असंच निवेदन करावं लागतं, हे दहा रूपये तुम्ही ठेवलेले नसतील,तर तुम्ही कितीही मोठे देवभक्त असा, तुम्ही केलेलं प्रतिज्ञापत्र खरंच होत नाही. साक्षात देव आला तरीही… या सर्व परंपरा आहेत, आपणच सुरू केलेल्या… पण आपल्या सर्वांसाठी राळेगणच्या एका देवळात राहणारा एक म्हातारा, तब्बल 74 वर्षांचा आठ दिवसांपासून उपाशी आहे, किमान त्यासाठी तरी या आठ दिवसात लाच देणं घेणं थांबलं असतं तरी अण्णांना खूप मोठा पाठिंबा बार्शीतून व्यक्त झाला असता.
पण हे झालं नाही. कधी होणारही नाही, हे तहसील-कचेरी परिसरातले व्यावसायिक तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकतील.
अण्णाच काय अजून कुणी दिल्लीत उपोषणाला बसला तरी बार्शीला काही फरक पडणार नाही, कारण बार्शीचं एक बरंय, ती नेहमी निवांत असते….
कालच एक वेगळा किस्सा ऐकायला मिळाला.. बार्शीत. तसं म्हणाल तर वेगळा अजिबात नाही. सगळा देश भ्रष्टाचार विरोधात एकवटलेला असताना किमान टीव्ही, वर्तमानपत्रे पाहून तरी तसं मत होत असताना बार्शीत लाच घेण्याचा प्रयत्न करताना एका पत्रकाराला अटक करण्यात आली. पुन्हा हा पत्रकार भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचा निलंबित की माजी पदाधिकारी होता. त्याचं नेमकं स्टेटस समजलं नाही, तरीही त्याने बार्शीतल्या एका डॉक्टरांना काही लाख रूपयांची लाच मागितली, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याशी संपर्क साधला, त्या पत्रकाराला पाच लाख रूपये स्वीकारताना अटक झाली, आता पोलीस तपास सुरू आहे. एक 74 वर्षाचा म्हातारा देश भ्रष्टाचार मुक्त होण्यासाठी, किमान त्या दिशेने एक पाऊल पडावं यासाठी तब्बल सात दिवसांपासून उपोषण करत असाताना, माझ्या बार्शी शहरात एका पत्रकाराला, भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या माजी किंवा निलंबित पदाधिकाऱ्याला लाच घेताना अटक व्हावी, हे बार्शीचं की अण्णा हजारेंच्या आंदोलनाचं दुर्दैव… या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं नाही, माझे बार्शीकर फेसबुकर मित्र काही मदत करतील का?
(मी दोन दिवसांपूर्वी माझ्या फेसबुक प्रोफाईलवर टाकलेली नोट… )