अण्णांसोबतची जनशक्ती मतपेटीतून व्यक्त होईल?

अण्णा तीन दिवसांच्या तिहारमधील मुक्कामानंतर आज बाहेर पडले. खरं तर गेल्या दोन दिवसात तिहारबाहेर जमलेल्या लोकांचा समुदाय घटत असल्याचीही निरीक्षणे अनेकांनी नोंदवली होती. काँग्रेसच्या अंतर्गत सुत्रांनी त्यावरून पुन्हा अण्णांना मोर्चेबांधमी सुरू केल्याच्या बातम्या येत होत्या, पण आज अण्णा तिहारमधून बाहेर पडल्यानंतर सगळंच चित्र पालटलं. अण्णांना मिळालेला प्रतिसाद फक्त अभूतपूर्व आणि सरकार तसंच दिल्ली पोलिसांसाठी अकल्पनीय होता. आपापल्या मंत्रालयात बसून किंवा घरातून टीव्हीवर अण्णांच्या रॅलीचं चित्रण पाहत असलेल्या राजकारण्यांना ही गर्दी पाहूनच धडकी भरली असेल.

फक्त राजधानी दिल्ली किंवा तिहारचा परिसर, राजघाट, इंडिया गेट आणि रामलीला मैदान नाहीतर देशभरात सगळीकडेच अण्णांना मिळत असलेला पाठिंबा सर्वाधिक आहे. ज्यांना राजधानीत दाखल व्हायला जमलेलं नाही, त्यांनी आपापल्या शहरातून, गावातून अण्णांना पाठिंबा जाहीर केलाय. काही ठिकाणी रॅली निघताहेत. मोटार सायकल, सायकल, पायी, मेणबत्त्या घेऊन लोक पुढे निघालेत.

मध्यप्रदेशातून आलेली बातमी तर खूप इंटरेस्टिंग आहे, तिथे लोक आपल्या नवीन जन्मलेल्या अपत्याचं नाव अण्णा ठेवत आहेत. याला फक्त एक वेड म्हणून बाजूला सारता येणार नाही. सचिनची कारकिर्द ऐन बहरात असताना आपल्याकडे अनेकांनी आपल्या अपत्याची नावे सचिन अशी ठेवली होती. पण सचिन तरूण आहे, तसं अण्णाचं नाही. पण अण्णांमध्ये त्यांना एक आशा दिसतेय, त्याचं वय नाही.

माझ्या पिढीने अशी मोठी आंदोलने पाहिलेली नाहीत. आता सरकारमध्ये बसलेल्या आणि सत्तरी पार केलेल्या नेत्यांना कदाचित जेपी आणि त्याचं नवनिर्माण आंदोलन किंवा त्यानंतर लादलेली आणीबाणी आठवत असेल. माझ्या पिढीला यापैकी काहीच माहिती नाही. त्यांच्यासाठी अण्णांचं आंदोलनच सर्वकाही आहे. माझी पिढी आणीबाणीनंतर जन्मलेली. त्यानंतरचं मुंबईतील कामगाराचं आंदोलनही आम्हाला माहिती नाही. या पिढीला दत्ता सामंत, इंदिरा गांधी, महेन्द्र सिंह टिकेत किंवा औरंगाबादच्या विद्यापीठाच्या नामांतरासाठी लाँगमार्च काढणारे जोगेन्द्र कवाडेही माहीती नाही. म्हणूनच कदाचित या पिढीला इंटरनेट आणि फॅशन टीव्हीच्या माध्यमातून पोहोचलेले चे गव्हेराचे टीशर्ट जास्त जवळचे वाटत असतील. पण अण्णांच्या या आंदोलनाने मात्र माझ्या पिढीला ‘मी अण्णा हजारे’ असं छापलेली गांधी टोपी घालायला कसलीच लाच वाटत नाहीय. उलट माझ्या पिढीसाठी ही एक अभिमानाची बाब झालीय.

या देशातला युवक हा नवनिर्माणाच्या क्रांतीचं इंजिन आहे, असं कधीतरी जेपी म्हणाले होते, म्हणजे मी ही हे पुस्तकातच वाचलेलं आहे. क्रांतीचं इंजिन युवक असणं म्हणजे काय याचं दर्शन, अनुभूती आज या देशाच्या युवकांसोबत संसदेत बसलेल्या आणि याच युवकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनाही आली असेल.

अण्णांनी तिहार बाहेर पडल्या पडल्या समोर जमलेल्या अतिविशाल लोकांना सांगितलं की मी असेन किंवा नसेन क्रांतीची ज्योत सतत पेटती ठेवा… या त्यांच्या संदेशाने देशातलं स्फुल्लिंग पुन्हा चेतवलं आहे.

अण्णांना मिळालेला हा अभूतपूर्व प्रतिसाद पाहून मला सहजच पडलेला प्रश्न हा की, अण्णांच्या पाठिंब्यासाठी एकवटलेला हा समुदाय कधी मतपेटीतून व्यक्त होईल का? अण्णांना गेल्या एप्रिल महिन्यापासून मिळत असलेल्या प्रतिसादाचं, इंटरनेट, फेसबुक, ट्विटर किंवा प्रत्यक्ष लोकांच्या सहभागातून मिळालेल्या पाठिंब्याचं आजवर वेगवेगळ्या पातळीवर विश्लेषणही झालं असेल. त्या सर्वाचंही एकमत याच मुद्दयावर की हा लोकांच्या मनातला राग आहे. हा राग साचत आलाय, अण्णांनी फक्त त्याला एक निमित्त दिलंय, वाट करून दिलीय. हा राग व्यक्त होण्यासाठी… लोकांना रस्त्यावर येण्यासाठी… आधी जंतर मंतरवर आणि आता तिहारबाहेर तसंच रामलीला मैदानावर एकवटण्यासाठी भाग पाडलंय. पण हा राग मतपेटीतून व्यक्त होणार कसा. कारण हा राग मतपेटीतून व्यक्त होण्यासाठी अण्णा प्रयत्न करणार नाहीत. तसे प्रयत्न अण्णांनी केले तरी त्याला प्रतिसाद मिळणार नाही, कारण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा असा एक प्रयत्न झाला. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. कारण अनेक उमेदवारांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना नामोहरम करण्यासाठी अण्णाच्या पाठिंब्याचं पत्र मिळवलं. अण्णांकडे स्वतःची अशी कोणतीही यंत्रणा नाही, ज्यावरून ते निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवाराची पार्श्वभूमी तपासू शकतील. त्यामुळे एकाच मतदारसंघातल्या, समोरासमोर लढणाऱ्या उमोदवारांनीही अण्णांच्या पाठिंब्याची पत्रे मिळवली. पण काही मोजके अपवाद वगळता लोकांनी कुणालाही निवडलं नाही. जे कुणी अण्णा पुरस्कृत उमेदवार निवडून आले त्यामध्ये अण्णांच्या पाठिंब्याचा वाटा किती, हे ते उमेदवारही कबूल करतील. पण पुन्हा असा प्रयत्न करूच नये, असंही काही नाही. फक्त त्यासाठी एक नियोजनबद्ध मेकॉनिझम हवं एवढं मात्र खरं…

अण्णांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा मतपेटीतून व्यक्त व्हायला हवा, पक्ष कोणता ते महत्वाचं नाही. पण निवडून येणारा कोण आहे, हे जास्त महत्वाचं आहे, खरं तर अण्णा आता उपोषणाला बसलेत ते जनलोकपालाची मागणी रेटण्यासाठी, अशावेळी त्यांच्यामागे जमलेला जनसमुदाय मतपेटीचा विचारही करणार नाही. तरीही मतपेटीतून अण्णांच्या मागे आलेली जनशक्ती युवाशक्ती मतपेटीतून व्यक्त व्हायलाच हवी. हे विषयांतर मुळीच होणार नाही, उलट एक निश्चित अशी दिशा असेल.

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Join the Conversation

3 Comments

  1. विनित राजे, आपण कोण आहात माहिती नाही… पण आपली मांडणी पटत नाही… आपण मांडलेल्या सर्व मुद्द्याचा प्रतिवाद केला जाऊ शकतो, तो ही समर्थपणे… अण्णांच्या विरोधात काम करणारी एक यंत्रणा आहेच. आपण त्याचाच भाग असावेत. अण्णा जन लोकपालाची म्हणा किंवा सशक्त लोकपालाची मागणी करतात म्हणून त्यांचा विरोध करायचा, पण मग भ्रष्टाचार सहन का करायचा. त्याचं उत्तर कोण देणार… का प्रश्न सोडवायचाच नाही, लोकपाल सशक्त झाला तर हुकूम शहा होईल अशी भिती व्यक्त करायची, मग सध्याचे नेते कोण आहेत. त्यांचं सध्याचं वर्तन तुम्हाला कोणत्या अंगाने हुकूमशहापेक्षा कमी वाटतं… आपापल्या मतदारसंघातील हे संस्थानिकच आहेत की… मग त्यांची हुकूमशाही चालवून घ्यायची पण अण्णांच्या लोकपालाची नको, सर्वात महत्वाचं म्हणजे अण्णांनी सुचवलेल्या लोकपालाला नियंत्रित करणाऱ्या व्यक्तिमध्ये स्वतः अण्णा आहेत का? त्यांनी मांडलेल्या निकषात अण्णा बसतात का? त्यांना ना नोबल मिळालंय, ना मॅगसेसे… ते न्यायाधिशही नाहीत. तुमचा मुद्दा असा आहे की हे सर्व लोक फितूर होणार नाहीत का, मग आत्ताचे आपण निवडून देतो ते लोक फितूर होणार नाहीत, याची तरी कोण गॅरन्टी देऊ शकतो, अहो हे आपण निवडून दिलेले लोक ज्याला तुम्ही खासदार म्हणता, ते लोकांचे प्रश्न विचारण्यासाठीही सुद्धा पैसे घेतात की… अजून बरंच काही…

  2. मांडणी कशी आहे यापेक्षा अण्णांच्या आंदोलनाच्या मुद्यावर चर्चा आणि विचार व्हावा. लोकपाल बिल हे काँग्रेस आणि बीजेपी च्या जातीयवादी आणि वर्चस्ववादी गटाने समोर उभे केलेले भूत आहे. जेव्हा जेव्हा जनतेच्या हिताचे मुद्दे यांना बोलायचे नसतात तेंव्हा मिडियाच्या मदतीने “नॉन इश्यू” ला “इश्यू” केले जाते.

    कायदे अंमलात आणणारी व्यवस्थाच जर भ्रष्ट असेल तर कायदे करून उपयोग नाही. सध्या अस्तित्वात असलेले सगळे कायदे जर १००% राबवले तर नवीन कायद्याची गरज नाही. भ्रष्टाचार हा परिणाम आहे, त्याच्या मुळावर चर्चाच होत नाही. अण्णा भ्रष्टाचारा ऐवजी भ्रष्टाचार्यांवर बोलतात.

    हे राजकीय नेते आणि अन्नांसारखे सो कॉल्ड “सिव्हील सोसायटी” वाले एकाच ठीचे चट्टेबत्ते आहेत. सरकारी बिलात “सरकारी एन.जी.ओ.” ना लोकपालच्या कक्षेतून वगळले आहे आणि अण्णांच्या बिलातून “खाजगी एन.जी.ओ.” ना वगळले आहे. स्वच्छ कारभाराची मागणी करणारे स्वतः मात्र त्यातून सूट घेऊ इच्छितात हि क्रूर चेष्टा नाही का?

    सध्या लाखो कोटींचे घोटाळे उघडकीस येत आहेत, महागाई उच्चांकी दर रोज गाठत आहे. त्यात कुणीही मागे नाही. हे सर्व झाकण्यासाठी असली थेरं सुरु आहेत. भारतातील मंदिरांमध्ये लाखो कोटींची संपत्ती दडवून ठेवली जात आहे. विदेशातील आणायचा तेंव्हा आणू पण इथे आपल्या जवळ असलेल्या पैश्यांचे काय?

    ह्याला एकाच पर्याय “व्यवस्था परिवर्तन”.. एक विस्तारित लेख ह्या मुद्यावर लिहितोय. नक्की वाचा आणि प्रतिक्रिया द्या.

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: