युद्धाचे आखाडे आता बदललेत…

जगात यापुढील तिसरं महायुद्ध कोणा-कोणात आणि कधी होईल… हे सांगता येईल नाही, पण चौथ्या महायुद्धाविषयी मात्र नक्की सांगता येईल, की ते कधीच होणार नाही.. कारण ते लढण्यासाठी कुणीच शिल्लक राहणार नाही… अशा आशयाचा एक कोट आहे… नेमक्या कोणत्या तत्वज्ञाचा की विचारवंताचा, आता नेमकं आठवत नाही
बहुतेक आईनस्टाईन असावेत.

हा कोट इथे देण्याचं कारण असं की जगाने आजवर फक्त दोनच महायुद्धे आणि त्यातली अपरिमीत हानी अनुभवलीय, पाहिलीय. त्यामुळे तिसरं महायुद्ध झालंच, तर पुन्हा चौथं महायुद्ध खेळण्यासाठी त्यावेळी कुणीच शिल्लक नसेल. हे मात्र सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे.

पण तिसरं महायुद्ध हे पारंपरिक पद्धतीनेच व्हायला हवं, असं थोडंच आहे. कारण युद्धाचे आखाडे आता बदललेत. महायुद्धे आता कुठही होतात, कधी त्याचं ठिकाण बाजारपेठ असतं तर कधी त्याचं ठिकाण व्हर्च्युअल म्हणजे आभासी जग असतं. हे विश्व आहे, इंटरनेटचं… आणि गेल्याच आठवड्यात आलेल्या बातम्यांमुळे हे युद्ध सुरू झालं असल्याचंही दिसतं. फक्त ते व्हर्च्युअल म्हणजेच आभासी जगात असल्यामुळेच तुम्हा-आम्हाला त्याची झळ एवढ्यात बसेलच असं नाही. पण या आभासी जगातल्या युद्धाच्या हानीचे दूरगामी परिणाम तुम्हा-आम्हालाच सहन करावे लागतील.

आता उघडकीस आलेलं युद्ध तसं सुरू झालंय ते तब्बल पाच वर्षांपूर्वीपासून… फक्त ते उघडकीस आत्ता आलंय.

इंटरनेट सिक्युरीटी फर्म मॅकअफी यांनी अलीकडच्या काळातला सर्वात मोठा सायबर हल्ला उघड केल्याचा दावा केलाय. या सायबर हल्ल्यात गेल्या पाच वर्षांपासून अमेरिका, भारत सरकारसह वेगवेगळ्या देशातल्या 72 संघटनांच्या संगणकावर हल्ले चढवले जात आहेत.

या सायबर हल्ल्यांमध्ये संयुक्त राष्ट्रे म्हणजे यूएन आणि जागतिक ऑलिंपिक संघटनेलाही लक्ष्य करण्यात आलं होतं. मॅकअफीने या हल्ल्यासाठी कोण जबाबदार आहे, ते अजून स्पष्ट केलं नसलं तरी त्यामागे चीनचे हॅकर्स असल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सुरू आहे.

चीनने मात्र आपल्यावर होत असलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. हॅकिंग आणि सायबर हल्ल्यासंदर्भात आपल्यावर होणारे आरोप बिनबुडाचे असल्याचं चीनने म्हटलं आहे.

मॅकअफीचे युरोप तंत्रज्ञान प्रमुख राज समानी यांनी हे सायबर हल्ले अजूनही सुरूच असल्याचा दावा केलाय.

चीन ही आशियातली एक आर्थिक आणि राजकीय महासत्ता आहे, पण सायबर विश्वातही चीनचा मोठा दबदबा आहे. चीनने या क्षेत्रात केलेली प्रगती लक्षणीय आहे. अतिशय सुरक्षित असलेल्या म्हणजे सिक्युअर्ड असा टॅग असेलल्या माहितीला भगदाड पाडणं हे चीनी सायबर चाच्यांचा हातचा खेळ आहे, एवढी लक्षणीय प्रगती त्यांनी साधलीय. अनेक भारतीय जाणकार त्याला दुजोरा देतात. चीनच्या सायबर क्रांतीपुढे काहीजणांना भारतातील सायबर क्रांती म्हणजे अश्मयुग वाटतं.

गेल्यावर्षी उघडकीस आलेल्या नाईट ड्रॅगन हल्ल्यांपेक्षा हे हल्ले अतिशय वेगळे असल्याचा दावाही मॅकअफीने केलाय. हे हल्ले काही विशिष्ट अशा संघटनांवर आणि खास क्षेत्रामध्येच होत असल्याचं निरीक्षण मॅकअफीने नोंदवलंय.

या हल्ल्यांना शॅडी रॅट (RAT – Remote Access Tool) असं नाव देण्यात आलंय. मॅकअफीचे व्हाईस प्रेसिडेंट थ्रेट रिसर्च डीमित्री अॅलपरोविच यांनी आपल्या ब्लॉगमध्ये या सायबर हल्ल्यांविषयी विस्तृत माहिती दिलीय. फक्त सरकारीच नाही तर काही खासगी कंपन्यांच्या कॉम्प्युटर नेटवर्कलाही या शॅडी रॅटने भगदाड पाडलंय.

एरवी संगणक तज्ज्ञांमध्ये लोकप्रिय असलेल्या रिमोट अॅक्सेस टूलचा वापर करूनच या सायबर हल्ल्याचं नियोजन करण्यात आलंय. रिमोट अॅक्सेस टूल म्हणजेच अन्य दूरच्या किंवा कोणत्याही संगणकाच्या माध्यमातून कोणताही संगणक किंवा नेटवर्क नियंत्रित करणे. या प्रणालीचा वापर सरकारी सुरक्षा यंत्रणा किंवा हॅकर्स हेरगिरीसाठी नेहमीच वापर करतात. पण आता काही सरकारांच्या संगणकांनाच या सायबर हल्ल्याने भगडाद पाडलंय.

मॅकअफीने तब्बल पाच वर्षांपासून केलेल्या संशोधनातून यासंबंधीचे काही निष्कर्ष जगापुढे मांडले आहेत. मॅकअफीने केलेल्या पाहणीत अनेक संघटना तसेच सरकारची इंटलेक्चुअल माहिती हॅकर्सनी चोरल्याचं स्पष्ट झालंय. अनेक खाजगी संगणक कंपन्या, भारत सरकार, वेगवेगळ्या लष्करी संशोधन संस्था, अमेरिका प्रशासन, संयुक्त राष्ट्रे, आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक संघटना यांना या सायबर हल्ल्याचा फटका बसलाय.

चोरलेला डाटा किंवा माहिती कुठे जातेय, किंवा त्याचं पुढे काय होतंय, हे अजून स्पष्ट झालं नसलं तरी त्याचा वापर प्रतिस्पर्धी उत्पादनांसाठी होत असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. म्हणजे प्रामुख्याने या हल्ल्यामागे आर्थिक हितसंबंध असण्याची शक्यताही मॅकअफीने वर्तवलीय. संगणकीय भाषेत मॅकअफीने या हल्ल्यांना स्पिअर फिशिंग असंही म्हटलंय. म्हणजे एखाद्या कंपनीच्या किंवा सरकारच्या संगणकातील माहिती चोरून किंवा ती नष्ट करण्यावर सायबर हल्ल्याचा भर नाही तर एखाद्या विशिष्ट संगणकातील, आवश्यक तेवढीच आणि महत्वाची असलेली माहिती मिळवण्यावर या हल्ल्यात भर दिला गेलाय.

एखाद्या संगणकाचा व्यक्तिगत वापर करणाऱ्याला एखादा मेल पाठवून त्यासोबत सायबर हल्ल्यासाठीचा प्रोग्राम संबंधित संगणकात लोड करण्याची पद्धत या शॅडी रॅटमध्ये वापरण्यात आलीय. एकदा का हा मेल वापर कर्त्यांने ओपन केला की संबंधित संगणकाचा किंवा त्या नेटवर्कचा रिमोट अॅक्सेस हॅकर्सकडे जातो. तो आपल्या सोईने हवी ती माहिती हवी त्या वेळी काढून घेतो.

मॅकअफीने या हल्ल्यामागे कोण असेल हे सांगण्यास असमर्थता व्यक्त केली असली तरी सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक इंटरनॅशनल स्टडीजचे जीम लेवीस यांनी स्पष्टपणे चीनकडे बोट दाखवल्याचं वृत्त रॉयटर्सच्या वृत्तात म्हटलंय. जीम लेवीस यांच्यामते वेगवेगळ्या संगणकांमधून ज्या प्रकारच्या माहितीवर डल्ला मारण्यात आलाय, त्यामध्ये सध्या फक्त चीनी कंपन्यांनाच स्वारस्य आहे. कारण या सर्व उत्पादनात चीनने शिरकाव केला आहे. लुईस यांच्यामते काहीजण रशियन हॅकर्सकडेही बोट दाखवत आहेत. रशिया किंवा चीन यांच्यापैकी कोणीही या सुनियोजित सायबर हल्ल्यामागे असू शकतं. तर सोफोस या इंटरनेट सिक्युरिटीचे सायबर एक्सपर्ट ग्रॅहम कुली यांच्यामते जेव्हा केव्हा असे सायबर हल्ले होतात, तेव्हा प्रत्येकालाच त्यामागे चीनचा हात असल्याचा संशय येतो. प्रत्येकवेळी हे खरंच असेल असं नव्हे… असं सांगून या मागेही चीन असेल, असं वाटत नसल्याचं म्हटलं आहे.

या हल्ल्यामागे कोण आहे, हे आत्ताच स्पष्टपणे दाव्यानिशी सांगणं अवघड आहे, कारण प्रत्येक देश ऑनलाईन हेरगिरी करत असतो. हे काम कोणत्याही देशाचं किंवा खाजगी हॅकर्सचं असू शकतं, असंही ग्रॅहम कुली यांना वाटतं. तसंच या सायबर हल्ल्यामागे अमुक एक देशच आहे, असं कुणालाही सिद्ध करता येणार नाही असा दावा त्यांनी केलाय.

कारण ही सगळी दुनियाच व्हर्च्युअल आहे. इतकंच काय युद्ध सुरू होतं तेव्हा रामायण-महाभारतातल्या सारखे इशारे किंवा आयुधांचे टणत्कारही इथे होत नाहीत. आपल्यावर हल्ला केला गेलाय, हे समजायलाही बराच वेळ लागतो, तोवर अपरिमीत नुकसान झालेलं असतं.

मॅकअफी ही इंटेल कॉर्पोरेशनची उपकंपनी आहे. इंटेल म्हणजे संगणकाची प्रोसेसिंग चीप बनवण्यात जवळ जवळ मक्तेदारी असलेली बलाढ्य कंपनी. आपण वापरत असलेल्या प्रत्येक संगणकात इंटेलचीच चीप वापरली जाते. या मॅकअफीने हा आजवरचा सर्वात मोठा सायबर हल्ला उघडकीस आणलाय.

महायुद्ध म्हणतात ते यापेक्षा वेगळं काय असू शकेल.

(दै. कृषिवल – 09/08/2011)

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Join the Conversation

1 Comment

  1. >>>आपल्यावर हल्ला केला गेलाय, हे समजायलाही बराच वेळ लागतो, तोवर अपरिमीत नुकसान झालेलं असतं.

    खरच युद्धाचे आखाडे आता बदललेत……

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: