K 2 S : एक अनुभव

कात्रज-सिंहगड नाईट ट्रेकचं आकर्षण तसं वर्षभरापासून होतं. म्हणजे आमची एक टीम या ट्रेकमध्ये गेल्या वर्षी सहभागी झाली. पुण्यातून परतल्यावर तब्बल महिनाभर तरी त्यांच्या बोलण्यात या ट्रेकशिवाय दुसरा विषयच नव्हता. उठताना, बसताना, जेवताना, चहा पिताना, ऑफिसला येताना, जाताना फक्त केटूएस.. सतत केटूएस केटूएस ऐकून कंटाळल्यावर मी ही पुढच्यावर्षी नक्की केटूएसला येणार, असं जाहीर करून टाकलं. पण आता तुमच्या केटूएसच्या गप्पा बंद करा, असंही सुचवलं.

केटूएस म्हणजे कात्रज ते सिंहगड किल्ला हा ट्रेक. माझ्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मार्गात लहानमोठ्या तब्बल सतरा टेकड्या आहेत. वाटेत जंगल आहे, वाट म्हणून कुठेच नाही, तुमची तुम्हालाच वाट शोधावी लागते, असं बरंच काही.

प्रसाद पुरंदरे यांची एनईएफ म्हणजे नॅशनल एज्युकेशन फाऊंडेशन हा ट्रेक दरवर्षी आयोजित करते. हा ट्रेक जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात असतो.

माझ्या तीन सहकाऱ्यांनीही हा ट्रेक एनईएफसोबतच केला होता.

संदीप रामदासी, माणिक मुंढे आणि मयुरेश कोण्णूर हे तीन माझे सहकारी.

आम्ही सर्वजण स्टार माझा या मराठी वाहिनीत काम करतो. आणि स्टार माझा हे एनईएफच्या केटूएसचा मीडिया पार्टनर असतो. त्यामुळे आमची एक टीम गेल्यावर्षीपासून या ट्रेकमध्ये सहभागी होत आलीय. म्हणजे यावर्षीचं हे दुसरंच वर्ष. तसं एनईएफच्या या ट्रेकला तब्बल दहा वर्षे उलटून गेलीत.

गेल्यावर्षी आमच्या तीन सहकाऱ्यांनी या ट्रेकमध्ये सहभाग घेतला होता. तर यावर्षी तब्बल आठजण झाले. पुण्यातून दोघेजण… म्हणजे पुणे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर आणि मंदार गोंजारी. त्यातल्या मयुरेशला हा ट्रेक करण्याचा चांगलाच सराव होता. त्याने किमान तीन चारवेळातरी हा ट्रेक केलाय, अशी माहिती त्यानेच पुरवली.

आम्ही मुंबईतून बाकीचे सहाजण पोहोचलो होतो. पण वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या वाहनाने. म्हणजे संदीप रामदासी शिवनेरीने दुपारीच पुण्यात दाखल झाले होते. मी, अभिजीत करंडे आणि सचिन ढवण असे तिघेजण शिवनेरीनेच पुण्यात पोहोचलो, पण पोहोचायला तब्बल साडेपाच वाजले. तर प्रशांत कदम आणि माणिक मुंढे ट्रेनने सकाळीच पुणे मुक्कामी पोहोचले होते.

आम्हाला प्रत्यक्ष ट्रेक सुरू होतो, त्याठिकाणी म्हणजे जुन्या कात्रज बोगद्याच्या टपावर पोहोचायला तब्बल सात वाजले. त्यापूर्वीच म्हणजे सहा वाजताच प्लॅगऑफ झाला होता. आमच्या टीमचे दोन सहकारी सिंहगडच्या दिशेने रवाना झाले होते. संदीप रामदासी आणि माणिक मुंढे.

मागे राहिलेले आम्ही सर्व सहाजण. म्हणजे मंदार गोंजारी, मयुरेश कोण्णूर, प्रशांत कदम, अभिजीत करंडे, सचिन ढवण आणि मी अशा सहा जणांनी दुसऱ्या टप्प्यात चालायला सुरूवात झाली.

पहिला डोंगर चढायला सुरूवात होत असतानाच अभिजीत करंडे आणि प्रशांत कदम पुढे सटकले, नंतर त्यांची भेट सिंहगडावर कांदा भजी खातानाच झाली.

मग आम्ही चार जण सोबत राहिलो, त्यातला मंदार गोंजारीही मध्येच कुठे तरी आम्हाला मागे टाकून पुढे सटकला, तो थेट सकाळ झाल्यावर सिंहगडाच्या पायथ्याशी आम्हाला भेटला.

आता आम्ही तिघेच राहिलो. सचिन ढवण, मयुरेश कोण्णूर आणि मी… त्यात फक्त मयुरेश हा फक्त अनुभवी ट्रेकर होता, तसंच त्याने हा ट्रेकही अनेकवेळा यापूर्वीही केला असल्याने आमच्यासाठी तो जाणकारच होता. मयुरेशला मागे टाकून पुढे जाणं आमच्यापैकी कुणालाच शक्य नव्हतं कारण फक्त त्याच्याकडेच बॅटरी होती. त्यामुळे अंधारात हा ट्रेक पूर्ण करणं म्हणजे निव्वळ अशक्यच… कारण आम्ही तिघेही चष्मेवाले. अंधारात पुढे खड्डा आहे की वाट काही म्हणजे काहीच दिसत नाही. मग आमचा ट्रेक सुरू झाला, पुढे आधी मयुरेशने जाऊन वाट पहायची, नंतर त्याने मागे वळून आम्हाला बॅटरी दाखवायची, मग त्या उजेडात आम्ही त्याच्यापर्यंतचा मार्ग कापायचा. कारण मयुरेशकडे हेडलॅम्प होता. तो त्याच्या डोक्यावरच फिट केलेला.

आम्ही कुणीच बॅटऱ्या घेतलेल्या नाहीत, याची पहिल्यांदाच जाणीव झाली. आणि बॅटरी सोबत न घेणं ही किती मोठी चूक केली, याची जाणीव दोनदा पाय मुरगाळून रपकन टिरीवर आपटल्यावर झाली. त्या अंधारात डोळ्यासमोर अंधारी आली नाही, पण काजवे मात्र चमकून गेले.

ट्रेक सुरू होतानाच प्रशांतने समोरच्या एका डोंगराकडे बोट करून असे तीन चार मोठे आणि तेवढेच लहान डोंगर चढायचे आणि उतरायचे आहेत, याची कल्पना दिली.

नंतर तो कुठे गर्दीत हरवला ते समजलंच नाही.

मग आम्ही चालायला सुरूवात केली. पहिल्याच मोठ्या आणि उंच डोंगराने चांगलंच थकवलं. अगदी धाप लागेस्तोवर… हा पहिलाच डोंगर पार करताना दोन वेळा थांबून पाणीही प्यावं लागलं. एकदा हा डोंगर सर करून पुढची सपाट वाट चालायला लागल्यावर मात्र काही वाटलं नाही. पण तोपर्यंत चांगलाच अंधार पडला होता. आणि आम्ही कात्रज बोगद्याच्या अगदी टॉपवर पोहोचलो होतो. दोन्ही बाजूंना बोगद्यात जाणारे वाहनांचे दिवे दिसत होते. थोडंसं पुढे गेल्यावर सगळी मंडळी (इतर स्पर्धक) एका ठिकाणी थांबलेली दिसली. का थांबलीत कुणीच सांगायला तयार नव्हतं. पुढे रस्ता आहे की नाही, याचीही कल्पना नव्हती.

पाऊसही सुरू झाला होता. समोरचं काही दिसत नव्हतं. धुकं आहे ढग याचाही अंदाज येत नव्हता. समोरचा माणूसही दिसणार असा अंधार आणि झोंबणारा थंड वारा… मग थोड्यावेळानंतर सगळं लख्ख दिसायला लागलं. डोंगरापलिकडंचं चमचमणारं पुणं स्पष्ट दिसायला लागलं. धुकं म्हणा किंवा ढग म्हणा, बाजूला झालं होतं. मग कळालं की सगळे थांबले होते, कारण एनईएफचे स्वयंसेवक एकावेळी एकालाच खाली सोडत होते. रस्ता अतिशय घसरणीचा होता.

पाय ठेवायचं तर सोडाच अगदी हात आणि ढोपर टेकवून सरकत सरकत पुढे जावं लागत होतं. मग थोडं ढोपरावर सरपटत गेल्यावर उभा राहून चालू शकण्याइतपत आत्मविश्वास आला आणि उढून चालायला सुरूवात केली.

मागे वळून पाहिलं तर काही बॅटऱ्यांचे प्रकाश वरून खाली येताना चमकत होते. तेव्हाच लक्षात आलं किती तीव्र उतार आहे आणि म्हणूनच एकावेळी एकालाच सोडणाऱ्या त्या स्वयंसेवकाचंही कौतुक वाटलं.

अजून किती चालायचंय माहिती नव्हतं. मागे पुढे एकमेकाला हाका मारत सगळे जवळपास मागे-पुढे असल्याची खात्री करत आमचं मार्गक्रमण सुरू होतं.

किती वाजलेत पाहावं तर घड्याळातलं काहीच दिसत नव्हतं. म्हणून मोबाईलमध्ये वेळ पाहिली. तब्बल साडे दहा वाजलेले.

तेव्हाच माझ्या मोबाईलमध्ये चांगला टॉर्च असल्याची जाणीव झाली, मग तिथून पुढचं मार्गक्रमण सोपं झालं, या टॉर्चच्या उजेडात. फक्त चढ अथवा उतार लागला किंवा पावसाचे थेंब सुरू झाले की मोबाईल बंद करून खिशात ठेवायला लागायचा. कारण चढणीवर आणि उतारावर दोन्ही हात मोकळे ठेवणं गरजेचं असायचं. अशावेळी डोक्यावर फिट केलेला हेडलॅम्प असणं किती गरजेचं आहे, याची जाणीव झाली. आमच्यापैकी फक्त मयुरेशकडे असा हेडलॅम्प होता.

मग एका प्लॅस्टिकच्या तंबूत काही स्वयंसेवक बसलेले दिसले. त्यांनी चौकशी केली. पण आमच्या अंगातही स्वयंसेवकांचा टी शर्ट असल्यामुळे आमचं तसं स्वागतच झालं. प्रत्येक तंबूत खायलाही मिळालं. एकेठिकाणी पाय मुरगळ्यामुळे एका तंबूत स्वयंसेवकाने रॅली स्प्रे मारून दिला. तेवढंच बरं वाटलं.

आम्ही या ट्रेकचे मीडिया पार्टनर असल्यामुळे स्रव पॉईन्टला शाही वागणूक मिळत होती. आम्हाला मिळत असलेल्या शाही वागणुकीचा फायदा घेत आम्ही प्रत्येक पॉईन्टला भरपूर विश्रांतीही घेत होतो. मयुरेशने ठरवलंच होतं की, आपण काही स्पर्धेत भाग घेतलेला नाही. मग भरपूर एन्जॉय करूयात, पोहोचूयात सकाळी सावकाश गडावर… आपल्याला फक्त ट्रेक पूर्ण करायचाय. स्पर्धा नाही.

आम्हाला तळजाई गार्डनवर पोहोचायला तब्बल चार वाजले. आधी वाटलं की तिथं थोडी विश्रांती घ्यायला मिळेल. किमान पाठ टाकायला तरी मिळेल. पण काहीच नाही. तिथे पोहोचल्यावर फक्त बसायला खुर्च्या मिळाल्या. प्रमुख संयोजक प्रसाद पुरंदरे यांच्याशी तिथेच भेट झाली. तशी सुरवातीला म्हणजे ट्रेक सुरू करताना त्यांची भेट झाली होती. रस्त्यात कुठे पाऊस लागला तर माझ्या स्पेक्ट्सला वायपर नाही, असं सांगून त्यांच्याकडून कॅप मिळवली होती. ती कायम डोक्यावर होती. प्रसाद पुरंदरे यांनी कॅप देतानाच काही उपयोग होणार नाही, असं बजावलं होतं. पण मला मात्र पाऊस सुरू झाल्यावर त्याचा बराच उपयोग झाला होता. कारण पावसाचं पाणी चष्म्यावर साचल्यावर समोरचं काहीच दिसत नाही. आधीच अंधार, त्यात चष्मा, आणि त्यावर साचलेलं पाणी म्हणजे दुष्काळात तेरावा महिना होऊ नये, एवढीच खबरदारी मला घ्यायची होती.

तळजाई गार्डनवर पोहोचल्यावर पुरंदरे यांच्या सहकाऱ्यांनी आम्हाला उकडलेली अंडी खायला दिली. आमच्याकडे ब्रेड आणि बिस्कीटे होतीच. गूळ-शेंगदाण्याची चिक्की आणि राजगिऱ्याचे लाडू सोबत घेतलेले होतेच. सगळं खाऊन मग पाणी पिल्यावर तिथेच झोपावसं वाटू लागलं. एव्हाना पाच वाजत आले होते.

तेवढ्यात प्रसाद पुरंदरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना आम्हाला चहा देण्याची सूचना केली. गरम गरम चहा घश्याखाली गेल्यावर तरतरी आली. डोळ्यावरची झोप उतरली. जरा बरं वाटलं. मग पुढे निघायचा निश्चय केला.

आम्ही तळजाई गार्डनवर थांबलेलो असताना तिथे एक टीम आली. त्यांचा एक प्रॉब्लेम झालेला.

त्यांच्यातल्या तीन जणांमध्ये दोन मुली एक मुलगा होता. तळजाई गार्डनला पोहोचल्यावर त्या मुलाला क्वीट करायचं होतं. टीममधल्या एकाने क्वीट करणं, म्हणजे संपूर्ण टीम बाद. पण मुलींचा उत्साह मात्र दांडगा होता, त्यांनी आपल्या सहकाऱ्याला खूप समजावलं, पण तो काही ऐकायलाच तयार नव्हता. मुलींना तर ट्रेक पूर्ण करायचा होता. मग तोडगा काय? स्पर्धेचे नियम तर अगदी काटेकोर, कुणाचाही सुटका नाही. दस्तुरखुद्द प्रसाद पुरंदरे यांनीही त्या मुलाला खूप समजावलं. पण तो ऐकायला तयारच नव्हता. त्याला सांगितलं की हा पॉईन्ट क्वीट करायचा नाहीच, इथून खाली म्हणजे सिंहगडाच्या पायथ्याला पोहोचेस्तोवर बाहेर जाण्याचा मार्गच नाही. पण तो मुलगा ऐकायलाच तयार नव्हता, त्या मुलींची पंचाईत झालेली. शेवटी संयोजकांनी निवाडा दिला. त्या मुलींना ट्रेक पूर्ण करण्याची परवानगी दिली. मात्र त्यांचा बक्षीसासाठी किंवा स्पर्धेसाठी विचार होणार नसल्याची त्यांना पूर्वकल्पना दिली.

हा एक चांगलाच अनुभव होता, आमच्या डोळ्यासमोर घडत असलेला… मुलींना ट्रेक पूर्ण करायचा होता, तर मुलाला क्वीट करायचं होतं.

तळजाई गार्डनपासून पुढे सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाणारा रस्ता हा खरा आव्हानात्मक ट्रेक होता. पाऊस पडल्यामुळे रस्ता अतिशय घसरणीचा. याच टप्प्यावर मी पुन्हा एकदा चांगलाच रपकलो. ढोपर सणकून आपटलं. मग पुढे पाय नीट विचार करून ग्रीप जमवून ठेवायला शिकलो, काही ठिकाणी रिस्क नको म्हणून चक्क ठोपार टेकवून घसरत जाण्याचा पर्याय निवडला. तळजाई गार्डन ते सिंहगड पायथा या टप्प्यानेच खऱ्या अर्थाने घाम काढला. हा टप्पा पार करत असतानाच सूर्य उगवला होता. चांगलं स्पष्ट दिसू लागलं होतं. पण फोनच्या बॅटरीने या ट्रेकमधून सर्वांच्या आधी क्वीट केलं. त्यामुळे कुणाला फोनही करता येत नव्हता की कुणाचा घेता येत नव्हता. फोटोही काढता आले नाहीत. रात्रभर फोनमधला टॉर्च सुरू असल्यामुळे स्टॅमिना संपलेल्या बॅटरीने ट्रेकमधून क्वीट करणंच पसंत केलं असावं.

सिंहगडाच्या पायथ्याला एका हॉटेलच्या बाकावर मंदार गोंजारी बसलेला दिसला. तो म्हणजे रात्री अडीच वाजताच इथे पोहोचला होता. आम्हाला मात्र सकाळचे साडेसहा वाजलेले. हा टप्पा संपल्यावर खूप बरं वाटलं.

पण सिंहगड अजून चढायचा होता. मयुरेशने सांगितलं सिंहगड चढल्याशिवाय ट्रेक पूर्ण होत नाही. तिथे प्रसाद पुरंदरे यांचे ज्येष्ठ बंधू अमृत पुरंदरे पहिल्या पायरीला स्वागताला सज्ज असतात. पण खरंच पुढे जाण्याएवढा स्टॅमिनाच शिल्लक नव्हता. तळजाई ते सिंहगड पायथा या टप्प्याने अगदी जीवच काढला होता.

शेवटी चहा पिऊन पुढचा रस्ता कापायचं ठरवलं. बराचवेळ ऑर्डर देऊनही चहा येत नाही, म्हणून हॉटेलवाल्याला विचारणा केली तर त्याने सांगितलं की दूध संपलंय, आणायला माणूस पाढवलाय. मग आणखी उशीर नको म्हणून आम्ही सिंहगड चढायचं ठरवलं.

मयुरेशने माहिती पुरवली की दररोज सिंहगड चढणारे काहीजण आहेत. ते अर्ध्या तासात सिंहगड चढतात. मला वाटलं मग आपणही तासाभरात सर करू शकू सिंहगड.

पण सिंहगडची वाट काही केल्या संपतच नव्हती. तब्बल तास-सव्वा तास झाल्यानंतर समोरून ट्रेक पूर्ण करून येणारे काहीजण भेटले, त्यांनी सांगितलं की अजून तासाभरापेक्षाही जास्त अंतर सर करायचं आहे. मग मात्र खरोखरच इथंच क्वीट करावं असं वाटलं. पण पायाचं चालणं नेटाने सुरूच होतं, काही झालं

तरी ट्रेक पूर्ण करायचाच होता.

रस्त्यात दोन ठिकाणी खाणं झालं, सोबत असलेलं, आणि एका ठिकाणी काकडी आणि अजून काय घेतलं ते आठवत नाही. पण नाश्ता उरकून आम्ही निघालो. सिंहगड चढत असताना एका नव्या मित्राशी ओळख झाली. हा मित्र इन्फोसिसमध्ये काम करत होता. शनिवार-रविवार सुटी म्हणून पायथ्यापासून सिंहगड चढायला आला होता. तो शेवटपर्यंत आमच्यासोबत होता. त्याच्याशी गप्पा मारत आम्ही पुढचं अंतर कापलं.

सिंहगड चढत असतानाच आम्हाला माहिती मिळाली की मंचरच्या टीमने हा ट्रेक रेकॉर्ड वेळेत म्हणजे रात्री पावणे दहालाच पूर्ण केला. आम्हाला फक्त आश्चर्यचकितच व्हायचं बाकी होतं. सायंकाळी सहा वाजता सुरू झालेला ट्रेक मंचरच्या पठ्ठ्यांनी फक्त पावणेचार तासात पूर्ण केला होता. खरंच त्यांच्या स्टॅमिन्याला दाद द्यावीशी वाटली.

तळजाई गार्डनवर प्रसाद पुरंदरे यांनाही आम्ही विचारलं की, त्यांनी हा ट्रेक कितीवेळा केलाय, त्याचं उत्तर आलं, मोजता येणार नाही इतक्यांदा… त्यांत त्यांनी असंही सांगितलं की त्यांनी एकट्यानेच एकदा हा ट्रेक पूर्ण केलाय. कात्रजच्या बोगद्यावरून पहाटे चार वाजता सुरूवात केलेली, तर सकाळी साताठच्या सुमारास ते तळजाई गार्डनला होते.

आम्हाला सिंहगडला पोहोचायला चक्क साडे नऊ वाजले. सिंहगडाच्या पायऱ्या सुरू झाल्यानंतर खरं तर पाय उचलून टाकणंही जीवावर आलं होतं. एकवेळ डोंगररांतली पायवाट परवडली पण या दगडी पायऱ्या नकोत, असं वाटायला लागलं. सिंहगडावर दाट धुकं साचलेलं. प्रचंड थंडी आणि बोचणारा वारा.

गडावर ठिकठिकाणी बाजूबाजूला हॉटेल्स आहेत. तिथली पिठलं भाकर आणि कांदा भजी हा संबंध पुणेकरांचा वीकपॉईन्ट…

आपणही एका हॉटेलात पोहोचावं आणि भरपूर हादाडावं असं वाटलं, पण मयुरेश आणि सचिन पुढे गेलेले ते काही दिसत नव्हते. मग आधी मंदार दिसला, त्याच्यासोबत तो इन्फोसिसवाला नवीन मित्रही होता. मग बाजूच्या एका हॉटेलातून आधी पोहोचलेल्या सर्व टीमचा गलका ऐकू आला.

ही सर्व मंडळी साडेचार वाजताच गडावर पोहोचली होती.

संदीप रामदासी, माणिक मुंढे, अभिजीत करंडे, प्रशांत कदम हे चारहीजण साडेचार वाजता गडावर पोहोचलेले. त्यातही अभिजीत करंडे आणि प्रशांत कदम या सातारकरांनी आमच्यासोबत सुरूवात करून सर्वात आधी गड सर केला होता. तसे मुंबईहून सगळे वेगवेगळे निघाले, पण भेट झाली ती सिंहगडावरच कांदाभजी आणि पिठलं भाकरी खातानाच.

आमचा ट्रेक पूर्ण झाला होता. सायंकाळी सात वाजल्यापासून पायांना विश्रांतीच नव्हती. मग भजी खाऊन झाल्यानंतर आपल्याला पाय आहेत, आणि ते प्रचंड दुखताहेत, याची जाणीव झाली. पण तोवर चहा पिऊन लगेच परतीचा प्रवास सुरूही झाला होता.

परतीच्या प्रवासासाठी टमटममध्ये बसल्यानंतर सर्वात आधी रात्रभर पायात असलेले कॅन्व्हासचे पूर्णपणे चिखल आणि पावसाच्या पाण्यात भिजलेले बूट पायाबाहेर काढले. आणि फ्लोटर्स घातले. तेव्हा पाय आहेत, याची पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणीव झाली. पण मुंबईला घरी परतण्याचे वेध सुरू झाले होते.

मग आधी स्वारगेट, तिथून पुणे स्टेशन, मग शिवनेरी आणि नेरूळ असं करत घरही गाठलं.

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Join the Conversation

8 Comments

  1. झक्कास अनुभव आणि वर्णन… ती रात्र तुमच्या पोस्टमधून उभी राहिली डोळ्यांसमोर….आम्हालाही करायचं आहे बुवा आता हे K 2 S ….पुढच्या वर्षी कळवळत तर बर होईल….

  2. झक्कास अनुभव आणि वर्णन… ती रात्र तुमच्या पोस्टमधून उभी राहिली डोळ्यांसमोर….आम्हालाही करायचं आहे बुवा आता हे K 2 S ….पुढच्या वर्षी कळवलत तर बर होईल….

  3. नक्की कळवू, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात असतो हा मान्सून ट्रेक अधिक माहिती साठी पुण्यात प्रसाद पुरंदरे यांच्याशी संपर्क साधावा त्यांची वेबसाईट आहे… http://enduro3.com/

  4. मेघराजजी , त्या साईट वर ते इंटर कॉलेज असल्याच लिहल आहे … मी कॉलेजमध्ये नाहीये..तरी संधी मिळू शकेल काय …

  5. देवेन्द्रजी, मलाही कल्पना नाही.. मी चौकशी करून कळवेन तुम्हाला… माझ्या माहितीप्रमाणे एक कॅटेगरी स्वतंत्र अशी आहे, पण तीन जणांचा ग्रुप मात्र हवाच

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: