मुंबईवर पुन्हा अतिरेकी हल्ला झाला. यावेळी अतिरेक्यांनी १३ जुलैचा बुधवार निवडला. तेरा तारखेवरून पुन्हा चर्चा सुरू झाल्या. कबुतरखाना दादर, ऑपेरा हाऊस आणि झवेरी बाजार परिसरात अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. टीव्ही वाहिन्यांवर ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या. व्हिज्युअल्ससाठी धावपळ… मग वेगवेगळ्या ठिकाणांहून प्रत्यक्षदर्शींचे फोनो इंटरव्ह्यू, बाईट्स, पोलीस अधिकारी, राजकारण्यांच्या भेटी, रिपोर्टर्सचे वॉक थ्रू… सगळं काही ओघानेच. बॉम्बस्फोटानंतरचा दिवस दिवस वेगवेगळ्या पत्रकार परिषदांचा, वेगवेगळी पत्रके जारी करण्याचा. पण, पत्रकार परिषदा आणि पत्रकबाजी यांच्याही बऱ्याच पलिकडे एक माध्यम पोहोचलं आणि प्रत्यक्ष मदतकार्यात सहभागी झालं, ते म्हणजे सोशल नेटवर्किंगचं. यावेळी पुन्हा फेसबुक आणि ट्विटरने बाजी मारली. त्यातही ट्विटर अधिक उजवं ठरलं. त्याला कारण टीव्हीवर स्फोटाचं ब्रेकिंग सुरू झाल्यावर लगेचच सगळ्यांनी आपापल्या आप्तस्वकीयांना फोनवर सुखरूप असल्याचं कळवायला सुरूवात केली. दुसर्या बाजूला मुंबईत असलेल्या मित्र-स्नेह्याची, नातेवाईकांच्या चौकशीसाठी देशभरातून फोन सुरू झाले. त्याचं पर्यवसान मोबाईल नेटवर्क ठप्प होण्यात झालं. स्फोटाच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर काही मिनिटांतच मोबाईल नेटवर्क बिझी झाले.
मग कुणाचेच फोन लागेनात, कुणाचेच फोन येईनात. अनेक मोबाईलने मान टाकली तरी एक पर्याय शिल्लक होता, फोनमधल्या इंटरनेटचा. मग लोकांनी ट्विटरवरून स्फोटांचे अपडेट द्यायला सुरूवात केली आणि मग ट्विटरवरून फोटो, मदतीसाठीचे फोन क्रमांक, पोलीस हेल्पलाईन, कंट्रोल रूम, वेगवेगळ्या हॉस्पिटलचे क्रमांक याची देवाणघेवाण सुरू झाली. कुणीही न सांगता mumbai blasts here 2 help, needhelp mumbai यासारख्या ट्रेन्डनी ट्विटरवर गर्दी केली. या हॅश टॅगमुळे नेका ट्विट शोधण्यास अनेकांना मदत झाली. फोन बंद झाले तरी कम्युनिकेशन सुरू राहिले. जे स्फोट झालेल्या ठिकाणी होते, त्यांनी ट्विटफोटो किंवा ट्विटपिकवरून फोटो पाठवायला सुरूवात केली. यामुळे स्फोटांची तीव्रता लक्षात आली. आता यामध्ये सोशल नेटवर्किंग साईटने केलेलं काम मोठं की, टीव्ही चॅनेल्सचं मोठं अशी चर्चाच गैरलागू आहे. टीव्ही वाहिन्यांचा प्रेक्षक हा घरांध्ये, ऑफिसमध्ये बसलेला असतो, तर ट्विटर, फेसबुकवरून स्फोटासारख्या घटनांचे अपडेट देणारा किंवा घेणारा नेटिझन घर, ऑफिस किंवा रस्त्यावर, ट्रेनमध्ये, बसमध्ये कुठेही असू शकतो. त्याच्या हातात त्याचा ङ्गोन असला की पुरे. त्यामुळे प्रत्यक्ष टीव्हीसमोर न बसताही त्याला अपडेट मिळू शकतात किंवा आपल्याकडे असलेले अपडेट तो संबंध जगाशी शेअर करू शकतो. टीव्ही वाहिन्या यामुळेच आपल्या प्रमोशनसाठी फेसबुक, ट्विटरचा वापर करतात. दोघांचा प्रेक्षक थोड्याफार फरकाने एकच असला तरी तो एकाचवेळी दोघांचा प्रेक्षक नसतो.
एका नेटिझन्सने उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीचा योग्य वापर करत, म्हणजेच इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सॉफ्टवेअर्सचा वापर करत गुगल स्प्रेडशीटचा वापर करून मुंबईतली महत्त्वाची हॉस्पिटल्स, तिथे उपचार घेत असलेल्या जखमींची नावे, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची नावे, हॉस्पिटलचे क्रमांक, कोणत्या रक्तगटाची कुठे आवश्यकता आहे, अशी सर्व माहिती एकत्र संकलित करून इंटरनेटवर सर्वांसाठी खुली केली. या स्प्रेडशीटचा अनेकांनी उपयोग केला, तर ज्यांना उपयोग नाही त्यांनी ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे स्प्रेडशीट तयार केलं, तो मुंबईचा रहिवासी नसलेल्या नेटिझनने, माणुसकीचं आणि सौहार्द्राचं यापेक्षा चांगलं उदाहरण कोणतं. दिल्लीचा रहिवासी असलेल्या नितीन सागर या नेटिझनने हे मुंबई हेल्प स्प्रेडशीट तयार केलं. देशभरातल्या वेगवेगळ्या वेबसाईट्ससह लाखो नेटिझन्सनी त्यात भर टाकली, त्याचा प्रसार केला. मुंबई हेल्प या ब्लॉगनेही मुंबईतील स्फोटानंतर वेगवेगळ्या प्रकारची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायला मदत केली, त्यामध्ये हॉस्पिटलचे क्रमांक, पोलीस कंट्रोल रूमचे क्रमांक याचा समावेश होता. एरवी कधी कुणाबरोबर आपले फोन नंबर शेअर न करणार्या मुंबईकरांनी यावेळी आपापले फोन नंबर देऊन मदतीसाठी उपलब्ध असल्याचं सर्व मुंबईला कळवलं. अनेकांनी जेवण कुठे पोहोचवायचंय, तर आपला रक्तगट सांगून या रक्ताची कुठे गरज आहे, आपल्याकडे गाडी आहे, कुणाला कुठून लिफ्ट हवी आहे, अशी विचारणाही केली.
एका बहुराष्ट्रीय कंपनीने आपलं मुंबईतलं गेस्ट हाऊस लोकांच्या मदतीसाठी खुलं करून तसं ट्विटरवर कळवून टाकलं. ज्यावेळी टीव्ही चॅनेल्स स्फोट, त्यामुळे झालेली हानी, मृतांची नावे, जखमींची नावे, त्यांचा आकडा आणि स्फोटासंदर्भातल्या लोकांच्या प्रतिक्रिया प्रसारित करत होत्या, नेक्या त्याचवेळी बिनचेहर्याचे कितीतरी जण ऑफिसमधून, घरातून किंवा आपल्या मोबाईलमधून इंटरनेट ऍक्सेस करून मुंबईकरांना मदतीचा हात देत होती. ही मदत माहितीची होती, वेगवेगळ्या उपयुक्त क्रमांकांची होती, रक्तासंदर्भातल्या मदतीची होती, जेवणाचे डबे उपलब्ध असण्याविषयीची होती आणि हे सर्व होत होतं सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून… ट्विटर, फेसबुकसारख्या साईट्सच्या माध्यमातून. प्रत्यक्ष मदत देण्याबरोबरच दिलासा किंवा फेक्त सोबत असल्याची भावनाही अनेकदा महत्त्वाची ठरते. नेहमीच्या पद्धतीने आपापल्या घरात किंवा कामाच्या ठिकामी बसून सेलिब्रिटींनी हे कर्तव्य पार पाडलं. अमिताभ बच्चनपासून कित्येक लहानमोठ्या सेलिब्रिटींनी मुंबईतल्या ब्लास्टविषयी समजल्याबरोबर लोकांना घाबरून न जाण्याचं, आपापल्या घरात थांबण्याचं आवाहन केलं. ट्विटिंग ही या सेलिब्रिटींची मानसिक गरज असली, तरी अशा वेळी कसलंही पॅनिक न करता त्यांनी बजावलेली भूमिका महत्त्वाचीच ठरते. मुंबईवर बुधवारी झालेला हल्ला हा गेल्या वीस वर्षातला तेरावा अतिरेकी हल्ला होता. आधी रस्त्यावरची ट्रॅफिक, नंतर फोनलाईन्स जाम झाल्यानंतर या मुंबईकरांनी किंवा एकूनच देशवासियांनी स्तब्ध बसून न राहता, अनामिक राहून आणि प्रसिद्धीच्या झोतात न येता एकमेकांबरोबर माहिती शेअर करुन महत्त्वाचं काम केलं. म्हणजे जगात कुठेही असलो तरी आपण एकटे नसतो, एकाच वेळी जगातल्या लाखो कोट्यवधी लोकांशी जोडलेले असतो, ही भावनाच किती महत्त्वाची… सोशल नेटवर्किंग म्हणजे यापेक्षा वेगळं काय असतं…
(कृषिवल – 19/07/2011)
MALA TUMAI LIHALELELE SARV BLOG AVADATAHA ANI TE ME NEHAMI VACHAT ASATO THANKU
धन्यवाद, सुशांत