या विश्वातला प्रत्येक माणूस म्हणजे एक स्टोरी आहे.. त्याचं जगणं, त्याचं विचार करणं, त्यानंतर त्याचा संघर्ष, त्यातलं नाट्य सर्व काही भन्नाट आणि जगावेगळं, विलक्षण… फक्त आपण ते कधी समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही, कारण सब घोडे बारा टक्के, ही आपली शिकवण…
प्रचंड अशा दणकट असलेल्या या माणूस नावाच्या स्टोर्या काही अभिव्यक्त होतात, तरी काही तशाच व्यक्त न होताच गर्दीत मिसळून जातात, हरवतात, मागे पडतात, संपतात… तर त्याच्या उलट काही अभिव्यक्त झाल्यामुळे त्याची महाकाव्ये बनतात, रामायण-महाभारत असो की आपले सगळे असले-नसलेले आदर्श, या सर्व अशा व्यक्त झालेली माणसंच आहेत.
प्रत्येक माणूस ही एक स्वतंत्र स्टोरी आहे, म्हणून त्याला अभिव्यक्त होण्याची गरज आहे, याची खात्री पटल्यानंतरच ऑर्कुट, फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साईटचा जन्म झाला. त्यांचा प्रसार झाला. एकूणच पत्रकारिता काय किंवा सर्वच प्रसारमाध्यमे काय, ही अभिव्यक्तीची साधने. त्यामध्ये काम करण्यासाठी आताशा पत्रकारितेची पदवी किंवा पदविका किंवा त्यासंदर्भातलं कुठलंही औपचारिक शिक्षण अनिवार्य मानलं जातं. पण, हे शिक्षण नसतानाही फक्त अभिव्यक्त होता येणं ही पात्रता मानत आपल्याकडे मीडियात काम करण्याची संधी मिळत नाही. म्हणून मग मत मांडण्याच्या अभिजात गरजेतून ब्लॉगचा जन्म झाला. ब्लॉगचा जन्म हा काही फार जुना इतिहासकालीन वगैरे अजिबात नाही. विकीपीडियाच्या नोंदीनुसार ब्लॉगचं विस्तारीत नाव म्हणजे, ‘वेब ब्लॉग.’ हा शब्दप्रयोग पहिल्यांदा झाला तो दिवस म्हणजे १७ डिसेंबर १९९७. त्याचं संक्षिप्त रूप ब्लॉग… आपण वेबसाईटला जसं फक्त साईट म्हणायला लागलोत तसं…अमेरिकन ब्लॉगर जॉर्न वर्जर यांनी पहिल्यांदा वेब ब्लॉग हा शब्ध वापरला. त्याचा अर्थ त्यांनीच स्पष्ट केला तो असा, वेबसाईटवर दररोज लिहिलेली डायरी.. वेबवरील नियमित लॉग… १९९७ पासून आतापर्यंत म्हणजे फक्त १४ वर्षात तब्बल १५६ मिलियन म्हणजे पंधरा कोटी साठ लाख ब्लॉग प्रकाशित झालेत. वेब लॉगिंगचं ब्लॉग असं बारसं होण्यापूर्वीही ब्लॉगर होतेच, त्याचं काम नियमित सुरूच होतं. तशी सुरूवात पाहायची तर १९९० पर्यंत जावं लागतं. पहिला नियमित ब्लॉग १९९४ मध्ये तयार झाल्याची विकीपीडियाची नोंद आहे. या ब्लॉगरचं नाव जस्टीन हॉल. आज ब्लॉगची ताकद एवढी प्रचंड झालीय, याकडे एक अभिव्यक्तीचं प्रभावी साधन म्हणून पाहिलं जातंय. अनेक बंडखोरांना त्यातून आपलं मत मांडण्याचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. प्रकाशन व्यवसायाची एक स्वतंत्र समांतर व्यवस्था या ब्लॉगने निर्माण केलीय. आपल्याकडे ब्लॉगर्सनी विशेष काही कर्तृत्व अद्याप गाजवलं नसलं तरी पाश्चिमात्य देशांमध्ये मात्र ब्लॉगर्सनी लोकमत घडवण्यात मोठा वाटा उचललाय. आपल्याकडे ब्लॉगचं पेजरसारखं झालंय. मोबाईल फोन येण्यापूर्वी पेजर असायचे. फक्त एकमार्गी संवाद करणारं छोटसं यंत्र. त्याचा पुरेसा वापर होण्यापूर्वीच आपल्याकडे मोबाईल दाखल झाला आणि पेजर कुठे लुप्त झाला ते कळलंही नाही. कारण कम्युनिकेशन ही गरज होती, आणि कम्युनिकेशनचं कोणतंही मॉडेल असू दे दोन्ही बाजूंनी संवाद साधण्याची सोय नसेल तर मागे पडतं. तसंच ब्लॉगच्या बाबतीत म्हणता येईल. ब्लॉगचा पूर्ण प्रसार होण्यापूर्वीच ऑर्कुट लोकप्रिय झालं, आणि ब्लॉग हा प्रकार तितकासा रूळला नाही, मग लगेच फेसबुक आणि ट्विटर…
प्रत्येक माणूस ही एक स्टोरी असणं, त्याच्याकडे मतपेटीत किंवा मतदानयंत्रावर बटण दाबण्यापलिकडे व्यक्त करण्यासाठी मत असणं यातूनच मग व्यापक ब्लॉगर्स आणि त्यांच्या राजकीय-सामाजिक दबावगटाची मोहीम जगभर सुरू झाली, विशेषतः पाश्चिमात्य देशात. अमेरिकेसारख्या देशात अध्यक्षीय निवडणुकीच्या काळात हे ब्लॉगर्स आणि त्यांचे दबावगट प्रचंड आक्रमक आणि कार्यशील होतात. वेगवेगळी मते मांडतात, या मतांशी सहमती दर्शवण्याची किंवा असहमती दर्शवण्याची सोय त्यांच्या वाचकांना असतेच. कारण या ब्लॉगना ना कुणी संपादक, ना कुणी प्रकाशक. सर्वकाही स्वयंभू… या ब्लॉगर्सची हीच ताकद आणि क्षमता वापरून हफिंग्टन पोस्टसारखी ब्लॉगरसाईट तयार झाली. सर्वांना अभिव्यक्त होण्याची समान संधी. एकच सूत्र… माहितीचा महासागरच. कारण प्रत्येकाकडे काहीतरी सांगण्यासारखं, प्रत्येकाला हवं असलेलं दुसर्याकडे काहीतरी आहे. नाही आवडलं तर द्या सोडून, पुन्हा शोधा, काहीतरी लागतंच हाताला, गुगलच्या जंजाळात.
ब्लॉगच्या क्षमतेचा वापर करत हफिंग्टन पोस्ट या अमेरिकन स्वतंत्र वेबसाईटने ‘ऑफ द बस’ या नावाने एक मोहीम सुरू केलीय. निमित्त आहे, २०१२ सालच्या अध्यक्षीय निवडणुकाचं. तसं पाहिलं तर हा प्रकार सिटीझन जर्नलिस्टसारखा. आपल्याकडे काही न्यूज चॅनेल्सनी सटीझन जर्नालिस्ट ही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न केलाय, पण अजून त्यांनाही बराच पल्ला गाठायचाय. हफिंग्टन पोस्टने २००८ च्या अध्यक्षीय निवडणुकीतही ऑफ द बस ही संकल्पना राबवली होती. हफिंग्टन पोस्टच्या मते, सध्या मीडिया प्रचंड आक्रमक आहे. वेगवेगळ्या भूमिका स्वतःच वठवत आहे. म्हणजे आपल्याकडेही मीडियाच्या बाबतीत असंच म्हणतात. थोडक्यात काय तर अमेरिकेत यापेक्षा परिस्थिती नाही. मग मीडियाबद्धलची नाराजी कुठे व्यक्त करायची. त्यांनी दिलेल्या बातम्या, किंवा विश्लेषण यापेक्षा वेगळं मत असेल तर कुठे मांडायचं… तसं पाहिलं तर वृत्तपत्रांमध्ये वाचकांची पत्रे लिहिण्यासाठी जागा असते, पण ती एकूण वृत्तपत्र व्यवहाराच्या तुलनेत अतिशय तोकडी. पुन्हा बरीच पत्रे ही नागरी समस्यांशी संबंधित आणि एखाद्या वृत्तपत्राने घेतलेल्या भूमिकेपेक्षा विरोधी मत असेल तर त्याला किती जागा मिळेल, यावरही पुन्हा प्रश्नचिन्ह. यामुळेच सिटीझन जर्नालिस्ट ही संकल्पना पाश्चिमात्य देशात रूजली. हफिंग्टन पोस्टने त्याला आगामी अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक नवा आयाम दिलाय. ही घटना तशी ऑनलाईन किंवा सोशल नेटवर्किंगमधली एक प्रमुख घटना म्हणूनच पाहायला हवी.
आपल्याकडेही ऑफ द बस या संकल्पनेची भारतीय आवृत्ती येईलच कधीतरी, तंत्रज्ञानाचा रेटा जबरदस्त आहे, त्यामुळे संकल्पना लगेच येईल. फक्त भारतात अजून तरी ब्लॉगर्सनी चमकदार कामगिरी केलेली नाही, कारण भारतीयांची पचनशक्ती अफाट आहे. भारतीय जनमानस कसलंही मतं असू देत, त्याचं व्यवस्थित पचन करतं. कुणालाही पत्तासुद्धा लागणार नाही, अशा खुबीने… नंतर मग पुतळे उभे करण्याची सोय होते, एकदा एखादा माणूस, त्याचा विचार किंवा त्याची स्टोरी पचवली की…
(दै. कृषिवलमध्ये प्रकाशित)