आज आषाढी एकादशी. पंचागाप्रमाणे देवशयनी एकादशी… म्हणजेच मोठी एकादशी… संबंध महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून मोठ्या संख्येनं भाविक पंढरपुरात दाखल होतात.
विठ्ठल रखुमाईकडे अब्जावधींचा सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा खजिना असल्याचं अलीकडेच उघड झालं असलं तरी विठ्ठल हा तसा गरीबांचा देव. सगळे वारकरी हे शेतकरी किंवा शेतमजूर…
वारी हे तर महाराष्ट्राचं एक अंगभूत वैशिष्ट्य… महाराष्ट्रात सर्वात जास्त ग्लॅमर मिळालंय ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालख्यांना.. कदाचित या पालख्या पुणे जिल्ह्यातून निघत असाव्यात आणि पुण्यात दोन दिवस मुक्काम करत असाव्यात म्हणून असेल… कदाचित. सबंध महाराष्ट्राला वारी म्हटलं की आळंदी-देहू ते पंढरपूर एवढंच चटकन नजरेसमोर उभं राहतं. पण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून पालख्या निघतात, कोकणातून, खानदेशातून, विदर्भातून, मराठवाड्यातून… सर्व महाराष्ट्रातील पालख्या आणि दिंड्या भक्ति संप्रदायातील ज्येष्ठ संतानींच सुरू केल्यात. पण आळंदी-देहू एवढी चर्चा कुणाचीच होत नाही.
वारी हे महाराष्ट्राचं एकमेव सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे, इतिहासकार असा दाखला देतात, की लोकमान्य टिळकांनी समाज जागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांचे समकालीन असलेल्या भागवत शास्त्रींनी त्यांना गणेशोत्सव सुरू करू नये असा सल्ला दिला होता. कारण महाराष्ट्रांचं सांस्कृतिक वैशिष्ट्यं हे गणेशोत्सव नसून देहू आळंदीहून निघणारी विठोबाची वारी असल्याची भूमिका होती.. वारीचा सातशे वर्षांचा इतिहास वगैरे आता अनेक ठिकाणी शब्दबद्ध आणि ग्रंथबद्ध झालाय. त्यावर अनेकांनी पीएचड्या मिळवल्या असतील.
वारीमधील शिस्त, व्यवस्थापन हा अनेक देशी-विदेशी अभ्यासकांच्या कुतूहलाचा विषय आहे. वारीमध्ये जमणाऱ्या लोकसमुदायामुळे वारीकडे कॉर्पोरेट जगतही खास लक्ष पुरवतंय.
पंढरपूरच्या वारीसाठी मी पहिल्यांदा गेलो, तेव्हा साल होतं… 2001.. तेव्हा मी पायी चालणाऱ्या वारीमध्ये सहभागी नव्हतो. तर हैदराबादून थेट पंढरपुरात दाखल झालो होतो. ते ईटीव्ही मराठीचा पहिला लाईव्ह इव्हेंट.. फक्त त्यावेळी वारीला इव्हेंट म्हणतात, हे मात्र माहिती नव्हतं..
दरवर्षी वारी टीव्ही वाहिन्यांवर यायची, दरवर्षी नित्यनियमाने. वारी म्हणजे एक ओबी व्हॅन सोबत जाणार, वारीचा सगळा प्रवास कव्हर करण्यासाठी एक खास प्रतिनिधी, दररोजचं लाईव्ह… ईटीव्हीत असताना एकदा ठरवलं की फक्त आळंदी-देहूतून निघणाऱ्या पालख्याच का कव्हर करायच्या. महाराष्ट्रातील इतर संतांच्या पालख्याचं काय. म्हणून मग वेगवेगळ्या ठिकाणाहून निघणाऱ्या पालख्यांसोबत एक खास प्रतिनिधी पाठवायचं ठरवलं. मग शेगावहून निघणाऱ्या संत गजानन महाराजांच्या पालखीसोबत, त्र्यंबकहून निघणाऱ्या निवृत्तीनाथांच्या पालखीसोबत, पैठणहून नाथांच्या पालखीसोबत, मुक्ताईनगरहून निघणाऱ्या मुक्ताबाईच्या पालखीसोबत, हिंगोलीतून निघणाऱ्या संत नामदेव महाराजांच्या पालखीसोबत असा एकेक रिपोर्टर पाठवण्याचा निर्णय झाला. एक सर्वसमावेश अशी पालखी परंपरा महाराष्ट्राला दाखवता आली. पण पंढरपूरला कधी जाणं जमलंच नाही.
वारी कव्हर करणारे टीव्ही रिपोर्टर क्वचितच वारीसोबत चालतात. त्यांच्यासाठी वारीचे काही खास टप्पे ठरलेले असतात. म्हणजे पालख्याचं देहू आळंदीतून निघणं, मग पुण्यात प्रवेश, मग दिवेघाट, सासवड, जेजुरीत पालखी भंडाऱ्यात न्हाऊन निघणं (जेजुरीत अंधार पडायच्या आत पोहोचता आलं तरच) आणि मग वेगवेगळे रिंगणं, तसं तुकाराम महाराजांच्या पालखीत ही रोटीघाट आणि वेगवेगळी रिंगणं… ही कव्हर करून आलं की टीव्ही रिपोर्टरची वारी संपते. मध्ये मध्ये काही स्पेशल स्टोरीज, साईड स्टोरीज… वारीत चालल्याचा फील टीव्ही रिपोर्टरला अभावानेच मिळतो. ई टीव्हीत असताना एकेवर्षी पुण्याचा प्रतिनिधी स्वप्नील बापटला हडपसरपासून दिवेघाट चढून जायला लावलं होतं. मला असं वाटतं होतं की रिपोर्टरने वारीमध्ये चालल्याशिवाय त्याच्या स्क्रीप्टमध्ये वारी उतरणार नाही.
पंढरपूर वारीला जाण्याचा योग आला तो, थेट स्टार माझामध्ये आल्यावर… तब्बल दोन वर्षांनी.. म्हणजे गेल्यावर्षी…
वारी हा आता इव्हेंट झाला होता. सर्वमान्य इव्हेंट..
यावेळी मी वारीत सहभागी होतो. पण टीव्ही रिपोर्टरच्या पद्धतीने म्हणजे काही महत्वाचे टप्पेच… तसं यावेळी माझ्याकडे खास कार्यक्रमाची जबाबदारी होती. अभिनेता समीर पाटील सोबत बैलगाडीतून ही वारी करायची होती, वारीसाठी नवीन काहीतरी करायचं होतं. यापूर्वी विधानसभेची वारी केलीच होती. आता पुन्हा एसटी बस घेऊन वारीला निघण्याचा विचारही झाला, मात्र वारीतली एकूण गर्दी, वाहतुकीची संभाव्य कोंडी यामुळे एसटी बस घेऊन पंढरपूरला जाण्याची आयडिया रद्द करावी लागली. मग विचार आला बैलगाडीतून का जाऊ नये. पण एकच एक बैलगाडी सुरवातीपासून शेवटपर्यंत घेऊन जाणं, तसं अव्यवहार्य म्हणजे इम्प्रॅक्टिकल होतं. म्हणून पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी बैलगाड्या वापरायचं ठरवलं.
हा कार्यक्रम तर छान झाला होता. त्याला प्रेक्षकांचा प्रतिसादही चांगला मिळाला. आमची वारी, पालख्या पंढरपुरात पोहोचायच्या अगोदर तब्बल तीन दिवस पंढरपुरात पोहोचली. थांबायचं सर्व पत्रकाराचं एकच ठिकाण गांधी बंधूंचं हॉटेल ऐश्वर्या…
पंढरपुरात आधी तीन दिवस पोहोचल्यामुळे विठ्ठलाचं तब्बल तीनवेळा अतिशय जवळून दर्शन घेता आलं. अर्थातच बारी मोडून…
दोन-तीन राज्यातून येणारे वारकरी आणि पालख्या यासाठी पंढरपूर चांगलं महिनाभर आधीपासून सज्ज होतं. बसगाड्यांसाठी खास स्थानक, यात्रा शेड, पत्रा शेड, त्यांचे बॅरीकेट्स… असा सगळा मंदिर परिसर… वारकऱ्यांसाठी सज्ज होतो. पण वारीच्या काळात काही व्यापारी आणि मानकरी पुजारी सोडले तर मूळ पंढरपूर कुठेच नसतं. सगळे पंढरपूरकर आपापली घरे वारकऱ्यांसाठी सोडून बाहेरगावी निघून जातात. फक्त जाताना घरातली शौचालये मात्र बंदच ठेवतात… अशी माहिती पंढरपुरातल्या एका ज्येष्ठ मानकऱ्यानेच दिली. आम्हाला वारीच्या काळात पंढरपूर सर्वाधिक घाण का होतं, आणि वारीनंतर जोपर्यंत मोठा पाऊस येत नाही, तोपर्यंत सगळं पंढरपूर बकाल हा होतं, याचं उत्तर मिळालं. पालख्या आणि वारकरी पंढरपुरातून निघून गेल्यानंतर एकेक पंढरपूरकर परतायला लागतात. त्यातही सगळ्यात आधी परततात ते डॉक्टर मंडळी, कारण वारीनंतर पसरणाऱ्या साथीच्या रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांचीच आवश्यकता असते.
शासकीय महापूजेच्या आधीच्या रात्री आम्ही सहज म्हणून पंढरपूरचा फेरफटका मारायला निघालो. एकादशीच्या अगोदर दोनेक दिवस पंढरपूर झोपत नाही. तशी न झोपणारं शहर म्हणून आजवर फक्त मुंबईचीच माहिती होती. पंढरपूर वारीच्या अगोदर असंच असतं. सगळे हौशे नवसे गवसे या रात्री जागी असतात. कोणीतरी म्हटलं दर्शनरांग कुठेपर्यंत आलीय, ते पाहूया… मग आमचा मोर्चा गोपाळपूरडकडे वळाला. एकादशीच्या आधीच्या दिवशीच दर्शन रांग इंजिनीयरिंग कॉलेजपर्यंत पोहोचली होती.
जिथे दरवर्षी दर्शन रांग बारी पोहोचते, तिथेपर्यंतच बॅरीकेटिंग होतं. म्हणजे यावेळी गर्दी खूप जास्त होती. वरून पाऊसही येत होता. सगळीकडे किचकिच… लोकं सातत्याने दर्शन रांगेत नंबर लावायला येतच होते. पोलीस होतेच, पण बॅरीकेटिंग संपल्यानंतर दर्शनरांग बरीच विस्कळीत होती. सहज विचार केला, या लोकांना कधी दर्शन मिळणार, स्थानिक पत्रकारांनी सांगितलं माहिती पुरवली, किमान 26 ते 30 तास लागतील. मिनिटाला पन्नास ते साठ भाविकांना दर्शन मिळतं. तरीही एवढा वेळ. आम्ही थांबलो तेव्हा रांग तसूभरही पुढे सरकत नव्हती. पत्राशेडपर्यंत ही रांग, म्हणजे पावसात भिजणं अपरिहार्य. त्यानंतर पत्राशेड… तब्बल पाच.. त्यामध्ये नागमोडी वेटोळ्यासारखी दर्शनरांग खेळवली जाते. फक्त पाऊस लागत नाही, एवढंच काय ते सुख. त्यानंतर दर्शन मंडप, हा तब्बल आठमजली. एक मजल्याचा एक फेरा चारशे मीटरचा. पुन्हा हा फेरा वरून खाली जाणार आणि पुन्हा वरून खाली, असा चक्राकार… म्हणजे आधी किमान पाच ते बारा तास रांगेत असलेला वारकरी तब्बल आठमजल्यांची बिल्डिंग आठ वेळा चढतो आणि उतरतो, तेव्हा कुठे तो नामदेव पायरीजवळ पोहोचतो.
हा सगळा खटाटोप समजून घेतल्यानंतर या दर्शनरांगेतला प्रत्येक भाविक, ज्याला आपल्याला दर्शन कधी मिळेल, याची काहीच शाश्वती नसते, त्याचे पाय धरावे वाटले, सर्वात महत्वाचं म्हणजे आपण तीनवेळा रांगेशिवाय व्हीआयपी म्हणून मध्येच घुसून दर्शन घेतलं याची लाच वाटली, प्रचंड अपराधी वाटलं. देवाचं दर्शन घेतल्याचा मनस्वी राग आला. कुणीही व्हीआयपी रांग मोडून जेव्हा दर्शनासाठी घुसतो, फक्त मिनीट अर्धा मिनिटभर दर्शन घेतो, तेव्हा रांगेतल्या शेवटच्या माणसाची प्रतिक्षा तब्बल तासाभराने वाढते. तरीही व्हीआयपी दर्शन किंवा घुसखोरीचं दर्शन काही थांबत नाही.
हा मनस्वी संताप अनावर झाल्यावर मंदिर समितीच्या एका सदस्याला रात्री दोन वाजता फोन केला, किती वाजलेत, याची माहिती त्याला फोनवर दिली, रांग कुठपर्यंत आलीय, याची माहिती दिली. रांग कशी विस्कळीत होतेय, तसंच व्हीआयपी किंवा इतर चोर दर्शनाने रांगेचं गणित कसं बिघडतं, याचा संताप जमेल त्या भाषेत व्यक्त केला. आणि फोन ठेऊन दिला. काही तरी फरक पडेल असं वाटलं…
पण पुन्हा दर्शन रांगेतले पांडुरंगाच्या एका दर्शनासाठी तिष्ठत बसलेल्या वारकऱ्यांना दिवसा उजेडी पाहण्याचं धाडस काही झालं नाही. पण एकादशीची महापूजा संपल्यानंतरही सहज म्हणून चक्कर टाकली तेव्हा दर्शन मंडप फुल्ल होता, पत्रा शेडही आणि दर्शन रांग फक्त गोपाळपूरच्या ओढ्यापर्यंत…. खरं तर पुंडलिकासाठी स्वर्गातून पंढरपूरला आलेला देव या व्हीआयपी भक्तांना सोडून गोपाळपूरपर्यंत का येत नाही, असा प्रश्न अनुत्तरीत ठेऊन परतीचा प्रवास सुरू केला.
shriram……
jay hari …..