एका भाषणाचा प्रवास…

म्यानमारच्या लष्करी राजवटीविरूद्ध एक महिला तब्बल तेवीस वर्षांपासून लढा देतेय. तिला अनेकदा तुरूंगवास झाला तर कित्येक वर्षे ती आपल्याच घरात नजरकैदेत होती. तिला नोबेल पुरस्कारही मिळालाय. तिचं नाव आंग सान स्यू की. नाव सगळ्यांना तोंडपाठ असेल. पण गेल्या आठवड्यात एक महत्त्वाची घटना झाली.

ही घटना संबंधित आहे, तिच्या एका भाषणाशी. म्हणजे तिने एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि नावाजलेल्या व्याख्यानमालेत आपलं भाषण दिलं. ही व्याख्यानमाला आहे बीबीसीची. रीथ व्याखानमाला तिचं नाव. रीथ म्हणजे लॉर्ड जॉन रीथ, बीबीसीचे पहिले व्यवस्थापकीय संचालक… दरवर्षी जगातल्या महत्त्वाच्या तज्ज्ञाला किंवा जाणकाराला या रीथ यांच्या स्मरणार्थ चालवल्या जाणार्या व्याख्यानासाठी आमंत्रित केलं जातं आणि नंतर बीबीसी ४ या रेडिओ चॅनेलवरून या व्याख्यानाचं प्रसारण केलं जातं. खरं तर या अत्यंत महत्त्वाच्या व्याख्यानमालेसाठी आमंत्रण मिळणं म्हणजे एक बहुमानच असतो.

रीथ व्याख्यानमालेत पहिलं व्याख्यान दिलं ते जगप्रसिद्ध तत्त्ववेत्ते बरट्रँड रसेल यांनी १९४८ मध्ये. आजपर्यंत फक्त १९९२ चा अपवाद वगळता प्रत्येक वर्षी रीथ व्याख्यानमालेतलं पुष्प गुंफलं गेलंय. २००३ साली एका भारतीयाला म्हणजे व्ही.एस. रामचंद्रन यांना रीथ व्याख्यानमालेत बोलण्याची संधी मिळाली. तशी पर्यावरण तज्ज्ञ वंदना शिवा यांनाही एकदा संधी मिळालीय, पण त्यांच्यासोबत इतरही काहीजण होते. सर्व आपापल्या देशातले ख्यातनाम.

आता रीथ व्याखानमालेसंदर्भात लिहायचं नाहीच आहे, पण यावर्षीच्या व्याखानमालेत आमंत्रित करण्यात आलं होतं, म्यानमारच्या आंग सान स्यू की यांना. पण त्यांना तिथल्या लष्करी राजवटीमुळे लंडनला पोहोचताच आलं नाही. मग बीबीसीने म्यानमारमध्येच त्यांचं भाषण रेकॉर्ड करून ते बीबीसीच्या मुख्यालयापर्यंत पोहोचवण्यात आलं. तसं पाहिलं तर चोरट्या मार्गाने म्हणजे स्मगल्ड करून हे भाषण म्यानमारमधून बाहेर काढण्यात आलं आणि या व्याख्यानानंतरच्या निमंत्रित श्रोत्यांसाठीच्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात स्यू की यांनी भाग घेतला तोही म्यानमानमधल्याच अज्ञात ठिकाणाहून…

आपल्या भाषणात त्यांनी सर्वात महत्त्वाचा मुद्दा मांडला तो कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये झालेल्या क्रांतीचा. कारण या क्रांतीमुळेच ट्यूनिशियासह इतर अरब देशांमध्ये सत्तापालट झाली. म्यानमारमध्ये गेल्या २३ वर्षांपासून तिथल्या लष्करी राजवटीबरोबर लोकशाही आणि मानवी हक्कांसाठी लढा देत असलेल्या असलेल्या स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमॉक्रॅसी पक्षाला अजून यश का येत नाही, यावर त्यांनी बराच उहापोह केला. त्यांच्यामते म्यानमारमध्ये काय होतंय, हे जगाला कळतच नाही.

अगदी अलीकडे म्हणजे याच आठवड्यात टाईम मॅगेझिनने जगाला कलाटणी देणार्या दहा आंदोलनांची यादी निश्चित केलीय. त्यामध्ये अमेरिकेच्या बोस्टन टी पार्टीनंतर बापूजींच्या दांडी यात्रेचा आणि मिठाच्या सत्याग्रहाचा समावेश केलाय. एवढ्यापुरतीच आपण या बातमीची दखल घेतली. पण त्यामध्ये १९८९ मध्ये चीनमध्ये झालेली तीआनमेन चौकातली निदर्शनेही होती. तसंच सर्वात शेवटच्या क्रमांकावर म्हणजे दहाव्या स्थानावर इजिप्तमध्ये होस्नी मुबारक यांची राजवट उलथवण्यासाठी झालेल्या निदर्शनांचा समावेश होता. ही क्रांती पूर्णपणे फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंगमुळे पसरली होती, संपूर्ण इजिप्तभर व्यापली होती. एवढंच नाही तर पुढे अनेक अरब देशांमध्ये त्याचं लोण पसरलं.

आंग सान स्यू की यांनी ट्यूनिशियाध्ये यशस्वी झालेली क्रांती आणि म्यानमारमध्ये गेल्या तेवीस वर्षांपासून सुरू असलेला लढा यातला नेमका फरक सांगितला. त्यांच्यामते कम्युनिकेशन क्रांतीमुळेच ट्यूनिशियातली क्रांती यशस्वी झाली. म्यानमारमध्ये कदाचित ट्यूनिशियापेक्षाही जास्त अत्याचार झाले असतील, जास्त बळी गेले असतील, पण ते कधी जगापुढे आलंच नाही. कारण तिथल्या लष्करशहांनी ही कम्युनिकेशन क्रांती म्यानमारमध्ये पोहोचू दिलेली नाही. चीन सरकारनेही यावेळी शांततेचं नोबेल आपल्या एका मानवी हक्कासाठी लढणार्या कार्यकर्त्याला दिल्यानंतर प्रचंड आकांड तांडव केलं. एवढंच नाही तर त्यासंदर्भातल्या बातम्याच चीनी दैनिके आणि प्रसारमाध्यमांमध्ये येऊ दिल्या नाहीत. हेच नेमकं म्यानमारच्या जुंटा राजवटीने केलंय. गेल्या २३ वर्षांपासून हेच सुरूय.

कम्युनिकेशन म्हणजे कॉन्टॅक्ट… या एकाच सूत्राभोवती आंग सान स्यू की याचं रीथ व्याख्यानमालेतलं भाषण झालं. आपल्याला विचार करण्याचा मुद्दा एवढाच की कम्युनिकेशनची क्रांती आणि त्याचा परिणाम… किती होऊ शकतो तर एखादी जुलमी राजवट उलथवून टाकण्याएवढा. नेमकी हीच खंत स्यू की यांनी रीथ व्याख्यानमालेत बोलून दाखवली.

इंटरनेट आणि तरूण एकत्र आले की काय होतं, ट्यूनिशिया आणि इतर अरब देशात दिसलंच आहे. तसे तरूण नॅशनल लीग फॉर डेमॉक्रॅसीकडेही खूप आहेत. पण त्यांच्याकडे तंत्रज्ञान नाही. जगात काय होतंय, हे कधी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही की आपल्याकडे काय होतंय, हेच जगाला सांगता येत नाही. संपर्क तुटणं म्हणजे काय याची व्यथा गेल्या २३ वर्षांपासून तिथले तरूण जगतायत.

चीन आणि म्यानमारसारखे देश गुगलसारख्या बलाढ्य कंपनीलाही जुमानत नाहीत, तिथे लोकशाहीसाठी झगडणारे कार्यकर्ते म्हणजे किस झाड की पत्ती. यावर्षीच्या गुगल ट्रान्सपरन्सी रिपोर्टमध्ये चीन आणि म्यानमारमध्ये गुगलला किती वेळा मज्जाव करण्यात आलाय, याचा विस्तृत तपशील आहे.

पण आंग सान स्यू की आशादायी आहेत, कारण एका मर्यादेपलिकडे तंत्रज्ञान क्रांतीला रोखता येत नाही. तंत्रज्ञानाच्या विकसित होण्याचा, पसरण्याचा वेग भयानक असतो. तो रेटा चीनलाही एका मर्यादेपलिकडे थाबवणं शक्य होणार नाही. म्यानमारला तर कधीच थोपवता येणार नाही.
(कृषिवल)

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: