डिजीटल फर्स्ट : लोकाभिमुख

पाश्चिमात्य देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एक विचार सुरू झालाय. हा विचार आहे, डिजीटल फर्स्ट म्हणजे माहिती प्रसारणाची जी अनेक माध्यमे आहेत त्यामध्ये अग्रक्रम कोणाचा तर वेब मीडियाचा. वेब फर्स्ट न्यूजरूम ही संकल्पना त्यातूनच पुढे आलीय. म्हणजे कुठल्याही वृत्तपत्राची, टीव्ही चॅनेलची किंवा अन्य प्रसारमाध्यमाची वेबसाईट ही त्या माध्यमाला, व्यवसायाला किंवा संस्थेला फक्त पूरक न ठरता, ही वेबसाईट हीच एक प्रमुख माध्यम आहे, ही धारणा तिकडे आता चांगलीच रूजलीय.

आपल्याकडे अजून तसं काहीच झालेलं नाही. पण आपल्याकडे असलेली अनुकरणप्रियता पाहता लवकरच हा ट्रेंडही रूजेल. आता बऱ्याचअंशी आपल्याकडे वृत्तपत्र किंवा टीव्ही चॅनेल्सच्या वेबसाईट्स या संबंधित वृत्तपत्रे किंवा चॅनेल्ससाठी पूरक अशीच आहेत. काही ठिकाणी त्याचा स्वतंत्र असा विचार होतोय. पण अपवाद म्हणावेत एवढे हे प्रयत्न विरळ आहेत. नोकरी डॉट कॉम, रेडिफ सारख्या वेबसाईट्स किंवा इंडियन टेलिव्हिजन डॉट कॉम, बॉलीवूड हंगामा डॉट कॉम यासारखे काही प्रयत्न अपवादात्मकच.

वर उल्लेख केलेल्या या काही वेबसाईट्सनी फक्त वेब हा त्यांच्या व्यवसायाचा फोकस ठेवलाय. हल्ली अनेक व्यवसाय इंटरनेटवर उपलब्ध असले तरी अजून तरी त्याचं स्वरूप पूरकच आहे. नेमकी याच्या उलट स्थिती आता अमेरिकेसारख्या देशात आहे. तंत्रज्ञानातल्या अफाट प्रगतीने सध्या अनेक देशांमधली अंतरे मिटवली असली तरी अजून आपल्याला बराच मोठा टप्पा गाठायचा आहे.

पाश्चिमात्य देशात आता मुद्रीत म्हणजेच प्रिट माध्यमे पुढच्या काही दशकात उतरणीला लागतील, असा एक विचारप्रवाह सुरू झालाय. पारंपरिक क्रमानुसार प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि नंतर न्यू मीडिया म्हणजेच वेब असा क्रम असला तरी तंत्रज्ञानातल्या प्रगतीने आता हा क्रम उलटा झालाय. प्रचंड तंत्रज्ञानाधिष्टीत आणि खर्या अर्थाने लोकशाही व्यवस्था असलेलं वेब आता पहिल्या क्रमांकाचं स्थान घेत आहे. कारण या माध्यमाचा वेग अफाट आहे.

गेल्याच आठवड्यात अमिताभ बच्चनने आपण आजोबा होणार असल्याचं ट्विट करून संबंध जगाला सांगितलं. त्यानंतर त्याने ब्लॉगमधून आपला झालेला आनंद तपशिलाने सांगितला. त्यासाठी त्याला कुठेही कुणाही पत्रकाराची भेट घेऊन त्याला ही माहिती सांगावी लागली नाही. आता ब्लॉग काय किंवा ट्विटर काय, ही बातमीचे प्रमुख सोर्स झालेत. त्यावर बेतलेल्या अनेकांच्या बातम्या बायलाईन मिळवून देतात. आयपीएल तीनच्या वेळी तत्कालीन कमीशनरने त्यांचं मत सर्वात आधी ट्विटरवरूनच जगभरात पोहोचवत होते. त्यांना त्यासाठी कधीच पत्रकार परिषद बोलवावी लागली नाही. एवढंच नाही तर त्यावेळच्या सर्वात जास्त कॉन्ट्रोवर्सीही ट्टिवटरवरच रंगल्या. या वर्षीही कुणा एका विदेशी चीअर लीडरने तिला आलेल्या अनुभवांना आपल्या ब्लॉगमधून वाट करून दिली. तिला नोकरी गमवावी लागली, हा भाग वेगळा.

आपल्याकडे अजून काही सेलिब्रिटींचा अपवाद सोडला तर सोशल नेटवर्किंग किंव अन्य साईट्सकडे बातमीचा सोर्स म्हणून पाहिलंच जात नाही. किंवा आपल्याकडे सोशल मीडियाच बातमीदारीत किंवा एकूण पत्रकारितेत गांभीर्याने समावेशच केला जात नाहीय. म्हणजे अने बातमीदार त्यांच्या व्यक्तिगत आवडीनिवडीपोटी अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर किंवा त्यांच्या सारख्या अनेकांना ट्विटरवर फॉलो करत असतील, पण त्यापलिकडे जाऊन काही सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून काही बातमी मिळवण्याची उदाहरण विरळच.

टीव्ही आणि वृत्तपत्रे या पारंपरिक माध्यमांची पोच तशी बरीच फसवी. म्हणजे मला म्हणायचं असं की वाचक किंवा प्रेक्षकांपर्यंत प्रत्यक्ष पोहचून त्यांच्या माहितीची भूक भागवणं हे हल्ली बर्याच प्रमाणात मर्यादित झालंय. नेमकी हीच उणीव न्यू मीडियाने भरून काढलीय. म्हणजे आपल्याला हव्या त्या वाचकापर्यंत पोहोचता येतं, शिवाय त्याच्या शंकेचं समाधान झालंय की नाही किंवा त्याला हवी असलेली माहिती मिळालीय की नाही, याची शहानिशा लगेचच होते. यामुळेच व्यवस्थापन किंवा बिझिनेस लीडर्स यांना न्यू मीडियाचं महत्व पटलं असलं तरी आता गरज आहे, या क्षेत्रात आधीपासून असलेल्यांनी आपली मानसिकता बदलण्याची. यासंदर्भात प्रशिक्षण देणार्या स्कूल-कॉलेजांनीही आपली मानसिकता बदलून नवे अभ्यासक्रम डिझाईन केले पाहिजेत. तरच आपल्याकडे डिजीटल फर्स्ट साध्य होईल. नाहीतर प्रिंट विरूद्ध टीव्ही हा संघर्ष अगदी फिल्डपासून डेस्कपर्यंत आपला जसा पिच्छा पुरवत राहतो. तसंच यापुढील काही काळात वेबसाठी होईल. कारण टीव्हीला आपल्याकडे चांगली दहा वर्षे झाल्यानंतरही महाराष्ट्रात टीव्ही जर्नालिझम शिकवणारी एकही चांगली संस्था निर्माण झाली नव्हती. आपल्याकडे सर्व अभ्यासक्रम हे वृत्तपत्रे आणि त्यांच्या गरजा डोळयासमोर ठेऊनच डिझाईन केलेली असतात. एखादा पेपर टीव्ही किंवा वेबचा असला तरी किंवा काही संस्थामधून इलेक्ट्रॉनिक मीडियात स्पेशलाईजेशन करण्याची सोय असली तरी हे विषय शिकवणारे मात्र पुस्तकातली छापील माहिती विद्यार्थ्यांवर फेकणारे तथाकथित प्राध्यापक आहेत.

Digital first, aggressively implemented, means that digital drives all decisions: how news is covered, in what form, by whom, and when. It dictates that as soon as a journalist knows something, she is prepared to share it with her public. It means that she may share what she knows before she knows everything (there’s a vestige of the old culture, which held that we could know everything and by deadline to boot) so she can get help from her public to fill in what she doesn’t know. That resets the journalistic relationship to the community, making the news organization a platform first, enabling a community to share its information and inviting the journalist to add value to that process. It means using the most appropriate media to impart information because we are no longer held captive to only one: text. We now use data audio, video, graphics, search, applications, and wonders not yet imagined. Digital first is the realization that news happens with or without us it mimics the architecture of the internet, end-to-end and we must use all the tools available to add value where we can.

– Jeff Jarvis (Buzz Machine)

जेफ जार्विस हे न्यूयॉर्कच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ जर्नालिझम मध्ये असोसिएट प्रोफेसर आणि इंटरऍक्टिव जर्नालिझम प्रोजेक्टचे संचालक आहेत. शिवाय त्यांचं व्हॉट वूड गूगल डू? हे बहुचर्चित पुस्तक आहे. त्यांनी डिजीटल फर्स्ट म्हणजे काय ते अतिशय नेमक्या शब्दात सांगितलंय. न्यूज स्टोरीज कशा कव्हर करायच्या, कोणी करायच्या, कोणत्या प्रेक्षकांसाठी करायच्या, या स्टोरीजना जास्तीत जास्त लोकाभिमुख कसं करायचं, म्हणजेच पत्रकारितेला किंवा माध्यमांना जास्तीतजास्त लोकाभिमुख करण्याचा डिजीटल फर्स्टचा मुख्य उद्देश आहे. तशी आपल्याकडची प्रसारमाध्यमे अगदी स्वातंत्र्याच्या आधीपासून म्हणजे काही तर त्यांच्या जन्मापासून लोकाभिमुख असल्याचा दावा करतात, पण खरं काय हे या लोकांना माहितीच असतं. आता हा वादाचा विषयच नाही. पण डिजीटल फर्स्ट म्हणजे माध्यमातल्या नव्या लोकशाहीची आणि माध्यमे आणि त्यांचे वाचक-प्रेक्षक यांच्यातल्या नव्या परस्पर संबंधांची, सामंजस्यांची नांदीच म्हणावी लागेल.
(कृषिवलमध्ये प्रकाशित झालेला लेख)

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: