सोशल नेटवर्किंगचे फंडे बदलणारं फेसबुक

फेसबुक या सोशल नेटवर्किंगचा जन्म अगदी काही वर्षांपूर्वीचा आहे, म्हणजे फेब्रुवारी २००४ मध्ये ही साईट लॉंच झाली. आज जगभरात ६०० मिलियनपेक्षाही जास्त नेटीझन्स फेसबुक वापरताहेत. ६०० मिलियन म्हणजे ६००० लाख म्हणजेच ६० कोटी. फेसबुक ही काही कुणा सामाजिक संघटनेची किंवा एखाद्या सरकारची वेबसाईट नाही, तर पूर्णपणे खाजगी आहे. पण या वेबसाईटने सोशल नेटवर्किंगचे सगळेच फंडे बदलून टाकलेत.

या वेबसाईटला मिळालेलं यश अभूतपूर्व आहे. फेसबुकने वेगवेगळ्या देशातल्या, भाषेतल्या, वयातल्या लोकांना एक व्यासपीठ देत त्यांना अभिव्यक्त होण्यासाठी स्पेस उपलब्ध करून दिलीय. कसलीही सेन्सॉरशिप नसलेली स्पेस. फेसबुक इन्वेन्ट केलं मार्क झुकरबर्गने. त्याचा जन्म १९८४ चा. म्हणजे ज्यावेळी तो फक्त २० वर्षांचा होता. त्याच्या कार्यकर्तृत्वावर अलीकडेच एक सिनेमाही येऊन गेलाय.

आज भारतातील जवळ जवळ प्रत्येक नेटीझन आज फेसबुकवर आहे. किंवा दोन-चार दिवसातून एकदा तरी किंवा दिवसातून अनेकवेळा तो फेसबुकवर असतो. आपल्याकडे अनेक व्यावसायिक कंपन्या, कॉर्पोरेट हाऊसेस यांनी फेसबुकवर येणाऱया मोठ्या तरूण वर्गाला टॅप करण्यासाठी फेसबुकवर फनपेजेस सुरू केलेत. या फेसबुकवर तुम्ही ङ्गक्त लाईक करायचं असतं. अनेक सामाजिक संघटनांचीही अशी ङ्गेसबुक पेजेस आहेत. अलीकडेच नवी दिल्लीत झालेल्या अण्णा हजारेंच्या उपोषणाला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, त्यामध्ये फेसबुक पेजेसचा वाटा लक्षणीय होता. आपल्याकडील संस्था संघटना फेसबुकचा वापर व्यक्तिगत किंवा ब्रँड प्रमोशनसाठीच सर्वाधिक करतात. नाही म्हणायला काही व्यक्तिगत गट किंवा समूह वेगवेगळ्या सोप्या प्रश्नांवर उत्तरे मागवून सर्वे वगैरे करण्याचा प्रयत्न करतात. पण अशी माहिती जमवण्यामागे फक्त मौज हाच एक उद्देश असतो. त्यापलिककडे काहीच नाही. पण तिकडे अमेरिकेत मात्र फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्किंग साईट वापरण्यांच्या माध्यमातून वेगवेगळी सर्वेक्षणं केली जातात, त्यातून अनेक साधक- बाधक निष्कर्ष काढले जातात.

अमेरिकेत अलीकडेच एक सर्वेक्षण झालं. या सर्वेक्षणानुसार अमेरिकेत सोशल नेटवर्किंगमध्ये सर्वाधिक वाटा हा फेसबुकचा आहे. त्याखालोखाल मायस्पेस, लिंकड् इन आणि व्टिटरचा क्रमांक लागतो. अमेरिकेत एकूण लोकसंख्येच्या ७९ टक्के प्रौढ नियमित इंटरनेट वापरतात, तर त्यापैकी जवळ जवळ ५९ टक्के नेटीझन्स कोणत्या न् कोणत्या सोशल नेटवर्किंगच्या सहाय्याने स्वतःला अभिव्यक्त करतात. २००८ च्या तुलनेत आता हा आकडा दुप्पट झालाय आणि त्यातील निम्म्यापेक्षा जास्त या महिला आहेत. म्हणजेच सोशल नेटवर्किंग वापरणाऱया महिलांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालीय.

सोशल नेटवर्किंग साईट्सवर असणार्यांपैकी सर्वाधिक जण म्हणजे तब्बल ९२ टक्के कनेक्टेड आहेत, फेसबुक बरोबर, त्याखालोखाल २९ टक्के माय स्पेसवर नंतर तिसऱ्या क्रमांकावर आहेत लिंक्डइन वाले, त्यांचं प्रमाण आहे १८ टक्के आणि सर्वात शेवटचा क्रमांक आहे, ट्विटरवाल्याचा. तिथे फक्त १३ टक्के नेटिझन्स स्वतःला अभिव्यक्त करतात. आपल्याकडे काही वर्षापूर्वी बऱयाच ऑङ्गिसेसनी बॅन केलेल्या ऑरकूटचा यामध्ये कुठेच उल्लेख नाही. ऑरकूट जेवढ्या झपाट्याने लोकप्रिय झालं, तेवढ्याच तीव्रतेनं त्याची लोकप्रियता ओसरली. अमेरिकी नेटिझन्समध्ये ट्विटरचा क्रमांक सर्वात शेवटचा असला तरी त्याला नियमित भेट देणार्याचं प्रमाण दुसऱया क्रमांकाचं आहे. म्हणजे ५२ टक्के
फेसबुक यूजर्स आणि ३३ टक्के ट्विटर यूजर्स दिवसातून अनेकदा आपलं स्टेटस अपडेट करतात.

अमेरिकेतले नेटिझन्स फेसबुकवरस येऊन करतात तरी काय? हा प्रश्न पडणं साहजिकच आहे. तर त्याचं उत्तर आहे, १५ टक्के स्वतःचं स्टेटस अपडेट करतात, २२ टक्के दुसर्याच्या स्टेटसवर कॉमेन्ट करतात. २० टक्के दुसर्याच्या फोटोवर कॉमेन्ट करतात, २६ टक्के इतर यूजर्सच्या स्टेट्सला फक्त लाईक करतात, तर दहा टक्के नेटिझन्स इतरांना खाजगी मेसेज पाठवतात. म्हणजे हा मेसेज फक्त दोन यूजर्ससाठीच असतो. थोडक्यात काय तर अमेरिकेत किंवा आपल्याकडे काय हा एक कॉमन ट्रेंड आहे की, स्वतः काही स्टेट्स टाकण्याऐवजी आधीच जे काही स्टेट्स आपल्या मित्राने वगैरे टाकलंय… त्यावर कॉमेन्ट करणं किंवा त्याला थेट लाईक करणार्यांची संख्या सर्वाधिक आहे. किंवा ते जास्त सोपं असल्यामुळे असेल कदाचित. आधीच आजच्या पिढीकडे वेळ वगैरे फार कमी. त्यामुळे जे आधीच आयतं आहे, त्याला सहमती किंवा अनुमोदन देण्याची सोय फेसबुकने केलीय, जे आपल्या पिढीला सर्वाधिक पसंतीला उतरलंय.

या सर्वेक्षणात असं आढळून आलं की सोशल नेटवर्किंगमुळे त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात खूप मोठा फरक पडलाय. मुख्य म्हणजे ते सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या जास्त जागरूक आणि कृतिशील झालेत. असं अमेरिकी तरूणांना वाटतं. आपल्याकडेही यापेक्षा
फार वेगळं चित्र नाहीय तर… अण्णा हजारेंच्या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद पाहा. अण्णांचं दिल्लीत झालेलं उपोषण आपल्यासाठी म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांसाठी काही नवीन नव्हतं. पण फेसबुकवाल्यांनी हे आंदोलन सर्वदूर पोहोचवण्यात मोठा वाटा उचलला. त्यापूर्वीही महाराष्ट्रात अण्णांनी अनेक आंदोलनं केलीत. अनेक तर आपल्याला माहितीच नाहीत. अण्णांनी अगदी सुरवातीला म्हणजे त्यांच्या सार्वजनिक आयुष्याच्या प्रारंभी सामाजिक वनीकरणामधल्या भ्रष्टाचाराविरूद्ध केलेलं उपोषण तर आपल्याला स्थानिक वर्तमानपत्रांच्या लायब्ररीमध्येच जाऊन शोधावं लागेल. सोशल नेटवर्किंग, इंटरनेट यामुळे आजची तरूण पिढी एकांगी, एकलकोंडी होतेय, असा सूर आपल्याकडे असला तरी ते संपूर्णपणे खरं नाहीय, असंच या सर्वेक्षणाने सिद्ध केलंय. उलट ही पिढी संवाद साधण्यासाठी सर्वात जास्त उत्सुक आहे. अभिव्यक्त होण्यासाठी सर्वात जास्त उत्सुक आहे. हे अमेरिकेत काय किंवा आपल्याकडे काय, नेटिझन्स हा एक नवीन कल्ट आहे, त्याचे निष्कर्ष हे सगळीकडेच सारखेच. आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आपल्यामुळे आणि त्यात स्पीडचा इंटरनेट असल्यामुळे आपण फक्त संपर्कातच नसतो तर जगभराशी या इंटरनेटच्या माध्यमातून कनेक्टेडही असतो. म्हणजेच जग, जगातले समूह, समविचारी गट दोन वर्षांपूर्वी नव्हते तेवढे एकत्र आलेत. विचाराचं आदान-प्रदान वाढलंय. मुख्य म्हणजे कम्युनिकेशन वाढलंय.

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Join the Conversation

3 Comments

  1. केवळ अभिव्यक्तीसाठी फेसबूक हे माध्यम नाही, असं मला तरी ठामपणे वाटते. जुने मित्र-मैत्रिणी फेसबुकच्या माध्यमातून मिळतात, त्यांच्याशी पुन्हा सूर साधले जातात. कालौघात विस्मरणात गेलेल्या व्यक्ती पुन्हा भेटतात. किमान हिंदुस्थानातील माझा अनुभव तरी, हा असा आहे…
    माहिती छान आहे…

  2. मेघराज पाटील सर अतिशय छान आर्टिकल आहे. परंतु फेसबुक या सोशल साइटला सेन्सॉरशिप नसल्यामुळे वाईट प्रकाराला देखील उच्छाद आला आहे. त्याचबरोबर एखाद्या चांगल्या व्यक्तीची प्रतिमा या साइटद्वारे मलिन केली जात आहे. एकीकडे विधायक कामाला पांठिबा दर्शविला जातो. तर दुसरीकडे वाईटप्रवृत्तीला तेवढेच महत्त्व दिले जाते. त्यामुळे फेसबुक या सोशल साइटला पुढील काळात सेन्सॉरशिप लागू करण्यात यावी.

  3. सतिश, सेन्सॉरशिप लागू करण्याने काहीच साध्य होणार नाही, उलट सेन्सॉरशिप नसणं, हीच या माध्यमाची ताकद आहे, त्यामुळे सेन्सॉरशिपनंतर या माध्यमाचं आस्तित्वच उरणार नाही, प्रत्येकाने याचा वापर कशासाठी आणि काय करायचा, ते स्वतःहूनच ठरवावं लागेल, लक्ष्मणरेखा स्वतःहून आखलेली, हीच सर्वात महत्वाची सेन्सॉरशिप असेल

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: