(हा लेख कृषिवलसाठी लिहिला होता, तो 14 जूनला प्रकाशित झाल्याचं सांगण्यात आलं, पण त्यांच्या नेटवर कुठेच आठळला नाही. हा लेख लिहित असताना मुंबईत नुकताच पाऊस सुरू झालेला होता. रामदेवबाबाचं आंदोलन गुंडाळलं गेलं होतं. आता फक्त माझ्या ब्लॉगवर पुन्हा अपलोड करतोय, एवढंच)
मुंबईत पाऊस सुरू झाला तसा रामदेवबाबा आणि त्याचं आंदोलन मीडियातून हळू हळू ऑफस्क्रीन होत गेलं. मराठी माध्यमापुरतं म्हणाल तर टीव्ही, वृत्तपत्रे असो की इंटरनेट, मुंबईतल्या पावसाने बाबांच्या आंदोलनाला झोडपूनच टाकलं.
मुंबईतला पाऊस हा एक इव्हेंट म्हणता येईल, एवढा माध्यमांसाठी महत्वाचा झालाय. तसं 26 जुलैपासून त्याला हे स्टेटस मिळालं. 26 जुलैला जो काही जलप्रलय मुंबई आणि कोकणाने अनुभवला, त्यामुळे माध्यमांची या पावसाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून गेली.
रामदेव बाबांच्या उपोषणाच्या सुरवातीपासूनच त्यांना मास सपोर्ट असा नव्हताच. म्हणजे अण्णांच्या आंदोलनाला जसा उत्स्फूर्त पांठिबा मिळाला, तो रामदेवबाबांच्या वाट्याला आलाच नाही. नाही म्हणायला काँग्रेसच्या दिग्विजयसिंह यांनी अण्णा हजारे यांच्याप्रमाणेच बाबांवरही जहरी टीका सुरू ठेवली होती. पण तेवढ्या टीकेचेही बाबा हकदार नव्हते, असं नंतर वाटायला लागलं, त्यातच गेल्या शनिवारी दिल्ली पोलिसांनी बाबांवर धडक कारवाई केली, आणि बाबांच्या आंदोलनाला खरं तर जीवदान मिळालं, अन्यथा सर्व माध्यमांनी तिसऱ्या-चौथ्या दिवशीच बाबांना ऑफ स्क्रीन केलं असतं. पण बाबांवरील मध्यरात्रीनंतर झालेली कारवाई इतकी नाट्यमय होती की त्यामुळे पुन्हा बाबा चर्चेत आले, आणि आठवडाभर या ना त्या कारणाने स्क्रीनवर राहिले.
शुक्रवारी रात्री मीडियासाठी हिट असलेले मनसेचे आमदार रमेश वांजळे यांच्या निधनाची बातमी आली, तेव्हा तर रामदेव बाबा कुणाच्याही लक्षातही राहिले नसतील… रमेश वांजळे यांच्याविषयीची उत्सुकता ही फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नव्हती तर संबंध जगभरातल्या नेटीझन्समध्ये त्यांच्याविषयीची उत्सुकता ताणली गेली होती. गूगल इंडियाच्या ट्रेन्ड्समध्ये गोल्ड मॅन रमेश वांजळे अगदी पहिल्या स्थानावर पोहोचले.
गुरूवार मात्र पूर्णपणे मकबूल फिदा हुसेन यांचाच होता. सर्व माध्यमात, इंटरनेट असो की टीव्ही… की पेपरवाले… त्यांना शिव्या देणारे आणि त्यांची स्तुती करणारेही तेवढेच… पण त्यांना इंटरनेटवर जेवढ्या मुक्तकंठाने शिव्या दिल्या गेल्या त्याची सर अन्य कुठल्याही माध्यमाला येणार नाही… कारण या माध्यमाचं नियंत्रण असलं तर ते स्वतःहून वापरणारांकडेच आहे, कसलीही सेन्सॉरशिप नसलेलं खरंखुरं लोकशाहीधिष्टीत आणि म्हणूनच अराजकासारखं अनिर्बंध माध्यम…
सदा न् कदा फेसबुक, ट्विटरवर असलेल्या तरूणाईनेही बाबांच्या आंदोलनाला अण्णाइतका प्रतिसाद दिला नाही, त्या उलट अण्णा हजारेंनी राजघाटावर एकच दिवस लाक्षणिक उपोषण केलं तर त्यांना किमान महाराष्ट्रातून तरी चांगला प्रतिसाद मिळाला, अण्णा हजारे हे महाराष्ट्रीय असल्याचा परिणाम म्हणून किंवा केजरीवालांच्या व्यवस्थापन कौशल्याचा परिणाम असेल, अण्णा पुन्हा ठळकपणे नजरेत भरले.
पण आता पुन्हा पावसाचे दिवस आहेत. माध्यमांमध्येही… 2005 ला जेव्हा मुंबईसह कोकणाने जलप्रलय अनुभवला तेव्हा ही टीव्ही इंटरनेटसारखी माध्यमं आपल्याकडे बाळसं धरत होती, त्यामुळे पाऊस हा भारतात या माध्यमांसाठी जन्मापासूनच एक इव्हेंट आहे. मेगा इव्हेंट म्हणता येईल असा भव्य दिव्य… तसं पावसावरही आपलं कुणाचं नियंत्रण नाही. एकवेळ रामदेव बाबा किंवा अण्णा हजारे यांनाही समजावून सांगून किंवा सरळसोटपणे त्यांच्या मागण्या मान्य करून उपोषणापासून परावृत्त करता येईल पण पावसाला अजिबात नाही.
मुंबईत पाऊस कोसळायला लागला की लोकल ट्रेन ठप्प होणं, सायन-कुर्ला, मस्जिद यासारख्या सखल भागात पाणी साचणं, रस्त्यावरची वाहतूक ठप्प होणं आणि हिंदमाता, परळ, मिलन सब वे ही ठिकाणं तर मीडियावाल्यांची तीर्थक्षेत्रंच बनतात. फूट-अर्धाफूट पाण्यात उभं राहायचं आणि गुडघाभर पाणी साचलंय, असं सांगत सुटायचं… हा आता रतीब झालाय. हे दरवर्षी होत असलं तरी त्याचा अजून तरी लोकांना कंटाळा आलेला नाही, म्हणूनच माध्यमांसाठी ही ठिकाणे तीर्थक्षेत्रे बनलीत. कारण या ठिकाणांशिवाय फारसं पाणी कुठे साचत नाही. त्यापूर्वी नालेसफाई, मिठीची सफाई अशा बातम्या यायला लागल्या की माध्यमांना मान्सून येणार असल्याची चाहूल लागते. चोवीस तास बातम्यांचे चॅनेल मराठीत सुरू झालेले नव्हते तेव्हा छत्र्या, रेनकोट यांची पावसाळ्याची चाहूल लागतानाची विक्री या बातम्यांचा विषय बनायची. पण आता ट्रॅकवर पाणी साचून ट्रेन ठप्प झाली किंवा मिलन सब-वे आणि हिंदमाताला पाणी साचल्याचे फ्लॅश-ब्रेकिंग न्यूज झळकल्या की पावसाचा इव्हेंट सुरू झाल्याची खात्री पटते.
पावसाचा महाइव्हेंट सेलिब्रेट करण्याचे माध्यमांचे आणि लोकांचेही आपापले फंडे आहेत. तुम्ही घरी असाल तर तुम्हाला भजी खावीशी वाटतील, अद्रक घातलेला गरम गरम चहा प्यावासा वाटेल, किंवा वाफाळती कॉफी… काही जणांना आपापले ब्रँड आठवतील, आठवू द्यात, मीडियाचं म्हणाल तर ऑफिसात असताना स्क्रीनवर पावसाची जास्तीत जास्त माहिती, जी आपल्याला वाटतं की लोकांसाठी उपयुक्त आहे, ती देण्यासाठीची चढाओढ आणि त्यासाठीची ग्राफिक्सच्या मदतीने वेगवेगळे लेआऊट… सेलिब्रिटी असतील, त्यांनी पाऊस कसा एन्जॉय केला, याच्या रंजक कहाण्या… आपण ट्रेनमध्ये अडकल्याचा त्रागा-त्रास हलका करण्यासाठी कामाला येतात. पावसाळ्याची चाहूल लागण्यापूर्वी या सेलिब्रिटींच्या मुलाखती हा रविवार पुरवण्यांचा खास मेनू असायचा, हल्ली हे सेलिब्रिटी.. फक्त ट्विटरवरच स्वतःला व्यक्त करतात, आणि त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचतात. आधेमधे कुणीच नाही…
पावसाचा मुक्काम किती दिवस राहील, हे वेधशाळेशिवाय कुणालाच सांगता येत नाही. मात्र माध्यमांचे अनेक दिवस त्यातून निभावून जातात. जलप्रलय असला तरी सेलिब्रेट होतो, परळ-हिंदमाताला पाणी साचलं हे सेलिब्रेशन सुरूच असतं. बातम्या असतातच की अधून-मधून…