व्हर्च्युअल नव्हे; लोकशाहीचा ‘रिअल’ स्तंभ!

(कृषिवलसाठी लिहिलेला लेख)
न्यू मीडिया म्हणा किंवा वेब जर्नालिझम… हे माध्यमाचं एक तंत्रज्ञानाधिष्ठीत रूप.. पण अतिशय साधं. सोपं, सर्वांना सहज उपलब्ध होणारं आणि तरीही तुलनेनं स्वस्त.. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संबंध माध्यम विश्वाचं भविष्य इंटरनेटची सुरूवात झाली तेव्हापासूनच न्यू मीडियाचा जन्म झाला, फक्त त्याचं न्यू मीडिया किंवा नवमाध्यम असं बारसं फार उशीरा झालंय.

आपल्याकडची पारंपरिक माध्यमे म्हणजे वृत्तपत्रे, रेडिओ आणि टीव्ही… इंटरनेट सर्वात अलीकडचं… किमान आपल्यासाठी तरी…इंटरनेट किंवा कॉम्प्युटर किंवा माहिती-तंत्रज्ञान यांनी आपली सगळी परिभाषाच बदलून टाकलीय. म्हणजे क्लिक, डॉट, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू, वेबसाईट, लिंक, अंडरस्कोअर, ऍट द रेट, ऑनलाईन, नेटिझन असे शब्द त्याचा अर्थ ठाऊक नसले तरी आपल्या अजिबात अडचणीचे वाटत नाहीत, त्याचा व्यवहारातला वापरही आपण अगदी सहजपणे करतो. हा या नवमाध्यमाचा किंवा माध्यमातल्या तंत्रज्ञानाधिष्ठीत क्रांतीचा परिणामच की…सर्वच पारंपरिक आणि आधुनिक माध्यमाचं भविष्य या नव्या तंत्रज्ञानाधिष्टीत क्रांतीशी जोडलं गेलंय. त्याची सुरूवातही तशी खूपच जुनीय, पण तंत्रज्ञानाची ही क्रांती कायम प्रवाहित असल्याने त्यामध्ये सातत्याने नवनवीन बदल होत राहणार आहे, काल आलेलं व्हर्जन आज आऊटडेट होणार आहे. तसंच या नव्या रतीबाला प्रतिसादही सातत्याने मिळत राहणार आहे. कारण हे सर्व नवे बदल सामान्य लोकांनी सामान्य लोकांसाठी केलेले आहेत. म्हणजेच वेब मीडिया किंवा न्यू मीडिया हाच खर्‍या अर्थाने लोकशाहीधिष्ठीत आहे. तसं पाहिलं तर वृत्तपत्रे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्स प्रसारमाध्यमेही आपण लोकशाहीधिष्ठीत असल्याचा दावा प्राणपणाने करतील, पण ही पारंपरिक माध्यमे किती लोकशाहीधिष्ठीत आहे, ते वाचकांसह सर्वांनाच चागलं ठाऊक असतं. या पारंपरिक माध्यमांचं लोकशाहीधिष्ठीत असणं, हे फक्त दररोजच्या अंकात वाचकांच्या पत्रांना काही कॉलमची जागा देण्यापुरतं किंवा टीव्हीसारखं माध्यम असेल तर कधी तरी वॉक्स पॉप्युली म्हणजे लोकांच्या थेट प्रतिक्रिया… सगळे संबंध लोकशाहीशी… तशी प्रेक्षकांना किंवा वाचकांना काय हवंय, किंवा कायम नको हे आम्हीच आमच्या एसी कार्यालयात बसून ठरवणार म्हणजेच आमचा आपला असा अजेंडा राबवणार.. तसं नाही म्हणायला कधी तरी एखाद्या मार्केटिंग एजन्सीमार्फत कधी तरी वाचक सर्वेक्षण वगैरे प्रातिधिनिक प्रकार होतही असतील. तरीही सर्व कम्युनिकेशन मात्र एकतर्फीच… पेपर-चॅनल किंवा त्यांच्या संपादकांनी ठरवून दिलेल्या लाईनवर सर्व काही चालणार ते वाचकांनी मुकाट वाचायचं किंवा प्रेक्षकांनी मुकाट पाहायचं. आपला असा चॉईसतच नाही. नेमकी हीच कोंडी तंत्रज्ञानाधिष्ठीत असलेल्या नवमाध्यमांनी फोडलीय. आणि वाचकांना त्यांच्या हक्काचं, कुणाचीही कसलीही सेन्सॉरशिप नसलेली एक व्यवस्था माध्यम म्हणून उपलब्ध करून दिली.

प्रत्येक नेटीझनने सुरू केलेला आपला स्वतःचा असा एक ब्लॉग किंवा ट्विटर, फेसबुकवरील अकाऊंट ही नवमाध्यमाचीच रूपे. स्वतःला अभिव्यक्त करण्यासाठी या माध्यमांची सुरूवात झाली. आता ही माध्यमे सर्वव्यापी झालीत. त्याशिवाय आपापल्या गरजेप्रमाणे वेगवेगळ्या सोशल नेटवर्किग साईट्स दिवसाच्या रतीबागणिक तयार होत आहेत. त्या विषयीची जागरूकता ही सातत्याने वाढत आहे, ही वाढ आणि प्रसार तंत्रज्ञानाधिष्ठीत माध्यम क्रांती लोकांनी स्वीकारल्याचंच प्रतिक आहे, लोकशाहीधिष्टीत नवमाध्यमाचं आणखी एक ठळक उदाहरण म्हणजे विकीपीडिया. आज विकीपीडिया माहिती नसलेला नेटिझन सापडणं जवळ जवळ अशक्यच. अनेकांसाठी माहितीचा रेडी रेकनर असलेला विकीपीडिया हा लोकांनी त्यांच्या परस्पर गरजेतून तयार केलेला जगातला सर्वात मोठा माहिती कोश आहे, आपल्याला हव्या असलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती विकीपीडियावर उपलब्ध आहे, शिवाय ही सर्व माहिती तुमच्या-माझ्या सारख्या लाखो लोकांनी परस्पर गरजेपोटीच टाकलेली आहे. ज्या एखाद्या गोष्टीची माहिती नसेल, ती कुणालाही टाकायची सोयही विकीपीडियात आहे. विकीपीडिया म्हणजे नवमाध्यम कसं असावं याचं एक आदर्श उदाहरण. लोकांनी लोकांसाठी चालवलेली माहिती, ज्ञान प्रसाराची एक मुक्त चळवळ, कसलाही पैश्याचा व्यवहार नाही. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही देणगी देऊ शकता, पण त्यासाठी जबरदस्ती नाही. सर्व काही मोकळं ढाकळं… हवं असेल तर फुकट.. कितीही माहिती घ्या, माहितीचा हा महासागर आटणार तर नाहीस, उलट प्रत्येकाने आपापल्या मगदुराप्रमाणे केलेल्या कॉन्ट्रिब्युशनमुळे दिवसेंदिवस त्यामध्ये भरच पडणार आहे. ब्लॉगचंही तसंच आहे. ब्लॉग ही प्रत्येकाची आपापली अशी अभिव्यक्ती असली तरी त्याला विषय, शब्दमर्यादा, लेखनाचा प्रकार किंवा भाषा असं कसलंच बंधन नाही. कितीही लिहा, कसंही लिहा… तुमचं तुम्हीच तपासा.. तुमचं तुम्हीच संपादित करा आणि करा प्रकाशित.. कुणी संपादक नाही की कुणी प्रकाशित नाही. शिवाय हे सर्व फुकट आणि सहज उपलब्ध, एका क्लिकसरशी तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर सगळं विश्व तुमच्यासाठी सज्ज आहे.

कम्युनिकेशनच्या संदर्भात बोलायचं तर सर्व मामला देवाण घेवाणीचा. एकमार्गी किंवा वन वे असं काहीच नाही. तुम्ही कोणाच्याही ब्लॉगला फॉलो करू शकता किंवा इतर कुणीही तुमच्या ब्लॉगला फॉलो करू शकतं. शिवाय प्रतिक्रिया द्यायची असेल काही तरीही करा मोकळेपणाने.. कुणाचेही कसलेही निर्बंध नाही. नवमाध्यम हे एका अर्थाने पूर्णपणे लोकशाहीवादी, म्हणूनच टोकाचं व्यक्तिनिष्ट आणि नियंत्रणमुक्त माध्यम असल्यामुळे काही तोटे आहेतच, पण त्याची काळजी करण्यासाठी आपलं आपण आपल्यासाठी एक लक्ष्मणरेषा आखून घेणंही आहेच. नाही तर तुमची अभिव्यक्ती आवडली नसेल तर तसं मत व्यक्त करण्याची मोकळिकही जगभरातल्या नेटिझन्सना आहे. आज काल माहितीच्या या महास्फोटाची आणि त्यातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जाणीव झाल्यामुळेच या संदर्भातले व्यावसायिक हितसंबंधही जागे झालेत. ट्विटरच्या विक्रीच्या बातम्याही त्यामुळेच पुढे आल्या. किंवा गुगलच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी मायक्रोसॉफ्टने वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साईट्स आपल्या ताब्यात घेणं, हाही या घडामोडींचा एक भाग. या क्षेत्रात दररोज नवनव्या घडामोडी होताहेत. कारण या माध्यमाच्या अफाट पसार्‍याची आणि त्यातल्या आर्थिक हितसंबंधाची जाणीव असल्यामुळेच.

या आर्थिक हितसंबंधामुळेच अलीकडे लहान लहान वृत्तपत्रेही आपली स्वतःची अशी वेबसाईट असायला हवी, असं म्हणायला लागलीत. कारण वेबसाईट किंला सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकचं फॅनपेज हे तुम्हाला तुमच्याशी अपरिचित असलेली प्रचंड मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देतं. त्यामुळेच आधी वेबसाईट म्हणजे एक फॅड असा असलेला समज दूर होऊन आता ती एक अत्यावशक बाब बनलीय. आपल्याकडेही अनेक लहानमोठ्या वृत्तपत्रांच्या वेबसाईट आणि फेसबुक पेजेस आहेत. या माध्यमातून ते त्यांना नियमितपणे अपरिचित असलेल्या लाखो कोट्यवधी वाचकांशी टू वे कम्युनिकेशन करतात. या आयडिया एक्स्जेंचमधून अनेक मोठमोठे प्रकल्प, योजना प्रत्यक्षात येत आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे माहितीचं अदानप्रदान होतंय. ते कितीतरी महत्वाचं, म्हणजे आर्थिक लाभाच्याही पलिकडे असं असणारं आहे.

या दशकातल्या म्हणजे नव्या शतकातल्या पहिल्या दशकातल्या सर्वाधिक क्रांतिकारी ठरलेल्या मोबाईलच्या भारतातील प्रसारामुळे तर नवमाध्यमाचा माहिती प्रसारित करण्याचा वेग झपाट्याने वाढलाय. कारण मोबाईलमधल्या वेगवेगळ्या टप्प्यांमुळे इंटरनेट आता प्रत्येकाच्या तळहातावर आलंय. प्रत्येक मोबाईल हा एक स्वतंत्र संगणक झाल्यामुळे माहिती प्रसारणाचा वेग झपाट्याने वाढलाय. म्हणूनच आता फक्त वेबसाईट लॉंच करण्यासोबतच त्या वेबसाईटचं मोबाईल व्हर्जन लॉंच करणंही महत्वाचं समजलं जातं. हे तंत्रज्ञानाचा हा अश्वमेध थांबवणं कुणा एकाच्या क्षमतेपलिकडचं आहे. आपल्या हातात आपल्या भल्यासाठी त्याचा वापर करून घेणंच आहे!

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: