यावेळचा ट्रेक वासोट्याचा… फार ठरवावं वगैरे लागलं नाही. एक तारीख ठरली होती, आणि त्याच तारखेला मुंबईतून प्रस्थानही झालं… ज्यांनी आधी कबूल केलं होतं, ते सर्वजण आलेच.. काहीही कुरकूर न करता…
संदीपने आधीच अमेझिंग सह्याद्रीच्या योगेश कर्डिलेशी चर्चा केली होती. तो वेळोवेळी माहिती देत होता. त्याने आम्हाला अगोदर महाबळेश्वरला येण्यासाठी
सुचवलं होतं, नंतर त्यामध्ये बदल झाला, आणि आम्ही सातारला पोहोचलो. मी, माणिक आणि अभिजीत… संदीप रामदासी बीडहून थेट सातारला पोहोचणार होता.
सातारला सकाळी आठ वाजता आमचा प्रतिनिधी राहुल तपासे त्याची गाडी घेऊन आम्हाला बामणोलीला पोहोचवण्यासाठी आला, बामणोली हे सह्याद्रीच्या डोंगररांगात वसलेलं लहानसं खेडं, सर्व बाजूंनी कोयनेचं पाणी. वासोट्याला जायचं तर लाँचमधूनच… दुसरा मार्ग नाही…
बामणोलीला जाताना कास पठार लागतं. तेव्हा अलीकडेच आलेल्या कास पठारावरच्या काही बातम्या आठवल्या. त्याचं खाजगीकरण करण्याचा घाट वगैरे…
तिथे न थांबता आम्ही थेट बामणोलीच्या दिशेनं निघालो. रस्त्यात जाताना ठिकठिकाणी आमचं फोटो सेशन सुरूच होतं.
बामणोलीत पोहोचल्यावर चहा वगैरे झाला. तशा उशीरच झाला होता. तापोळ्याहून योगेशचा सहकारी भूषण आमच्यासाठी लाँच घेऊन निघाल्याचा मेसेज मिळाला. मग बसलो टाईमपास करत.
भूषण बोबडे आल्यावर त्याने फॉरेस्ट वगैरेच्या फॉर्मेलिटी पूर्ण केल्या, आम्ही लाँचमध्ये बसलो, आमचा पाण्यातला प्रवास सुरू झाला. नावाड्याला सहज विचारलं, इथे पाण्याची खोली किती… तर तो म्हणाला अंदाजे दीडेकशे फूट असेल… मग पुन्हा आमचं फोटोसेशन सुरू झालं… साधारण पणे तीनेक तासांचा प्रवास असेल,
वासोट्याचा पायथा म्हणजे कोयना अभयारण्याचं प्रवेशद्वार जवळ येत यायला काही वेळ असताना आमच्यातल्या काहींना भूक लागली. मग योगेश कार्डिलेच्या सहकाऱ्यांनी आमच्यासाठी पाठवलेलं जेवण लाँचमध्येच जेवायचं ठरलं. सर्वांना वाटलं होतं की अजून तासभर आहे, आपलं ठिकाण यायला, तोपर्यंत घ्या जेवून… पण जेमतेम दहा ते पंधरा मिनिटात आमचा लाँच प्रवास संपला. आणि आता कोयना अभयारण्याकडे चालायला सुरूवात करायची होती. आणि पोटं तर जेवणाने टम्म झालेली… कोयना अभयारण्यापर्यंत चालतानाच देव आठवले, आपण लाँचमध्ये जेवण करून काय चूक केलीय, हे प्रत्येकाला उमगलं, पण त्याला आता इलाज नव्हता, शिवाय वासोटाही चढायचा होता.
भूषणने माहिती पुरवली की महिन्याभरापूर्वी बरंच पाणी होतं, अगदी अभयारण्याच्या पायथ्यापर्यंत लाँचमधून जाता यायचं, पण आता पाणी बऱ्यापैकी ओसरलंय, त्यामुळे आमचा लाँचचा प्रवास लवकर संपला आणि कोयना अभयारण्यापर्यंत बरंच चालावं लागलं. भरलेल्या पोटांनी… बाराच्या सुमारास आम्ही कोयना अभयारण्याच्या कार्यालयात पोहोचलो. तिथे पोहोचल्या पोहोचल्या भरपूर पाणी पिऊन घेतलं, सोबतच्या बाटल्या भरून घेतल्या. कागदोपत्री कारवाया पूर्ण केल्या, आणि सव्वा बाराच्या सुमारास आमचा वासोट्याकडचा प्रवास सुरू झाला.
कोयना अभयारण्याच्या कार्यालयापासून वासोटा किंवा व्याघ्रगड तब्बल चार किलोमीटरवर आहे. या जंगलात अलीकडेच काही वाघ आढळल्याची बातमी वाचली होती. त्यावर रखवालदारांने सांगितलं की या अभयारण्याच्या दारातच काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले होते. या अभयारण्यात सहा वाघ आणि चौदा बिबटे असल्याची माहितीही या रखवालदाराने दिली.
वासोटा ट्रेकविषयीची माहिती इंटरनेटवरून मिळवताना कळालं होतं की या जंगलात जळवा आणि डास भरपूर आहेत. काही हौशी ट्रेकर्सच्या ब्लॉगमध्ये याविषयीची माहिती होती. एवढंच नाही तर गवे, साप आणि इतर जंगली श्वापदं मोठ्या प्रमाणावर असल्याचं नेटवरच समजलं होतं.
आम्हाला माहिती देणाऱ्या रखवालदाराने सांगितलं की तासाभरापूर्वीच पुण्याचा एक 45 जणांचा ग्रुप पुढे गेलाय.
तसे आम्ही मुंबईहून आलेलो चार जण आणि योगेश कर्डिले यांनी आमच्या मदतीसाठी पाठवलेले तिघेजण असे सातजण होतो, त्यातल्या दोघांनी वासोटा ट्रेक यापूर्वी केला होता. तर एकजण नवखा होता, त्याचा हा दुसराच ट्रेक होता.
कोयनेच्या जंगलात जागोजागी झाडांच्या शेजारी असलेल्या बोर्डवर झाडांची शास्त्रीय माहिती आणि त्याचे उपयोग नमूद करण्यात आलेत. आम्हाला सगुना बागेच्या शेखऱ भडसावळेंची आठवण झाली. त्यांनीही अशीच उपयुक्त माहिती सर्व झाडांच्या जवळ एका बोर्डवर दिलीय.
कोयनेच्या जंगलात झाडांच्या माहितीसोबतच वेगवेगळ्या वन्य पशूंची माहितीही त्यांच्या चित्रांसकट दिलीय. ही सर्व श्वापदं या जंगलात आहेत, असाच त्या बोर्डवरील माहितीचा अर्थ होता. दिसलं कुणीच नाही पण भिती मात्र जळवांची वाटत होती. त्या एकदा अंगाला चिटकल्या की लवकर निघत नाहीत म्हणे…
अर्धा-पाऊण तास चालल्यानंतर आपण जेवण घेऊन किती मोठी चूक केलीय याची प्रत्येकालाच जाणीव व्हायला लागली होती. पण आता इलाज नव्हता.
साधारणपणे किलोमीटरभर चालल्यानंतर आम्ही झाडांच्या गर्द सावलीत जरा थांबायचं ठरवलं. नदी किंवा ओढ्याचं कोरडं पडलेलं पात्र होतं, त्यामध्येच तिथल्या लोकांनी दगडांनी रचून केलेलं एक मंदिर होतं, अनेक ट्रेकर्स इथे घडीभर विश्रांती घेतात, अशी माहिती मिळाली. तिथे अजून वासोटा तीन किलोमीटर लांब असल्याचा बोर्ड डकवला होता. हे उघडंच मंदिर गणपती आणि मारूती याचं संयुक्त होतं.. एकाच देवळात दोघांनी आपापली स्पेस ठरवून घेतली होती.
चालताना आम्ही सर्वजण मागे-पुढे होत होतो. या मंदिराच्या टप्प्याला विश्रांती घेतल्यावर अभिजीत आणि माणिक मागावून आले. मग पाचेक मिनिटं थांबून आम्ही पुढे चालायला सुरूवात केली.
अजून अर्धाएक तास चालल्यावर एक मोठी शिळा रस्त्याच्या कडेला दिसली, लगेच आम्ही फोटोची हौस भागवून घेतली. घामाने ओलं झालेलं अंग कोरडं केलं, इथेच आम्हाला पहिल्यांदा डासांचा त्रास झाला. मोठमोठाले डास चावले. सगळा रस्ता गर्द जंगलातून.. पानांच्या सळसळीच्या बॅकग्राऊंड म्युझिकवर आमचं चालणं सुरू होतं. डासांचं गुंगुगुं वाढलं तेव्हा खिशातलं रुमाल काढून कानांवर बांधला…
अर्ध्या एक तासाने, चालून चालून बऱ्यापैकी दमल्यावर वासोटा किल्ला एक किलोमीटर आणि दुसऱ्या बाजूला नागेश्वर मंदिर दोन किलोमीटर अशी पाटी डकवलेली दिसली. चला आता थोडसंच राहिलंय चालायचं, पाय उचला पटापट… असं एकमेकांना म्हणत असतानाच लक्षात आलं की आता जंगल संपलेलं आहे, आणि डोंगरावरची मातीची घसरडी वाट सुरू झालीय, शिवाय उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता, मग हे एक किलोमीटर अंतरही आता खूप वाटायला लागलं.
शेवटी आम्ही पोहोचलो, वासोटा किल्ल्यावर.. तिथे पुण्याचा एक ट्रेकिंग ग्रुप आमच्याही आधी येऊन पोहोचलेला. त्यांचं एन्जॉय करणं सुरू होतं, आणि आमचं फोटो सेशन… आमच्याजवळचं पाणी संपलं होतं. वासोटा किल्ल्याचे आता फक्त काही अवशेषच शिल्लक आहेत. फार काही नाही. एक टेहळणी बुरूज आणि एक मंदिर आहे अजून शाबूत. नाही म्हणायला पाण्याचे दोन हौद मात्र अजून चांगल्या अवस्थेत आहेत… आमच्याकडे त्याला कळ्ळोळ म्हणतात. पण त्यातलं पाणी कमालीचं घाण झालेलं… पण येळेला केळं आणि वनवासात सिताफळं असं म्हणत आम्ही ते ही पाणी पिलो… मग बाबू कडा, टेहळणी बुरूज
आणि त्याही वर जाऊन दिसणारा सुंदर कडा आम्ही फोटोंमध्ये साठवून घेतला, आणि परतीच्या वाटचालीला सुरूवात केली.
अंधार पडायच्या आत परतायचं होतं, पण जंगलाचा भाग लागल्यावर लक्षात आलं की इथे तर आत्ताच अंधार पडलाय, मग आम्ही चालायचा वेग आणखी वाढवला. परतताना आम्हाला कुठे फारसं विश्रांतीसाठी बसावं वगैरे लागलं नाही. एकदोन वेळा पाय घसरतोय असं वाटलं तरी लगेच सावरता आलं.
पावसाळ्यात कोयना अभयारण्य आणि वासोटा ट्रेक पर्यटकांसाठी का बंद असतो, याची उत्तरेही आम्हाला इथेच मिळाली,
कोयना अभयारण्याच्या सुरवातीला असलेल्या फॉरेस्ट ऑफिसमध्ये आल्यावरच आम्ही थांबलो, भरपूर पाणी प्यालो. आता तसा ट्रेक संपला होता. पण लाँचपर्यंत अजून चालायचं बाकी होतं. म्हणजे अजून साधारणपणे दोनेक किलोमीटर… पायात चालायचं त्राण नव्हतं तरी चालावं लागणारच होतं.
शेवटी एकदाचं आम्ही लाँच धक्क्याला लागलेल्या ठिकाणी पोहोचलो. आमच्या आधी आलेल्या ग्रुपची लाँचही निघण्याच्या तयारीत होती, तेवढ्यात संदीप, माणिक आणि अभिजीत यांना पोहण्याची हुक्की आली. घामाने आणि चालण्याने आलेला शिणवटा घालवण्यासाठी पोहण्याशिवाय दुसरा चांगला मार्ग तरी कोणता. त्यांच्या पोहण्यामुळेच आम्हाला वीस-पंचेवीस मिनिटांचा उशीर झाला. पण हा उशीर झाल्यामुळेच हा ट्रेक कायम स्मरणात राहिल असा अनुभवही आम्हाला मिळाला.
लाँचमधून परतीचा प्रवास सुरू झाला तेव्हाच लांबवरच्या डोंगरात पाऊस दिसत होता. हा पाऊस कधीतरी आपल्यालाही गाठणार हे ही तसं ठाऊक होतं.
लाँडमधून जात असताना पावसात भिजणं याचा अनुभव घ्यायचा होता. आम्ही परतीच्या वाटेवर असताना पुन्हा फोटोपिसाटासारखं फोटोशेशन सुरूच होतं, तेवढ्यात पाऊस सुरू झाला. मग आडोसा शोधायला सुरूवात झाली. काही वेळ पावासांच्या थेंबात भिजण्यातून वाचलो खरं पण नंतर लगेचच सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि आमची पाचावर धारण बसली… कारण आम्ही तर सगळे भिजलो होतोच, मोबाईल आणि कॅमेरे भिजू नयेत याची काळजी घेत होतो. पण पावसाचे फोटोही काढायचे होते, तेवढ्यात आणखी एका किनाऱ्यावरच्या जंगलात वणवा पेटलेला दिसला, पाऊस आणि वाऱ्याच्या माऱ्यापुढे कितीवेळ तग धरणार होता माहिती नाही. पण त्याचाही एक फोटो टिपला आणि कॅमेरा म्यान केला.

दरम्यान पाऊस वाढला होता. नावाड्याला समोरचं काहीच दिसत नव्हतं. वारा वाढला होता, पावसाचे बोचरे थेंब टोचत होते. तशातही नावाडी नावेला दिशा देतच होता, त्याने आम्हाला सांगितलं की दहा एक मिनिटात बामणोली येईल. पण आम्हाला तर वाणवलीला जायचं होतं, निघताना तर ठरवलं होतं की वाणवलीला जायचं, मग प्रोग्राम कधी चेंज झाला माहिती नाही. ठिकाय… बामणोली तर बामणोली… पण लवकर किनाऱ्याला लागा.
समोरचं काहीच दिसत नसल्यामुळे आम्ही पुढेच जात होतो, आणि तुम्ही नावेच्या तोंडाकडे (पाण्याकडे न बघता) असला की नाव एकाच जागी स्थिर असल्याचा भास होतो. मग जरा बाजूला पाहिलं की आपण पुढे जात आहोत, याची खात्री पटते. तेवढ्यात जोराचा आवाज आला, माणसाच्या ओरडण्याचा, कारण आमच्या नावेचं इंजिन सुरू असल्यामुळे आणि घोंगावत्या वाऱ्यामध्ये पावसाची रिपरिप यामुळे तसं मोठ्याने बोलण्याशिवाय पर्यायच नव्हता. काय झालं काही कळलंच नाही… काही वेळाने नावाड्याने सांगितलं की समोरून येणारी नाव आपल्याला धडकणार होती, आपण आधीच आरडाओरडा केल्यामुळे दोघांनीही दिशा बदलली. आणि संकट टळलं. मग त्या अंधूक उजेडात दोन्ही नावाड्यांनी एकमेकांना बॅटरीचे इशारे केले, कदाचित शिव्याही दिल्या असाव्यात.
पण तो पुढे निघून गेला, आम्ही आमच्या वाटेला… पण पावसाचा आणि वाऱ्याचा जोर पुन्हा वाढला. बोट हेलकावे खाऊ लागली. आमच्या लाँच मध्ये असलेल्या दोघांना पोहता येत नव्हतं, तशा कठीण प्रसंगातही आमचे थट्टा विनोद सुरू झाले. मलाच पोहता येत नाही, हे माझ्या सहकाऱ्यांना माहिती होतं, त्यांनी नावाड्याला विचारलं पाणी इथे किती खोल असेल, त्याने सांगितलं की दीडेकशे फूट… पण गाळ खूप आहे, अशीही माहिती पुरवली. मग अभिजीत म्हणाला, मी तुम्हाला वाचवतो, बुडू देणार नाही… मला पोहता येतं, माणिकने त्याला पुस्ती जोडली, पाटील मी ही तुम्हाला वाचवतो, फक्त बुडताना माझ्या गळ्यात पडू नको, संदीप रामदासीही मागे नव्हता, सर्वांना मी सांगितलं की कुणीही घाबरू नका, काही होणार नाही. मला पोहता येत नसलं तरी मी बुडणार नाही, कुणावरही माझा भार येणार नाही, आपला नावाडी निष्णात पोहणारा आहे, तुमचं तुम्ही पोहून किनाऱ्याला पोहोचा म्हणजे झालं, सर्वात महत्वाचं म्हणजे आत्ताच उड्या टाकू नका, अजून आपण नावेतच आहोत… मग सगळे भानावर आले, बोट प्रचंड हेलकावे खाऊ लागले, तेवढ्यात मग आमच्या सोबत असलेल्या भूषणने प्रसंगावधान राखून नावाड्याला बोट जवळच्या कोणच्याही किनाऱ्याला घ्यायला सांगितली. तो स्वतः बोटीच्या पुढे आला, थोडं किनाऱ्याच्या
जवळ आल्यावर बोटीचा खिळा घेऊन तो खाली उतरला, आणि आम्ही किनाऱ्याला लागलो. पाऊस आणि वारा सुरूच होता, फक्त बोट थांबली होती, किनाऱयाला पण हेलकावे सुरूच होते, सगळे कपडे – अंगावरचे आणि बॅगेतले भिजले होते. आता पाऊस आणि वारा थांबेपर्यंत इथेच थांबायचं ठरवलं होतं, पुन्हा आमच्या गप्पा सुरू झाल्या, त्यामध्ये कळालं की तसल्या मुसळधार पावसात बोटीचा खिळा घेऊन खाली उतरणाऱ्या भूषणलाही पोहता येत नव्हतं. पण तो घाबरला नाही की आम्हालाही घाबरवलं नाही. पुन्हा मला पोहता येत नाही म्हणून वाचवून किनाऱ्याला आणणारे सर्व एक झाले, वाचवणारे अनेक होते, पण बुडायला कुणीच तयार नव्हतं.
अंधार गच्च झाला. आमच्या लाँचवर ना लाईट ना हॉर्न… इशारे करायचे तर ओरडायचं किंवा टॉर्च दाखवायचा… मग किनाऱ्यावरूनही काही टॉर्च पेटणार…
आजच्या एकविसाव्या शतकातल्या संपर्कयुगातही ही मध्ययुगीन संपर्क साधने… सहज विचार केला तर जाणवलं की आमच्या लाँचवर ना लाईफ जॅकेट, ना हॉर्न, ना हेडलाईट, ना उजेडासाठी लँम्प, सगळं काही राम भरोसे… लाँचला छत होत, पण तरीही बॅगेतले कपडेही पूर्णपणे भिजले…
पाऊस पूर्णपणे थांबल्यावर आम्ही पुन्हा वाणवलीलाच जाण्याचा निर्णय घेतला, बामणोली रद्द झालं, आता पुन्हा दोनेक तासांचा प्रवास होता. फक्त अंधारात…
सगळीकडे पाणी… समोरचं पाणीही या अंधारात दिसत नव्हतं फक्त कधी तरी अंगाला पाण्याचे थेंब लागल्यावर जाणवायचं की आपण बोटीत आहोत. भूक लागलेली… बिस्कीट वगैरे खाण्याचे पदार्थ संपलेले… पाणीही भरपूर पिलं तरी भूक काही शमत नव्हती. पुन्हा पाऊस किंवा वारा सुरू होऊ नये, असंच मनोमन वाटत होतं. देवाला मानत नसल्यामुळे प्रार्थना वगैरे करायचा प्रश्नच नव्हता. किनाऱ्यावरून एखादा लाईट दिसला की हायसं वाटायचं… तेवढाच काय तो दिलासा. पण एखाद्या एस टी किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या लहान मोठ्या वाहनाचा हेड लाईट जसा दिसायचा तसा तो बंदही व्हायचा, वाहन पुढे गेलं की… पुन्हा अंधार… असा आकस्मिक चमकून गेलेल्या लाईट नंतर आधीच असलेला अंधार आणखी भीषण वाटू लागतो. बोटीच्या पुढे किंवा बाजूला अंधारामुळे पाणीही दिसत नव्हतं, त्यामुळे आपण बराचवेळ एकाच ठिकाणी थांबलेलो आहोत, असं वाटायचं… पण बोट मात्र तिच्या वेगाने पुढे सरकत होती.
शेवटी भूषण आणि त्याच्या एका मित्राने सांगितलं की आता पाचेक मिनिटात तापोळा येईल, आम्ही तिथे उतरणार आहोत, आमच्या बाईक्स तापोळ्याला ठेवलेल्या आहेत. त्यांनी सांगितलं की ते बाईक्सने वानवलीला आमच्या आधी पोहोचणार होते… अंधारात कुठल्यातरी किनाऱ्याला बोट थांबवली, भूषण आणि त्याचा मित्र बोटेतून उतरले… त्यांना अंधारात वेगवेगळ्या किनाऱ्यांची खूण कशी सापडते, याचंही आश्चर्य वाटलं, पुन्हा आमचा वाणवलीचा प्रवास सुरू झाला,
नावाड्याने सांगितलं की आता अजून विसेक मिनिटे लागतील… अर्ध्या तासाच्या पाण्यातल्या प्रवासानंतर वाणवलीचा किनारा आल्याचं नावाड्याने सांगितलं.
त्याला या किनाऱ्यावरील गावाची नावे कशी कळतात, देव जाणे… कारण आम्हाला काहीच दिसत नव्हतं, त्याने सांगितलं तिथं उतरलो… आम्हाला उतरायचं केंद्र वाणवलीतच असल्याचंही तो म्हणाला, योगेश कर्डिले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा हा नावाडी परिचित असावा… आम्हा सर्वांची वाटचाल अंधारातच सुरू होती, कुठे काहीच दिसत नव्हतं. आम्ही आपलं चालत होतो. नदीपात्रातून वर जाणारा एक उंच डोंगर.. मग रस्ता… केंद्राकडे जाणारा… खरं तर आता एकही पाऊल टाकवत नव्हतं, कारण पायांनी केव्हाच राम म्हणायला सुरूवात केलेली… नदी पात्रातला चढ चढून वर आल्यावर एक झाड दिसलं चमचमणारं… जरा जवळ गेल्यावर कळालं की ते काजवे आहेत. पण या झाडाचा फोटो घ्यायचंही जीवावर आलं होतं.
अंगावरचे आणि बॅगेतले ओले कपडे सुकायला टाकल्यावर जेवण झालं, अगदी पोटभर… मग झोप….
सकाळ झाली… आमचा दुसरा दिवस.
आम्ही मुक्काम केलेलं केंद्र म्हणजे एक संस्था होती, श्रमिक आणि ग्रामीण विकासासाठी काम करणारी… या केंद्राचं मुख्यालय या दिवसात म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात कृषि पर्यटन केंद्र म्हणूनही वापरात येतं… सकाळची कामे उरकली. स्वदिष्ट पोहे आणि चहाही झाला, मग ठरलं की नदीवर पोहायला जायचं. मडबाथ करायचं. मडबाथ काय तर नदीतच असलेला गाळ अंगाला फासून घ्यायचा… कल्पना चांगली होती. नदीत भरपूर डुंबल्यावर आम्ही तापोळ्याला जायला सज्ज झालो. यावेळी नदीतून नाही तर बाईकवरून जायचा प्लॅन होता.

या वाणवली गावात सकाळचा टाईमपास सुरू असताना आमच्या लक्षात आलं की या गावात पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे. गाव म्हणाल तर कोयना धरणाच्या अगदी उशाला.. पण सकाळी सकाळी डोईवर पाण्याचे हंडे वाहणाऱ्या बायका पोरी पाहिल्या की आपण सुवर्ण महोत्सव साजरा करत पुरोगामी आणि विकसित असल्याचा डागोंरा पिटणाऱ्या महाराष्ट्रातच असल्याची खात्री पटते.
वीसेक मिनिटांच्या प्रवासानंतर तापोळा आलं. गाव तसं मोठं वाटलं, म्हणजे वाणवलीच्या तुलनेत खरंच मोठं आहे, गावात एक प्राथमिक आरोग्य केंद्र ही आहे… बाकी पर्यटकांना हव्या असलेल्या वस्तू मिळणारी दुकाने प्रामुख्याने या गावात सापडतात. प्रमुख आकर्षण म्हणाल तर वॉटर स्पोर्ट्स… स्पीड बोट, वॉटर स्कूटर असं बरंच काही. वॉटर स्कूटरची एकेक राईड घेतल्यानंतर आम्ही थेट स्पीड बोट घेऊन बामणोलीला निघालो… कारण आमच्या सातारच्या प्रतिनिधीने आम्हाला पुन्हा सातारा मुक्कामी परत नेण्यासाठी आमच्यासाठी पाठवलेली गाडी आमची पाट पाहत असल्याचा निरोप मिळाला.
साडेचारशे रूपयात बामणोलीला पोहोचण्यासाठी स्पीड बोटीचं बुकिंग केलं. या स्पीड बोटीमध्ये बसल्यावर तुम्हाला लाईफ जॅकेट पुरवली जातात. आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. मग परतताना आम्ही आमच्या नव्या नावाड्याशी गप्पा सुरू केल्या. त्याला रात्रीचा अनुभव सांगितला, पुन्हा दिवसाच्या उजेडात फोटोची हौस भागवून घेतली. इथल्या शेतीविषयी विचारल्यावर तो म्हणाला, की पाणी खूप आहे, शेतीही आहे, पण कसणारे सर्वजण मुंबईत जाऊन चाकरी करतात, कुणीही शेती करायला तयार नाही, त्यामुळे पाणी असून उपयोग नाही. त्याला उमगलेलं वास्तव त्याने सांगितलं असणार… पण कोयना धरण आणि अभयारण्याच्या परिसरातले किंवा या दोन्ही प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न अधून मधून माध्यमांचा विषय बनतातच.. आमच्या नावाड्याने सांगितलेला एक नवा पैलू इतकंच…
शेवटी आम्ही बामणोलीला पोहोचलो. इथं पोहोचल्यावर आम्हाला काही नावाडी भेटले, त्यांनी सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर कुठे थांबला, काय काय अडचणी आल्या, ते आमच्या मदतीसाठी येणार होते, वगैरे अशी माहितीही पुरवली. तेव्हा पावसात अडकलो, ते प्रसंग खरोखरच बाका होता, याची खात्री पटली… सुखरूप पोहोचलो, याची खात्री पटली..
परतीचा प्रवास गाडीने सातारच्या दिशेनं होता. पोटात कावळे ओरडत होते, फिरून आलेल्या वासोटा, कोयना अभयारण्य, वाणवली, तापोळा यांच्या आठवणी सोबतच्या फोटोंमध्ये होत्या… वासोटा, कोयना अभयारण्य वगैरे मागे सरकत होतं…