भीमाशंकर ट्रेक व्हाया शिडीघाट

शेवटी आम्ही कर्जत भीमाशंकर ट्रेक पूर्ण करायचा मूहूर्त निश्चित केला. आधी ठरवलेली तारीख एका आठवड्याने पुढे ढकलल्यानंतर रविवार 15 मे ही तारीख निश्चित झाली. पण प्रत्यक्षात निघाले तिघेच जण… मुंबईतून मी, संदीप रामदासी आणि त्यांचा सहकारी गजानन उमाटे… तसं मंचरहून आम्ही आमच्या चॅनेलचा पुणे ग्रामीणचा प्रतिनिधी अविनाश पवार यालाही बोलवून घेतलं होतं. अविनाश एकटा न येता आपल्या एका माहितगार मित्रालाही आणलं.. धनंजय कोकणे त्याचं नाव.. त्याने सह्याद्रीच्या परिसरात अनेक ट्रेक केलेत. त्याचा पूर्वानुभव आम्हाला बराच मोलाचा ठरला. असे सर्व मिळून पाच जणांचा ग्रुप ट्रेकिंगसाठी सज्ज झाला.


कर्जत-भीमाशंकर ट्रेकला आम्ही जोड दिली होती, कृषि पर्यटन केंद्राच्या पिकनिकची… म्हणजे ढोबळमानाने प्रोग्राम असा होता,
शुक्रवारी सायंकाळी मुंबईतून निघायचं, नेरळच्या सगुना बागेत मुक्काम करायचा, दुसरा दिवसही तिथेच एन्जॉय करायचा आणि मग रविवारी पहाटे खांडसकडे कूच करायचं…

सगुना बाग मार्गे भीमाशंकर व्हाया खांडस-काठेवाडी आणि परत हा सुधारित प्रोग्राम खूप उशीरा ठरला असला तरी अनेकांनी एवढ्या उन्हाळ्यात हा ट्रेक न करण्याचा सल्ला दिला होता. पण कळसूबाईही मार्च महिन्यातल्या रखरखत्या उन्हातच पूर्ण केल्यामुळे हा सल्ला आम्ही फारसा मनावर घेतला नाही.

पावसाळ्यातल्या कात्रज-सिंहगड या ट्रेकपूर्वी किमान तीन ट्रेक तरी पूर्ण करायचे असं मी ठरवलंच होतं, पहिला कळसूबाई झाला, आता हा कर्जत-भीमाशंकर आणि तिसरा प्रस्तावित आहे.. वासोटा किल्ला.. पण पावसाळ्यापूर्वीच
…………….

आमच्या दोन दिवसांच्या पिकनिक आणि ट्रेकची सुरूवात सगुना बागेपासून झाली, नेरळच्या चंद्रशेखर भडसावळे यांच्या सगुना बागेविषयी लिहायचंय, तिथल्या दोन मुक्कामाविषयी, कृषि पर्यटनाविषयी, भडसावळे दादांबरोबर मारलेल्या गप्पांविषयी, उल्हास नदीत उभा राहून चहा पिण्याविषयी (मंजे स्वर्गसुख)

लिहायचंय… पण जरा तब्येतीने… आधी भीमाशंकरचा ट्रेक
…………….

आपण ज्याला एक दिवसाचं अॅडव्हेंचर स्पोर्ट्स किंवा ट्रेकिंग म्हणत पुण्या-मुंबईहून सुरूवात करून डोंगर दऱ्या, गड-किल्ले हिंडतो, मग ब्लॉग लिहितो, फोटो काढतो… सोशल नेटवर्किंगवरूनही गाजावाजा करतो, स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेतो, ते खरं तर याच डोंगरदऱ्यातल्या लोकांचं रोजचं जगणं असतं..

कळसूबाई शिखर चढलो, त्यावेळीही हाच अनुभव होता, आणि आता कर्जत भीमाशंकर ट्रेक पूर्ण केल्यावर याचाच प्रत्यय आला.

सगुना बागेतून आम्ही पहाटे पाच वाजता निघायचं ठरवलं होतं, तसे चार वाजताच्या अलार्मने सगळे झोपेतून उठलेही होते, पण आवराआवर करायला पाच वाजले. त्यानंतर भडसावळे दादांचा निरोप आला की चहा तयार आहे, मग आम्ही सगुना बागेतल्या त्यांच्या घराकडे चहा पिण्यासाठी निघालो. तिथेच त्यांनी कागदावर नकाशा काढून खांडसपर्यंत कसं पोहोचायचं ते लिहून दिलं. हे समजावून सांगताना चहा पिऊन झाला.

दादांनी मार्ग समजावून सांगितला तो असा, नेरळमध्येच साई मंदिर कॉर्नरपासून डावीकडे वळायचं, हा कशेळे गावाकडे जाणारा रस्ता आहे, कशेळे गावातून खांडसला रस्ता जातो… तिथे काठे नावाच्या त्यांच्या परिचिताकडे गाडी ठेवायला सांगितली…

आम्ही निघालो…

भडसावळे दादांनी कागदावर खाणाखुणांसह खांडसपर्यंत पोहोचायचा मार्ग आखून दिला असला तरी आणि रस्त्यावर तो कोणत्या गावाला जाणारा रस्ता आहे, याच्या पाट्या असल्या तरी आम्ही वाटेतही एक दोघांना विचारून आपण जात आहोत, तो रस्ता बरोबर असल्याची खात्री करून घेतली.

कशेळे गावाच्या चौकातून मग खांडसकडे रवाना झालो, खांडसमध्ये पोहोचल्यावर काठे गुरूजींचा पत्ता विचारला तर ते पुढे काठेवाडीत राहतात, असं समजलं, मग काठेवाडीकडे निघालो. खरं तर या काठेवाडीतूनच भीमांशकरला जाण्याची डोंगरवाट आहे.

ट्रेकला प्रत्यक्ष सुरूवात करण्यापूर्वी आम्हा पाचही जणांचा एक फोटो काढून घेतला…

भीमाशंकर चढायला सुरूवात झाली… शेतातून-माळावरून वाट तुडवत निघालो… पाचेक मिनिटे चालत नाहीत तोवरच मागून एक हाळी आली… सांगणारा काय म्हणत होता, ते कळलं नाही तरी आम्ही वाट चुकलोय, हे त्याच्या हातवाऱ्यांवरून समजलं. मग पुन्हा थोडंसं मागे फिरून हाळी देणाऱ्याच्या हाताच्या दिशेनं चालायला सुरूवात केली,

मग एक वाटाड्या सोबती मिळाला. त्याला भीमाशंकरालाच जायचं होतं. त्याच्या डोक्यावर एक पिशवी होती, त्यामध्ये बिसलरीच्या काही बाटल्या होत्या. या बाटल्यातून काय घेऊन जाताय, असं विचारल्यावर त्याने निःसंकोचपणे सांगून टाकलं की मोहाची दारू हाये. रविवारी भीमाशंकरला खपते. बाटली केवढ्याला अशं विचारलं तर उत्तर आलं दोनशे रूपये… आम्हाला त्यात काहीच रस नव्हता.

मध्ये केव्हा तरी त्याला नाव विचारून घेतलं, तर म्हणाला देवू… हा देवू पहिल्यांदा भेटला तसा चक्क उघडाबंब होता, नाही म्हणायला एक लाल शॉर्ट एवढाच काय तो त्याचा त्या दिवशीचा वेष… आम्हाला वाटलं त्याला डोंगर चढायला सोपं जावं म्हणून त्याने केला असेल हा खास वेष परिधान. मध्ये एक जंगल लागलं तसा हा देवू गायब झाला, म्हणजे त्याचा चालण्याचा स्पीड आमच्या स्पीडशी मॅच होत नव्हता, त्याला घाई होती, मोहाची दारू लवकर भीमाशंकरला पोचवायची. म्हणूनही असेल कदाचित लवकर झपाझप पावलं टाकत होता. मध्येच असंही वाटून गेलं की हा आम्हाला सांगण्यासाठीच फक्त मोहाची दारू म्हणतोय, खरं तर त्याच्याकडे हातभट्टीच असली पाहिजे, असाच आमचा मध्यमवर्गीय पांढरपेशी संशय

आमचं ट्रेकिंग जंगलातून, डोंगरकपारीने, जरा दमादमाने, गप्पा-बिप्पा मारत म्हणजेच निवांत चाललं होतं, जरा बसत, हाश्शहुश्श करत, मध्येच बऱ्यापैकी पाणी पित, सोबत घेतलेले गूळ-शेंगदाणे, बिस्कीटे खात आमची चढाई सुरू होती. त्यामुळे देवू केव्हाचाच पुढे निघून गेला…

आपण ज्याला एक दिवसाचं अॅडव्हेंचर स्पोर्ट्स किंवा ट्रेकिंग म्हणत पुण्या-मुंबईहून सुरूवात करून डोंगर दऱ्या, गड-किल्ले हिंडतो, मग ब्लॉग लिहितो, फोटो काढतो… सोशल नेटवर्किंगवरूनही गाजावाजा करतो, स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेतो, ते खरं तर याच डोंगरदऱ्यातल्या लोकांचं रोजचं जगणं असतं..

देवू या दोंगरदऱ्यातलाच एक… देवू सारखेच अनेक जण आम्हाला भीमाशंकरच्या वाटेवर भेटले, त्यात काही महिलाही होत्या, तर काही लहान शाळकरी मुले आणि मुलीही… रविवार असतानाही या मुलीचं भीमाशंकरला काय काम, असं विचारल्यावर उत्तर आलं की जंगलात सापडलेली करवंदं, जाभळं घेऊन त्या विकायला निघाल्यात. तेवढाच हातभार लागतो खर्चाला…

पदरवाडी नावाचं एक गाव या मार्गावर लागतं. पदरवाडी म्हणजे जेमतेम सात-आठ घरे असतील. खाली खांडस-काठेवाडी… तर वर भीमाशंकर… या दोन्हीच्या मध्ये ही साताठ घरांची वस्ती… दोन गावांच्या मधल्या डोंगराच्या पदरात वसलेली वाडी म्हणून पदरवाडी हे नाव घेतलं असावं या गावाने…

पदरवाडीच्या लोकांना खाली कोकणात जायचं असेल तर शिडी घाट किंवा गणेश घाट पार करण्यावाचून पर्याय नाही. तसं भीमाशंकरला जायला शिडी घाटाइतका अवघड मार्ग नसला तरी दमझाक करणारा जंगल आणि डोंगराचा रस्ता मात्र सर करावाच लागतो, पण ते त्यांचं रोजचचं काम… तसं पदरवाडी हे गाव दिलीप वळसे-पाटलांच्या मतदारसंघातलं शेवटचं टोक म्हणजे पुणे जिल्ह्यातलीच एक वाडी.

आमचं मार्गक्रमण सुरूच होतं. दोन अवघड चढणी पार केल्यानंतर एक कडा लागला. हा पार कसा करायचा?

आपल्या लगबग चालण्याने आमच्या खूप पुढे निघून आलेला देवू तिथे आमची वाट पाहात होता, वरून मध्ये मध्ये हाळीही द्यायचा, लवकर या… त्याला माहितीच असावं कदाचित ही मंडळी मंजे आम्ही इथे थांबणार… कुणाच्या तरी मदतीसाठी… तसाच तो थांबला असावा.. या संपूर्ण ट्रेकमधला हा अतिशय अवघड असा कडा आहे… या कड्याच्या वरच्या टोकाला काही नैसर्गिक कपारी तयार झाल्यात, जेमतेम हाताची चार बोटं एकावेळी जातील एवढ्याच या दोन-तीन कपारी आहेत. तसंच खालच्या बाजूला पाय टेकवण्यासाठी अतिशय बारीक खाच… तिथे तुम्ही जेमतेम पाय टेकवू शकता, ठेवण्याची बातच नाही…

तिथे तेवढ्याच्या खाचेवर तुमच्या पायाने ग्रीप पकडली नाही तर थेट खाली दरीत… किंवा वरच्या कपारीत बोटे व्यवस्थित अडकली असली तर लोंबकळत बसायचं, कुणीतरी मदत करेपर्यंत…

हा कडा पार करताना देव आठवतो, पण आमच्यासाठी देवू मदत करायला थांबलाच होता.

शेवटी हा कडा पार केला एकदाचा, मग लागतात शिड्या.. दोन शिड्या… डोंगर कपारीत फक्त ठेवलेल्या… त्यातली एक सुतळीसदृश्य बांधलेली दोरीने बांधलेली, एका झाडाच्या मुळीला…

हा शिडी घाट पार केल्यानंतर तुम्ही पदरवाडीत पोहोचता. पण तोपर्यंत तुमच्यासाठी थांबलेला देवू बराच पुढे निघून गेलेला असतो, आणि तुम्ही चर्चा करत असता त्या अवघड कड्याची आणि त्या गंजलेल्या आणि हेलकावे खात असलेल्या शिड्यांची…

पदरवाडीचं शिवार पार करताना आम्हाला आमच्या सोबत असलेला आमचा पुणे ग्रामीण प्रतिनिधी अविनाश पवारने माहिती पुरवली की या गावात एक मोठा जनरेटर सेट बसवण्यात आला होता. तो त्याची स्टोरी कव्हर करण्यासाठी आला होता, हा जनरेटर सेट या डोंगरदऱ्यांच्या मार्गांवरून सुट्ट्या भागांच्या रूपात आदिवासींनी डोक्यावरून वाहून नेला होता, मग पदरवाडीत त्याचं असेम्ब्लिंग करण्यात आलं होतं.

पदरवाडीला मागे टाकून आम्ही पुन्हा डोंगराचे चढ पार करून जंगलातल्या एका वाटेवर थांबलो. इथे आल्यावर भूक लागल्याची जाणीव झाली. मग आम्ही आमच्या सोबत असलेली बिस्कीटे आणि गूळ-शेगदाणे बाहेर काढले. तर आमच्या बिस्कीटात वाटा मागायला आमचे पूर्वजही तिथे लगेच हजर झाले. हे पूर्वज म्हणजे जंगलाचे कायमस्वरूपी रहिवासी असलेली वानरं.. त्यांना चुकवून आम्हाला काहीच खाता येईना… शेवटी आम्ही आमच्या जवळची सर्वच बिस्कीटे त्यांना देऊन पुढे निघालो, नाहीतर आम्हालाच तिथून पुढे जाता आलं नसतं, मंजे घाबरलोही होतो, बऱ्यापैकी…

मग हळू हळू भीमाशंकर जवळ येत गेलं. इतक्या वेळात म्हणजे दोन-अडीच तासात आम्हाला समोरून कुणीच येताना दिसलं नव्हतं. शेवटच्या टप्प्यात मात्र दोघे-तिघे ट्रेकर्सच असावेत बहुतेक समोरून येताना दिसले, त्यांनी सांगितलं की आता जेमतेम वीसेक मिनिटांचा मार्ग राहिलाय… मग जरा हायसं वाटलं,

आधीच दमलेल्या पायात थोडासा जोर आला, पावलं झपाझपा पडू लागली.

आणि पोहोचलो एकदाचे भीमाशंकरला…

पण तिथे पोहोचल्यावर पहिल्यांदाच आम्हाला उन्हाची तीव्रता जाणवली,

खांडस-काठेवाडीहून येताना सूर्य आमच्या विरूद्ध वाजूला असल्यामुळे उन्हाचा अजिबात त्रास झाला नव्हता.

भीमाशंकरला पोहोचल्यावर मंदिरात जाऊन दर्शन घेणं हा तसा आमचा उद्देश नव्हताच. मग सगळ्यात आधी मस्त वडा-पाव खाल्ला… मग सर्वांनी मिळून ठरवलं की तिथून दहा-पंधरा किलोमीटर असलेल्या एका रिसॉर्टवर जाऊन फ्रेश व्हायचं. मग अविनाश पवारच्या मदतीने एक महिन्द्रा जीप अरेंज झाली.

त्यांनंतर आम्ही स्वारी पोहोचली हॉटेल ब्लू मॉर्मनवर… तिथे आंघोळ वैगेरे उरकून घेतल्यावर भरपेट जेवण झालं, जेवण करताना पुन्हा आपल्याला आलेल्या मार्गानेच खांडस-काठेवाडीला जायचं हे आम्ही सर्वजणच विसरून गेलो होतो. जेवण झाल्यावर किती खाल्लंय हे लक्षात आलं. पण तेव्हा काहीच इलाज नव्हता.

घड्याळात दुपारचे साडेबारा वाजले होते.

मग आम्ही सर्व जण निघालो, भीमाशंकर मंदिराकडे… भीमाशंकर मंदिरात मी आणि धनंजय कोकणे वगळता सर्व सहकाऱ्यांनी दर्शन घेतलं. अगदी रांगेत उभं राहून भर उन्हात दगडी फरशीवरून त्यांनी मंदिराला प्रदक्षिणाही घातली, या मंदिरात प्रदक्षिणा मार्गावर रबर कारपेट अंथरल्या आहेत. ही तशी भक्तांची चांगली सोय… फक्त एका ठिकाणी रबर कारपेट तिथल्या एका फेरीवाल्याने स्वतःच्या पथारीकडे ओढून घेतली होती, कारण त्यांच्याकडे येणाऱ्या गिऱ्हाईकांचे पाय पोळू नयेत म्हणून… मग त्या पथारीवाल्याकडे न जाता ज्या भक्तांना प्रदक्षिणा पूर्ण करायची होती, त्यांचे पाय मात्र त्या ठिकाणचं रबर कार्पेट हटवल्यामुळे चटा चटा भाजत होते, मग लवकर पुढचं रबर कारपेट पकडण्यासाठी त्यांना अक्षरशः पळावं लागे. मग तिथूनच एक महाराज गेले, मंदिराचे पुजारी असावेत, त्यांना मी ही अडचण सांगितली, पण त्यांना माझा मुद्दाच पटला नाही, मग मी आणि अविनाश पवार यांनी एके ठिकाणी गुंडाळून ठेवलेली रबर कार्पेट पसरवून टाकली. तेवढंच दर्शनाला आलेल्या भक्तांचे आशीर्वाद… भीमाशंकराचं दर्शन घेतलेलं नसल्यामुळे त्याचे आशीर्वाद मिळणारच नव्हते, पण त्याच्या भक्तांच्या दुवा मिळाल्या तर काय हरकत आहे….

अशी थोडीशी समाजसेवा करून आम्ही परतीची वाटचाल करायला ठरवलं. खांडसकडे जाणाऱ्या डोंगरवाटेने आम्हाला शर्टृपँट घातलेला एक जण बसलेला दिसला. त्याच्यासोबत त्याचे इतरही मित्र वैगेरे होते. जरा बारकाईने पाहिल्यावर कळ्ळं की अरे हा तर आपला देवू… शिडीघाटाचा अवघड कडा पार करून देणारा… पूर्ण कपड्यात असल्यामुळे आता ओळखूच येत नव्हता. त्याला येणार का खाली असं विचारल्यावर म्हणाला की ऊन उतरल्यावर चार-चाडेचारच्या सुमारास तो निघेल. आम्हालाही आता न जाण्याविषयी त्याने सुचवलं, कारण काय तर शिडी घाटाचा कडा आता खूप तापलेला असतो. शिडी घाडातल्या त्या कड्यावर जिथे नैसर्गिक खाचा तयार झाल्यात तिथे आता बोटेही ठेवता येणार नाहीत, असा अनुभवाचा सल्लाही त्याने दिला.

आम्ही पुन्हा द्विधा मनस्थितीत…

पण मग निश्चय करून निघालो, रस्त्यात कुठेतरी अर्धा-एक तास विश्रांती घ्यावी आणि शिडी घाटातलं ऊन जरा मावळलं की शिडी घाट पार करावा असा विचार करून आम्ही दोन-पावणेदोनच्या सुमारास खांडस काठेवाडीकडे प्रस्थान ठेवलं.

नाही तरी आमचा चालायचा स्पीड आम्हाला ठाऊकच होता. विश्रांती घ्यायची गरज न पडताही शिडी घाटाचा तो अवघड कडा पार करायला दिवस मावळलाच असता… जाताना मग आमच्या सोबत असलेल्या गजाननने शिडी घाटाऐवजी गणेश घाटातूनच जाण्यासाठी अनेकदा सुचवून पाहिलं.. पण त्याचं कुणीच ऐकलं नाही. प्रत्येकाला तो थरार पुन्हा अनुभवयाचा होता. तरीही पदरवाडीपर्यंत गजाननचं गणेश घाट मार्गे जाण्याचं तुणतुणं सुरूच होतं.

भीमाशंकरहून खांडस-काठेवाडीकडे परतताना आमच्या मागे एक कुत्रं लागलं. आमचा पिच्छाच सोडेना.. कितीही हाकललं तरी त्याला आमच्या सोबत यायचं होतं. जरा बारकाईने पाहिल्यावर लक्षात आलं की ती कुत्री होती. आम्ही विचार केला, जंगलातल्या रस्त्यावर ती माकडांना भीत असेल, म्हणून तिला आमच्या सोबत यायचं असेल… तसंही तिला काही कडेवर घ्यायचं नव्हतं म्हणून आम्ही येऊ दिलं तिला आमच्या सोबत… आम्हाला वाटलं तिला पदरवाडीपर्यंत यायचं असेल… जंगलातल्या वाटेवर सोबत हवीच…

पण तिने जंगलातल्या प्राण्यांच्या तुलनेत आम्ही माणसांवर विश्वास टाकला हे काय कमी होतं!!!!!!

या कुत्रीसोबत पदरवाडीचा रस्ता पार करताना लक्षात आलं की तिला आमच्या सावलीत चालायचंय… कारण उन्हाचा त्रास तिलाही होतोय. त्यामुळेच आम्ही थांबलो की तिही थांबलीच…

उतरताना रस्ता थोडा सोपा वाटला तरी, आधीच्या चढणीमुळे पायांनी मान टाकल्याने हा उताराचा सोपा रस्ताही अवघड वाटत होता. शिवाय फक्त भरपेट नाही तर अतिभरपेट जेवण झालेलं…

त्यामुळे चालण्याचा त्रास तर होतच होता, पुन्हा कडक आणि भाजून काढणाऱ्या उन्हाचा मारा…

रस्ता आता माहितीतलाच होता. तरीही एखाद्या दगडावर किंवा मुळीवर ग्रीप न बसल्याने पाय घसरायला व्हायचा. मग कुणीतरी सांगितलं अशी रस्त्यावर पाय टेकवताना तो थोडा तिरका टाका,

अरे हे आपल्या कसं लक्षात आलं नाही, कळसूबाईपण असंच उतरलो होतो की. तिथेही ऊन होतंच फक्त भरपेट जेवण झालेलं मात्र नव्हतं…

पदरवाडीच्या शिवारात झाडांच्या गर्द सावलीत एक म्हातारा ताक विकत बसलेला होता. तिथेच पाठ टाकायचीही सोय होती, आम्ही लगेच ताणून दिली. भरपूर पाणी पिलं, त्याच्याकडील ताकही दिलं. त्याच्याकडून माहिती घेतली, कडा किती तापलेला असेल, मग या परिसरातले लोक यावेळी जातच नाहीत का… गणेशघाटाने गेलं तर किती लांब पडेल.. अशा आमच्या चौकश्या सुरू होत्या…

या चौकश्या करत असतानाच कधीतरी डोळा लागला. छान अर्धा-पाऊण तासाची झोप झाली.

मग उठून पाणी पिल्यावर पुन्हा अंदाज घेतला, तर त्या म्हाताऱ्याकडे खांडस गावातलेच दोघे तिघे जण बसलेले होते. त्यांनी सांगितलं की ते ही आत्ताच निघणार आहेत. त्यांच्यापैकी एकजण गावातल्या गणेश मंदिराचे पुजारी होते, दुसरे त्यांचे सहायक असतील, भीमाशंकरला कुठल्या तरी लग्नाला गेले होते. लग्न झाल्यावर ते ही परतीच्या प्रवासाला लागले होते.

मधल्या काळात भीमाशंकरपासून आमच्या मागे लागलेली कुत्री कुठे दिसेनाशी झाली, आम्हाला वाटलं ती पोहोचली असेल एव्हाना तिच्या घरी…

गणेश मंदिराचे पुजारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत जायचं की नाही, हे आम्ही ठरवतच होतो, त्यांच्याबरोबर आता चालायला सुरूवात केली तरी त्यांच्या गतीने चालू शकू की नाही, अशी भितीही होतीच… मग हो नाही करत निघालो त्यांच्यासोबतच…

सकाळी वर येताना जशी देवूने सगळ्यांना मदत केली, तशीच यावेळी या महाराजांनी मदत केली. प्रत्येकाला पाय ठेवायची खाच कुठे आणि हाताची बोटे घालायची कपार कुठे आहे, याची माहिती ते देत होते. फरक एवढाच होता की या कपारीत हात घातल्याबरोबर हाताची बोटे अक्षरशः भाजून निघाली.. तरीही तिथून हात काढता येत नव्हता कारण खाली पडून कपाळमोक्ष व्हायची भिती…

एकदाचा तो अवघड कडा पार केल्यानंतर आमच्या हातावर फुंकर मारत जरा वेळ बसलो, पण आमची आम्हालाच लाज वाटली कारण आम्हाला मदत करणारे महाराज आणि त्यांचे सहकारी तर चक्क उघडेबंब होते, असल्या तळपत्या उन्हात… मला वाटलं हा कडा पार करण्यासाठी पकडे गैरसोईचेच असावेत.

कारण सकाळी भेटलेला देवूही असाच होता. त्या महाराजाच्या सहकाऱ्याच्या पायात तर चपलाही नव्हत्या. शिवाय ग्रीप येणारे शूज घातलेले आम्ही, मात्र त्यांच्या पायात मात्र साध्या चपला होत्या… या चपला घालूनही त्यांना पाय ठेवायची खाच व्यवस्थित सापडत होती,

हा अवघड कडा पार केल्यावर लक्षात आलं की भीमाशंकरपासून मागे लागलेली कुत्री आमच्या सोबत नाहीय. मगल रूखरूख लागली. तेवढ्यात अविनाश आणि धनंजय यांनी माहिती पुरवली की तिला शिड्या उतरता आल्या नाहीत, शिडीवरून खाली घ्यावं यासाठी ती विव्हळत होती, पण आम्हाला समोर उतरायचा कडा दिसत होता, कुणाचंच लक्ष तिच्याकडे नव्हतं. दोन अवघड शिड्या आणि कडा पार केल्यानंतरच ती आमच्यासोबत नसल्याचं लक्षात आलं.

हा कडा पार केला म्हणजे तुम्हाला खांडसला पोहोचल्याचं समाधान मिळतं. त्यापूर्वी दोन शिड्या आहेत, पण त्याची एवढी भिती वाटत नाही, उतरताना… मग त्या महाराजांनीच सांगितलं की आत्ता तुम्ही जेमतेम अर्धा मार्ग सर केलाय, अजून तुम्हाला एवढंच चालायचं.

आमच्यासाठी आपल्या चालण्याची गती कमी केलेले महाराज आणि त्यांचे सोबती मात्र नंतर निघाले, तुरू तुरू… जंगलात कुठेतरी दिसेनासे झाले.

आम्ही आपलं, थांबत, बसत चालतच होतो.

खड्या भितींसारखा उंच असलेला तो कडा उतरल्यावर आपण काय उतरलोत हे पाहण्यासाठी एक फोटोही काढून घेतला, त्याचवेळी आनम्हाला सकाळी भेटलेला देवूने आमच्या मागून सुरूवात करून आम्हाला गाठलं होतं. त्याने सांगितलं की साडेचारलाच उतरायला सुरूवात केली, फक्त तासाभरात तो आमच्यासोबत होता.

मग आणखी अर्धा पाऊण तास चालल्यावर आम्ही पायथ्याला पोहोचलो.

काठे गुरूजींकडे भरपूर थंडगार पाणी प्यालो. एक मोठा ट्रेक पूर्ण केल्याचं समाधान होतं. तशी उंची कळसूबाई शिखरापेक्षा बरीच कमी असली तरी तो अवघड कडा आणि शिड्यांमुळे हा ट्रेक कळसूबाईपेक्षाही अवघड होता.

आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. अविनाश पवारची गाडी होतीच, मग कुठेही न थांबता थेट सगुना बाग गाठली… कारण तिथे पोहोचल्यावर आम्हाला नदीत डुंबायला मिळणार होतं… भीमाशंकर ट्रेकचा थकवा घालवण्यासाठी यापेक्षा उत्तम उपाय तो कोणता…


Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Join the Conversation

4 Comments

  1. Meghraj G..I had not remind properly that anytime u had told about your this venture..as i know u, but doing something different is verygood..it is nice to read and share your experience with us..convey my feelings to sandip also..nice..all the best for next venture…

  2. धनाजीराव, मला हा ट्रेकिंगचा छंद तसा अलिकडेच जडलेला… तसा मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी होताच, आता जर वर डोकावलाय, अगदी लहानपणचं सांगायचं तर आम्ही येरमाळ्याच्या येडेश्वरीला नवरात्रात घालायचो ते खेटे म्हणजे एक ट्रेकिंगच होतं की…

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: