ओसामा बिन लादेन.. 9/11 नंतर तब्बल दहा वर्षे अमेरिकेला अस्वस्थ करून सोडणारं नाव.. सोमवारी पहाटे म्हणजे अमेरिकेच्या कॅलेंडर प्रमाणे एक मे रोजीच अमेरिकन नेव्ही सील्सनी त्याचा खातमा केला. दहशतीचा एक अध्याय संपवला.
ओसामा तब्बल दहा वर्षे अमेरिकेच्या निशाण्यावर होता. मात्र नेहमी त्यांना चकमा द्यायचा, काल मात्र त्याचा खेळ संपला. आता ओसामाला मारलं कसं? अमेरिकी अधिकाऱ्यांनी या मिशनचं प्लॅनिंग कसं केलं? तो अबोटाबाद या पाकिस्तानी शहरात कसा सहावर्षांपासून पाकिस्तानात लपून होता. बराक ओबामांनी या कारवाईला कशी परवानगी दिली. अबोटाबादमधल्या कारवाईचं त्यांना मिनिटा मिनिटाचं अपटेड कसं मिळत होत, हे सर्व आता बातम्यांचे, वेगवेगळ्या फीचर स्टोरीजचे विषय आहेत.
ओसामाचा खेळ खल्लास झाला तेव्हा मी नेहमीप्रमाणे (सोमवारची पहाट असल्यामुळे) मी बार्शीच्या जवळपास होतो. स्टार न्यूजच्या एसएमएसने ओसामा ठार झाल्याचं सांगितलं. मी तब्बल दहावर्षांपूर्वीच्या काळात डोकावलो.
पहिल्यांदा ओसामाचं नाव कानावर आदळला तो दिवस मंगळवार होता. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर तालिबानी अतिरेक्यांनी हल्ला करून जगभरात हाहाकार उडवून दिला होता. त्यांनतर हा मंगळवार म्हणजे शॉर्टफॉर्ममध्ये 9/11 म्हणून ओळखला जाऊ लागला होता.
तेव्हा मी हैदराबादला ईटीव्हीत होतो. आकाशाशी स्पर्धा करणारे दोन मनोरे दोन अज्ञान विमानांनी जमीनदोस्त केले होते. मग नंतरच्या काही दिवसात आजच्या सारखे खंडीभर चॅनेल्स नसतानाही 9/11 हा एक इव्हेन्ट कसा झाला, ते ही ध्यानात आलं. मग अपेक्षेप्रमाणेच अफगाणिस्तानमध्ये मिलिट्री अॅक्शन सुरू झाली, आणि ईटीव्हीवर एक स्वतंत्र न्यूज बुलेटिन सुरू झालं, वार स्पेशल न्यूज बुलेटिन…
काल ओसामा ठार झाल्यावर माझा ईटीव्हीतला जुना सहकारी नरेन्द्र बंडबेचा फोन आला, त्यावेळी बार्शीपासून दूर असलेल्या माझ्या शेतात होतो. त्याने सांगितलं, तुझा ओसामा मेला, त्यावर आता काहीतरी लिही, तुझ्या वार स्पेशल बुलेटिनमध्ये बराच चमकायचा, त्यावेळी तो… मग तिथेच ठरवलं की मुंबईत परतल्यावर ओसामावर लिहायचं.. खरं तर ओसामा मेल्याचा एसएमएस आल्यापासूनच त्याच्यावरचा ब्लॉग आकार घेत होता. कारण ईटीव्ही वॉर स्पेशल बुलेटिनची तेव्हाच पहिल्यांदा आठवण आली… तेव्हा ओसामा लिहायचं की उस्मा-बिन-लादेन
असं लिहायचं… यावरही अनेकांशई वाद झाला होता. अमेरिकी प्रशासनाच्या काही साईट्सवर तेव्हाही उस्मा-बिन-लादेन (USMA-BIN-LADEN) असं स्पेलिंग असल्याचं मी दाखवलं होतं. पण मराठी वृत्तपत्रांसकट सबंध जगभराने त्याला ओसामा असं नामकरण केल्यावर तो ओसामा म्हणूनच पटकन लक्षात यायला लागला.
ईटीव्हीच्या वार स्पेशल बुलेटिनचं फीड (व्हिडिओ फूटेज) मिळायचं ते सीएनएन न्यूजसोर्स या त्यांच्या सिंडीकेट न्यूज एजन्सीकडून आणि रॉयटर्सच्या व्हिडिओ न्यूज सर्विसकडून… त्याकाळात (दहा वर्षे सरून गेलीत, म्हणून ‘त्याकाळात’) ईटीव्हीत व्हाईसओव्हर स्क्रीप्ट करण्यासाठी कॉम्प्युटर नव्हते. या दोन प्रमुख आंतरराष्ट्रीय एजन्सीजकडून येणारं फीडही टेपवर रेकॉर्ड करून घ्यावं लागे.
सीएनएन ही वृत्तवाहिनी सबंध जगभरात प्रसिद्ध झाली ती गल्फ वॉरमुळे… आता दुसऱ्यांदा तिला अशीच संधी मिळत होती. अफगाणिस्तान युद्धाच्या निमित्ताने, त्यामुळेही असेल कदाचित.. मी त्या स्पेशल बुलेटिनसाठी सीएनएन न्यूजसोर्सचा वापर सर्वाधिक केला.
अमेरिकेच्या लष्करी कारवाईच्या काळातच अमेरिकेत तेव्हा अँथ्रॅक्सच्या अनेक बातम्या यायच्या. कुठेही अँथ्रॅक्स सदृश्य पावडर सापडली की त्याची ब्रेकिंग न्यूज व्हायची. ईटीव्ही हे एन्फोटेनमेंट चॅनेल असल्यामुळे तेव्हा ब्रेकिंग हा आमच्यासाठी निषिद्ध शब्द होता.
अफगाणिस्तानातली कारवाई अनेक दिवस फक्त विमानातून बॉम्बफेक करण्यापुरतीच होती. तसे सीएनएनचे काही रिपोर्टर अफगाणिस्तानात दाखल झाले होते. ख्रिस्तीना अमानपूर ही त्यापैकीच एक. ती तेव्हा सीएनएनची प्रमुख आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी होती. भारतातीलसीएनएनचे प्रमुख सतिंदर बिंद्रा हेही तेव्हा अफगाणिस्तान मुक्कामी दाखल झाले होते. अफगाणिस्तानातली लष्करी कारवाई अमेरिकेने 9/11 च्या हल्ल्यानंतर फक्त एक महिन्याच्या आत म्हणजे 7 ऑक्टोबर 2001 ला सुरू होती. ‘ऑपरेशन एन्ड्युरिंग फ्रीडम’ असं गोंडस नाव या लष्करी कारवाईला देण्यात आलं होतं.
सात तारखेच्या संध्याकाळी अफगाणिस्तानात बॉम्बहल्ले सुरू झाले. आठ तारखेला वॉर स्पेशल बुलेटिनचा पहिला अंक ऑन एअर झाला. तेव्हापासून अफगाणिस्तानातलं युद्ध रम्य न राहता रटाळ होईस्तोवर हे बुलेटिन सुरू राहिलं. हे बुलेटिन ऑफ एअर कधी झालं हे मात्र आता आठवत नाही. नंतर अफगाणिस्तानलं युद्ध हे तालिबानच्या पाडावानंतर बेचव झालं, आणि कसलाही प्रतिकार न करता तालिबानने उत्तरेकडून आलेल्या संयुक्त फौजांपुढे सपशेल शरणागती पसरली, यामुळे या युद्धातला इव्हेंट संपूनच गेला. मग हळू हळू ईटीव्ही वॉर स्पेशलही…
सीएनएनचे देशोदेशीचे प्रतिनिधी तेव्हा फक्त 9/11, जागतिक म्हणा की इस्लामी दहशतवाद आणि अफगाणिस्तान, इस्लामी राष्ट्रे यासंदर्भातल्याच बातम्या देत. त्याशिवाय अन्य कोणतीही बातमी सीएनएनवर त्याकाळात आली नाही. फक्त आंतरराष्ट्रीय दहशतवाद… हा एकच अजेंडा… बाकी काहीच म्हणजे काहीच नाही.
त्यावेळी अध्यक्ष जॉर्ज डब्लू बुश यांनी एका बेसबॉल स्पर्धेचं उद्घाटन केलं, त्यामधेही त्यांचा तोच नेहमीचा चोथा झालेला बाईट, वी विल ब्रिंग देम जस्टिस…
अमेरिकी विमानांची बॉम्ब आणि मिसाईल हल्ले संपून जमिनीवरील युद्ध सुरू झालं तेव्हा वॉर स्पेशल उत्सुकतेच्या ऐन टोकावर होतं.
या वॉर स्पेशल बुटेटिनमध्ये अफगाणिस्तानचा इतिहास, अफगाणिस्तानातलं जीवनमान, तालिबानचा उदय, नॉर्दर्न अलायन्स, नॉर्दर्न अलायन्समधील वेगवेगळे गट, त्यांची बलस्थाने, अमेरीकी फौजांची व्यूहरचना, रेडक्रॉसची अफगाणी नागरिकांना मिळणारी वैद्यकीय आणि इतर मदत तसंच युद्ध शरणार्थीचे कॅम्प यांचा समावेश केला जायचा. नॉर्दर्न अलायन्सच्या अहमद शाह मसूद, जनरल दोस्तम यांची नावे ही बुलेटिन करत असताना रोजच्या परिचयाची झालेली असायची.
तालिबानचा पाडाव अतिशय सहजपणे झाला. अलायन्सच्या आंतरराष्ट्रीय फौजांना कुठेच कसलाच विरोध झाला नाही. तालिबान कुठे गायब झाले, ते कळलंही नाही. यथावकाश कंधारही सर झालं. त्यावेळी तालिबानचा परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला अब्दुल्ला सतत टीव्हीमध्ये दिसायचा. आम्ही मराठी मुले याच्या बापाला स्वतःचंच नाव आपल्या मुलाला कसं ठेवावं वाटलं असंही एकमेकांना विचारत असू, पण त्याच नाव होतं, अब्दुल्ला अब्दुल्ला… त्यावर कुणाचाच काही इलाज नव्हता.
युद्ध संपल्याची घोषणा अमेरिका कधी करणार, हे आम्हा बुलेटिन बनवणारांपैकी कुणालाच माहिती नव्हतं. त्यामुळे वॉर स्पेशल बुलेटिनमधला स्पेशलनेस हळू हळू संपत आला. शेवटी शेवटी स्वतंत्र अफगाण नागरिकांनी करमणुकीखातर केलेल्या कोंबड्यांच्या झुंजीही या बुलेटिनमध्ये यायला लागल्या तेव्हा मी स्वतःहूनच या बुलेटिनपासून दूर झालो.
हा सगळा फ्लॅशबॅक, ओसामा बिन लादेनला शेवटी यमसदनी धाडल्याच्या बातमीनंतर तरळून गेलेला….