सत्याच्या नावाने सत्यापलाप : सत्यसाईबाबा

I m praying for Shri Sathya Sai Baba’s quick recovery. Hope everyone will join me in praying for his return to good health. सचिन तेंडुलकरचा कालचा हा ट्विट त्याच्या किती चाहत्यांना आवडला, किंवा नाही आवडला माहिती नाही, पण माझा सचिन विषयीचा आदर या ट्विटमुळे नक्कीच कमी झाला.

त्याच्या तब्बल दहा-अकरा लाख फॉलोअर्सना त्याने हा ट्विट टाकलाय. तसंच अनेकवेळा रिट्विट झाल्यामुळे हा ट्विट कित्येक कोटी लोकांपर्यंत पोहोचला असेल. या ट्विटमुळे पहिल्यांदाच मला सचिन तेंडुलकर हा पुट्टपार्थीच्या सत्यसाईबाबांचा भक्त अनुयायी असल्याचं समजलं. टीव्ही मीडियात असूनही ही गोष्ट मला माहिती नव्हती. आमच्या कार्यलयातल्या अनेकांशी चर्चा केली तेव्हा अनेकांना पहिल्यांदाच सचिन सत्यसाईंचा फॉलोअर असल्याचं समजलं होतं, म्हणजेच मी याबाबतीत फारच मागास नव्हतो, याचंही समाधान वाटलं. पण आमच्यातल्या काही स्पोर्ट्स रिपोर्टर्सना मात्र सचिनच्या बाबाभक्तीविषयी कल्पना होती, स्पोर्ट्समधल्या काही मित्रांनी तर असंही सांगतिलं की त्याच्या कीटमध्ये सत्यसाईबाबांचा फोटो असतो, प्रत्येक वेळी बॅटिंगला जाताना तो बाबांच्या फोटोच्या पाया पढूनच मैदानात जातो म्हणे…

वेगवेगळ्या क्रिकेटपटूंच्या किंवा स्पोर्ट्समनच्या अनेक अंधश्रद्धा आहेत, हे तसं ऐकूनच माहिती होतं, स्पोर्ट्स हा रूचिचा विषय नसल्यामुळे त्याविषयी सखोल ज्ञान असणं कधीच आवश्यक वाटलं नाही. पण विक्रमादित्य सचिन, क्रिकेटचा देव असलेला सचिन एका भोंदू बाबाचा भक्त असल्याचं समजल्यावर त्याच्याविषयी भ्रमनिरास झाला.

मला क्रिकेटचं फारसं ज्ञान किंवा रूचि नसली तरी मैदानावर कधीही वाद-वितंडवाद न घालणारा, त्याला स्वतःला आऊट असल्याची खात्री पटल्यावर किंवा अंपायरने आऊट नसताना दिलं तरं मिनिटभरही क्रीझवर न थांबणाऱ्या सचिनविषयी अनेकदा ऐकलं होतं. इतकंच काय परवा त्याच्या घराच्या बांधकामासाठी त्याने जास्तीचा एफएसआय मागितला तर राजकारण सुरू झालं म्हणून आपला अर्ज मागे घेणाऱ्या सचिनविषयीचा आदर प्रचंड वाढला होता.

त्याच्या नाबाद 200 धावांचा टाईम मॅगेझिनने गौरव केल्यावरही असाच अभिमान वाटला होता. पण कालच्या ट्विटने आणि तसंच त्यानंतर आलेल्या बातमीने म्हणजे आपला वाढदिवस साजरा न करण्याच्या तसंच आयपीएल मॅच खेळण्याविषयीची साशंकता यामुळे आणखी वाईट वाटलं. (सचिन हैदराबादमध्ये डेक्कन चार्जर्सविरूद्धची मॅच खेळतोय हे आत्ताच टीव्हीवर पाहिलं… मॅच, सचिन आणि पुट्टपार्थी आंध्रातच आहे. आंध्र प्रदेश सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला अशला तरी आयपीएलने त्याला भीक घातलेली नाही)

सचिन तेंडुलकर प्रमाणेच सुनील गावसकर, आणखी काही क्रिकेटपटू सत्यसाईबाबांचे भक्त असल्याचं इंटरनेटवर शोध घेतल्यानंतर समजलं.

मला असं वाटायचं की या बाबाचे भक्त राजकारणी, सिनेस्टारच आहेत. कारण कोणाही बाबा-बुवाला असे हाय प्रोफाईल भक्त हवेच असतात, आपला लौकिक सर्वदूर पसरवण्यासाठी… शिवाय या राजकारणी आणि सिनेमा स्टार हे प्रचंड असुरक्षित असलेली जमात. कायम परावलंबी यामुळे या लोकांचं अंधश्रद्धांच्या आहारी जाणं आणि स्वतःचा मेंदू गहाण ठेऊन वाटचाल करणं हे तसं स्वाभाविकच म्हणायला हवं, पण सचिनने हा समज खोटा ठरवला.

सत्य साईबांबाच्या बाबतीत माझी काही मते पक्की आहेत. सत्य साईबाबा हे भोंदू आहेत, हे माझं स्वतःचं मत आहे. बीबीसीने 2004 साली प्रसारित केलेली त्यांच्यावरील डॉक्युमेंटरी, अब्राहम कोवूर याचं पुस्तक (याच पुस्तकाच्या मराठी अनुवादासाठी प्रस्तावना लिहिताना डॉ. श्रीराम लागू यांनी परमेश्वराला रिटायर करा, हा प्रसिद्ध लेख लिहिला होता) शिवाय बी. प्रेमानंद यांनी जमवलेले साईबाबांच्या भोंदूगिरीचे पुरावे आणि लिखाण यामुळे माझी मते वेळोवेळी पक्की होत गेली आहेत. हे सर्व दुसरं कुणीतरी लिहिलेलं असलं तरी तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांना हवेतून सोन्याची चेन काढून देताना सत्यसाईबाबा अख्ख्या देशाने पाहिलं होतं. म्हणजे त्यांना वेगवेगळ्या वस्तू, घड्याळे, सोन्याची चेन, अंगठ्या देताना एक हात दूरदर्शनच्या कॅमेऱ्याने पकडला होता (या वस्तू म्हणजे तुम्ही किती हाय प्रोफाईल आहात, यावर तुम्हाला काय मिळणार ते ठरलेलं नाही तर नुस्त्या भस्म,विभुतीवर समाधान मानावं लागतं.)

दूरदर्शनच्या त्या बातमीपत्रानंतर बाबाच्या भोंदूगिरीवर बरीच टिका झाली, त्यानंतरच्या सर्व बातमीपत्रातून बाबांना मौल्यवान वस्तू पुरवतानाचा हात मात्र सोईस्करपणे एडिट झाला. ही या बाबाची कर्तबगारी. आज पंतप्रधानपदी पी.व्ही. नरसिंहराव किंवा शंकरराव चव्हाण यापैकी कुणीही गृहमंत्री असले असते तर (आज हे दोन्ही नेते हयात नाहीत) त्यांनी सत्यसाईबाबांच्या निधनाबद्धल राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असता. आता फक्त आंध्र सरकारनेच दुखवटा जाहीर केलाय. आपल्या बुवाबाजीचे पुरावे सरकारी प्रसारमाध्यमांनाच एडिट करायला लावण्याएवढा सत्य साईबाबाचा प्रभाव.

सत्य साई बाबांचे अनेक भक्त यावर असा दावा करतील की त्यांनी केलेली विकासकामे दिसत नाहीत का? अनंतपूरमध्ये त्यांनी पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी राबविलेल्या योजना, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्स, विद्यापीठे याची यादी पुढे करतात. त्यांनी केलेल्या कामांविषयी कोणालाच आक्षेप नाही. पण त्यांनी भोंदूगिरी करून किंवा चमत्कार करून गोरगरीबांना देण्यासाठी चाळीस हजार कोटी रूपयांची माया जमवावी का? बरं हे पैसे कुणाकडून येतात. किती जणांनी बाबांना केलं दान हे सरकारकडे आवश्यक तो सर्व कर भरून उरलेल्या रकमेतून केलंय. असा प्रश्न विचारला तर तो तुमच्या श्रद्धेवर, विश्वासावर आक्रमण ठरतं…

दोन वर्षांपूर्वी सत्यसाईबाबा मुंबईत आले होते. मुख्यमंत्र्याच्या सरकारी निवासस्थानी येऊन गेले. तिथे सरकारी खर्चाने त्याचं स्वागत झालं. तेव्हाही त्याचं स्वागतासाठी त्याचं दर्शन घेण्यासाठी राजकारण्यांची, आमदार-खासदारांची आणि नोकरशहांची मोठी गर्दी झाली होती. कुणालाच यात काही वावगं वाटत नव्हतं. हे सर्व सरकारी खर्चाने आणि सरकारी वेळेत तसंच सरकारी वास्तूत सुरू होतं, आले मुख्यमंत्र्याच्या मना तेथे कोणाचे चालेना…

सत्य साईबाबांनी केलेल्या कामाची उदाहरणे देण्यात आणि त्यांच्यावरील श्रद्धेचं समर्थन करण्यात राजकारणी आणि त्यांचे पिट्टे पुढे असतात, पण जे सत्यसाईबाबा राजकारण्यांकडून दक्षिणेच्या रूपात पैसा घेऊन विकासकामे, समाजोपयोगी कामे करतात, ती कामे खरं तर या राजकारण्यांनी आपल्या जनतेसाठी कल्याणासाठी करायची असतात. त्यासाठीच त्यांना निवडून दिलं जातं. पण आपलं घटनादत्त काम विसरून बाबांच्या नादी लागायचं आणि बाबाच्या कामाचं कौतुक करायचं… खरं तर ते आपल्याही करंटेपणाचंही कौतुक असतं. कारण सत्यसाईबाबांनी जी अनेक विकासकामे केली ती काही हवेतून पैसा उत्पन्न करून नक्कीच केलेली नाहीत. त्यांना त्यांच्या भक्तांनी पुरवलेल्या पैश्यातून ही कामे झालेली आहेत.

खरं तर सत्यसाईबाबांनी केलेल्या कामाची यासाठी प्रशंसा करायला पाहिजे, कारण जे राजकारण्यांना जमत नाही, किंवा राजकारण्यांना फक्त मतांची आणि पेट्यांची भाषा कळते, अशा राजकारण्यांकडून, धनाड्यांकडून, सिनेस्टारकडून पैसे घेऊन त्यांनी केली. त्यासाठी त्यांनी मते मागितली नाहीत. पण हे विवेकी समाजाला भूषणावह कसं वाटावं. बाबांचे चमत्कार आणि त्यांनी केलेले चमत्कार यांना देश मान्यता द्यायची तर सर्वात अगोदर घटनादुरूस्ती करावी लागेल, कारण वैज्ञानिक दृष्टीकोण अंगिकारणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि अशा घटनादुरूस्तीनंतर रॉबिन हूड टाईपच्या सर्वानाच फक्त लोकप्रियतेच्या आणि चमत्कारांच्या निकषावर मान्यता द्यावी लागेल.

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Join the Conversation

12 Comments

 1. या बाबतीत मी आज सकाळीच फेसबुक वर एक पोस्टिंग केले कि हे स्वयंभू संत,महात्मे या काल्युगातही अवतरतात आणि मोठमोठी, सुप्रसिद्ध मंडळी त्यांचे अनुयायी असतात तर आपल्य्सार्ख्या संभ्रम पडतो कि हे संत,महात्मे खरोखरच त्या उंचीचे आहेत का ? त्यांनी दाखविलेले चमत्कार खरे असू शकतात का? त्यांच्या मुळे रुग्ण बरे होऊ शकतात का ? जर हे खरे नसेल तर देशात आणि परदेशात इतक्या मोठ्या संख्येने यांचे अनुयायी कसे बनतात ? मला तर आता पर्यंत अश्या एकाही सिद्ध पुरुषाचे दर्शन झाले नाही किंवा चमत्कार देखील प्रत्यक्ष बघता आला नाही. सचिन सारखा दिव्य घडविणारा माणूस जर त्यांचा इतका भक्त असेल तर हि माझ्याही दृष्टीने आश्चर्याचा धक्का देणारी गोष्ट आहे.

 2. मेघराज, मी मागेच सचिन ला त्यांच्या पाया पडताना बघितले होते. तेव्हा मला असेच वाटले होते. पण नंतर विचार केला कि तो त्याचा प्रश्न आहे कि त्याने कोणाल आयडॉल बनवावे. आपण त्यात वाईट वाटून का घ्यावे? जे आपल्याला पाहिजे तो ते अजून ही देतो आहे. हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा प्रश्न आहे.
  जाउदेत आपण का मनाला लावून घ्यावे?

 3. बाबा (केवळ सत्यसाईबाबाच नव्हे) ही संकल्पना त्यांच्या भक्तानी आपल्या संकल्पाला बळ मिळावे म्हणून निर्माण केली आहे. आपल्याकडून आदर मिळविणे हे त्यांचे उद्दिष्ट कधीच नव्हते.

 4. मेघराज,
  मस्त. लेख खूप आवडला.अगदी नेमका सामान्यांच्या मनातला विचार जणू कागदावर उतरला आहे.
  हे सगळ बघितलं ना कि सामन्यांच्या मनामध्ये कधी कधी अशी चुळबुळ सुरु होते कि हे असे मोठ्या (उदा. इथे सचिन.) लोकांप्रमाणे असे कुणाला तरी फॉलो केले तरच मोठे (श्रीमंत) होता येते का ? देवघर पॉश असले तरच देव प्रसन्न होतो का? दिसायला हि गम्मत वाटेल पण मी स्वतः एक असे महाभाग बघितले आहे कि त्यांचे कडे बऱ्या पैकी पैसे आल्यावर,नि ते नवीन मोठ्या फ्लॅट मध्ये गेल्या वर त्यांनी परंपरागत सर्व देव मोडीत काढून चांदीचे देव बनविले कारण काय तर ते फ्लॅटला नि देवघराला शोभले पाहिजेत म्हणून.. थोडक्यात काय तर मोठ्यांचे सगळेच मोठे अन दुसर काय?

 5. I like this article. 100 % agree.

  I felt bad when I saw bhondu baba’s body wrapped in tiranga, our national flag. What he did for the nation?

  I also saw BBC video. His gold chain was for politician (richer) and vibhuti for poorer.

 6. सचिन विषयी माझ्या मनात असलेल्या आदराला या घटने मुळे खरच खूप ठेच लागली. सर्व प्रकारे सत्य साई बाबाचा भोंदूपणा उघड होऊन ही त्याच्या विषयी एवढी श्रद्धा (???).. की सचिनला एवढे ओक्साबोक्शी रडू यावे…
  सत्य साई बाबाच्या मृत देहावर राष्ट्रीय झेंडा घालणे म्हणजे अक्कल कुठे तरी गहाण टाकल्याचा पुरावा भारताने दिला आहे…

 7. धन्यवाद…

  देव कधीच देव्हाऱ्यात आणि मंदिरातही नव्हता, यापुढेही नसेल

  दर्शनाला आलात? या..

  पण या देवालयात, सध्या देव नाही
  गाभारा आहे, चांदीचे मखर आहे.
  सोन्याच्या समया आहेत, हिर्‍यांची झालर आहे.
  त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.
  वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या
  पाहीलात ना तो रिकामा गाभारा?
  नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे
  काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,
  दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा
  दोन तास वामकुक्षी घ्यायचा
  सार काही ठीक चालले होते.
  रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग
  पडत होते पायाशी..
  दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते
  मंत्र जागर गाजत होते
  रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
  बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते.
  सारे काही घडत होते.. हवे तसे
  पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव
  उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला
  कोणी एक भणंग महारोगी
  तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”
  आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
  गाभारा रिकामा
  पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..
  परत? कदाचित येइलही तो
  पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर त्याला पुन्हा..
  प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,
  आमच्या ट्रस्टींना,

  पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्‍या मुर्तीसाठी
  पण तुर्त गाभार्‍याचे दर्शन घ्या.
  तसे म्हटले तर, गाभार्‍याचे महत्व अंतिम असत,
  कारण गाभारा सलामत तर देव पचास.

  – कुसुमाग्रज

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: