…म्हणे निवडणूक लढवून दाखवा!

अण्णाचं उपोषण संपलं, अण्णा राळेगण सिद्धीमध्ये परतले, तिथं त्याचं जंगी स्वागत झालं. आता हळू हळू उपोषणाचा विषयही मागे पडतोय. मधल्या काळात आयपीएल आहे. 2G घोटाळ्यात आरोपपत्रही दाखल होऊ लागलेत. पुन्हा पाच राज्यातल्या निवडणुका आहेत… विषयांना काही तोटा नाही, पण मधल्या काळात चिडीचूप असलेल्या वाचाळ नेत्यांना आता वाचा फुटायला लागलीय.

अण्णांच्या उपोषणाच्या काळात अण्णांना जो देशव्यापी असा अभूतपूर्व पाठिंबा मिळाला, त्यामुळे पायाखालची जमीन हललेले सर्वच नेते आता भानावर येऊ लागलेत.

अण्णांना पाठिंबा कसा मिळाला, याचं चिंतन विश्लेषण सुरूय. त्यातूनच आता अण्णांवर पलटवार म्हणा की प्रतिहल्ला म्हणा करण्याची अहमहिका लागलीय. या राजकीय नेत्यांच्या ताब्यात असलेलं सर्वात महत्वाचं हत्यार म्हणजे निवडणुका… सगळेच एकसुरात अण्णांना म्हणतायत, एवढी लोकप्रियता आहे तर मग दाखवा एखादी निवडणूक जिंकून…

सर्वात आधी राष्ट्रवादीच्या डीपी त्रिपाठींनी अण्णांना निवडणूक लढवून दाखवण्याचं आव्हान दिलं.. खरं तर डीपी त्रिपाठी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते म्हणजेच ते जे काही मत मांडतील, ते पक्षाचं मत म्हणा की भूमिका असते, असायला हवी. म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसने अण्णांना थेट आव्हान दिलंय, निवडणूक लढवून ती जिंकून दाखवण्याचं.

खरं तर डीपी त्रिपाठी हे संसदेत मागच्या दाराने म्हणजे राज्यसभेतून जातात. त्यांनी कधी लोकसभेची निवडणूक लढवलीय, हे आता कदाचित त्यांनाही आठवत नसेल, डीपींच्या अगोदर राज्यात सुरेश जैन आणि नबाब मलिक या नेत्यांनाही अण्णांना निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलंय.

इथे एक सहज आठवलेली बाब म्हणजे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हाही अण्णांचा पाठिंबा ही एक करन्सी होती, त्यामुळेच अनेक संभाव्य किंवा कोणत्याही पक्षाचं तिकीट मिळालेले उमेदवार अण्णांच्या पाठिंब्यासाठी राळेगण सिद्धीला चकरा मारायचे. अण्णांनी तब्बल 12 उमेदवारांना पाठिंबा जाहीरही केला होता. त्यावेळी अण्णांचा पाठिंबा मिळणं हे उमेदवारांसाठी एक व्हॅल्यू अॅडिशन होतं. आता अण्णांचा पाठिंबा मागणारांमध्ये राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचे उमेदवार किती ते शोधावं लागेल. अण्णांचा पाठिंबा महत्वाचा नसेल तर हे संभाव्य आमदार कशासाठी अण्णांच्या पाठिंब्यासाठी राळेगणच्या वाऱ्या करायचे, हा प्रश्नही अनुत्तरीतच राहतो.

राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ देशातला प्रमुख आणि सत्ताधारी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही अण्णांवर तोफ डागलीय. अर्थातच अण्णांचं उपोषण वैगेरे सर्व संपल्यानंतरच…

काँग्रेसचे सरचिटणीस आणि ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही अण्णांना निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलंय. शिवाय काँग्रेसचे ठेवणीतलं हत्यार म्हणून लोकपाल कायद्याच्या कक्षेत स्वयंसेवी संस्था (एनजीओ NGOs) आणि मोठी औद्योगिक घराणी यांनाही आणण्याची मागणी केलीय. मोठी औद्योगिक घराणी किंवा एनजीओ यांचा कारभार पारदर्शक होण्यासाठी काँग्रेसने ही मागणी केली असले तर त्यामध्ये काहीच गैर नाही. उलट त्याचं समर्थनच करायला हवं. प्रस्तावित लोकपाल कायद्यामध्ये मोठी औद्योगिक घराणी किंवा एनजीओंचा समावेश करायला काहीच हरकत नाही. एनजीओंनी अण्णांच्या आंदोलनाला बळ दिलं म्हणून त्यांना भ्रष्टाचार करण्याची मुभा असते, असं समजण्याचं काहीच कारण नाही. पण दिग्विजय सिंह यांना कुणीतरी हे शांतपणे समजावलं पाहिजे की मोठी औद्योगिक घराणी म्हणजे त्यांना नेमकी कोणती घराणी अपेक्षित आहेत, जी घराणी काँग्रेसच्या निवडणूक निधीला मदत करत नाहीत तीच की सरसकट सर्व… तसंच फक्त औद्योगिक घराणीच का? राजकीय घराणी का
नकोत, लोकपाल कायद्याच्या कक्षेत यायला? जिथे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांसारख्या महत्वाच्या संस्थाही लोकपाल विधेयकाच्या कक्षेत यायला हव्यात यासाठी अण्णा आणि त्यांचे आंदोलक सहकारी प्रयत्न करत आहेत, तिथे मोठी औद्योगिक घराणी वगळली जावीत, असं कुणीच म्हणणार नाही. ही मोठी घराणी जर लोकांच्या पैश्याचा अपव्यय करत असतील तर त्यांची चौकशी करून त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. मग मोठ्या राजकीय घराण्यांना तरी का सवलत असावी. आजच्या तारखेला देशातलं सर्वात मोठं राजकीय घराणं, काँग्रेस नेतृत्वाचच आहे.

दिग्विजय सिंह असो की डीपी त्रिपाठी.. दोघेही सत्तेच्या राजकारणात चांगलेले मुरलेले आहेत, त्यांना सत्ता कशासाठी असते हे कुणी राजकीय पंडिताने सांगायची गरज नाही. एवढंच नाही ही सत्ता ज्या निवडणूक प्रक्रियेतून येते ती कशी राबवतात, हे ही या दोन्ही नेत्यांना माहिती नाही, असं कुणी म्हेल का?

स्वतः मुख्य निवडणूक आयुक्तांनीही निवडणूक हा भ्रष्टाचाराचा सर्वात प्रमुख स्त्रोत असल्याचं मान्य केलंय. तरीही हे दोन्ही नेते अण्णांना निवडणूक लढवून ती जिंकून दाखवण्याचं आव्हान देतायत.

अण्णांनी पहिल्यांदा आरोप झाला तेव्हाच निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलंय, त्यांची ही भूमिकाही तशी जुनीच आहे. त्याचवेळी निवडणुकांसंदर्भात जनजागृती करायला हवी, यावरही त्यांनी अलीकडच्या काही मुलाखतींमध्ये भर दिलाय.

दिग्विजय सिंह आणि डीपी त्रिपाठी यांच्यासोतच भाजपच्या लालकृष्ण अडवाणी यांनीही अण्णांच्या आंदोलनावर आपल्या ब्लॉगमधून भाष्य केलंय. त्यांनी लोकपाल विधेयकाला पाठिंबाही दिलाय. पण देशातले सर्वच राजकीय नेते भ्रष्टाचारी नसतात, असं ठळकपणे सांगून अण्णांच्या आंदोलनामुळे राजकीय नेत्यांची प्रतिमा खराब होत असल्याबद्धल त्यांनी नाराजी व्यक्त केलीय. पण एकेकाळी स्वतःला पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करणाऱ्या अडवाणी यांच्या हे लक्षातच आलेलं नाही, ही राजकीय नेत्यांची प्रतिमा अण्णांच्या आंदोलनामुळे नाही तर त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वामुळे खराब झालीय. भ्रष्टाचार करायला त्यांना काही अण्णांनी सांगितलं नव्हतं. या आंदोलनामुळे राजकीय नेते देशावासियांच्या मनातून उतरले असतील, तर पुन्हा आपली प्रतिमा सुधारवण्यासाठी या राजकीय नेत्यांनीच प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत.

कारण गुजरातमध्ये ग्रामविकासासंदर्भात चांगलं काम केलेल्या नरेन्द्र मोदीची आणि बिहारमध्ये अनेक चांगल्या कामांनी आदर्श घालून दिलेल्या नितीश कुमारांची अण्णांनी जाहीर प्रशंसा केली, या प्रशंसेमुळे अण्णांना पाठिंबा देणारे आंदोलकही बुचकाळ्यात पडले, काहींनी अण्णांची साथ सोडत असल्याचं जाहीर केलं, पण अण्णांनी लगेच आपली प्रशंसा ही फक्त मोदींच्या ग्रामविकासाच्या कामासंदर्भात असल्याचंही स्पष्ट केलंय, त्यामुळे राजकीय नेत्यांची प्रतिमा खराब होतेय, आणि असं होणं लोकशाही व्यवस्थेच्या वाढीसाठी योग्य नसल्याचं मत म्हणजे फक्त टीकेसाठीच टीका होईल…

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Join the Conversation

1 Comment

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: