का उभा राहिला देश अण्णांच्या मागे?

अण्णांनी उपोषण सोडलं. अण्णांनी उपोषण सोडावं यासाठी प्रयत्न करणारांनाही आता हायसं वाटलं असेल. उपोषण सोडल्यानंतर अण्णांनीही जाहीर केलंय की ही तर फक्त

एक लढाई होती, म्हणजे सरकारला जनलोकपालासाठीच्या मसुदा समितीसाठी राजी करणं ही साधी बाब नाही. पण आता जन लोकपालचा मसुदा तयार होताना

समितीतल्या सर्वांनाच जागरूक रहावं लागणार आहे, या समितीत सर्वच जण थोर जाणते आणि कार्यकर्ते असल्यामुळे ते होईलच, पण सरकारी बाबू आपले प्रयत्न

थांबवणार नाही. हा सर्व नंतरचा भाग…

मला सर्वात महत्वाचं वाटतं ते अण्णांना मिळालेला पाठिंबा, हा पाठिंबा अभूतपूर्व होता, माझ्या पिढीने जेपीचं आंदोलन पाहिलेलं नाही. त्यामुळे त्यांना जनआंदोलनाच्या

रेट्याची कल्पना नसणारच… पण आताच्या पिढीला देशविदेशात झालेली आंदोलने माहिती आहेत, ती त्यांच्यापर्यंत इंटरनेटने पोहोचवली आहेत.

अण्णांना जो कोट्यवधी लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला, त्यामध्ये मला सर्वात महत्वाची भूमिका इंटरनेट आणि मीडियाची वाटते. नाही तर फक्त टेन प्लस, एबीसी

फिफ्टीन प्लसची भाषा समजणाऱ्या टीव्ही चॅनेलांनी राळेगणसारख्या खेड्यातून आलेल्या, धोतर-टोपी घालणाऱ्या म्हाताऱ्याला सलग चार दिवस स्क्रीनवरून खाली उतरूच

दिलं नाही. एवढंच नाही तर या देशाच्या तरूण पिढीने त्यांना इंटरनेट आणि इचर मिळेल त्या माध्यमातून डोक्यावर घेतलं. कदाचित यामुळेच मीडियालाही पहिल्या

दिवसाच्या प्रतिसादानंतर पुढचे चार दिवस आयपीएल तोंडावर असतानाही अण्णांना ऑफस्क्रीन करण्याचं धाडस झालं नाही.

अण्णांना देशातल्या तरूणाईने डोक्यावर घेण्याची काही कारणे मला जाणवली ती अशी :

1. देशातल्या माजलेल्या भ्रष्टाचाराचा फटका देशातल्या तरूणाईलाही बसला आहे, तो त्यांच्या त्यांच्या पातळीवर कमी अधिक प्रमाणात बसलाय, म्हणजे शाळा कॉलेजात

प्रवेश घेण्यापासून, वेगवेगळी शिफारस पत्रे जमवण्यापासून, पैसेवाल्या किंवा राजकीय नेत्यांच्या मुलांना वेगवेगळ्या कारणांसाठी प्राधान्य मिळत असण्यापासून ते पार

तहसील कार्यालयातून जातीचं प्रमाणपत्र, डोमेसाईल, चारित्र्याचं प्रमाणपत्र अशी अनेक वेगवेगळी आवश्यक आणि अनावश्यक कागदपत्रांच्या भेंडोळ्या जमवताना द्यावी

लागलेली चिरीमिरी, वाहन परवाना, सात-बाराचा दाखला ही तर खूप नंतरची झाली, पण त्यापूर्वी चहा-पाण्याला पैसे द्यावेच लागतात, ही जणू सरकारी कार्यालयातली

सरकारमान्य आणि लोकमान्य पद्धतच झालीय. याचाच राग या तरूणाईमध्ये धुमसत असावा… शिक्षण घेत असतानाच या देशात भ्रष्टाचार कसा बजबजलाय, याचे संस्कार

होतात, शिवाय पुन्हा नोकरी शोधताना, पैसे देणं ही सर्वमान्य रितच झालीय. तुम्ही नाही दिले तर ज्याच्याकडे पैसे आहेत, तो पैसे देऊन त्या जागेवर नोकरी पटकावतो.

साध्या शिक्षकाच्या जागेसाठी सोळा ते वीस लाख रूपये मोजावे लागतात हल्ली… एरवी समाजात शिक्षण महर्षी आणि शिक्षण सम्राट म्हणून मिरवणाऱ्यांच्या शिक्षण

संस्थांमध्येही हा रेट बदलत नाही. त्यापूर्वी डीएडला अॅडमिशन घ्यायची तर तुम्हाला हजारो-लाखो रूपये डोनेशन तयार ठेवावं लागतं.

मला वाटतं हाच राग तरूण पिढीने अण्णांना पाठिंबा देऊन व्यक्त केलाय.

2. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून अशा आंदोलनांना पाठिंबा देणं खूप सोपं झालंय. हल्ली गावागावात इंटरनेट कॅपे झालेत. शिवाय प्रत्येकाच्या

मोबाईलमध्ये इंटरनेट सुविधा आहे. त्यामुळे फेसबुक किंवा ट्विटरवर लॉग इन होणं अजिबातच अवघड राहिलेलं नाही. इंटरनेटवर लॉग इन व्हायचं आणि आपला सपोर्ट

नोंदवायचा, सहज शक्य असेल तर कॉमेन्ट टाकायची, किंवा आपल्याला जे मत व्यक्त करायचंय, त्याला साजेशी कॉमेन्ट कुणी आधीच टाकलेली असेल तर त्याला फक्त

लाईक करायचं, झालं कितीतरी सोप्पंय, जनआंदोलनाला पाठिंबा देणं…

आंदोलनात सहभागी होणं जितकं सोपं, तितकं त्याचं यशस्वी होण्याची शक्यताही जास्त… यासंदर्भात मला दोन आंदोलनाचं उदाहरण द्यायचं, एक आहे जगप्रसिद्ध दांडी

यात्रेचं आंदोलन… गांधीजीनी केलेला मिठाचा सत्याग्रह… आंदोलनात सहभागी होणं कितीकरी सोपं, काही नाही, सरळ जायचं, मिठागरावर आणि मूठभर मीठ उचलायचं,

झालं आंदोलन… बाकी काहीच करायचं नाही. ते मूठभर मीठ खिशात घालायचं नाही की घरी आणायचं नाही. मीठ उचललं की झालं आंदोलन

असंच एक आंदोलन आहे, मराठवाड्यात शेतकरी संघटनेच्या शरद जोशींनी केलेलं. संप नाही, बंद नाही, मोर्चे नाही, घोषणा नाही… धरपकड नाही की जेलभरो नाही…
क्वीट करप्शन… असा इशारा देण्यासाठी शेतकरी संघटनेनं एक अभिनव आंदोलन केलं होतं. यामध्ये सहभागी आंदोलकांनी एवढंच करायचं… कोणतंही सरकारी वाहन

दिसलं की, अगदी एसटीपासून ते तहसीलदाराच्या गाडीपासून ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डंपरपर्यंत त्याला थांबवायचं आणि त्या गाडीवर इंग्रजीमध्ये Q असं

लिहायचं, आणि त्याला निघून जायला सांगायचं.. झालं आंदोलन… कुणा प्रवाश्याला किंवा ड्रायव्हरला मारहाण नाही की गाड्य़ांची तोडफोड नाही. सगळं काही शांततेत.

3. अण्णांना मिळालेल्या पाठिंब्यात इंटरनेटचं महत्व यापूर्वीच स्पष्ट झालंय, पण फक्त इंटरनेटच नाही तर कम्युनिकेशन सहज होणं, मग इंटरनेट हे तर फक्त एक साधन

आहे… हे पाठिंब्याच्या मुळाशी आहे. मोबाईल फोन असो की एसएमएस किंवा इंटरनेट मिळेल त्या मार्गाने लोकांनी आपला सहभाग नोंदवला.

4. सर्वात महत्वाचं आहे, लोकांना आपल्या दररोजच्या रहाटगाड्यातून थोडासा वेळ काढून या आंदोलनाला द्यावं वाटणं, हेच सर्वात महत्वाचं आहे, त्यामध्ये अण्णांची

स्वच्छ प्रतिमा आणि त्याचं राळेगण सिद्धी तसंच माहितीचा अधिकार कायद्यासाठी केलेलं काम याचाही वाटा महत्वाचा आहे,

5. अण्णांना असा पाठिंबा मिळण्यासाठी आणखी महत्वाची ठरलेली एक बाब म्हणजे, अण्णा आणि सहकाऱ्यांनी या आंदोलनासाठी निवडलेली वेळ. एवढंच नाही तर ही वेळ

साधण्यापूर्वी अण्णांनी सर्व देश पिंजून काढला होता. वेगवेगळ्या ठिकाणी सभा, बैठका घेऊन आपलं म्हणणं पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर प्रत्यक्ष उपोषणाला

सुरूवात केली. याचा फायदा त्यांना विश्वकप जिंकल्यापासून ते आयपीएलपर्यंतच्या मधल्या वेळात झाला. मधल्या काळात आंदोलनाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे

आयपीएलचा पहिला दिवसही झाकोळला गेला.

6. अण्णा हजारेंनी आपल्या उपोषणासाठी निवडलेलं ठिकाण, हा आणखी एक मुद्दा वाटतो. कारण अण्णांनी मुंबई किंवा राजधानी दिल्ली व्यतिरिक्त कुठेही आंदोलन केलं

असतं तर ते तितकं यशस्वी झालं असतं की नाही, याविषयी शंका घेण्यास बराच वाव आहे. अण्णांनी युती सरकारच्या काळात पहिलं जाहीर आंदोलन केलं तेव्हा त्यांना

असाच मोठा प्रतिसाद मिळाला होता. पहिले दोन दिवस अण्णांच्या बातम्यांना पहिल्या पानांवर स्थान न देणाऱ्या वृत्तपत्राने तेव्हा अण्णाच्या महाराष्ट्र यात्रेसाठी खास

प्रतिनिधी अण्णासोबत पाठवला होता. शिवाय याच वृत्तपत्राचे जिल्ह्या-जिल्ह्यातील प्रतिनिधी अण्णांच्या यात्रेचं कव्हरेज करत होते. मधल्या काळात राज्याच्या वेगवेगळ्या

नद्यांमधून बरंच पाणी वाहून गेलंय. अण्णाचं आंदोलन पहिल्या दिवसापासून बिगर राजकीय असलं तरी आता अण्णांना पाठिंबा देणारे पक्ष कधी त्यांच्या विरोधात होते.

आणि आता गप्प असणारे पक्ष त्यावेळी त्यांच्या सोबत होते. म्हणूनच महाराष्ट्रात जसे अण्णांचे प्रशंसक आहेत, तसेच त्यांचे विरोधकही आहेत. त्यामुळेच अशी कसलीच

पार्श्वभूमी किंवा पूर्वेतिहास नसलेल्या राजधानी नवी दिल्लीत अण्णांनी केलेल्या उपोषणाला आपोआपच राष्ट्रीय महत्व प्राप्त झालं.

अण्णांच्या आंदोलनाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाचं विश्लेषण आता वेगवेगळ्या पातळ्यावर होईल. सरकारी गुप्तहेरही आपल्या सरकारला योग्य तो अहवाल देतीलच.

वेगवेगळ्या संघटनांनी लोकांना एकत्र करण्यासाठी कशी मदत केली, याच्या बातम्या अनेक दिवस वेगवेगळ्या पेपरात येतील. अनेक माध्यम विश्लेषक आपापल्या परीने

विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतील. त्यामध्ये अर्थाच मीडिया, इंटरनेट तंत्रज्ञानासह जनसंपर्काची साधने या सर्वांसह सामाजिक-राजकीय विश्लेषण होईल.

या जाणकारांनी-तज्ज्ञांनी काहीही विश्लेषण केलं तरी, ते यापुढील लोकआंदोलनाला मार्गदर्शकच असंच ठरणार आहे, आंदोलनाचं कारण योग्य आणि सर्वव्यापी (विशेषतः

तरूणांच्या जिव्हाळ्याचं) असेल, तसंच आंदोलनासाठीची वेळ आणि ठिकाण यांची योग्य निवड केली तर आंदोलनाला यशस्वी होण्यापासून कोणालाच रोखता येणार नाही.

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Join the Conversation

1 Comment

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: