नो मोअर… अवरली बुलेटिन्स!

ई टीव्हीवर तासा-तासाला प्रसारीत होणारी बातमीपत्रे बंद करण्याचा निर्णय त्यांच्या व्यवस्थापनाने घेतला आणि बुलेटिन्स बंद झाली. या महिन्याच्या सात तारखेपासून…
अवरली न्यूज अपडेटस् या ई टीव्हीचा अविभाज्य घटक होता, चॅनेल सुरू झालं तेव्हा म्हणजे जुलै 2000 पासून ही तासातासाची बातमीपत्रे प्रसारित व्हायची. ही वैशिष्ट्यपूर्ण बातमीपत्रे बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाचा अंतर्गत निर्णय.. बाहेरच्या कुणाला त्यात ढवळाढवळ करता येणार नाही. त्यांचा कार्यक्रम ते कधीही बंद करू शकतात, सुरू करू शकतात.

तीन तीन चोवीस तास बातम्यांचा रतीब टाकणारी चॅनेल्स असताना तासाला एकदा पाच मिनिटांसाठी बातम्या देणारा कार्यक्रम तो ही पुन्हा जीईसी म्हणजे जनरल इंटरटेनमेंट सेगमेंटच्या चॅनेलवर जेवणाच्या घासात खडेच वाटणारे अनेक जण असतील…

पण दहा वर्षांच्या अवरली बुलेटिन्सच्या कारकिर्दीत मराठी टीव्ही पत्रकारिताही विकसित झालीय, ई टीव्हीच्या कित्येक पत्रकार सहकाऱ्यांना या मुळे एक व्यासपीठ मिळालं, काम करण्याची संधी मिळाली…

ई टीव्हीवर अगदी पहिल्या दिवसापासून तासातासाची बातमीपत्रे प्रसारित व्हायची. या बातमीपत्रांचं दहा वर्षांचं आयुष्य म्हणजे ई टीव्हीच्या आणि एकूणच मराठी टीव्ही पत्रकारितेच्या दहा वर्षांचा इतिहास आहे. म्हणूनच ई टीव्हीची अवरली बुलेटिन्स बंद करण्यात आल्याचं समजल्यावर त्यावर लिहायचं असं ठरवलं होतं, बाकी ही बुलेटिन्स का बंद केली, बंद करण्याची वेळ का आली, हा आपला चर्चेचा विषयच होऊ शकत नाही.

ई टीव्ही सुरू झालं तेच तासातासाच्या बातमीपत्रांनी… हा एक भन्नाट प्रकार… पहिल्या काही महिन्यातच ही बातमीपत्रे ही चॅनेल्सची ओळख बनली. प्रत्येक तासाच्या रिंगची सुरूवात या पाच मिनिटांच्या बुलेटिन्सने व्हायची. म्हणजे सकाळी सहा वाजता चॅनेलच्या प्रसारणाची सुरूवात अवरली बुलेटिन्सने आणि रात्री बारा वाजता शेवटही अवरली बुलेटिन्सने व्हायचा… रात्री बारा ते सकाळी सहा पर्यत चॅनेलवर कलरबार असायचे… कारण तेव्हा फक्त अठरा तासाचं प्रसारण होतं. या अठरा तासामध्ये 6, 8, 9, 10, 11 दुपारी 12, 1, 2, 3, 4, 5 आणि सायंकाळी 6, तसंच रात्री 8, 10, 11, आणि 12 अशी सोळा पाच मिनिटांची छोटी बुलेटिन्स प्रसारीत व्हायची… त्याशिवाय सकाळी सात वाजता राष्ट्रीय, सायंकाळी सात वाजता महाराष्ट्र माझा आणि रात्री नऊ वाजता राष्ट्रीय अशी अर्ध्या तासाची तीन प्रमुख बातमीपत्रेही प्रसारित व्हायची.

सुरवातीच्या काळात सकाळी साडेसात, दुपारी एक, आपली मुंबई किंवा वृत्तवेध यासारखी बातमीपत्रे नव्हती… त्या सर्व वेळी तासातासाची बातमीपत्रे होती. त्याकाळात बातमीपत्रे प्रसारित करणाऱ्या प्रॉडक्शनच्या (ईटीव्हीत त्यांना प्रॉडक्शन तर संपादकीय सहकाऱ्यांना एडिटोरियल किंवा डेस्कचे सहकारी असं म्हणायचे) लोकांना जेवायला जायलाही वेळ मिळत नसे. यामुळे अख्या अख्या महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण समजली जाणारी ही बातमीपत्रे आरएफसीमधल्या लोकांना जेवायची उसंतही देत नसत. कारण एक बुलेटिन करून आलं की लगेच दुसऱ्याची तयारी सुरू व्हायची, आणि एक तास कधी संपत आला ते ही समजत नसे.

नंतर कधी तरी निर्णय झाला की, अर्ध्या तासाच्या बातमी पत्रा नंतर लगेचच अर्ध्या तासात पाच मिनिटाचं बुलेटिन नको.. त्यामुळे सकाळी आठ आणि रात्री आठ तसंच रात्री दहा ही बुलेटिन बंद झाली, त्यामुळे आता किमान जेवायला तरी वेळ मिळेल, असं प्रॉडक्शनच्या अनेकांना वाटलं असेल. ते खरंही होतंच…

ईटीव्हीची ही तासातासाची बातमीपत्रे महाराष्ट्रात लोकप्रिय असली तरी आमच्याच प्रोग्रामिंगच्या सहकाऱ्यांना मात्र ही बुलेटिन अडगळ वाटायची… कारण त्यामुळे साठ मिनिटांच्या एका तासाच्या रिंगमधली पाच मिनिटे त्यांना न्यूजसाठी द्यावी लागायची, अर्थात सिरियल्सचा वेळ कमी करूनच.. शिवाय ही पाचच मिनिटांची बातमीपत्रे रेटिंगमध्ये रजिस्टर होत नाहीत, पाच मिनिटे हे काही ड्युरेशन आहे का, अशी कुजबूजही व्हायची. पण अवरली बुलेटिन्स ही चॅनेलचे सर्वेसर्वा रामोजी राव यांचीच संकल्पना असल्याने फक्त कुजबूजच व्हायची.

पाच मिनिटांच्या बातमीपत्राविषयी त्याचं नेहमी एक सांगणं असे, की या बातमीपत्रात एकही बातमी रिपीट होता कामा नये… कारण ही बातमीपत्रे पाहिली नाही तर प्रेक्षकांना काही तरी चुकल्यासारखं वाटायला हवं, असं ते सांगायचे… म्हणजेच या बातम्यांची सवय प्रेक्षकांना व्हायला हवी… पण ईटीव्हीला जेव्हा सशक्त स्पर्धा नव्हती तेव्हा कदाचित त्याचं हे मत बरोबरही असेल, पण आता प्रेक्षकांकडेही पुरेसा वेळ नाही… प्रत्येक तासाला बातम्या बघण्यासाठी… त्याला त्याच्या सोईच्या वेळी बातम्या हव्या आहेत… शिवाय मोबाईल, वेबसाईट्स यासारखी माध्यमेही त्याच्यापर्यंत हव्या त्या वेळी बातम्या पोहोचवतातच की…

एखाद्या जिल्हा प्रतिनिधीकडून बातमी येत नाही, त्यावर त्याने आमच्याकडे काही हॅपनिंग नाही किंवा बातमी नाही असं सांगितलं तर रामोजी रावाचा प्रतिप्रश्न असायचा की संबंधित जिल्ह्यातील जिल्हा दैनिक आज कोरंच प्रकाशित झालं का … त्यामध्ये बातम्या असतात तर तुमच्याकडे का नाही…?

त्यानंतर कधीतरी सायंकाळी सात ते रात्री दहा या दरम्यानच्या छोट्या बातमीपत्रांचा बळी गेला. त्याचं कारण सागंण्यात आलं, सात ते दहा हा प्राईम टाईम… त्यामध्ये तासातासाच्या छोट्या बातमीपत्रांचा प्रेक्षकांना अडथळा होतो. प्राईम टाईमचा प्रेक्षक टीव्हीसमोर खिळवून ठेवण्यासाठी रात्री नऊचं बुलेटिन बंद करावं लागलं. एवढंच नाही तर रात्री नऊचं अर्ध्या तासाचं बातमीपत्रही रात्री दहाला शिफ्ट करण्यात आलं. म्हणजे साडेसातला महाराष्ट्र माझा हे अर्ध्या तासाचं प्रादेशिक बातमीपत्र संपल्यानंतर थेट दहा वाजताच राष्ट्रीय बातम्या… मधल्या काळात कोणत्याही अडथळ्याविना फक्त मालिका… त्यानंतर दुपारच्या काही बातमीपत्रांचा बळी गेला. म्हणजे एक वाजता अर्ध्या तासाचं बातमीपत्र सुरूच झालं होतं, त्यामुळे दुपारी दोन वाजता पाच मिनिटाचं बुलेटिन नसायचं… त्यापाठोपाठ तीन आणि चारच्या बातमीपत्रांचाही बळी गेला. कारण सोपं, या स्लॉटमध्ये रात्रीच्या प्राईम टाईममधल्या लोकप्रिय सिरियल्स रिपीट व्हायच्या, त्यामध्येही बातम्यांचा अडथळा नको होता…

मग उरली… सकाळी सहा, नऊ, दहा, अकरा आणि बारा… त्यानंतर चार, पाच आणि सहा, त्यानंतर थेट रात्री अकरा आणि बारा… रात्री बाराचं बुलेटिन सकाळी सहापर्यंत चालायचं, काही ब्रेकिंग असेल तरच नवीन बुलेटिन किंवा नवीन अँकर्सच्या प्रॅक्टिससाठी नवीन बुलेटिन व्हायचं…

बुलेटिनच्या वेळांच्या बाबतीत ईटीव्हीमध्ये एवढे प्रयोग झालेत की त्याची काही गणतीच नसावी, सर्वात आधी रात्री नऊचं बुलेटिन रात्री दहाला करण्यात आलं, ते पुन्हा रात्री नऊ आणि पुन्हा दहावर नेण्यात आलं… त्यानंतर त्याचं नाव बदलून त्याला रात्री अकराची वेळ देण्यात आली. वेळ न बदलण्याच्या बाबतीत सर्वात नशीबवान बुलेटिन म्हणजे सकाळी सातचं बातमीपत्र… याची वेळ कधीच बदलली गेली नाही. फक्त सकाळीही एक प्रादेशिक बातमीपत्र सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर सातची वेळ सकाळच्या महाराष्ट्र माझाला आणि साडे सातची वेळ सकाळच्या राष्ट्रीय बातमीपत्राला देण्यात आली. हा एक तास पूर्णपणे न्यूजचा होता.

त्यानंतर दुपारी एकच्या बातमीपत्रासाठीही अनेक प्रयोग करण्यात आले, ईटीव्हीवर बातम्या प्रसारीत व्हायला सुरूवात झाली, तीच मुळी दुपारी एक वाजल्यापासून… म्हणजे नऊ जुलै दोन हजार साली दुपारी एक वाजता पहिलं न्यूज बुलेटिन माधुरी गुंटी यांनी वाचलं. त्यानंतर बरेच दिवस एक वाजता पाच मिनिटाचं बुलेटिन प्रसारित व्हायचं, नंतर हे बुलेटिन अर्ध्या तासाचं करण्यात आलं, मध्येच काही काळासाठी ते बंद करण्यात आलं, पुन्हा सुरू करण्यात आलं… असे बरेच प्रयोग झाल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता आणि नंतर पाऊण वाजताही या बुलेटिनच्या प्रसारणासाठी वेळ दिल्याचं ऐकण्यात आलं. (सध्याची स्थिती आणि ड्युरेशन माहिती नाही)

ईटीव्हीवर सुरवातीच्या काळात असंच कधी तरी आपली मुंबई हे फक्त मुबईसाठी असलेलं बातमीपत्र सुरू झालं. या बुलेटिनच्या बाबतीत एक मात्र ठळकपणे नमूद करावं लागेल, की या बुलेटिनच्या जन्मापासून कधीही याची वेळ बदलण्यात आलेली नाही…

तासातासाच्या बुलेटिन्सचा आढावा अशासाठीही महत्वाचा ठरतो, कारण या बुलेटिन्सने ईटीव्हीमधील सर्व स्थित्यंतरे पाहिलीत. वेगवेगळे वृत्तविभाग प्रमुख… वेगवेगळे अँकर्स तंत्रज्ञानातले बदल… सर्व काही पाहून, अनुभवून झाल्यानंतर स्वतःच बंद होणं…

अगदी सुरवातीच्या काळात ईटीव्हीवरील बुलेटिन्स रेकॉर्डेड असायची… म्हणजे बुलेटिन प्रसारित होण्यापूर्वी पाच ते दहा मिनिटे ती रेकॉर्ड व्हायची आणि ती टेप नंतर एमसीआरकडे प्रक्षेपणासाठी सोपवली जायची… त्यानंतर अचानक आपण लाईव्ह असल्याचं सांगण्यात आलं… म्हणजे रेकॉर्डिंग करून त्यामध्ये काही त्रुटी किंवा चुका असतील तर त्या एडिटिंगमध्ये काढण्याची सोय बंद झाली, जे काही करायचं ते थेट करायचं…

ईटीव्हीवर प्रसारित झालेलं पहिलं बुलेटिनही पाच मिनिटाचंच होतं तर लाईव्ह झालेलं पहिलं बुलेटिनही पाच मिनिटाचंच होतं… त्यानंतर तंत्रज्ञानाच्या क्रांतीचा मुद्दा आला… आणि ईटीव्हीमधील टेप हा प्रकार बंद झाला. सर्व काही डिजीटल आणि व्हर्च्युअल… टेप बंद झाल्याबरोबर एडिट सुट आणि व्हिडीओ एडिटरवरही संक्रात आली. कॉपी एडिटर्सनेच आपापली पॅकेजेस एडीट करायची असा निर्णय झाला. प्रत्येक कॉम्युटर हा एक एडीट सुट झाला. आणि नव्या बिल्डिंगमध्ये पीसीआर पाचव्या मजल्यावरून तळघरात मायनस दोन मजल्यावर आले… तिथेही कुठेच टेप हा प्रकार नव्हता. सर्व काही डिजीटाईज…

इतकंच नाही तर सुरवातीच्या काळात बातम्यांचे अँकर स्क्रीप्ट किंवा पेकेज स्टोरीचे स्क्रीप्ट लिहिण्यासाठी कॉम्प्युटरचा वापरही अजून व्हायचा होता, अवरली बुलेटिनच्या सुरवातीच्या काळात… आपल्याकडे रायटिंग पॅड असतं ना तसेच काही पॅड असायचे.. न्यूज प्रिंटपासून बनवलेले… त्यावर ईटीव्ही न्यूज… तारीख, बुलेटिनचं नाव, वेळ, ड्युरेशन असा तपशील छापलेला असायचं, हा मजकूर भरूनच मग तुम्हाला त्यावर हस्ताक्षरात अँकर स्क्रीप्ट लिहावा लागे. बातमी आयत्यावेळी अँकरच्या हातात थेट द्यायची असेल तर ती स्वच्छ आणि चांगल्या हस्ताक्षरात लिहिलेली असेल तरच द्यायची किंवा टॉकबॅक वरून पुरेशी माहिती द्यायची… एरवी बुलेटिन सुरू हौण्यापूर्वी टीपी ऑपरेटर कॉपी एडिटर्सने हातांनी लिहिलेल्या सर्व बातम्या प्रॉम्प्टरवर टाईप करत बसत… तंत्रज्ञानाच्या ओघात टीपी ऑपरेटर, व्हिडिओ एडिटर, सीजी ऑपरेटर ही नाहीशी झाली, ही सर्व कामे संपादकीय सहकाऱ्यांनी करायची असा फतवा जारी झाला.

याच काळात पाच मिनिटांच्या छोट्या बातम्यांनी पाहिलेलं आणखी एक महत्वाचं स्थित्यंतर म्हणजे स्टुडिओमधून कॅमेरामनची कपात… पीसीआरमधून रिमोटने ऑपरेट करता येणारे कॅमेरे बसवण्यात आल्यानंतर स्टुडिओमध्ये कॅमेरामन ठेवण्याची आवश्यकताच उरली नाही… त्यापूर्वी अँकर आणि त्यांच्यासमोरचा कॅमेरामन दोघांना स्वतंत्र कमांड द्याव्या लागत… आता कॅमरा रिमोटने ऑपरेट झाल्यानंतर कॅमेरामन शिवायची पहिली बुलेटिन्सही अवरली म्हणजे तासातासाचीच होती.

सुरवातीच्या काळात टेप होत्या तेव्हा, चौथ्या मजल्याच्या एडीट सुटमधून तयार झालेली एडीट मास्टरची स्टोरी टेप पाचव्या मजल्यावरील पीसीआरमध्ये धावत-पळत जाऊन पोचवावी लागे, अगदीच पोहोचणं शक्य नसेल तर गुळगुळीत फरळीवरून टेप सरकवायची… थोडा जास्त चोर लावला तर टेप पीसीआरच्या दारात… कॅरम बोर्डवर सोंगट्या फिरल्यासारखी.. पण डीजीटाईज तंत्रज्ञानात सिस्टिम हँग झाली तर गप्प बसून राहण्याशिवाय काही पर्याय नव्हता.

अवरली बुलेटिन्स मुळात पाच मिनिटांची… सुरवातीच्या काळात जाहिराती नव्हत्या तेव्हा ओपनिंग-क्लोजिंग मोटांज वजा जाता चांगली साडेचार मिनिटे बातम्यांसाठी मिळायची, पण जाहिराती आल्यानंतर हा वेळ कमी झाला. पण त्याहीवेळी टेप्स असताना व्हिज्युअल्स आणि बाईटसाठी दोन वेगवेगळ्या टेप्स प्रॉडक्शनच्या सहकाऱ्यांना सोबत घ्याव्या लागत. पाच मिनिटांच्या बुलेटिनला अर्धा तास अवकाश असतानाच पॅनल प्रोड्यूसरची रन ऑर्डर मागण्याची घाई सुरू व्हायची, कारण कॉपी एडिटरने रन ऑर्डर दिल्यानंतर त्याला सर्व आवश्यक टेप जमवाव्या लागत, अँकर आणि टीपी ऑपरेटर यांना सोबत घेऊन पीसीआरमध्ये दाखल व्हावं लागे, मग ऑडिओ-व्हिडिओ टेस्ट झाल्यानंतर बुलेटिन वाचायला सुरूवात… पाच मिनिटांच्या बुलेटिनसाठी पाच मिनिटे अगोदर आणि अर्ध्या तासाच्या बुलेटिनसाठी पंधरा मिनिटे अगोदर अँकरने पीसीआरमध्ये स्टँडबाय असलंच पाहिजे, हा एक नियमच होता तिथे…

हा सर्व दहा वर्षांचा इतिहास आहे… ही दहा वर्षे टेलिव्हिजनमधल्या बदलांची, तंत्रज्ञानाच्या प्रगतीची आहेत… या दहा वर्षात या बुलेटिन्समुळे ईटीव्हीची बातमीपत्रे ठसठसीतपणे लोकांसमोर आली… सर्व सामान्य प्रेक्षकांना हे तांत्रिक बदल कधीच समजले नसतील, कारण त्यांच्यापर्यंत कोणत्याही माध्यमातून (टेप असो की डिजीटाईज) बातम्या पोहोचतच होत्या… त्यांना फक्त या बातम्या बंद करण्यात आल्यानंतरच काय ते कळेल… पण 24 तास बातम्या देणारे इतरही पर्याय उपलब्ध झाल्यामुळे प्रेक्षकांना तसा काहीच फरक पडणार नाही. त्यांना फक्त बातम्या हव्यात, त्या जिथे मिळतील, ते चॅनेल आपलं…

सध्याच्या 24 अवर्स न्यूज चॅनेल्सला कॉम्पिट करू शकतील, अशी पाच मिनिटांची बुलेटिन्स डिझाईन्स करता आली नसती का? तसं झालं असतं तर ही बुलेटिन्स बंद झाली नसतीच उलट या दहा वर्षांच्या लंब्या इनिंगनंतरही नव्या चॅनेलांच्या स्पर्धेत टिकून राहता येईल, असा कॉन्टेन्ट जनरेट करून स्पर्धेत टिकून राहण्याचा आणखी एक पराक्रम या बुलेटिन्सच्या नावावर जमा झाला असता. पण ही सर्व जर-तरची भाषा झाली… तोपर्यंत अवरली बुलेटिन्स बंद झाली, हेच वास्तव आणि त्याची रूखरूख हे ही आणखी एक वास्तव…

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Join the Conversation

7 Comments

  1. ही पाच पाच मिनिटांची बुलेटिन करत करतच आम्ही घडलो अस मला तरी वाटत….

  2. मेघराजजी, तुमच्या कितीतरी मागून मी ई टिव्हीत रुजू झालो त्यामुळे मला तुमच्या मार्गदर्शनाखाली पाच मिनिटांच्या बातमीपत्रांची कार्यशाळा मिळाली. या बातमीपत्राने जे शिकविले, घडविले आणि जे ऐकविले ( सर्वात जास्त आपणच ऐकविले हा भाग वेगळा ) ते खरोखरीच अविस्मरणिय आहे. त्यानंतर तुम्ही दुपारच्या शिप्टला ( बी ) गेलात. तुम्ही जेंव्हा ऑफीसात येत असत तेंव्हा माझी चारची गडबड सुरू असतानाही माझ्या मानगुटीस धरून कँटीनपर्यंत अक्षरशः ओढत नेऊन चहा वसूल करणारे तुम्ही पण सिगारेट स्वतःच्याच पैशाने घेणारेही तुम्ही. आपणच, प्रमोद महाजनांवर झालेल्या गोळीबाराची बातमी पहिल्यांदा अगदी शेवटच्या तीन मिनिटांत म्हणजे 8 :47 ला हाती आल्यावरही प्रसारीत केली होती ड्राय न्यूज या स्वरुपात. अशा अनेक आठवणी आहेत.
    याच बातमीपत्राच्या अनुषंगाने आपण मला सांगितलेली एक गोष्ट आजही मी विसरलो नाही. तुम्ही चुका करू शकता फक्त एक चुक दुसऱ्यांदा घडू देऊ नका.

  3. मेघराज, इतके छान लिहिलय, आणि कदाचित तुम्हाला आठवत नसे, पण तुम्ही मलाही खूप शिकवलय.
    ते सगळे सान्गायची ही जागा नाही. पण या लेखामुळे पुन्हा लक्षात आले की ईटीव्हीवाले ईटीव्हीला विसरत नाहीतच.

  4. मेघराज,आमच्या सारख्या सर्व सामान्य माणसाला पुष्कळस समजू शकेल, कळेल अशी माहिती अतिशय ओघवत्या भाषेत दिल्या बद्दल मना पासून धन्यवाद. खरे तर न्यूमॅटिक कॅमेरा येऊ घातला असतांनाच माझ्या सारख्याचा मराठी चित्रपट सृष्टीशी जो काही अगदी थोडाफार संबंध आला होता तो हि संपला होता.त्या मुळेच आता आपला हा लेख वाचल्यावर आत्ताच्या काळात मिडीया क्षेत्रात काम करणे किती कठीण आहे ह्याची प्रकर्षाने जाणीव झाली.तुम्हा लोकांची कमाल आहे..कमाल.दूरदर्शन वरील गजरा नि साप्ताहिकी ह्या सारख्या एके काळच्या लोकप्रिय कार्यक्रमां प्रमाणेच ई टी व्ही वरील बातमीपत्रे आम्ही सामान्य प्रेक्षक सहजा सहजी विसरू शकणार नाही एवढे मात्र खरे.आपल्या माहीतीपूर्ण लेखा बद्दल धन्यवाद.

  5. Superb! very well written. This made me nostalgic and I reached to RFC while reading it. Meghraj, our team was great ( I joined in April 2001) and I am proud of being Etvian !

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: