भारतीय टेलीव्हिजनवर सध्या जिकडे पाहावं तिकडे रिअॅलिटी शोचा दबदबा आहे, वेगवेगळ्या धाटणीचे शोंचा रतीब सर्वच चॅनेलांवर सुरूय. या सर्व रिअॅलिटी शो मध्ये साम्य काय तर सर्वच्या सर्व शो किंवा त्यांच्या मध्यवर्ती कल्पना या कोणत्या ना कोणत्या विदेशी चॅनेलवरून किंवा कार्यक्रमांवरून उचललेल्या असतात. अनेकदा त्या मूळ कार्यक्रमांचं किंवा कॉन्सेप्ट डिझायनरचं नावही बाइज्जत दिलं जातं.
तसं पाहिलं तर रिअॅलिटी टीव्हीचा खरे मानकरी ठरतात, ते म्हणजे न्यूज चॅनेल… जे काही चाललंय, ते सर्व खरंखुरं… याची देही याची डोळा. न्यूज चॅनेलच्या यशातच कुठेतरी रिअॅलिटी शोच्या यशस्वी होण्यामागचं कारण दडलेलं असावं… रिअॅलिटी शो साठी कुठलीही स्टोरी किंवा स्क्रीप्ट लागत नाही. सगळं काही उत्स्फूर्त… म्हणूनच ते प्रेक्षकांच्या अधिकाधिक जवळ जाणारं आणि त्यांना जास्तीत जास्त भावणारं असावं..
आपल्याकडे रिअॅलिटी शो चा रतीब सुरू झाला कौन बनेगा करोडपतीपासून… यामुळे भारतीय टेलीव्हिजनचं संगळं रंगरूपच पालटून टाकलं. त्यानंतर वेगवेगळ्या गेम शोंची लाटच आली. हिंदी सिनेमांमध्ये होतं तसं म्हणजे एखादा विषय हिट झाला की सगळे त्याच प्रकारचे सिनेमे बनवण्याची लाट येते… तसंच या करोडपतीनंतर झालं.
करोडपती नंतर जेवढे काही म्हणून रिअॅलिटी शो आलेत, ते सर्वच्या सर्व युरोप-अमेरिकेतल्या लोकप्रिय रिअॅलिटींची कॉपी आहेत. आपल्याकडे एकही संकल्पना प्रसवली जाऊ नये, एवढं भारतीय टॅलेन्ट कुचकामी आहे का? हा नेहमीच सतावणारा प्रश्न…
भारतीय टेलीव्हिजनचा इतिहास जेमतेम वीस वर्षांचा… त्यात आतापर्यंत वेगवेगळ्या चॅनेलांवर सुमारे शंभरेक तरी रिअॅलिटी शो सादर झाले असतील, पण सगळेच्या सगळे कॉपीच… नाही म्हणायला एक अपवाद आहे… तो म्हणजे अंताक्षरीचा… अगदी सुरवातीला म्हणजे माझ्या लहानपणी अन्नू कपूर आणि त्यांची एक कुणीतरी महिला सहकारी झी टीव्हीवर अंताक्षरी हा खराखुरा भारतीय म्हणावा असा आणि कुणाही परकीय रिअॅलिटीची कॉपी नसलेला कार्यक्रम यायचा… त्याचीही भारतातल्या अनेक टीव्ही चॅनेलांनी कॉपी केली. त्यानंतर आला करोडपती… करोडपतीनंतर आपल्याकडे परदेशी हिट झालेल्या गेम शो सादर करण्याची रांगच लागलीय.
रिअॅलिटी शो मध्ये टॅलेन्ट हंट, गेम शो, सेलिब्रिटी शो, मेक ओव्हर शो, डॉक्युमेंटरी, अॅडव्हेंचर शो… असे अनेक प्रकार आहेत. त्याशिवाय आता बायको गावाला गेल्यावर, दोन घरातल्या प्रमुख स्त्रिया किंवा आयांची अदलाबदल, किंवा अडवळणातल्या गावी शहरातल्या चिकण्या पोरी गेल्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीवर रिअॅलिटी शो आलेत. त्याशिवाय लग्नासारखा गंभीर विषयचाही रिअॅलिटीवाल्यांनी गेम शो केला. खरं तर आपल्याकडे रामायण-महाभारतापासून स्वयंवराची संकल्पना आहे, तरीही आपल्याला या गेम शो ची कॉन्सेप्टही युरोप-अमेरिकेतल्या रिअॅलिटीवाल्यांकडून आयात करावी लागली.
रिअॅलिटी शो हे आता भारतीय टेलीव्हिजनचे अविभाज्य घटक बनलेत. त्यांच्याशिवाय कोणत्याही टेलीव्हिजन चॅनेलची कल्पनाच करताच येत नाही. रिअॅलिटी शो लोकप्रिय होण्याची अनेक कारणं आहेत… त्यातलं सर्वात प्रमुख म्हणजे अशा कार्यक्रमांची प्रेक्षकाभिमुखता… म्हणजे प्रेक्षकांना काय हवंय, किंवा काय बघायला आवडेल ते द्या आणि दुसरं अशा कार्यक्रमात निर्मितीपासून शेवटापर्यंत वेगवेगळ्या मार्गांनी प्रेक्षकांना सामावून घ्या… असं केलं की बनतो हिट शो… मग कधी एसएमएसच्या माध्यमातून तर कधी प्रेक्षकांनाच कार्यक्रमांचा एक भाग बनवून तयार होतात, रिअॅलिटी शो… मालिकांच्या झगमगाटांच्या तुलनेत खर्चही कमी असल्याने असे शो बजेटमध्येही मावतात.
रिअॅलिटी टीव्हीचा इथल्या सामान्य जनमानसावर होणारा परिणाम किंवा त्याचं यशापयश हा माझ्या लिहिण्याच्या हेतूच नाहीच. हा खरं तर एक पूर्णपणे वेगळा आणि गंभीर विषय आहे. पण भारतासारख्या टॅलेन्टेड देशात एकही जेन्युईन आयडिया आतापर्यंत रिअॅलिटीच्या माध्यमातून प्रत्यक्षात येऊ नये. स्वयंवरासारखा विषयही आपल्याला परदेशातून आयातच करावा लागतो. नाही म्हणायला अंताक्षरी एकमेव रिअॅलिटीने पूर्णपणे भारतीय प्रोग्राम असल्याचा मान कायम ठेवलाय.
आपल्याकडे समृद्ध आणि रसरशीत जगणं आहे, दणकट लिखाण आहे, रामायण-महाभारतासारखी उभ्या आयुष्याचं सार मांडणारी महाकाव्ये आहेत, त्यातल्या पानांपानांवर कित्येक दणकट रिअॅलिटी शो आहेत, तितक्यात लोकविध परंपरा, भाषा, संस्कृती आणि त्यांची वैशिष्ट्ये आहेत, तरीही या मातीतला आणि कुणाचीही कॉपी नसलेला भारतीय रिअॅलिटी शो अजून भारतीय टीव्हीवर सादर व्हायचाय. कदाचित टीव्हीसाठी प्रोग्राम बनवणारांचे काही ठोकताळे पक्के असावेत, जे प्रूव्हन आहे, तेच पुन्हा भारतीय रंगरूपात दाखवा, म्हणजे यशस्वी होईल… त्यामुळे खर्चही वाचेल, शिवाय मेहनत आणि रिसर्च वगैरेसाठी जास्त डोकेफोड करावी लागणार नाही. म्हणजे प्रयोग करण्याचा धोका नको, कारण रिस्क घ्यायची तयारी नाहीच.
यामुळे अजून पुढची कितीतरी वर्षे आपल्याला परदेशी कल्पना भारतीय रंगरूपात पाहाव्या लागतील.